भारत सरकारच्या सहाय्याने, भूतानची राजधानी थिम्पू येथे उभारण्यात आलेल्या 'ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल' या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी केले.
150 खाटांचे हे 'ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल' विकसित करण्यासाठी भारत सरकारने भूतानला दोन टप्प्यांत अर्थसाहाय्य केले आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी 22 कोटी रुपये खर्च आला आणि हा टप्पा 2019 पासून कार्यान्वित झाला तर 12 व्या पंचवार्षिक योजनेचा भाग म्हणून दुसऱ्या टप्प्यात 119 कोटी रूपये देण्यात आले. 2019 मध्ये सुरू झालेले हे बांधकाम आत्ता पूर्ण झाले.
नव्याने बांधण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे भूतानमधील माता आणि बालकांसाठीच्या आरोग्य सेवांच्या दर्जात मोलाची भर पडली आहे. बालरोग, स्त्रीरोग निदान आणि प्रसूती सुविधा, अनेस्थेसियोलॉजी, शस्त्रक्रिया विभाग, नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग आणि बालरोग अतिदक्षता विभाग अशा अत्याधुनिक सुविधा या रूग्णालयात उपलब्ध झाल्या आहेत.
हे रूग्णालय म्हणजे, भारत आणि भूतान यांच्यात आरोग्य सेवा क्षेत्रात होत असलेल्या सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे.