तेलंगणामधील आदिलाबाद येथे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उर्जा, रेल्वे तसेच रस्ते या क्षेत्रांशी संबंधित 56,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच पायाभरणी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की आदिलाबादच्या भूमीला केवळ तेलंगणाशीच नव्हे तर संपूर्ण देशाशी संबंधित विकासप्रकल्पांचे साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे कारण आज 56,000 कोटी रुपये खर्चाच्या 30 हून अधिक विकास प्रकल्पांचे आज लोकार्पण तरी होत आहे किंवा त्यांची पायाभरणी होत आहे. विद्युतनिर्मिती, पर्यावरणविषयक शाश्वतता तसेच रस्त्यांची सुविधा निर्माण करणे यांच्याशी संबंधित अनेक प्रकल्पांचा यात समावेश आहे असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार आणि तेलंगणा राज्य निर्मिती या दोघांच्याही कार्यकाळाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत याकडे निर्देश करून पंतप्रधान मोदी म्हणाले की या राज्यातील जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज देखील 800 मेगावॉट क्षमतेच्या एनटीपीसी युनिट 2 चे उद्घाटन करण्यात आले असून या प्रकल्पामुळे तेलंगणाच्या विद्युतनिर्मिती क्षमतेमध्ये अधिक भर पडणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. अंबारी-आदिलाबाद-पिंपळखुटी या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून आदिलाबाद, बेला आणि मुळूगूया भागातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे याचा देखील त्यांनी उल्लेख केला. हे रेल्वे आणि रस्ते प्रकल्प तेलंगणाच्या तसेच या संपूर्ण क्षेत्राच्या विकासाला चालना देतील आणि प्रवासाचा वेळ वाचवून, पर्यटनाला चालना देत असंख्य रोजगार संधी निर्माण करतील ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
राज्यांच्या विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास’ या संकल्पनेचा पुनरुच्चार करून पंतप्रधान मोदी म्हणाले की सुधारलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जगाचा देशावरील विश्वास वाढतो आणि त्यातून राज्यांकडे गुंतवणूक आकर्षित होत असल्यामुळे त्यांना देखील याचा फायदा होतो. गेल्या तिमाहीत 8.4 टक्क्यांची वाढ दाखवणारी भारत ही एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या उच्च विकास दराबाबत संपूर्ण जगात कुतुहल निर्माण झाले आहे याचा त्यांनी उल्लेख केला. “या वेगाने, भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल,”पंतप्रधान म्हणाले. याचा अर्थ असा देखील होतो की तेलंगणाची अर्थव्यवस्था देखील उच्च विकासदरासह प्रगती करेल असे त्यांनी पुढे सांगितले..
तेलंगणासारख्या भागांकडे पूर्वी दुर्लक्ष झाले होते याचे स्मरण करत, पंतप्रधानांनी गेल्या दशकातील प्रशासनाच्या नव्या मार्गांवर अधिक भर दिला. गेल्या 10 वर्षांत तेलंगणाच्या विकासासाठी अधिक निधीची तरतूद करून दिल्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत ते म्हणाले, “आमच्याकरिता विकास म्हणजे सर्वात गरीब व्यक्तीचा विकास, दलित, आदिवासी, मागासलेले आणि वंचित यांचा विकास.” देशातील 25 कोटींहून अधिक नागरिक दारिद्रयरेषेच्या बाहेर पडले असे सांगून पंतप्रधानांनी याचे श्रेय गरिबांसाठी सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांना दिले. येत्या 5 वर्षांच्या काळात अशा प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर अधिक भर दिला जाईल यावर पंतप्रधानांनी भर दिला.
तेलंगणाचे राज्यपाल डॉ.सुंदरराजन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी तसेच केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी देशभरातील ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांनी तेलंगणातील पेड्डापल्ली येथे एनटीपीसी चा 800 मेगावॅट (युनिट-2) तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. अल्ट्रा-सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित, हा प्रकल्प तेलंगणाला 85% वीज पुरवठा करेल आणि भारतातील एनटीपीसी च्या इतर सर्व पॉवर स्टेशन्समध्ये अंदाजे 42% एवढी सर्वाधिक वीज निर्मिती कार्यक्षमता असलेला प्रकल्प असेल. या प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती.
पंतप्रधानांनी झारखंडमधील चतरा येथील उत्तर करणपुरा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचा 660 मेगावॅट (युनिट-2) समर्पित केला. हा देशातील पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प आहे ज्याची संकल्पना एअर कूल्ड कंडेन्सर (ACC) सह एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे जी पारंपरिक वॉटर-कूल्ड कंडेन्सरच्या तुलनेत 1/3 पर्यंत कमी पाण्याचा वापर करते. या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील सिपत, बिलासपूर येथे फ्लाय ॲश आधारित हलक्या वजनाचे एकत्रित संयंत्र तसेच उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील ग्रीन हायड्रोजन प्लांटला सांडपाणी प्रक्रिया संयंत्र राष्ट्राला समर्पित केले.
याशिवाय, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे सिंगरौली सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, टप्पा-III (2x800 MW); छत्तीसगडमधील रायगड येथील लारा येथे फ्लू गॅस कार्बन डायॉक्साईड ते 4G इथेनॉल प्लांट; आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधील सिंहाद्री येथे समुद्राच्या पाण्यापासून ते हरित हायड्रोजन संयंत्रापर्यंत; आणि छत्तीसगडमधील कोरबा येथे फ्लाय ॲश आधारित FALG एकत्रित संयंत्राची पायाभरणी केली
पंतप्रधानांनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सात प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि एका प्रकल्पाची पायाभरणीही केली. नॅशनल ग्रीड मजबूत करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
पंतप्रधानांनी राजस्थानातील जैसलमेर येथील राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळाच्या (एनएचपीसी) 380 मेगावॅट सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 792 दशलक्ष युनिट हरित उर्जा तयार केली जाईल.
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील जालौन येथील बुंदेलखंड सौर ऊर्जा लिमिटेडच्या (बीएसयूएल) 1200 मेगावॅट जालौन अल्ट्रा मेगा रिन्युएबल एनर्जी पॉवर पार्कची पायाभरणी केली. या पार्कमधून दरवर्षी सुमारे 2400 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे.
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील जालौन आणि कानपूर देहात येथील सतलज जल विद्युत निगम (एसजेव्हीएन) च्या तीन सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांची एकूण क्षमता 200 मेगावॅट आहे. या प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती. पंतप्रधानांनी उत्तराखंड मधील उत्तरकाशी येथे संबंधित ट्रान्समिशन लाइनसह नैटवार मोरी जलविद्युत केंद्राचे उद्घाटनही केले. पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर आणि आसाम मधील धुबरी येथील सतलज जल विद्युत निगमच्या दोन सौर प्रकल्पांची तसेच हिमाचल प्रदेशातील 382 मेगावॅटच्या सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणीही केली.
पंतप्रधानांनी यूपीच्या ललितपूर जिल्ह्यात तुस्कोच्या 600 मेगावॅटच्या ललितपूर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पातून प्रतिवर्षी 1200 दशलक्ष युनिट हरित उर्जा निर्मिती होईल.
नवीकरणीय ऊर्जेतून 2500 मेगावॅट वीज बाहेर काढण्यासाठी रिन्यूच्या कोप्पल-नरेंद्र ट्रान्समिशन योजनेचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. ही आंतरराज्य पारेषण योजना कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आणि इंडिग्रीडच्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित इतर प्रकल्पांचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
ऊर्जा क्षेत्रासोबतच रस्ते आणि रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पही या भेटीदरम्यान हाती घेण्यात आले. पंतप्रधानांनी नव्याने विद्युतीकृत अंबारी - आदिलाबाद - पिंपळखुटी रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित केला. राष्ट्रीय महामार्ग - 353B आणि राष्ट्रीय महामार्ग - 163 द्वारे तेलंगणाला महाराष्ट्राशी आणि तेलंगणाला छत्तीसगडशी जोडणाऱ्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.
जिस विकास का सपना तेलंगाना के लोगों ने देखा था, उसे पूरा करने में केंद्र सरकार हर तरह से सहयोग कर रही है: PM pic.twitter.com/8I3Z7ksFP2
— PMO India (@PMOIndia) March 4, 2024
राज्यों के विकास से देश का विकास। pic.twitter.com/11cmY9t9wf
— PMO India (@PMOIndia) March 4, 2024