वडोदरा मुंबई द्रुतगती मार्गाच्या महत्त्वाच्या भागाचे राष्ट्रार्पण
काक्रापार अणुऊर्जा केंद्रातील केएपीएस-3 आणि केएपीएस-4 या दोन नवीन प्रेशराइज्ड हेवी वॉटर अणुभट्ट्या राष्ट्राला समर्पित
नवसारीतील पीएम मित्र पार्कच्या बांधकामाचे उद्घाटन
सूरत महानगरपालिका, सूरत नागरी विकास प्राधिकरण आणि ड्रीम सिटीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी
रस्ते, रेल्वे शिक्षण आणि पाणीपुरवठा प्रकल्पांची पायाभरणी
“नवसारीत आल्यावर नेहमीच छान वाटतं. विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण यामुळे गुजरातच्या विकासाची वाटचाल ताकदीने होईल”
"इतरांनी आशा सोडली की मोदींची गॅरंटी सुरू होते"
"गरीब असो वा मध्यमवर्गीय, ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न आहे"
"आज देशातील छोट्या शहरांमध्येही दळणवळणासाठीसाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत"
"आज जग डिजिटल इंडियाला ओळखते"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली  आणि लोकार्पणही केले. या प्रकल्पांमध्ये वीज निर्मिती, रेल्वे, रस्ते, वस्त्रोद्योग, शिक्षण, पाणीपुरवठा, कनेक्टिव्हिटी आणि शहरी विकास यासारख्या विस्तृत क्षेत्रांचा समावेश आहे.

गुजरातमधील आजचा हा आपला तिसरा कार्यक्रम असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी याआधी गुजरातमधील पशुपालक आणि दुग्ध उद्योगातील भागधारकांच्या कंपनीला भेट दिली. मेहसाणा येथील वलीनाथ महादेव मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही सहभागी झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. “आता, विकासाच्या या उत्सवात भाग घेण्यासाठी मी नवसारी येथे आलो आहे”, असे  पंतप्रधान म्हणाले. विकासाच्या या ऐतिहासिक उत्सवाचा एक भाग होण्यासाठी उपस्थितानी त्यांच्या मोबाइल फोनमधील फ्लॅशलाइट चालू करावेत असे आवाहन त्यांनी केले. वडोदरा, नवसारी, भरूच आणि सुरत या शहरांसाठी वस्त्रोद्योग, वीज आणि शहरी विकास या क्षेत्रातील 40,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करताना पंतप्रधानांनी नागरिकांचे अभिनंदन केले.

 

मोदी की गॅरंटी ची पूर्तता करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मोदी गॅरंटी म्हणजे काय हे गुजरातच्या लोकांना बऱ्याच कालावधीपासून माहीत आहे, असे ते म्हणाले.  त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ते ‘फाइव्ह एफ’– फार्म, फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन, फॅशन टू फॉरेन बद्दल बोलत असत, असे त्यांनी सांगितले. कापडाचा संपूर्ण पुरवठा आणि मूल्य शृंखला असणे हे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. “आज, सूरतच्या रेशीम नगरीचा नवसारीपर्यंत विस्तार होत आहे, या क्षेत्रातील सर्वात मोठ्या उत्पादक आणि निर्यातदारांशी स्पर्धा करण्याची भारताची क्षमता आहे”,  असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. गुजरातच्या वस्त्रोद्योगाच्या भूमिकेवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सूरतमध्ये उत्पादित कापड अद्वितीय म्हणून परिचित असल्याचे गौरवोद्गार काढले. पीएम मित्र पार्कमध्ये केवळ बांधकामासाठी 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून हे उद्यान पूर्ण झाल्यावर संपूर्ण प्रांताचा चेहरामोहरा बदलून जाईल, असे ते म्हणाले. कटिंग, विणकाम, जिनिंग, कपडे, तांत्रिक कापड आणि कापड यंत्रसामग्री यासारख्या क्रियांसाठी पीएम मित्र पार्क मूल्य-साखळी परिसंस्था तयार करेल आणि रोजगाराला चालना देईल, असे त्यांनी सांगितले.  या पार्कमध्ये कामगारांसाठी घरे, लॉजिस्टिक पार्क, वेअरहाऊसिंग, आरोग्य तसेच प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या सुविधा असतील, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.-

सुमारे 800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तापी नदीवरील बंधाऱ्याच्या कामाच्या कोनशिला समारंभाचा संदर्भ देऊन, या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याला प्रतिबंध करतानाच हा प्रकल्प सूरत मधील पाणीपुरवठा समस्या संपूर्णपणे सोडवेल ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

दैनंदिन जीवनात तसेच औद्योगिक विकासात विजेचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी 20-25 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये सतत वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असे याकडे निर्देश केला. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांच्यासमोर जी आव्हाने उभी राहिली त्यावर अधिक भर देत त्यांनी कोळसा आणि गॅस यांची आयात हा त्याकाळी सर्वात मोठा अडथळा असल्याचे नमूद केले. जलविद्युत निर्मितीच्या शक्यता अगदी कमी असल्याची बाब देखील त्यांनी सर्वांसमोर मांडली. ते म्हणाले, “मोदी है,तो मुमकिन है.” म्हणजेच मोदी असतील तेथे सर्व काही शक्य आहे असे उद्गार त्यांनी काढले. गुजरातला विद्युत निर्मितीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन तसेच गुजरातमध्ये आजघडीला निर्माण होत असलेल्या एकूण विजेपैकी प्रचंड मोठा भाग ज्या पद्धतीने निर्माण होतो त्या सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीला त्याकाळी विशेष चालना दिल्याची माहिती त्यांनी दिली.

 

अणुऊर्जेच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्याच्या प्रयत्नांबाबत तपशीलवार माहिती देताना पंतप्रधानांनी काक्रापार अणुऊर्जा केंद्रातील (केएपीएस) संयंत्र क्र.3 आणि संयंत्र क्र.4 मधील स्वदेशी पद्धतीने उभारण्यात आलेल्या दोन नव्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर अणुभट्ट्यांची (पीएचडब्ल्यूआरएस)ची चर्चा केली. आज या अणुभट्ट्यांचे लोकार्पण झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की या अणुभट्ट्या म्हणजे आत्मनिर्भर भारताचे उत्तम उदाहरण आहेत आणि त्या गुजरातच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.

वाढत्या आधुनिक पायाभूत सुविधांसह गुजरातच्या दक्षिण भागाचा झालेला अभूतपूर्व विकास देखील पंतप्रधानांनी यावेळी ठळकपणे मांडला. नागरिकांच्या घरचे वीज बिल कमी करण्यासोबतच त्यांना उत्पन्नाचे नवे माध्यम म्हणून देखील उपयुक्त ठरणाऱ्या पंतप्रधान सूर्यघर योजनेची माहिती पंतप्रधानांनी उपस्थितांना दिली. देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा मार्ग या प्रदेशातून जाणार असून या उपक्रमामुळे देशातील मुंबई आणि सुरत ही दोन महत्त्वाची औद्योगिक केंद्रे जोडली जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

नवसारीसह गुजरातचा संपूर्ण पश्चिम भाग तेथील कृषीक्षेत्रातील प्रगतीसाठी प्रख्यात आहे याकडे निर्देश करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “नवसारी आता तेथील औद्योगिक विकासाबद्दल मान्यता पावत आहे.”या भागातील शेतकऱ्यांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल चर्चा करताना, पंतप्रधान मोदी यांनी या भागात फलोत्पादन उदयाला येत आहे याचा ठळक उल्लेख करत नवसारीमधील हापूस आणि वलसारी या आंब्याच्या जगप्रसिध्द जाती तसेच तेथील सुप्रसिद्ध चिकूच्या लागवडीकडे निर्देश केला. ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधानांनी दिलेल्या देशातील युवावर्ग, गरीब, शेतकरी आणि महिला यांच्या सक्षमीकरणाच्या हमीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की ही हमी केवळ योजना तयार करण्यापुरती मर्यादित नसून योजनेचा संपूर्ण लाभ संबंधितांना मिळवून देण्यापर्यंत तिचा विस्तार होतो.

 

गुजरात राज्याच्या आदिवासी तसेच किनारपट्टी भागातील गावांकडे पूर्वी झालेल्या दुर्लक्षाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की सध्याच्या सरकारने उमरगाव ते अंबाजी या संपूर्ण क्षेत्रात प्रत्येक मुलभूत सुविधा उभारण्याची सुनिश्चिती केली आहे. राष्ट्रीय पातळीवर देखील विकासाच्या मापदंडांमध्ये मागे राहिलेले 100 हून अधिक आकांक्षित जिल्हे आता उर्वरित देशाच्या बरोबरीने प्रगती करत आहेत.

“ज्या ठिकाणी इतरांकडून असलेल्या आशा संपतात तेथून मोदींची हमी सुरु होते,” पंतप्रधान म्हणाले. गरिबांसाठी पक्की घरे, मोफत अन्नधान्य योजना, वीजपुरवठा, नळाने पाणीपुरवठा तसेच देशातील गरीब, शेतकरी,दुकानदार आणि मजूर यांच्यासाठी सुरु केलेल्या विमा योजना इत्यादी उपक्रमांतून मोदींच्या हमीसह दिलेल्या आश्वासनांची यादी त्यांनी उपस्थितांना ऐकवली. “ही सत्य परिस्थिती आहे कारण ही मोदींची गॅरंटी आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.

आदिवासी भागामध्ये दिसून येत असलेल्या सिकल सेल अॅनिमियाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात सिकल सेल अॅनिमियाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने योजलेल्या सक्रीय उपायांचा उल्लेख करत, या आजाराशी परिणामकारक पद्धतीने लढा देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या अधिक विस्तृत प्रमाणातील प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी दिली. देशभरातील आदिवासी भागांतून सिकल सेल अॅनिमियाचे संपूर्ण निर्मूलन करण्याच्या उद्देशास सरकारने हाती घेतलेल्या व्यापक उपक्रमाची माहिती देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “सिकल सेल अॅनिमियापासून संपूर्ण मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही आता राष्ट्रीय अभियान सुरु केले आहे.” “या अभियानाअंतर्गत, देशभरातील सर्व आदिवासी भागांमध्ये सिकल सेल अॅनिमियाच्या शक्यतेबाबत निश्चित माहिती मिळवण्यासाठी चाचण्या करण्यात येत आहेत,” पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आदिवासी भागात नव्याने सुरु होणार असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांचा देखील त्यांनी उल्लेख केला.

"गरीब असो की मध्यमवर्गीय, ग्रामीण असो की शहरी, आमच्या सरकारचा प्रत्येक नागरिकाचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न आहे," यावर भर देत, पंतप्रधान मोदी यांनी सर्वसमावेशक विकासासाठी असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

 

पूर्वीच्या काळातील अर्थव्यवस्थेमधील साचलेपणाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, "अर्थव्यवस्था ठप्प झाली म्हणजेच देशाकडे मर्यादित आर्थिक संसाधने होती," हे स्पष्ट करत पंतप्रधान मोदी यांनी या गोष्टीचा त्या काळात ग्रामीण आणि शहरी विकासावर झालेला विपरीत परिणाम अधोरेखित केला. ते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था 2014 मधील 11 व्या स्थानावरून आज जगात 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, याचा अर्थ आज भारतीय नागरिकांकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसा आहे आणि म्हणूनच भारत तो खर्च करत आहे. त्यामुळे आज देशातील छोट्या शहरांमध्येही उत्तम कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यांनी लहान शहरांमध्ये उपलब्ध झालेली हवाई सेवा आणि देशभरात बांधण्यात आलेल्या 4 कोटी पक्क्या घरांचा उल्लेख केला.

डिजिटल इंडिया उपक्रमाचे यश आणि व्याप्ती यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले, "आज जगाने डिजिटल इंडियाला मान्यता दिली आहे." डिजिटल इंडियामुळे लहान शहरांमध्ये नवीन स्टार्ट-अप्सच्या उदयाबरोबर कायापालट घडला असून, युवा वर्गाचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढला आहे, यावर त्यांनी भर दिला. छोट्या शहरांमध्ये उदयाला आलेल्या नव-मध्यम वर्गाचा उल्लेख करत ते म्हणाले की, हा वर्ग भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने घेऊन जाईल.

विकास आणि वारसा याला सारखेच प्राधान्य देण्यावर सरकारचा भर असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी नमूद केले की, हा प्रदेश भारताच्या श्रद्धेचे आणि इतिहासाचे महत्त्वाचे केंद्र आहे, मग ते स्वातंत्र्य चळवळ असो अथवा राष्ट्र उभारणी असो. घराणेशाही, लोकानुनय आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणामुळे या प्रदेशाच्या वारशाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले, याउलट, भारताच्या समृद्ध वारशाचा प्रतिध्वनी आज जगभर ऐकू येत आहे. दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहाचे स्मरण करण्यासाठी त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेले दांडी स्मारक, आणि सरदार पटेल यांच्या योगदानाला समर्पित स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या उभारणीचा त्यांनी उल्लेख केला.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पथदर्शक आराखडा यापूर्वीच तयार आहे. “या 25 वर्षात आपण विकसित गुजरात आणि विकसित भारत घडवू”, पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि खासदार सी आर पाटील यांच्यासह गुजरात सरकारचे अनेक खासदार, आमदार आणि मंत्री उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये वडोदरा मुंबई द्रुतगती मार्गाचे अनेक प्रकल्प, भरूच, नवसारी आणि वलसाडमधील अनेक रस्ते प्रकल्प, तापी येथील ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्प, भरुच येथील भूमिगत गटार प्रकल्प, या आणि इतर विविध प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नवसारी येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन एंड ॲपेरल (पीएम मित्रा) पार्कच्या बांधकामाची सुरुवात केली. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणीही केली. यामध्ये भरुच-दहेज प्रवेश नियंत्रित करणाऱ्या महामार्गाचे बांधकाम, वडोदरा येथील S.S.G रुग्णालयातील विविध प्रकल्प, वडोदरा येथील प्रादेशिक विज्ञान केंद्र, सूरत, वडोदरा आणि पंचमहाल येथील रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्प, भरूच, नवसारी आणि सूरत येथील अनेक रस्ते प्रकल्प, वलसाडमधील अनेक पाणीपुरवठा योजना, शाळा आणि वसतिगृहांच्या इमारती आणि नर्मदा जिल्ह्यातील इतर प्रकल्प, या आणि इतर विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे.

पंतप्रधानांनी सूरत महानगरपालिका, सूरत नगर विकास प्राधिकरण आणि ड्रीम सिटीमधील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पणही केले.

पंतप्रधानांनी काक्रापार अणुऊर्जा केंद्र (KAPS) युनिट 3 आणि युनिट 4 येथील दोन नवीन प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्सचे (PHWR) लोकार्पण केले. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) द्वारे 22,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आलेल्या, KAPS-3 आणि KAPS-4 या प्रकल्पांची एकत्रित क्षमता 1400 (700*2) MW आहे आणि ते सर्वात मोठे स्वदेशी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स (PHWR) आहेत. या अशा प्रकारच्या पहिल्या अणुभट्ट्या आहेत, आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट अणुभट्ट्यामधील एक आहेत. या दोन अणुभट्ट्या एकत्रितपणे वर्षाला सुमारे 10.4 अब्ज युनिट स्वच्छ विजेची निर्मिती करतील, आणि गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा ही राज्ये आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील ग्राहकांना याचा लाभ मिळेल.

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi