पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे 13,000 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करून भूमीपूजन केले. पंतप्रधानांनी वाराणसीतील कारखीयांव येथील यूपीएसआयडीए ॲग्रो पार्कमधील बनास काशी संकुल या बनासकांठा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दूध प्रक्रिया केंद्राला भेट देऊन तेथील गायींच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नियुक्तीपत्रांचे तसेच जीआय-अधिकृत वापरकर्ता प्रमाणपत्रांचे वाटप देखील केले. आज उद्घाटन झालेल्या विकासकामांमध्ये रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पेयजल, शहरी विकास आणि स्वच्छता अशा महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी काशीला पुन्हा एकदा उपस्थित राहता आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांनी 10 वर्षांपूर्वी याच शहरातून खासदार म्हणून निवडून आल्याचे स्मरण केले. ते म्हणाले की या 10 वर्षांत बनारस शहराने त्यांचे एका बनारसीमध्ये रुपांतर केले आहे. काशीच्या जनतेने दिलेला पाठींबा आणि योगदानाबद्दल आभार मानून पंतप्रधान मोदी म्हणाले की नवी काशी निर्माण करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे आणि आज उद्घाटन झालेले 13,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प त्यासाठीच सुरु करण्यात आले आहेत. ते म्हणाले की रेल्वे,रस्ते,विमानतळाशी संबंधित प्रकल्प, पशुपालन, उद्योग, क्रीडा, कौशल्य विकास, स्वच्छता, आरोग्य, अध्यात्मिकता, पर्यटन आणि एलपीजी गॅस सह इतर अनेक क्षेत्रांतील विकास प्रकल्पांमुळे केवळ काशीच नव्हे तर संपूर्ण पूर्वांचल प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. यातून नव्या रोजगार संधी देखील निर्माण होतील असे त्यांनी पुढे सांगितले. संत रविदास यांच्याशी संबंधित प्रकल्पांचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि नागरिकांचे अभिनंदन केले.
काशी तसेच उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागातील विकास प्रकल्पांबाबत आनंद व्यक्त करत पंतप्रधानांनी काल रात्री अतिथीगृहाकडे जाण्याच्या रस्त्यावरील प्रवासाची आठवण काढली आणि फुलवारिया उड्डाणपूल प्रकल्पाच्या लाभांचा उल्लेख केला. बीएलडब्ल्यूकडून विमानतळाकडे जातानाच्या प्रवासातील सुलभतेत सुधारणा झाली आहे याची देखील त्यांनी नोंद घेतली. गुजरात दौऱ्याहून विमानाने वाराणसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी लगेचच विकासप्रकल्पाचे निरीक्षण केले. गेल्या दहा वर्षांत या भागातील विकासाला अधिक चालना मिळाल्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की सिग्रा क्रीडा स्टेडीयमचा पहिला टप्पा आणि जिल्हा रायफल शूटींग रेंजच्या कामामुळे या भागातील युवा खेळाडूंना मोठा फायदा होईल.
आज सकाळच्या वेळात बनास डेरीला भेट देऊन तेथील अनेक पशुपालक महिलांशी संवाद साधल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. गाईंच्या स्वदेशी वाणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी 2-3 वर्षांपूर्वी कृषीविषयक पार्श्वभूमी असलेल्या महिलांना स्वदेशी वाणाच्या गीर गाई देण्यात आल्या होत्या असे त्यांनी सांगितले. येथील गीर गाईंची संख्या आता साडेतीनशे पर्यंत पोहोचल्याची नोंद घेऊन पंतप्रधानांनी अशी माहिती दिली की 5 लिटर दूध देणाऱ्या सामान्य गाईंच्या तुलनेत या गाई 15 लिटरपर्यंत दूध देतात. ते पुढे म्हणाले की, 20 लिटर दूध देणारी अशीच एक गाय महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देऊ शकते आणि त्यांना लखपती दीदी बनण्यास मदत करते. “देशातील बचत गटांशी जोडल्या गेलेल्या 10 कोटी महिलांसाठी ही फार मोठी प्रेरणा आहे,” पंतप्रधान म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी बनास डेरीच्या पायाभरणी कार्यक्रमाची आठवण काढून पंतप्रधान म्हणाले की त्या दिवशी दिलेली हमी आज लोकांच्या समोर साकार झाली आहे. ते म्हणाले की बनास डेरी हे योग्य गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीचे उत्तम उदाहरण आहे. बनास डेरीमध्ये वाराणसी, मिर्झापूर, गाझीपुर आणि रायबरेली या ठिकाणांहून रोज 2 लाख लिटर दूध संकलित होते. नव्या संयंत्राची सुरुवात झाल्यामुळे, बलिया, चंदौली, प्रयागराज आणि जौनपुर या भागातील पशुपालकांना देखील फायदा होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत वाराणसी, जौनपुर, चंदौली,गाझीपूर तसेच आझमगड या जिल्ह्यांतील 1000 हून अधिक गावांमध्ये नव्या दूध मंडया सुरु होणार आहेत.
बनास काशी संकुल हजारो नवीन रोजगार संधी निर्माण करेल यावर पंतप्रधानांनी भर दिला. एका अंदाजानुसार, बनास काशी संकुल 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देईल, असे पंतप्रधान म्हणाले. या युनिटच्या माध्यमातून ताक, दही, लस्सी, आइस्क्रीम, पनीर आणि स्थानिक मिठाई यांसारख्या इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादनही घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बनारसची मिठाई भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात हे संयंत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. रोजगाराचे साधन आणि पशु पोषण उद्योगाला चालना म्हणून दूध वाहतुकीच्या क्षेत्रालाही त्यांनी स्पर्श केला.
दुग्धव्यवसाय क्षेत्रातील महिलांचे प्राबल्य लक्षात घेऊन, पशुपालक भगिनींच्या खात्यात डिजिटल पद्धतीने पैसे थेट हस्तांतरित करण्याची व्यवस्था विकसित करण्याची विनंती पंतप्रधानांनी दुग्धव्यवसायाच्या नेतृत्वाला केली. छोटे शेतकरी आणि भूमिहीन मजुरांना मदत करण्यात पशुपालनाची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
अन्नदात्याला उर्जादाता ते खतदाता बनवण्याच्या सरकारच्या संकल्पाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.त्यांनी गोबर धन मधील संधीची माहिती दिली आणि जैव सीएनजी आणि सेंद्रिय खत बनवण्यासाठी डेअरीमधील संयंत्राबद्दल सांगितले. गंगा नदीच्या काठावर नैसर्गिक शेतीचा वाढता कल लक्षात घेऊन पंतप्रधानांनी गोबर धन योजनेअंतर्गत सेंद्रिय खताची उपयुक्तता अधोरेखित केली. एनटीपीसीच्या चारकोल संयंत्रामध्ये शहरी कचऱ्याचा उपयोग करण्याचा संदर्भ देत, कचऱ्याचे संपत्तीत रूपांतरित करण्याच्या काशीच्या तळमळीची त्यांनी प्रशंसा केली.
शेतकरी और पशुपालक यांना सरकारचे सर्वात मोठे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले.गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उसाच्या एफआरपीमध्ये सुधारणा करून ते 340 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आणि राष्ट्रीय पशुधन अभियानात सुधारणा करून पशुधन विमा कार्यक्रम सुलभ करण्यात आला, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांची केवळ थकबाकीच चुकती केली जात नाही, तर पिकांचे भावही वाढवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या आणि आताच्या सरकारच्या विचार प्रक्रियेतील फरक अधोरेखित करत "आत्मनिर्भर भारत विकसित भारताचा पाया बनेल",असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा देशात छोट्या संधीना नव्याने चालना दिली जाईल आणि छोटे शेतकरी, पशुपालक, कारागीर आणि लघु आणि मध्यम उद्योगांना मदत केली जाईल तेव्हाच आत्मनिर्भर भारत प्रत्यक्षात येईल, यावर त्यांनी भर दिला. व्होकल फॉर लोकलसाठीचे आवाहन ही बाजारातील लहान कंपन्यांसाठी म्हणजेच जे दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्र जाहिरातींवर खर्च करू शकत नाहीत त्यांच्यासाठी एक जाहिरात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. "स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्यांची मोदी स्वतः जाहिरात करतात" असे सांगत "मोदी हे प्रत्येक लहान शेतकरी आणि उद्योगाचे सदिच्छा दूत आहेत, मग ते खादी, खेळणी उत्पादक, मेक इन इंडिया किंवा देखो अपना देश यासाठीचे प्रोत्साहन असो", असे ते म्हणाले. अशा आवाहनाचा प्रभाव काशीमध्येच दिसून येतो आहे, इथे विश्वनाथ धामच्या कायापालटानंतर 12 कोटीहून अधिक पर्यटकांनी शहराला भेट दिली असून यामुळे उत्पन्न आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. वाराणसी आणि अयोध्येसाठी भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरणद्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रिक कॅटमेरन जहाजाच्या प्रारंभाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, इथे भेट देणाऱ्यांसाठी ते एक अनोखा अनुभव देईल.
पंतप्रधानांनी पूर्वीच्या काळातील घराणेशाहीचे राजकारण, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाचे दुष्परिणामही विशद केले. काशीतील तरुणांची काही विशिष्ट मंडळींकडून बदनामी होत असल्याची टीकाही त्यांनी केली. तरुणाईचा विकास आणि घराणेशाही यातील विरोधाभास त्यांनी अधोरेखित केला. काशी आणि अयोध्येबद्दलच्या नवीन स्वरूपावर या शक्तींकडून होत असलेल्या द्वेषाची त्यांनी दखल घेतली.
"मोदींचा तिसरा कार्यकाळ भारताच्या क्षमतांना जगासमोर आणेल आणि भारताची आर्थिक, सामाजिक, सामरिक आणि सांस्कृतिक क्षेत्रे नवीन उंचीवर पोहोचतील", असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकताना, गेल्या 10 वर्षात अर्थव्यवस्थेने 11 व्या क्रमांकावरून जगातील 5 व्या क्रमांकावर झेप घेतल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. येत्या 5 वर्षात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे ते म्हणाले. डिजिटल इंडिया, रस्त्यांचे रुंदीकरण, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत रेल्वे गाडी यांसारख्या विकासकामांना येत्या 5 वर्षांत गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.“पूर्व भारताला विकसित भारताच्या विकासाचे इंजिन बनवण्याची मोदींची हमी आहे ”, असे सांगत हा प्रदेश विकासापासून वंचित होता याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. वाराणसी ते औरंगाबाद या सहा पदरी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाबद्दल बोलताना, येत्या 5 वर्षात वाराणसी-रांची-कोलकाता द्रुतगती मार्ग पूर्ण केल्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील अंतर कमी होईल, असे पंतप्रधान म्हणाले. “भविष्यात, बनारस ते कोलकाता प्रवासाचा वेळ जवळपास निम्मा होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी येत्या 5 वर्षात काशी मध्ये अपेक्षित असलेल्या विकासाच्या नवीन पैलूंविषयी सांगितले. काशी मधील रोपवे आणि विमानतळाच्या क्षमतेमध्ये होणाऱ्या जलद वृद्धीचा त्यांनी उल्लेख केला. काशी देशातील एक महत्वाची क्रीडा नगरी म्हणून उदयाला येईल, असे ते म्हणाले. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानातील काशीच्या लक्षणीय योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. काशी येत्या पाच वर्षात रोजगार आणि कौशल्याचे केंद्र म्हणून नावारूपाला येईल असे ते म्हणाले. याच काळात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या परिसराचे काम पूर्ण होईल ज्यामुळे या क्षेत्रातील युवावर्ग आणि विणकरांना नवीन संधी उपलब्ध होतील. गेल्या दशकात आपण काशीला आरोग्य आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून एक नवीन ओळख प्रदान केली आहे. आता नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचीही भर यात पडणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या हस्ते बनारस हिंदू विद्यापीठातील नॅशनल सेंटर ऑफ एजिंग आणि 35 कोटी रुपयांच्या अनेक डायग्नोस्टिक मशीन्स आणि उपकरणांचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच रुग्णालयातील जैव-धोकादायक कचरा हाताळण्याची सुविधाही विकसित केली जात आहे.
काशी आणि उत्तर प्रदेशचा जलदगतीने निरंतर विकास होत राहिला पाहिजे आणि काशीच्या प्रत्येक नागरिकाने एकत्र आले पाहिजे असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले. जर देशाला आणि जगाला मोदींच्या हमी मध्ये एवढा विश्वास आहे, तर ते तुमचे प्रेम आणि विश्वनाथ बाबांच्या आशिर्वादामुळेच, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे आणि बनास डेअरीचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
वाराणसीच्या रस्ते संपर्क सुविधेचा आणखी विस्तार करण्यासाठी अनेक रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली, यात राष्ट्रीय महामार्ग -233 च्या घाघरा-पूल-वाराणसी विभागाचे चौपदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग-56 च्या सुलतानपूर-वाराणसी विभागाचे चौपदरीकरण, पॅकेज-1; राष्ट्रीय महामार्ग-19 च्या वाराणसी-औरंगाबाद विभागाच्या टप्पा-1 चे सहापदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग-35 वर पॅकेज-1 वाराणसी-हनुमना विभागाचे चौपदरीकरण; आणि बाबतपूर जवळ वाराणसी-जौनपूर रेल्वे विभागामधील रस्ते पूल (आरओबी) या प्रकल्पांचा समावेश आहे. वाराणसी-रांची-कोलकाता द्रुतगती मार्ग पॅकेज-1 च्या बांधकामाची पायाभरणीही त्यांच्या हस्ते झाली.
या प्रदेशातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, पंतप्रधानांच्या हस्ते सेवापुरीमध्ये एचपीसीएलचे एलपीजी बॉटलिंग संयंत्र; यूपीएसआयडीए ॲग्रो पार्क कारखीयांवमध्ये बनास काशी संकुल दूध प्रक्रिया युनिट; यूपीएसआयडीए ॲग्रो पार्क कारखीयांवमध्ये विविध पायाभूत सुविधांच्या कामांचे आणि विणकरांसाठी सिल्क फॅब्रिक प्रिंटिंग सामान्य सुविधा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये अनेक शहरी विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये रमणा येथील एनटीपीसीच्या कोळसा संयंत्रामध्ये नागरी कचरा व्यवस्थापन; सिस-वरुणा भागातील पाणीपुरवठा जाळ्याची सुधारणा; आणि एसटीपी आणि सांडपाणी पंपिंग स्टेशनचे ऑनलाइन सांडपाणी निरीक्षण आणि एससीएडीए ऑटोमेशन या प्रकल्पांचा समावेश आहे. तलावांचे पुनरुज्जीवन आणि उद्यानांच्या पुनर्विकासासाठी प्रकल्प आणि 3-डी अर्बन डिजिटल नकाशा आणि डेटाबेसच्या डिझाइन आणि विकासासाठीच्या प्रकल्पांसह वाराणसीच्या सुशोभीकरणासाठी अनेक प्रकल्पांची पायाभरणीही त्यांच्या हस्ते झाली.
वाराणसीमध्ये पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटनाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या प्रकल्पांमध्ये पंचकोशी परिक्रमा मार्गाच्या पाच पाडवांवर सार्वजनिक सुविधांचा पुनर्विकास आणि दहा अध्यात्मिक यात्रेसह पावनपथ ; वाराणसी आणि अयोध्येसाठी भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रिक कॅटामरन जहाजाचा प्रारंभ आणि सात चेंज रूम तरंगत्या जेटी आणि चार कम्युनिटी जेटी यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक कॅटामरन हरित ऊर्जेचा वापर करून गंगेतील पर्यटन अनुभव वाढवेल. पंतप्रधानांनी विविध शहरांमधील भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या तेरा सामुदायिक जेटी आणि बलिया येथे जलद तरंगता पूल उघडण्याच्या यंत्रणेची पायाभरणी देखील केली.
वाराणसीच्या प्रसिद्ध वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीमध्ये राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेची (एनआयएफटी) पायाभरणी करण्यात आली.ही नवीन संस्था वस्त्रोद्योग क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधा बळकट करेल.
वाराणसीमध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत, वाराणसीमधील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. बनारस हिंदू विद्यापीठातील नॅशनल सेंटर ऑफ एजिंगची पायाभरणीही त्यांच्या हस्ते झाली. याशिवाय पंतप्रधानांनी सिग्रा क्रीडा स्टेडियम टप्पा-1 आणि जिल्हा रायफल शूटिंग रेंजचे उद्घाटन देखील केले. शहरातील क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.
बनास डेरी प्लांट किसानों-पशुपालकों को बेहतर पशुओं की नस्ल और बेहतर चारे को लेकर भी जागरूक करेगा, प्रशिक्षित करेगा। pic.twitter.com/ZO7oPibnP2
— PMO India (@PMOIndia) February 23, 2024
पशुपालन तो एक ऐसा सेक्टर है, जिसमें सबसे अधिक हमारी बहनें जुड़ी हैं।
— PMO India (@PMOIndia) February 23, 2024
ये बहनों को आत्मनिर्भर बनाने का बहुत बड़ा माध्यम है। pic.twitter.com/jYrSJmMEHr
हमारी सरकार, अन्नदाता को ऊर्जादाता बनाने के साथ ही अब ऊर्वरकदाता बनाने पर भी काम कर रही है: PM @narendramodi pic.twitter.com/iuos0OIWiF
— PMO India (@PMOIndia) February 23, 2024
विकसित भारत का निर्माण, आत्मनिर्भर भारत के बल पर होगा। pic.twitter.com/4LBcTGpe23
— PMO India (@PMOIndia) February 23, 2024
Vocal for local. pic.twitter.com/7f3aURQnkC
— PMO India (@PMOIndia) February 23, 2024
यही तो नया भारत है... pic.twitter.com/al5ZAKfvF8
— PMO India (@PMOIndia) February 23, 2024