कोविड साथ असूनही काशीमध्ये विकास अव्याहत चालू- पंतप्रधान
हे संमेलन केंद्र म्हणजे भारत आणि जपानदरम्यानच्या दृढ संबंधांचे प्रतीक-पंतप्रधान
एक मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र आणि विविध लोकांना एकत्र आणण्याचे माध्यम म्हणून हे संमेलन केंद्र काम करील- पंतप्रधान
गेल्या 7 वर्षांत अनेक विकास प्रकल्पांचा साज काशीवर चढला आहे, मात्र रुद्राक्षाशिवाय तिला पूर्णत्व प्राप्त होणार नाही- पंतप्रधान

जपानच्या सहकार्याने वाराणसीमध्ये उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्र- 'रुद्राक्ष'- चे उद्‌घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठामधील 'जननी आणि बालक आरोग्य केंद्राची' पाहणी केली. तसेच कोविडवर मात करण्यासाठीच्या सज्जतेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने त्यांनी अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवादही साधला.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी काशीमध्ये अविरत सुरु असलेल्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले. "कोविड साथ असूनही काशीमध्ये अव्याहतपणे विकासकामे चालू आहेत. याच सृजनात्मकतेचा आणि गतिशील विचारांचा परिपाक म्हणजे रुद्राक्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्र होय" असेही पंतप्रधान म्हणाले. 'हे संमेलन केंद्र म्हणजे भारत आणि जपानदरम्यानच्या दृढ संबंधांचे प्रतीक असल्याचे' सांगून पंतप्रधानांनी, हे केंद्र उभारण्यासाठी जपानने घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा केली.

"जपानचे विद्यमान पंतप्रधान सुगा योशिहिदे हे त्यावेळी मुख्य कॅबिनेट सचिव होते. तेव्हापासून ते जपानचे पंतप्रधान होईपर्यंत त्यांनी या प्रकल्पात व्यक्तिशः लक्ष घातले." असे पंतप्रधान म्हणाले. सुगा यांना भारताप्रती वाटत असलेल्या जिव्हाळ्याबद्दल प्रत्येक भारतीय मनात धन्यतेची आणि कृतज्ञतेची भावना असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आजच्या कार्यक्रमाशी जवळून जोडले गेलेले जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नेहपूर्वक आठवण काढली. जपानचे तत्कालीन पंतप्रधान आबे यांच्या काशीभेटीच्या वेळी त्यांच्याशी 'रुद्राक्ष'च्या संकल्पनेविषयी झालेल्या चर्चेच्या आठवणीही मोदी यांनी जागविल्या. "या वास्तूमध्ये आधुनिकतेची चमक आणि संस्कृतिकतेचे तेज- या दोन्हींचा संगम झालेला आहे. आजवरच्या भारत-जपान संबंधांशी जोडली गेलेली ही वास्तू उभय देशांतील भावी सहकार्याचेही द्योतक आहे" असेही पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या जपान- भेटीपासून या प्रकारे लोकांचे लोकांशी स्नेहबंध जुळण्याची कल्पना मांडली जाऊ लागली असे सांगून पंतप्रधान म्हणाले, "रुद्राक्ष आणि अहमदाबादमधील झेन उद्यान म्हणजे याच संबंधांचे प्रतीक होत".

आज सामरिक आणि आर्थिक क्षेत्रांत भारताच्या सर्वाधिक विश्वासार्ह मित्रांमध्ये जपानचे स्थान असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले. संपूर्ण प्रदेशामध्ये भारत-जपान मैत्री ही सर्वाधिक नैसर्गिक भागीदारी म्हणून गणली जाते, असेही ते म्हणाले. 'आपला विकास हा आपल्या सुख-समाधानाशी जोडलेला असला पाहिजे. हा विकास सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वांच्या आवाक्यात असला पाहिजे' असा उभय देशांचा दृष्टिकोन असल्याचेही त्यांनी सांगितले.

"गीत, संगीत आणि कला बनारसच्या धमन्यांमधून वाहतात. येथे गंगेच्या घाटांवर कित्येक कला विकसित झाल्या, ज्ञानाने नवनवी उत्तुंग शिखरे पादाक्रान्त केली आणि मानव्याशी संबंधित सखोल विचारमंथनही झाले. त्यामुळेच संगीत, धर्म, अध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाचे बनारस हे एक जागतिक केंद्र होऊ शकते." असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. "हे रुद्राक्ष केंद्र एक मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र आणि विविध लोकांना एकत्र आणण्याचे माध्यम म्हणून काम करील." असे सांगून, या केंद्राचे काळजीपूर्वक जतन करण्याचे आवाहन त्यांनी काशीवासीयांना केले.

"गेल्या 7 वर्षांत अनेक विकासप्रकल्पांचा साज काशीवर चढला आहे, मात्र रुद्राक्षाशिवाय या अलंकरणाला पूर्णत्व कसे प्राप्त होईल?", असे पंतप्रधान म्हणाले. "आता साक्षात काशीरूप असणाऱ्या शिवाने हे रुद्राक्ष धारण केल्यावर काशीच्या विकासाला आणखी झळाळी प्राप्त होईल आणि काशीचे सौंदर्य आणखी वृद्धिंगत होईल" असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s coffee exports zoom 45% to record $1.68 billion in 2024 on high global prices, demand

Media Coverage

India’s coffee exports zoom 45% to record $1.68 billion in 2024 on high global prices, demand
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 जानेवारी 2025
January 04, 2025

Empowering by Transforming Lives: PM Modi’s Commitment to Delivery on Promises