पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे आयोजित होत असलेल्या महिनाभर चालणाऱ्या 'काशी तमिळ संगमम" या कार्यक्रमाचे आज उद्घाटन केले. तमिळनाडू आणि काशी या देशातील अतिशय महत्त्वाच्या आणि प्राचीन अध्ययन केंद्रांमध्ये अनेक शतकांपासून असलेला सबंधांचा नव्याने शोध घेणे, त्यांची पुष्टी करणे आणि त्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तमिळनाडूमधील 2500 पेक्षा जास्त प्रतिनिधी काशीला भेट देणार आहेत. आज झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी 'तिरुक्कुरल' या पुस्तकाचे 13 भाषामधील भाषांतरित आवृत्त्यांसह प्रकाशन केले. आरतीनंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहिले.
यावेळी या कार्यक्रमात पंतप्रधानांनी या कार्यक्रमासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. जगातील अस्तित्वात असलेल्या सर्वाधिक प्राचीन शहरांमध्ये हे संमेलन होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. देशातील संगमांच्या महत्त्वाबाबत बोलताना ते म्हणाले, संगम हा नद्यांचा, विचारसरणीचा, विज्ञानाचा वा ज्ञानाचा असो, संस्कृती आणि परंपरा यांचा संगम भारतात साजरा केला जातो आणि त्याचा आदर केला जातो. प्रत्यक्षात हा भारताचे सामर्थ्य आणि विविध गुणवैशिष्ट्यांचा उत्सव असल्याने काशी-तमिळ संगम अतिशय वेगळा आहे.
काशी आणि तमिळनाडू यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की एकीकडे काशी भारताची सांस्कृतिक राजधानी आहे आणि तर तमिळनाडू आणि तमिळ संस्कृती भारताची प्राचीनता आणि अभिमानाचे केंद्र आहे. गंगा आणि यमुना नद्यांच्या संगमाशी याचे साधर्म्य स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की अपरिमित संधी आणि शक्तींना सामावून घेणारा काशी-तमिळ संगमम हा देखील तितकाच पवित्र आहे. या संस्मरणीय संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकार आणि त्यांच्या शिक्षण मंत्रालयाचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि या कार्यक्रमासाठी पाठबळ देणाऱ्या आयआयटी मद्रास आणि बीएचयूसारख्या केंद्रीय विद्यापीठांचे आभार मानले. काशी आणि तमिळनाडूमधील विद्यार्थी आणि विद्वानांचे त्यांनी विशेषत्वाने आभार मानले.
काशी आणि तमिळनाडून आपली संस्कृती आणि सभ्यतांची कालातीत केंद्रे आहेत ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. संस्कृत आणि तमिळ या सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वाधिक प्राचीन भाषांपैकी आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. काशीमध्ये आपल्याकडे बाबा विश्वनाथ आहेत तर तमिळनाडूमध्ये आपल्याला भगवान रामेश्वराचे आशीर्वाद मिळतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. काशी आणि तमिळनाडू ही दोन्ही स्थाने शिवामध्ये बुडालेली शिवमय स्थाने आहेत. संगीत, साहित्य वा कला असो काशी आणि तमिळनाडू नेहमीच कलेचे स्रोत राहिले आहेत.
भारताची समृद्ध परंपरा आणि संस्कृती यावर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की ही दोन्ही ठिकाणे भारताच्या सर्वोत्तम आचार्यांची जन्मस्थाने आणि कर्मभूमी म्हणून ओळखली जातात. एखाद्याला काशी आणि तमिळनाडू या दोन्ही ठिकाणी सारख्याच उर्जेची अनुभूती होते, असे त्यांनी अधोरेखित केले. अगदी आजसुद्धा पारंपरिक तमिळ विवाहांच्या मिरवणुकीत काशी यात्रेचे महत्त्व दिसून येते, असे ते म्हणाले. तमिळनाडूचे काशीसाठी असलेले अनंत प्रेम एक भारत श्रेष्ठ भारतचे महत्त्व सिद्ध करते जी आपल्या पूर्वजांची जीवनशैली होती, असे त्यांनी सांगितले.काशीच्या विकासामधील तमिळनाडूचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तमिळनाडूत जन्म झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बनारस हिंदू युनिवर्सिटीचे(बीएचयू) कुलगुरु होते याची आठवण त्यांनी करून दिली. काशीमध्ये वास्तव्य करणारे वेदिक विद्वान राजेश्वर शास्त्री यांची देखील मूळे तमिळनाडूमध्ये होती, असे ते म्हणाले. काशीमध्ये हनुमान घाट येथे राहणाऱ्या श्रीमती पट्टवीरम शास्त्री यांची उणीव काशीमधल्या लोकांना नेहमीच जाणवेल असे त्यांनी सांगितले. हरिश्चंद्र घाटाच्या काठावर असलेल्या काशी काम कोटेश्वर पंचायतन मंदिर या तमिळ मंदिराची आणि दोनशे वर्षे जुन्या कुमारस्वामी मठ आणि केदारघाटावरली मार्कंडे आश्रम यांची पंतप्रधानांनी माहिती दिली. केदार घाट आणि हनुमान घाटाच्या काठावर तमिळनाडूमधील अनेक लोक राहत असून त्यांनी अनेक पिढ्यांपासून काशीच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले. मूळचे तमिळनाडूचे असलेले आणि अनेक वर्षेमध्ये काशीमध्ये राहिलेले महान कवी आणि क्रांतिकारक सुब्रह्मण्य भारती यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. सुब्रह्मण्य भारती यांच्या सन्मानार्थ बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्यांच्या नावाने अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत काळादरम्यान काशी- तमिळ संगम होत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "अमृत काळामध्ये संपूर्ण देशाच्या एकतेने आपले सर्व संकल्प पूर्ण होतील." असे पंतप्रधान म्हणाले. भारत हे हजारो वर्षांपासून नैसर्गिकरित्या सांस्कृतिक ऐक्य टिकून असलेले राष्ट्र आहे, असे ते म्हणाले. सकाळी उठल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण करण्याच्या परंपरेचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, आपण आपल्या दिवसाची सुरुवात देशाच्या आध्यात्मिक एकतेचे स्मरण करून करतो. आपली हजारो वर्षांची परंपरा आणि वारसा बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याबद्दलही मोदींनी खेद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, काशी-तमिळ संगमम् हे आज या संकल्पासाठी एक व्यासपीठ बनेल आणि आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देईल तसेच राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी उर्जेचा स्रोत बनेल.
भाषांचे बंधन तोडण्याच्या आणि बौद्धिक अंतर ओलांडण्याच्या या वृत्तीतूनच स्वामी कुमारगुरुपर काशीत आले आणि त्यांनी काशीला आपली कर्मभूमी बनवत काशीमध्ये केदारेश्वर मंदिर बांधले, असे पंतप्रधानांनी सांगितले. नंतर त्यांच्या शिष्यांनी कावेरी नदीच्या काठी तंजावर येथे काशी विश्वनाथ मंदिर बांधले. तमिळ राज्य गीत लिहिणाऱ्या मनोनमनियम सुंदरनार यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा आणि काशीशी त्यांच्या गुरूच्या संबंधाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी तमिळ विद्वान आणि काशी यांच्यातील दुव्याचा पुनरुच्चार केला. उत्तर आणि दक्षिणेला जोडण्यासाठी राजाजींनी लिहिलेल्या रामायण आणि महाभारताच्या भूमिकेचेही पंतप्रधानांनी स्मरण केले. “हा माझा अनुभव आहे की रामानुजाचार्य, शंकराचार्य, राजाजी ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांसारख्या दक्षिण भारतातील विद्वानांना समजून घेतल्याशिवाय आपण भारतीय तत्त्वज्ञान समजू शकत नाही,” असे मोदी यांनी स्पष्ट केले.
‘पंच प्रण’ चा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, समृद्ध वारसा असलेल्या देशाला आपल्या वारशाचा अभिमान वाटला पाहिजे. जगातील सर्वात जुन्या प्रचलित भाषांपैकी एक म्हणजे तमिळ असूनही तिचा सन्मान करण्यात आपण कमी पडतो याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. “तामिळ भाषेचा वारसा जपणे आणि समृद्ध करणे ही 130 कोटी भारतीयांची जबाबदारी आहे. जर आपण तमिळकडे दुर्लक्ष केले तर आपण राष्ट्राचे खूप मोठे नुकसान करु आणि जर आपण तामिळला बंधनात अडकवून ठेवले तर आपण त्या भाषेचे मोठे नुकसान करू. भाषिक भेद दूर करून भावनिक ऐक्य प्रस्थापित करण्याची गरज आपण लक्षात घेतली पाहिजे,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, संगमम हा शब्दांमध्ये वर्णन करण्यापेक्षा अधिक तो अनुभवण्याचा विषय आहे. काशीचे लोक संस्मरणीय आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तमिळनाडू आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये असे कार्यक्रम आयोजित केले जावेत आणि देशाच्या इतर भागांतील तरुणांनी तेथील संस्कृती आत्मसात करावी, अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. या संगममचे फायदे संशोधनातून पुढे नेण्याची गरज आहे आणि या बीजाचा महाकाय वृक्ष झाला पाहिजे, असा विश्र्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्री डॉ. एल मुरुगन, धर्मेंद्र प्रधान आणि खासदार इलैयाराजा आदी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असलेल्या सरकारसाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या कल्पनेचा प्रचार करणे हा प्रमूख मुद्दा राहिलेला आहे. याच दृष्टिकोनातून आणखी एक उपक्रम, ‘काशी तमिळ संगमम’ हा महिनाभर चालणारा कार्यक्रम काशी (वाराणसी) येथे आयोजित केला जात आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे तामिळनाडू आणि काशी - या देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि प्राचीन शिक्षणाच्या दोन ठिकाणांमधले जुने संबंध साजरे करणे, ते संबंध अधिक दृढ करणे आणि त्यांचा पुन्हा शोध घेणे हा आहे. दोन प्रांतातील विद्वान, विद्यार्थी, तत्वज्ञ, व्यापारी, कारागीर, कलाकार इत्यादी सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणे, त्यांचे ज्ञान, संस्कृती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आणि परस्परांच्या अनुभवातून नवनवीन शिकण्याची संधी प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तामिळनाडूतील 2500 हून अधिक प्रतिनिधी काशीला भेट देणार आहेत. ते समान व्यापार, व्यवसाय आणि स्वारस्य असलेल्या स्थानिक लोकांशी संवाद साधतील आणि परिसंवाद, विविध स्थळांना गाठीभेटी आदी उपक्रमामध्ये सहभागी होतील. दोन्ही राज्यातील हातमाग, हस्तकला, ओडीओपी उत्पादने, पुस्तके, माहितीपट, पाककृती, कला प्रकार, इतिहास, पर्यटन स्थळे इत्यादींचे महिनाभर चालणारे प्रदर्शनही काशीमध्ये भरवले जाणार आहे.
हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चाच एक भाग असून भारतीय ज्ञान प्रणालीच्या संपत्तीला आधुनिक ज्ञान प्रणालींशी जोडण्यासाठी यात भर दिला जात आहे. आयआयटी(IIT) मद्रास आणि बनारस हिंदू विदयापीठ (BHU) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या दोन संस्था आहेत.
Kashi-Tamil Sangamam is exceptional. It is a celebration of India's diversity. pic.twitter.com/gX4495ghod
— PMO India (@PMOIndia) November 19, 2022
A special connect... pic.twitter.com/WBYRwNwqet
— PMO India (@PMOIndia) November 19, 2022
Kashi and Tamil Nadu... They are timeless centers of our culture and civilization. pic.twitter.com/Pn4GDt6gMf
— PMO India (@PMOIndia) November 19, 2022
India believes in the mantra of ‘सं वो मनांसि जानताम्’ pic.twitter.com/R0v4wPCRxn
— PMO India (@PMOIndia) November 19, 2022
Several scholars from the South have made invaluable contributions towards enriching our insights about India. pic.twitter.com/835OjPUVdc
— PMO India (@PMOIndia) November 19, 2022
It is the collective responsibility of 130 crore Indians to preserve the rich Tamil heritage. pic.twitter.com/rTDHEsLTpx
— PMO India (@PMOIndia) November 19, 2022