पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे आज देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्पांची तसेच बिहारमधील 13,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.
विकसित भारताच्या निर्मितीच्या माध्यमातून बिहारचा विकास करण्याचा संकल्प घेऊन आज आपण बिहारमधील बेगुसराय येथे आलो आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना संबोधित करताना सांगितले. त्यांनी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीबद्दल तसेच लोकांच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार मानले.
बेगुसराय ही प्रतिभावान तरुणांची भूमी आहे आणि तिने नेहमीच देशातील शेतकरी आणि कामगारांना बळ दिले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज सुमारे 1.50 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी होत असल्याने बेगुसरायचे जुने वैभव परत येत आहे यावर त्यांनी भर दिला. “पूर्वी असे कार्यक्रम दिल्लीच्या विज्ञान भवनात होत असत, पण आता मोदींनी दिल्ली बेगुसरायमध्ये आणली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. यापैकी 30,000 कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या बिहारशी संबंधित आहेत, असेही ते म्हणाले. हे प्रमाण भारताची क्षमता दर्शवते आणि बिहारमधील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करते, असेही ते म्हणाले. आजचे विकास प्रकल्प भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनविण्याचे माध्यम बनतील, तसेच बिहारमध्ये सेवा आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त करतील, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी आज बिहारसाठी नवीन रेल्वे सेवेच्या उद्घाटनाचाही उल्लेख केला.
2014 मध्ये सत्ता स्विकारल्यापासून वेगाने विकास साधण्याला सरकार देत असलेल्या प्राधान्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. “ जेव्हा बिहार आणि पूर्व भारत समृद्ध होते तेव्हाच भारत सशक्त राहिला यांचे पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत”, असे बिहारच्या बिघडणाऱ्या परिस्थितीचा देशाच्या स्थितीवर पडणाऱ्या नकारात्मक प्रभावाकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी सांगितले. बिहारच्या विकासातूनच विकसित भारत निर्माण होईल, अशी ग्वाही त्यांनी राज्यातील जनतेला दिली. “हे वचन नाही, हे एक ध्येय आहे, एक संकल्प आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. मुख्यत्वेकरून पेट्रोलियम, खते आणि रेल्वेशी संबंधित आजचे प्रकल्प या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले. “ शेती असो किंवा उद्योग क्षेत्र, ऊर्जा, खते आणि संपर्क सुविधा हा विकासाचा आधार आहे. सर्व काही त्यांच्यावर अवलंबून आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी रोजगार आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी सरकारचे प्राधान्य क्षेत्र अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी उपस्थितांना बरौनी खत प्रकल्प सुरू केल्याची आठवण करून दिली, आणि आज ही गॅरंटी पूर्ण झाली असे सांगितले. बिहारच्या शेतकऱ्यांसह देशातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे, असे ते म्हणाले. गोरखपूर, रामागुंडम आणि सिंद्री येथील प्रकल्प बंद करण्यात आले होते पण आता ते युरिया उत्पादनात भारताच्या आत्मनिर्भरतेचा मुख्य कणा बनत आहेत, असे त्यांनी सांगितले. “म्हणूनच देश म्हणतो, मोदींची गॅरंटी म्हणजे आश्वासन पूर्ततेची गॅरंटी,” असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी आज बरौनी रिफायनरीच्या कार्याच्या व्याप्तीचा उल्लेख केला. या रिफायनरी मुळे हजारो श्रमिकांना अनेक महिन्यांसाठी रोजगार दिला आहे , असे ते म्हणाले. बरौनी रिफायनरी बिहारमधील औद्योगिक विकासाला नवी ऊर्जा देईल आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल यावर त्यांनी भर दिला. बिहारमध्ये 65,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूशी संबंधित बहुतेक विकास प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी बिहारमधील महिलांना गॅस पाइपलाइन विस्तारित जाळ्यामार्फत कमी किमतीत गॅस पुरवठा करण्याच्या सुविधेचा उल्लेख केला. यामुळे प्रदेशात उद्योगांची स्थापना करणे सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेला कृष्णा गंगा नदी पात्रातून देशाला ‘पहिले तेल’, ओएनजीसी कृष्णा गोदावरी नदीच्या खोल पाण्यातील प्रकल्पामधील पहिले कच्च्या तेलाचे टँकर, यामुळे या महत्त्वाच्या क्षेत्रात स्वयंपूर्णता वाढवण्यास मदत होईल. हे सरकार राष्ट्रहिताच्या कार्यासाठी कसे समर्पित आहे हे सांगून त्यांनी घराणेशाहीच्या स्वार्थी राजकारणावर टीका केली. आता भारताच्या रेल्वे आधुनिकीकरणाची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे हे सांगत त्यांनी रेल्वे मार्ग विद्युतीकरण आणि स्थानकांच्या दर्जा उन्नतीकरण याचाही उल्लेख केला.
पंतप्रधानांनी घराणेशाहीचे राजकारण आणि सामाजिक न्याय यामधील तीव्र विरोधाभासावर टीका केली. घराणेशाहीचे राजकारण विशेषतः प्रतिभावंतांसाठी आणि युवक कल्याणाच्यादृष्टीने घातक आहे, असे ते म्हणाले.
“खरा सामाजिक न्याय हा संतुष्टीकरणातून प्राप्त होतो, ‘तुष्टिकरणातून नाही, तो संपृक्ततेने प्राप्त होतो”, असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी यासंदर्भात आपण केवळ धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या विचारांनाच मान्यता देतो असे नमूद केले. शेतकऱ्यांसाठी मोफत रेशन, पक्की घरे, गॅस जोडण्या, नळाने पाणी पुरवठा, शौचालये, मोफत आरोग्य सेवा आणि किसान सन्मान निधी यासारख्या योजनांच्या माध्यमातूनच खरा सामाजिक न्याय साधता येतो हे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या 10 वर्षात सरकारी योजनांचे सर्वाधिक लाभ दलित, मागास आणि अत्यंत मागास समाजाला झालेले आहेत असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, आमच्यासाठी सामाजिक न्याय म्हणजे नारी शक्तीचे सक्षमीकरण. 1 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे यश आणि 3 कोटी भगिनींना‘ लखपती दीदी’ बनवण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला आणि, त्यापैकी अनेक भगिनी या बिहारमधील आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पंतप्रधानांनी पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेचाही उल्लेख केला ज्यामुळे वीज बिल कमी होईल आणि अतिरिक्त उत्पन्न मिळेल. ते म्हणाले की, बिहारचे रालोआ सरकार गरीब, महिला, शेतकरी, कारागीर, मागासलेल्यांसाठी आणि वंचितांसाठी अथकपणे काम करत आहे. “दुहेरी इंजिन सरकारच्या दुहेरी प्रयत्नांमुळे बिहार विकसित होईल”, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी जमलेल्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांसाठी त्यांचे अभिनंदन केले. आज महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
बिहारचे राज्यपाल, राजेंद्र व्ही.आर्लेकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी आणि संसद सदस्य गिरीराज सिंह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी यावेळी सुमारे 1.48 लाख कोटी रुपये खर्चाच्या अनेक तेल आणि वायू प्रकल्पांची पायाभरणी,उद्घाटन, आणि राष्ट्रार्पण केले. केजी बेसिनसह हे प्रकल्प देशातल्या, बिहार, हरियाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये उभारण्यात आले आहेत.
यावेळी पंतप्रधानांनी केजी बेसिन प्रकल्पामधून काढण्यात आलेले ‘पहिले तेल’ राष्ट्राला समर्पित केले आणि ओएनजीसीच्या कृष्णा गोदावरी खोल पाणी प्रकल्पातील पहिल्या कच्च्या तेलाच्या टँकरला हिरवा झेंडा दाखवला. केजी बेसिन प्रकल्पामधून ‘पहिले तेल’ काढणे ही भारताच्या दृष्टीने ऊर्जा क्षेत्रातील एक ऐतिहासिक कामगिरी आहे, ज्यामुळे ऊर्जा आयातीवरील आपले अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल. ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक तरलता वाढवण्याचे आश्वासन देणारा हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात असणार आहे.
बिहारमध्ये सुमारे 14,000 कोटी रुपये खर्चाचे तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्प हाती घेण्यात आले. यामध्ये 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पखर्च असलेल्या बरौनी रिफायनरीच्या विस्ताराची पायाभरणी आणि बरौनी रिफायनरीच्या ग्रिड इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या प्रकल्पांचे उद्घाटन, पारादीप – हल्दिया – दुर्गापूर एलपीजी पाइपलाइनचा पाटणा आणि मुझफ्फरपूर पर्यंत विस्तार इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.
देशभरात हाती घेतलेल्या इतर महत्त्वाच्या तेल आणि वायू प्रकल्पांमध्ये हरियाणातील पानिपत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल संकुलाचा विस्तार, पानिपत रिफायनरीत 3G इथेनॉल प्लांट आणि कॅटॅलिस्ट प्लांट; आंध्र प्रदेशातील विशाख रिफायनरी आधुनिकीकरण प्रकल्प (VRMP); पंजाबमधील फाजिल्का, गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यांचा समावेश असलेला सिटी गॅस वितरण नेटवर्क प्रकल्प; कर्नाटक,गुलबर्गा येथे नवीन पीओएल डेपो, महाराष्ट्रातील मुंबई हाय उत्तर पुनर्विकास फेज-IV इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी (IIPE) ची पायाभरणीही केली.
पंतप्रधानांनी बरौनी येथे हिंदुस्तान उर्वरक अँड रसायन लिमिटेड खत प्रकल्पाचे उद्घाटन केले. 9500 कोटींहून अधिक रुपये खर्च करून विकसित केलेला हा प्रकल्प शेतकऱ्यांना स्वस्त दरात युरिया उपलब्ध करून देईल आणि त्यांची उत्पादकता आणि आर्थिक स्थिरता वाढवेल. देशात पुनरुज्जीवित होणारा हा चौथा खत प्रकल्प असेल.
यावेळी पंतप्रधानांनी सुमारे 3917 कोटी रुपये खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. यामध्ये राघोपूर-फोर्ब्सगंज गेज परिवर्तन प्रकल्प; मुकुरिया-कटिहार-कुमेदपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण; बरौनी-बछवाडा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गासाठी प्रकल्प आणि कटिहार-जोगबनी रेल्वे विभागाचे विद्युतीकरण इत्यादी प्रकल्पांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रवास अधिक सुलभ होईल आणि प्रदेशाचा सामाजिक-आर्थिक विकास साधला जाईल. यावेळी पंतप्रधानांनी दानापूर-जोगबनी एक्स्प्रेस (दरभंगा-साक्री मार्गे), जोगबनी- सहरसा एक्सप्रेस; सोनपूर-वैशाली एक्स्प्रेस; आणि जोगबनी- सिलीगुडी एक्सप्रेस या चार रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला;
पंतप्रधानांनी ‘भारत पशुधन’ हा देशातील पशुधनासाठी एक डिजिटल डेटाबेस उपलब्ध करून देणारा प्रकल्प देशाला समर्पित केला - नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत विकसित करण्यात आलेला, ‘भारत पशुधन’ हा प्रकल्प, प्रत्येक पशुधन प्राण्याला विशेष 12-अंकी टॅग आयडी प्रदान करतो. या प्रकल्पांतर्गत, अंदाजे 30.5 कोटी गोवंश पशुधनापैकी, सुमारे 29.6 कोटी पशोधनाला आधीच टॅग प्रदान करण्यात आले असून त्यांचे तपशील डेटाबेसमध्ये उपलब्ध आहेत. ‘भारत पशुधन’ योजना गोवंशांसाठी ट्रेसिबिलिटी सिस्टीम (प्राण्यांचा शोध घेण्यासाठीची प्रणाली) प्रदान करून शेतकऱ्यांना सक्षम करेल तसेच रोग निरीक्षण आणि रोग नियंत्रणातही मदत करेल.
यावेळी पंतप्रधानांनी '1962 फार्मर्स ॲप' चे उद्घाटन केले, हे एक असे ॲप जे 'भारत पशुधन' डेटाबेस अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व डेटा आणि माहितीची नोंद करते, ज्याचा शेतकरी वापर करू शकतात.
बिहार विकसित होगा, तो देश भी विकसित होगा। pic.twitter.com/yLzRabSpyL
— PMO India (@PMOIndia) March 2, 2024
पूरी दुनिया में भारतीय रेल के आधुनिकीकरण की चर्चा हो रही है। pic.twitter.com/WqSH8zvRtr
— PMO India (@PMOIndia) March 2, 2024
सच्चा सामाजिक न्याय सैचुरेशन से आता है। pic.twitter.com/6fjfLinRxF
— PMO India (@PMOIndia) March 2, 2024