उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे केले उद्घाटन
आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचा शुभंकर, संग्रहालयातील एक दिवस- या विषयावरील चित्रमय कादंबरी, भारतीय संग्रहालयांची मार्गदर्शिका, कर्तव्य पथाविषयी माहिती देणारा छोटा नकाशा आणि संग्रहालयाची चित्रकार्डे यांचे केले अनावरण
“हे संग्रहालय भूतकाळापासून प्रेरणा देते आणि भविष्यातील कर्तव्यांची जाणीव ही करून देते”
“देशामध्ये एका नवीन सांस्कृतिक पायाभूत सुविधेची उभारणी होत आहे”
“प्रत्येक राज्य तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या वारशासह स्थानिक तसेच ग्रामीण भागातील संग्रहालयांचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे एक विशेष अभियान चालवले जात आहे”
“पिढ्यानपिढ्या जपण्यात आलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आता संपूर्ण जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांना एकत्र आणत आहेत”
“आपला वारसा जागतिक एकात्मतेचा अग्रदूत होऊ शकतो”
“ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूंची जपणूक करण्याचा गुण समाजमनात रुजविला पाहिजे”
“कुटुंबे, विद्यालये, विविध संस्था आणि शहरे यांनी त्यांची स्वतःची संग्रहालये निर्माण केली पाहिजेत”
“युवा वर्ग जागतिक सांस्कृतिक कार्याचे माध्यम होऊ शकतो”
“कोणत्याही देशाच्या कुठल्याही संग्रहालयात अशा प्रकारची कलाकृती असता कामा नये जी तेथे अवैध मार्गाने पोहोचली आहे. या तत्वाला आपण सर्वच संग्रहालयांसाठी नैतिक वचनबद्धतेचे स्वरूप दिले पाहिजे”
“आपण आपल्या वारशाचे जतन करू आणि नवा वारसा निर्माण देखील करू”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन केले. तसेच त्यांनी दिल्ली परिसरातील उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे देखील उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी तंत्रज्ञान मेळा, संवर्धन प्रयोगशाळा तसेच या निमित्त सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनांतून फेरफटका मारला. “संग्रहालये, शाश्वतता आणि स्वास्थ्य’ या यंदाच्या संकल्पनेसह 47 वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

 

यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगाचे विशेष महत्त्व सांगताना पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच, या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाच्या निमित्ताने तंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहासाचे विविध अध्याय सजीव होत आहेत. ते म्हणाले की जेव्हा आपण या संग्रहालयात प्रवेश करतो तेव्हा आपण भूतकाळात गुंगून जातो. हे संग्रहालय तथ्ये आणि पुराव्यांवर आधारित सत्ये आपल्यासमोर ठेवते तसेच ते भूतकाळापासून प्रेरणा देते आणि भविष्यातील कर्तव्यांची जाणीव देखील करून देते.

ते म्हणाले की आजच्या ‘शाश्वतता आणि स्वास्थ्य’या संकल्पनेतून आजच्या जगाचे प्राधान्यक्रम अधोरेखित होतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रसंगोचित ठरतो.आपल्या आजच्या प्रयत्नांमुळे युवा पिढीला त्यांच्या वारशाविषयी अधिक जाणून घेण्यात मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आज झालेल्या उद्घाटनाच्या पूर्वी, या संग्रहालयाच्या उभारणी कार्याला दिलेल्या भेटीचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या मनावर मोठा प्रभाव टाकण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या नियोजन तसेच अंमलबजावणी यांच्या संदर्भातील प्रयत्नांची प्रशंसा केली. आजचा कार्यक्रम भारतातील वस्तुसंग्रहालयांच्या जगतासाठी प्रचंड मोठा निर्णायक टप्पा ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

 

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात प्राचीन हस्तलिखिते आणि ग्रंथालये जळून खाक झाली, यामुळे या भूमीचा बराचसा वारसा नष्ट झाला. हे केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाच्या वारशाचेही नुकसान असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपल्या भूमीचा बऱ्याच काळापासून गमावलेला वारसा पुनरुज्जीवित आणि जतन करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रयत्नांचा अभाव राहिला याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. याबाबत नागरिकांमध्येही जागरूकता नसल्यामुळे आणखी मोठा परिणाम झाला.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात घेतलेल्या ‘पंच प्रण’ किंवा पाच संकल्पांचे स्मरण करून ‘आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे’ यावर पंतप्रधानांनी भर दिला. देशाची नवीन सांस्कृतिक पायाभूत सुविधा विकसित होत असल्याचेही अधोरेखित केले. या प्रयत्नांमध्ये, कोणालाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास तसेच देशाचा हजारो वर्षांचा वारसा सापडेल असे पंतप्रधान  म्हणाले. प्रत्येक राज्याच्या आणि समाजातील घटकांच्या वारश्यासह स्थानिक आणि ग्रामीण वस्तू संग्रहालयांचे संवर्धन करण्यासाठी शासन विशेष मोहीम राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समुदायांचे योगदान संस्मरणीय करण्यासाठी दहा विशेष वस्तू संग्रहालयांचा विकास सुरू आहे. आदिवासींच्या विविधतेची झलक दर्शवणाऱ्या जगातील सर्वात अनोख्या उपक्रमांपैकी हे एक असेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. देशाचा वारसा जतन करण्याची उदाहरणे पंतप्रधानांनी यावेळी दिली. महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहादरम्यान मार्गक्रमण केलेल्या दांडी पथ, मीठाचा कायदा मोडला त्या ठिकाणी बांधलेल्या स्मारकाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्या दिल्लीतील 5 अलीपूर रोड येथील राष्ट्रीय स्मारकाचा पुनर्विकास केला. त्याचबरोबर त्यांच्या जीवनाशी संबंधित पंचतीर्थ, अर्थात त्यांचा जन्म झाला त्या महू, लंडनमध्ये ते राहीले ते ठिकाण, नागपुरातील ठिकाण जिथे त्यांनी दीक्षा घेतली आणि मुंबईतील चैत्यभूमी जिथे आज त्यांची समाधी आहे या पंचतीर्थाच्या विकासाचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील संग्रहालय, पंजाबमधील जालियनवाला बाग संग्रहालय, गुजरातमधील गोविंद गुरुजींचे स्मारक, वाराणसीतील मान महल संग्रहालय आणि गोव्यातील ख्रिश्चन कला संग्रहालय यांची उदाहरणे दिली. देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या जीवनप्रवास आणि योगदानाला समर्पित असलेल्या दिल्लीतील प्रधान मंत्री संग्रहालयालाचाही त्यांनी उल्लेख केला. पाहुण्यांनी एकदा या संग्रहालयाला भेट द्यावी अशी विनंती त्यांनी केली.

 

जेव्हा एखादा देश आपला वारसा जपतो तेव्हा इतर देशांशीही जवळीक निर्माण होते असे पंतप्रधान म्हणाले. पिढ्यानपिढ्या संरक्षित असून आता जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांना एकत्र आणत असलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांची उदाहरणे त्यांनी दिली. शेवटच्या बुद्ध पौर्णिमेला चार पवित्र अवशेष मंगोलियाला पाठवले. पवित्र अवशेषांचे श्रीलंकेतून कुशीनगर येथे आगमन झाले यांचा उल्लेख त्यांनी केला. त्याचप्रमाणे गोव्याच्या सेंट केटेवनचा वारसा भारताकडे सुरक्षित आहे आणि ते अवशेष पाठवल्यावर जॉर्जियातील उत्साहाची आठवण त्यांनी करुन दिली.  "आपला वारसा जागतिक एकतेचा आश्रयदाता बनला असल्याचे", ते म्हणाले.

भावी पिढ्यांसाठी साधनसंपत्तीचे जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. या वसुंधरेवर आलेल्या अनेक आपत्तींच्या खुणा आणि पृथ्वीच्या बदलत्या चेहऱ्यामोहऱ्याचे सादरीकरण देखील वस्तुसंग्रहालय जतन करू शकतात, असे त्यांनी सुचवले.

 

या प्रदर्शनातील पाककृतीशी संबंधित विभागाचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी भारताच्या प्रयत्नांमुळे वाढत असलेले आयुर्वेदाचे आणि श्री अन्नाचे महत्व विशद केले. नवीन वस्तुसंग्रहालयांनी श्री अन्न आणि अन्य धान्यांच्या प्रवासाबद्दल माहिती द्यावी, असे पंतप्रधान म्हणाले. 

ऐतिहासिक महत्व असलेल्या वस्तूंचे जतन करणे हा जेव्हा देशाचा स्वभाव बनतो, तेव्हाच हे सर्व शक्य होते, असे ते म्हणाले. हे सर्व कशाप्रकारे साध्य करता येईल, हे त्यांनी सविस्तर सांगितले. प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबाचे एक वैयक्तिक कौटुंबिक वस्तुसंग्रहालय बनवावे. आजच्या साध्यासोप्या वस्तू उद्याच्या पिढीसाठी भावनांचा अनमोल ठेवा असू शकतो, असे त्यांनी सांगितले. शाळा आणि अन्य संस्थांनी देखील आपले स्वतःचे वस्तुसंग्रहालय तयार करावे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी शहरांना स्वतःचे शहर वस्तुसंग्रहालय बनवण्याचा सल्ला दिला. यामुळे भावी पिढ्यांसाठी मोठी ऐतिहासिक संपत्ती निर्माण होईल.  

वस्तुसंग्रहालये आता युवावर्गाचा करिअरचा एक पर्याय बनत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आपण या तरुणांकडे केवळ वस्तुसंग्रहालयातील कर्मचारी म्हणून न पाहता इतिहास आणि स्थापत्यशास्त्रासारख्या विषयांशी निगडित व्यक्ती म्हणून पाहिले तर ते जागतिक सांस्कृतिक कृतीचे माध्यम बनू शकतील. हे तरुण देशाचा वारसा परदेशात घेऊन जाण्यासाठी आणि  भूतकाळाबद्दल त्यांच्याकडून शिकण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

पंतप्रधानांनी तस्करी आणि दुर्मिळ कलाकृतींचा अपहार या सामूहिक आव्हानांचा उल्लेख केला आणि प्राचीन संस्कृती असलेले भारतासारखे देश गेली अनेक शतके या आव्हानांचा सामना करत असल्याचे नमूद केले. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील अनेक पुरातन मौल्यवान कलाकृती देशाच्या बाहेर नेण्यात आल्या असे सांगून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येकाने एकत्रपणे कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढत असताना विविध देशांनी भारताचा वारसा परत करण्यास सुरुवात केल्याने त्यांनी आनंदही व्यक्त केला. बनारसमधून चोरलेली माता अन्नपूर्णेची  मूर्ती, गुजरातमधून चोरलेली महिषासुरमर्दिनीची मूर्ती, चोल साम्राज्याच्या काळात निर्माण केलेल्या नटराजाच्या मूर्ती, गुरू हरगोविंद सिंग यांच्या नावाने सजवलेली तलवार अशी उदाहरणे त्यांनी दिली. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये 20 पेक्षा कमी पुरातन वस्तू भारतात परत आणण्यात आल्या त्या तुलनेत गेल्या 9 वर्षांत सुमारे 240 प्राचीन कलाकृती परत मिळवून भारतात आणल्या गेल्या आहेत, असे ते म्हणाले. या 9 वर्षात भारतातून होणारी  पुरातन मौल्यवान कलाकृतींची तस्करीचे प्रमाण देखील बरेच कमी झाले आहे,  असेही त्यांनी नमूद केले.

 

जगभरातील कला क्षेत्रातील तज्ञांना, विशेषतः जे संग्रहालायांशी संबंधित आहेत, नरेंद्र मोदींनी या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले आहे. “कुठल्याही देशातील कुठल्याही संग्रहालयात अशी कुठलीही कलाकृती नसावी जी तिथे चुकीच्या मार्गाने पोचली आहे. आपण सर्व संग्रहालयांनी ही नैतिक कटिबद्धता जपायला हवी,” असे पंतप्रधान म्हणाले. भाषांच्या शेवटी पंतप्रधान म्हणाले, “आपण आपला वारसा तर जपणारच आहोत, त्याच बरोबर नवा वारसा देखील तयार करणार आहोत.”

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच मीनाक्षी लेखी आणि लूव्र संग्रहालय अबुधाबी चे संचालक मॅन्युएल राबाटे यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी :

अंतरराष्ट्रीय संग्रहालय मेळा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून 47 वा अंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची यावर्षीची संकल्पना आहे ‘संग्रहालये, शाश्वतता आणि योग्य निगा’. हा संग्रहालय मेळा अशा पद्धतीने आखण्यात आला आहे, जेणेकरून संग्रहालय तज्ञांमध्ये संग्रहालायांवर समग्र चर्चा आणि संवाद सुरु होईल, ज्या द्वारे संग्रहालये सांस्कृतिक केंद्रे म्हणून विकसित होतील आणि भारताच्या सांस्कृतिक मुत्सद्देगिरीत महत्वाची भूमिका बजावतील.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक इथे निर्माणाधीन असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयाची आभासी पद्धतीने माहिती देणाऱ्या व्हर्च्युअल वॉकथ्रूचेही उद्घाटन केले. भारताच्या वर्तमानाला आकार देणाऱ्या भूतकाळाशी संबंधित ऐतिहासिक घटना, व्यक्तिमत्वे, संकल्पना आणि कामगिरी  पुढे आणणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे यासाठीचे सर्वंकष प्रयत्न म्हणजे हे संग्रहालय आहे.

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय संग्रहालय मेळ्याचा शुभांकर, चित्रमय कादंबरी –वन डे इन म्युझियम, भारतीय संग्रहालायांची निर्देशिका, कर्तव्यपथाचा, खिशात मावेल असा पॉकेट नकाशा आणि संग्रहालय कार्ड यांचे देखील यावेळी उद्घाटन केले.

या आंतरराष्ट्रीय संग्रहालय मेळ्याचा शुभंकर ही एका नृत्यांगनेची मूर्ती आहे, जी चेन्नापट्टम कला शैलीत लाकडातून बनविण्यात आली  आहे. चित्रमय कादंबरीत संग्रहालयाला भेट देणाऱ्या मुलांच्या एका गटाची गोष्ट आहे, जिथे येऊन ते संग्रहालयात उपलब्ध असलेल्या नोकरीच्या विविध संधींबद्दल माहिती घेतात. संग्रहालायांची निर्देशिकेत भारतातील संग्रहालायांची विस्तृत माहिती देण्यात आले आहे. कर्तव्य पथाच्या  नकाशात विविध सांस्कृतिक ठिकाणं आणि संस्थांची माहिती देण्यात आली आहे, तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांची देखील माहिती त्यात आहे. संग्रहालय कार्ड म्हणजे, एक 75 कार्डचा संच आहे ज्यात देशभरातील महत्वाच्या संग्रहालायांच्या दर्शनी भागांची चित्रे आहेत, प्रत्येक कार्डवर संग्रहालयाची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. सर्व वयोगटाच्या लोकांना संग्रहालायांची ओळख करून देण्याचा हा नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे.

जगभरातील सांस्कृतिक केंद्रांचे आणि संग्रहालायांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

The programme witnessed the participation of international delegations from cultural centers and museums from across the world.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Income inequality declining with support from Govt initiatives: Report

Media Coverage

Income inequality declining with support from Govt initiatives: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella meets Prime Minister, Shri Narendra Modi
January 06, 2025

Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella met with Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi.

Shri Modi expressed his happiness to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. Both have discussed various aspects of tech, innovation and AI in the meeting.

Responding to the X post of Satya Nadella about the meeting, Shri Modi said;

“It was indeed a delight to meet you, @satyanadella! Glad to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. It was also wonderful discussing various aspects of tech, innovation and AI in our meeting.”