शांतता टिकवून ठेवण्यासाठी आणि चैतन्यमय बोडो समाजाची उभारणी करण्यासाठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्यावर आधारलेला आणि दोन दिवस चालणारा पहिला बोडोलँड महोत्सव या महा कार्यक्रमाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी यांनी भारतवासीयांना कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी जगभरातील शीख बंधू-भगिनींना आज साजऱ्या होत असलेल्या श्री गुरुनानक देव जी यांच्या 555 व्या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेव्या जयंतीदिनी आज भारताचे नागरिक आदिवासी गौरव दिन साजरा करत आहेत हे देखील त्यांनी सांगितले. पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन करताना आनंद व्यक्त करून त्यांनी देशभरातून समृद्धी, संस्कृती आणि शांततेचे नवे भविष्य साजरे करण्यासाठी जमलेल्या बोडो लोकांचे अभिनंदन केले.
हा प्रसंग म्हणजे त्यांच्यासाठी एक भावनिक क्षण असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी म्हणाले की, या क्षणाने 50 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीतील हिंसाचाराचा अंत केला असल्याने हा अत्यंत योग्य क्षण आहे आणि बोडोलँड त्यांच्या ऐक्याचा पहिला उत्सव साजरा करत आहे. ते पुढे म्हणाले की रणचंडी नृत्यातूनच बोडोलँडचे ताकद दिसून आली.अनेक वर्षांचा संघर्ष आणि मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतर बोडोंनी नवा इतिहास रचल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली.
वर्ष 2020 मधील बोडो शांतता करारानंतर कोक्राझार भेटीच्या मिळालेल्या संधीचे स्मरण करत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की त्या वेळी बोडो जनतेने त्यांच्यावर जो स्नेह आणि प्रेमाचा वर्षाव केला, त्यामुळे त्यांना बोडो जनतेतील एक सदस्य असल्यासारखे वाटले. टाय भेटीला चार वर्षे उलटल्यानंतर देखील आजही त्यांना बोडो जनतेकडून तोच स्नेह आणि प्रेम मिळत आहे त्याबद्दल आपण आनंदी असल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केली.तेथील लोकांना शस्त्रांचा त्याग करून शांततेच्या मार्गाची निवड करताना पाहून ते बोडो जनतेला म्हणाले होते की, आता बोडोलँडमध्ये शांतता आणि समृद्धीची नवी पहाट उगवली आहे याचे देखील त्यांनी स्मरण केले. ते पुढे म्हणाले की, तो खरोखरच त्यांच्यासाठी एक भावनिक क्षण होता. आनंदी जनता आणि आज सुरु असलेला चमकदार सोहोळा पाहिल्यानंतर, बोडो लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता एक मजबूत पाया रचण्यात आला आहे ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. गेल्या 4 वर्षांत बोडोलँडमध्ये करण्यात आलेला विकास अत्यंत महत्त्वाचा आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. “शांतता करारानंतर बोडोलँडने विकासाची नवी लाट अनुभवली आहे,” पंतप्रधान उद्गारले. ते पुढे म्हणाले की, बोडो शांतता कराराचे लाभ आणि बोडो लोकांच्या जीवनावर त्याचा झालेला परिणाम पाहून आज समाधान वाटते. बोडो शांतता कराराने इतर अनेक करारांसाठी नवे मार्ग खुले केले असे त्यांनी सांगितले. या कराराचा परिणाम म्हणून एकट्या आसाममधील 10 हजार युवकांनी विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे परत वळण्यासाठी शस्त्रे खाली ठेवली, हिंसेचा मार्ग सोडून दिला हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. कार्बी अंग्लाँग करार, ब्रू-रिआंग करार आणि एनएलएफटी-त्रिपुरा करार एक दिवस प्रत्यक्षात येतील हे कोणाच्याही कल्पनाशक्तीच्या पलीकडे होते असे त्यांनी पुढे सांगितले. ते म्हणाले की, या भागातील जनता आणि सरकार यांच्यातील परस्पर विश्वासाचा दोघांनीही आदर केला आणि आता केंद्र सरकार तसेच आसाम राज्य सरकार बोडोलँड आणि येथील जनतेच्या विकासासाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी बोडो प्रदेश क्षेत्रातील बोडो समुदायाच्या गरजा तसेच आकांक्षा यांना दिलेले प्राधान्य अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी म्हणाले की केंद्र सरकारने बोडोलँडच्या विकासासाठी 1500 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले आहे आणि आसाम सरकारने विशेष विकासात्मक पॅकेज दिले होते. ते पुढे म्हणाले की बोडोलँडमध्ये शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 700 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. हिंसक मार्गाचा त्याग करून मुख्य प्रवाहाकडे परत आलेल्या लोकांप्रती सरकारने सर्वोच्च संवेदनशीलता दाखवून निर्णय घेतले आहेत अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. बोडोलँड राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चार हजारहून अधिक माजी कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यात आले असून अनेक युवकांना आसाम पोलीस दलात नोकऱ्या देण्यात आल्या आहेत अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना दिली. ते पुढे म्हणाले की बोडो संघर्षामुळे प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला आसाम सरकारने 5 लाख रुपयांची मदत दिली आहे. बोडोलँडच्या विकासासाठी आसाम सरकार दर वर्षी 800 कोटी रुपयांहून जास्त निधी खर्च करत आहे याचा देखील उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.
कोणत्याही क्षेत्रातील तरुण आणि महिला यांच्यासाठी कौशल्य विकासाचे तसेच संधींच्या उपलब्धतेचे महत्त्व ठळकपणे मांडत पंतप्रधानांनी एसईईडी अभियान सुरु केल्याची बाब अधोरेखित केली. एसईईडी मोहिमेची माहिती विषद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की,कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार निर्मिती आणि विकास यांच्या माध्यमातून तरुणांचे कल्याण करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले असून बोडो युवकांना या अभियानामुळे प्रचंड लाभ होणार आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी बंदुका हाताळणारे युवक आता क्रीडा क्षेत्रात प्रगती करत आहेत हे पाहणे अत्यंत आनंददायी आहे. बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या देशांच्या संघांच्या सहभागासह कोक्राझार येथे गेली दोन वर्षे आयोजित होत असलेल्या ड्युरंड चषक स्पर्धा ऐतिहासिक ठरल्या आहेत. शांतता करार झाल्यानंतर कोक्राझार येथे गेली तीन वर्षे बोडो साहित्याप्रती महान सेवेचे दर्शन घडवणाऱ्या बोडोलँड साहित्यिक महोत्सवाचे आयोजन होत आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आज साजऱ्या होत असलेल्या बोडो साहित्य सभेच्या 73 व्या स्थापनादिनानिमित्त देखील त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. हा दिवस बोडो साहित्य आणि बोडो भाषेच्या उत्सवाचा दिवस असून त्यानिमित्त या भागात उद्या सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
महोत्सवाच्या ठिकाणी आयोजित प्रदर्शनाच्या भेटीच्या अनुभवाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांनी प्रदर्शनात भौगोलिक मानके (जीआय टॅग) प्राप्त झालेली अरोन्नाये, दोखना, गमसा, कराई-दाखिनी, थोरखा, जऊ गिशी, खाम आणि इतर उत्पादने यांसारख्या समृध्द बोडो कला आणि हस्तकलेशी संबंधित वस्तू पाहिल्या. ते पुढे म्हणाले की, जीआय टॅगला असलेले महत्त्व येथे निर्मित उत्पादन जगभरात कोठेही असेल तरी ते बोडोलँड आणि बोडो संस्कृतीशी जोडलेले आहे ही त्या उत्पादनाची ओळख कायम राखण्यासाठी मदत करते. सरकारने येथे बोडोलँड सेरीकल्चर अभियान राबवले आहे हे देखील त्यांनी अधोरेखित केले.प्रत्येक बोडो कुटुंबात विणकामाची परंपरा आहे हे लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की बोडोलँड हातमाग अभियानाच्या माध्यमातून बोडो समुदायाच्या सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत.
"आसाम हे भारताच्या पर्यटन क्षेत्राचे एक मोठे शक्ती स्थान आहे, तर बोडोलँड हे आसामच्या पर्यटनाचे बलस्थान आहे", असे पंतप्रधान म्हणाले. मानस राष्ट्रीय उद्यान, रायमोना राष्ट्रीय उद्यान आणि सिखना झालाओ राष्ट्रीय उद्यानातील घनदाट जंगले, जी एकेकाळी लपण्याचे ठिकाण म्हणून वापरली जात असत, ती आता तरुणांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे माध्यम बनत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. बोडोलँडमधील वाढत्या पर्यटनामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोडोफा उपेंद्र नाथ ब्रह्मा आणि गुरुदेव कालीचरण ब्रह्मा यांच्या योगदानाचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की बोडोफा यांनी नेहमीच भारताच्या अखंडतेसाठी आणि बोडो लोकांच्या संवैधानिक हक्कांसाठी लोकशाही पद्धतीचा पुरस्कार केला, तर गुरुदेव कालीचरण ब्रह्मा यांनी अहिंसा आणि अध्यात्माच्या मार्गाने समाजाला एकत्र आणले. बोडो माता आणि भगिनींना त्यांच्या मुलांच्या उज्वल भविष्याची स्वप्ने आहेत, तर प्रत्येक बोडो कुटुंबात आता आपल्या मुलांना चांगले भविष्य देण्याची आकांक्षा आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. माजी मुख्य निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा, मेघालयचे माजी राज्यपाल रणजित शेखर मुशाहारी, यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम करून देशाची सेवा करणाऱ्या आणि बोडो समाजाची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या त्यांच्या समोर असलेल्या यशस्वी बोडो व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणेमुळे हे घडले, असे ते म्हणाले. . बोडोलँडचे तरुण चांगले करिअर घडवण्याचे स्वप्न पाहत आहेत, तसेच केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे प्रत्येक बोडो कुटुंबाच्या प्रगतीत भागीदार म्हणून त्यांच्या पाठीशी उभी आहेत याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
आसामसह संपूर्ण ईशान्येकडील राज्ये ही भारताची अष्टलक्ष्मी आहेत आणि विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा देण्यासाठी पूर्व भारतातून विकासाची पहाट उगवेल, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमधील सीमा विवादांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करून ईशान्येत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आसाम आणि ईशान्येच्या विकासाचा सुवर्णकाळ गेल्या दशकात सुरू झाला आहे यावर भर देऊन, सरकारच्या विविध धोरणांमुळे 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आसाममधील लाखो लोकांनी गरिबीवरही मात केली आहे, असे ते म्हणाले. सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात आसाम विकासाचे नवे विक्रम रचत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सरकारने विशेष करून आरोग्य पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे, असे ते म्हणाले. गेल्या दीड वर्षात आसामला गुवाहाटी एम्स आणि कोक्राझार, नलबारी, नागाव वैद्यकीय महाविद्यालय अशी 4 मोठी रुग्णालये देण्यात आली, ज्यामुळे लोकांच्या अडचणी कमी झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. आसाममध्ये कर्करोग रुग्णालय सुरू झाल्याने ईशान्येतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे ते म्हणाले. 2014 पूर्वी आसाममधील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 6 वरून वाढवून आता 12 करण्यात आली होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. याशिवाय आणखी 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडण्याचे काम सुरू असून या महाविद्यालयांमुळे तरुणांना संधींची नवीन दारे खुली होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
बोडो शांतता कराराने दाखवलेला मार्ग हा ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या समृद्धीचा मार्ग असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले. बोडोलँड हे शतकानुशतके जुन्या संस्कृतीचे समृद्ध निवासस्थान मानले जात असल्याचे सांगून आपल्याला ही संस्कृती आणि परंपरा सतत मजबूत करणे आवश्यक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी सर्व बोडोंचे आभार मानले आणि त्यांना पहिल्या बोडोलँड मोहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, बोडोलँड प्रादेशिक क्षेत्राचे प्रमुख प्रमोद बोरो, ऑल बोडो स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष दीपेन बोडो, बोडो साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. सूरथ नरझरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या कार्यक्रमात दूरदृश प्रणाली मार्फत सहभाग नोंदवला.
पार्श्वभूमी
पहिला बोडोलँड महोत्सव हा दोन दिवसीय कार्यक्रम 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जात आहे. शांतता टिकवून ठेवण्यासाठी आणि चैतन्यपूर्ण बोडो समाजाची उभारणी करण्यासाठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर आधारित असे हे एक मोठे आयोजन आहे. केवळ बोडोलँडमध्येच नाही तर आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या इतर आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिक बोडो लोकांना एकत्र आणणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रातील (BTR) इतर समुदायांसह बोडो समुदायाची समृद्ध संस्कृती, भाषा आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करून आयोजित या महोत्सवाची संकल्पना ‘समृद्ध भारतासाठी शांतता आणि सुसंवाद’ अशी आहे. सांस्कृतिक आणि भाषिक वारसा, पर्यावरणीय जैवविविधता आणि बोडोलँडच्या पर्यटन क्षमतेच्या समृद्धतेचा लाभ घेणे हे देखील या आयोजनाचे उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली 2020 मध्ये बोडो शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यापासून पुनर्प्राप्ती आणि लवचिकतेचा उल्लेखनीय प्रवास साजरा करण्यासाठी देखील हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या शांतता कराराने केवळ बोडोलँडमधील अनेक दशके सुरू असलेल्या संघर्ष, हिंसाचार आणि जीवितहानीचे निराकरण केले नाही तर इतर शांतता करारांसाठी उत्प्रेरक म्हणूनही काम केले.
“भारतीय वारसा आणि परंपरांमध्ये समृद्ध बोडो संस्कृती, परंपरा आणि साहित्याचे योगदान” या विषयावरील सत्र हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल, तसेच समृद्ध बोडो संस्कृती, परंपरा, भाषा या मुद्द्यांवर चर्चाही होईल. "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या अनुसार मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण पद्धती समोरची आव्हाने आणि संधी" या विषयावर एक विशेष सत्र देखील आयोजित केले जाईल. बोडोलँड प्रदेशातील पर्यटन आणि संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने "स्वदेशी सांस्कृतिक संमेलन आणि संस्कृती तसेच पर्यटनाद्वारे 'व्हायब्रंट बोडोलँड' प्रदेश निर्माण करण्यावर चर्चा" या विषयावर देखील चर्चासत्र आयोजित केले जाईल.
या कार्यक्रमात बोडोलँड प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि भारताच्या इतर भागांतून, सोबतच शेजारील नेपाळ आणि भूतान या देशातून पाच हजारांहून अधिक सांस्कृतिक, भाषिक आणि कला रसिक सहभागी झाले होते.
Click here to read full text speech
बोडो लोगों के उज्ज्वल भविष्य की मजबूत नींव तैयार हो चुकी है: PM @narendramodi pic.twitter.com/QAiZQaXHbN
— PMO India (@PMOIndia) November 15, 2024
पूरा नॉर्थ ईस्ट, भारत की अष्टलक्ष्मी है: PM @narendramodi pic.twitter.com/EfQhPzA726
— PMO India (@PMOIndia) November 15, 2024