सुमारे 14,850 कोटी रुपये खर्चाने 296 किमी लांबीच्या चार मार्गिका असलेल्या या द्रुतगती मार्गाची उभारणी
या द्रुतगती मार्गामुळे या भागातील दळणवळण आणि औद्योगिक विकासाला मिळणार चालना
“यूपी द्रुतगती प्रकल्प राज्यातील अनेक दुर्लक्षित भागांना जोडत आहेत”
“उत्तर प्रदेशातील प्रत्येक भाग नवी स्वप्ने आणि नवे संकल्प घेऊन पुढे जाण्यासाठी सज्ज”
“अनेक आधुनिक राज्यांना मागे टाकू लागल्यामुळे देशात यूपीची ओळख बदलत आहे”
“नियोजित वेळेपूर्वीच प्रकल्प पूर्ण होऊ लागल्यामुळे आपण जनतेने दिलेला कौल आणि त्यांचा विश्वास यांचा सन्मान करत आहोत”
“आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची आपण आठवण ठेवली पाहिजे आणि पुढील महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नव्या संकल्पांचे एक वातावरण तयार केले पाहिजे”
“देशाची हानी करणाऱ्या, विकासावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टींना दूर ठेवले पाहिजे”
“डबल इंजिनची सरकारे मोफत भेटींच्या शॉर्टकटचा आणि ‘रेवडी’ संस्कृतीचा अंगिकार करत नाही आहेत आणि कठोर परिश्रमांनी परिणाम साध्य करत आहेत”
“देशाच्या राजकारणातून मोफत वाटपाच्या संस्कृतीचे उच्चाटन करा आणि त्यांना पराभूत करा”
“संतुलित विकासाने सामाजिक न्याय साध्य होतो”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जलौनच्या ओराई तालुक्यातील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी बुंदेलखंड प्रदेशाच्या कठोर परिश्रम, शौर्य आणि सांस्कृतिक समृद्धीच्या वैभवशाली परंपरेची आठवण करून दिली. या भूमीने असंख्य योद्ध्यांना जन्म दिला ज्यांच्या रक्तामध्येच भारतभक्ती वाहत होती. या भूमीचे सुपुत्र  आणि सुकन्या यांची गुणवत्ता आणि कष्ट यांनी नेहमीच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

या द्रुतगती मार्गाने होणार असलेल्या परिवर्तनाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “ बुंदेलखंड द्रुतगती मार्गामुळे दिल्ली ते चित्रकूट यामधील अंतर तीन ते चार तासांनी कमी झाले आहे, पण याचे यापेक्षाही जास्त फायदे आहेत.  या द्रुतगती मार्गामुळे केवळ वाहनांच्या वेगामध्येच वाढ होणार नाही तर संपूर्ण बुंदेलखंडच्या औद्योगिक प्रगतीला गती प्राप्त होणार आहे.”

अशा महाकाय पायाभूत सुविधा केवळ मोठी शहरे आणि देशातील निवडक भागांपुरत्या मर्यादित असायच्या ते दिवस आता मागे पडले आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. आता सबका साथ, सबका विकास या भावनेने अगदी दुर्गम आणि दुर्लक्षित भागांनाही अभूतपूर्व संपर्कव्यवस्थेचा अनुभव येऊ लागला आहे, असे त्यांनी सांगितले. द्रुतगती मार्गामुळे या भागामध्ये विकासाच्या, रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, उत्तरप्रदेश मधील संपर्क प्रकल्प अनेक क्षेत्रांना जोडत आहेत, ज्याकडे यापूर्वी दुर्लक्ष केले गेले. उदाहरणार्थ, बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग सात जिल्ह्यांमधून जातो, जसे चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया आणि इटावा. त्याप्रमाणेच, अन्य द्रुतगती महामार्ग राज्याच्या काना कोपऱ्याला जोडतो, जो “उत्तरप्रदेशचा प्रत्येक कोपरा नवी स्वप्न आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी तयार आहे” अशी परिस्थिती निर्माण करतो. डबल-इंजिन सरकार नव्या जोमाने त्या दिशेने काम करत आहे, असं ते म्हणाले.

राज्यातील हवाई संपर्क सुधारण्याबाबत पंतप्रधान म्हणाले की प्रयागराज येथे नवीन विमानतळ टर्मिनल उभारण्यात आले आहेत. कुशीनगरला नवीन  विमानतळ मिळाले आहे आणि जेवर, नोईडा येथे नवीन विमानतळाचे काम सुरु आहे तसेच आणखी अनेक शहरे हवाई प्रवास सुविधांनी जोडली जात आहेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि विकासाच्या अन्य संधी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी प्रदेशातील अनेक किल्ल्यांभोवती पर्यटन सर्किट विकसित करावे अशी सूचना पंतप्रधानांनी केली. मुख्यमंत्र्यांनी किल्ल्यांशी संबंधित कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित कराव्यात अशी सूचना देखील त्यांनी केली.

ज्या उत्तरप्रदेशमध्ये सरयू कालवा पूर्ण व्हायला 40 वर्षे लागली, ज्या उत्तरप्रदेशमध्ये गोरखपूर खत संयंत्र 30 वर्ष बंद होते, ज्या उत्तरप्रदेशमध्ये अर्जुन धारण प्रकल्प पूर्ण व्हायला 12 वर्षे लागली, ज्या उत्तरप्रदेशमध्ये अमेठी रायफल फॅक्ट्री केवळ नावाच्या फलकासह पडून होती, ज्या उत्तरप्रदेशमध्ये राय बरेली रेल्वे कोच फॅक्ट्री केवळ रेल्वेचे डबे रंगवून चालत होती, त्याच उत्तरप्रदेशमध्ये आता पायाभूत विकास कामे इतक्या गांभीर्याने केली जात आहेत की त्याने चांगल्या राज्यांनाही मागे टाकले आहे. उत्तरप्रदेशची देशभरातली ओळख बदलत आहे. वेगातील बदलाबाबत मोदी यांनी टिप्पणी केली आणि म्हणाले की रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण वर्षाला 50 किलोमीटर वरून 200 किलोमीटर वर वाढवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशमधील सामान्य सेवा केंद्रांची संख्या 2014 मधील 11,000 वरून आज 1 लाख 30 हजार सामान्य सेवा केंद्र इतकी वाढवण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमधील 12 वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढून आज 35 वर पोहोचली असून आणखी 14 वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी नमूद केले की देश आज विकासाच्या ज्या प्रवाहावर पुढे चालला आहे त्याच्या गाभ्यामध्ये दोन पैलू आहेत. एक म्हणजे हेतू आणि दुसरा सन्मान (इरादा आणि मर्यादा). आम्ही देशाच्या वर्तमानासाठी केवळ नवीन सुविधा तयार करत नसून देशाचे भविष्य देखील घडवत आहोत.

उत्तर प्रदेशात पूर्ण झालेल्या सगळ्या प्रकल्पांनी वेळेची ‘मर्यादा’ पाळली आहे, असे ते म्हणाले. बाबा विश्वनाथ धामचे  पुनर्निर्माण, गोरखपूर एम्स, दिल्ली – मेरठ द्रुतगती मार्ग आणि बुंदेलखंड द्रुतगती मार्ग यासारखे प्रकल्प याचीच उदाहरणे आहेत.  या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण याच सरकारने केले. वेळेपूर्वी प्रकल्प पूर्ण करून, आम्ही लोकांनी आम्हाला दिलेल्या जनादेशाचा आणि आमच्यावर टाकलेल्या विश्वासाचा मान ठेवतो. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी लोकांना विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण ठेवली पाहिजे आणि येत्या महिन्यात नवीन संकल्पांचे वातावरण तयार केले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशाचा अधिकाधिक विकास हा, व्यापक विचार प्रत्येक निर्णय घेताना आणि प्रत्येक धोरण ठरविताना केला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. ज्यामुळे देशाचे नुकसान होईल, देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होईल अशा गोष्टी दूर ठेवल्या पाहिजेत. ते म्हणाले, ‘अमृत काळ’ ही दुर्मिळ संधी आहे आणि देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आपण ही संधी वाया घालवायला नको.

देशात मोफत काहीतरी देण्याचे आश्वासन देऊन मते मागण्याच्या  संस्कृतीमुळे  निर्माण होणाऱ्या समस्येकडे   पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ही ‘फुकट संस्कृती’ देशाच्या विकासाला अतिशय घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला. देशातल्या लोकांनी या ‘फुकट संस्कृती’ किंवा ‘रेवडी संस्कृती’ विषयी जागरूक असायला पाहिजे. जे अशा ‘फुकट संस्कृतीतून’ येतात ते कधीच तुमच्यासाठी द्रुतगती मार्ग, नवीन विमानतळे किंवा संरक्षण मार्गिका बांधणार नाहीत. या लोकांना असे वाटते की सामान्य माणसाला काही तरी फुकट दिले की आपण त्यांची मते  विकत घेऊ शकतो. अशा प्रवृत्तींचा पराभव करून देशाच्या राजकारणातून फुकट संस्कृतीचे उच्चाटन करण्याचे त्यांनी आवाहन केले. ते म्हणाले की आता सरकार ठोस प्रकल्पांवर काम करत आहे. ‘रेवडी संस्कृती’ पेक्षा जनतेला पक्की घरे, रेल्वे मार्ग, रस्ते आणि पायाभूत सुविधा, सिंचन, वीज निर्मिती  या सारख्या सोयी देण्यासाठी सरकार   काम करत आहे. “डबल इंजिन सरकारे फुकट संस्कृती सारखा कुठला ही शॉर्ट कट न घेता परिश्रमातून परिणाम देत आहेत,” पंतप्रधान म्हणाले.

संतुलित विकासाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणले, दुर्लक्षित आणि लहान शहरांत जेव्हा विकास पोहोचतो, तेव्हा सामाजिक न्याय खऱ्या अर्थाने मिळतो. आज अत्याधुनिक पायाभूत सुविधा दुर्लक्षित पूर्व भारत आणि बुंदेलखंडात पोहोचल्या आहेत, यामुळे सामाजिक न्याय मिळाला आहे. वाऱ्यावर सोडून दिलेल्या मागास जिल्ह्यांत आज विकास होत आहे, हा देखील सामाजिक न्यायच आहे. गरिबांसाठी शौचालये, खेड्यांना जोडणारे रस्ते, नळाद्वारे पाणी पुरवठा हा देखील सामाजिक न्याय आहे, असे पंतप्रधान म्हणाले. बुंदेलखंडात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न  करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या जल जीवन मिशन योजनेविषयी त्यांनी विस्ताराने माहिती दिली.

रतौली धरण, भवानी धरण, माझगाव-चिल्ली  तुषार सिंचन प्रकल्पाद्वारे बुंदेलखंडमधील नद्यांचे पाणी जास्तीत जास्त स्थानिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पंतप्रधानांनी  सांगितले. केन-बेतवा लिंक प्रकल्पामुळे या भागातील लोकांचे जीवन बदलेल, असे ते म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांच्या मोहिमेत बुंदेलखंडमधील लोकांनी योगदान द्यावे या आपल्या विनंतीचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

लहान आणि कुटीर उद्योगाला बळकटी देण्यासाठी मेक इन इंडिया मोहिमेच्या भूमिकेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाचे यश अधोरेखित केले. सरकार, कारागीर, उद्योग आणि नागरिकांच्या प्रयत्नांमुळे खेळण्यांच्या आयातीत मोठी कपात झाली आहे. याचा फायदा गरीब, वंचित, मागास, आदिवासी, दलित आणि महिलांना होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रातील बुंदेलखंडच्या योगदानावरही प्रकाश टाकला. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान स्थानिक पुत्र मेजर ध्यानचंद यांच्या नावावर आहे. 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अॅथलिट शैली सिंगचाही त्यांनी उल्लेख केला.

 

बुंदेलखंड द्रुतगती मार्ग

सरकार देशभरात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.  रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे काम हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 29 फेब्रुवारी 2020 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी पायाभरणी झाली. हा या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रयत्न होता. द्रुतगती मार्गाचे  काम 28 महिन्यांत पूर्ण झाले आहे, हे नवीन भारताच्या कार्यसंस्कृतीचे द्योतक आहे जेथे प्रकल्प वेळेवर पूर्ण केले जातात.

उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (UPEIDA) च्या पुढाकाराने सुमारे 14,850 कोटी रुपये खर्चून 296 किमी, चौपदरी द्रुतगती मार्ग  बांधण्यात आला आहे आणि नंतर तो सहा लेनपर्यंत देखील वाढविला जाऊ शकतो. हा मार्ग चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप जवळील गोंडा गावातील राष्ट्रीय महामार्ग -35 पासून इटावा जिल्ह्यातील कुद्रेल गावाजवळ  आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गामध्ये  विलीन होतो. हा मार्ग  चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया आणि इटावा या सात जिल्ह्यांतून जातो

या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासोबतच, बुंदेलखंड एक्सप्रेसवेमुळे आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल, परिणामी स्थानिक लोकांसाठी हजारो नोकऱ्यांची निर्मिती होईल. बांदा आणि जालौन जिल्ह्यात औद्योगिक कॉरिडॉर तयार करण्याचे काम आधीच सुरू करण्यात आले आहे.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Ayushman driving big gains in cancer treatment: Lancet

Media Coverage

Ayushman driving big gains in cancer treatment: Lancet
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Tamil Nadu meets Prime Minister
December 24, 2024

Governor of Tamil Nadu, Shri R. N. Ravi, met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Governor of Tamil Nadu, Shri R. N. Ravi, met PM @narendramodi.”