Quoteजम्मू-काश्मीर, तेलंगण आणि ओदिशामध्ये रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या शुभारंभामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि या प्रदेशांच्या सामाजिक-आर्थिक विकासात भर पडेल : पंतप्रधान
Quoteआज देश विकसित भारताच्या संकल्पाला पूर्ण करण्यात गुंतलेला आहे आणि त्यासाठी भारतीय रेल्वेचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे: पंतप्रधान
Quoteभारतातील रेल्वेचा विकास आम्ही चार निकषांवर पुढे नेत आहोत. पहिला- रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, दुसरा-रेल्वे प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा, तिसरा- देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे कनेक्टिव्हिटी, चौथा- रोजगार निर्माण करण्यासाठी, उद्योगांना पाठबळ देण्यासाठी रेल्वे : पंतप्रधान
Quoteआज भारत रेल्वे मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याच्या जवळ आला आहे, आम्ही सातत्याने रेल्वेचा पल्ला देखील विस्तारला आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजनचे उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे डिव्हीजनच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले.

श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी त्यांची शिकवण आणि जीवन, सशक्त आणि समृद्ध राष्ट्राच्या संकल्पनेला प्रेरणा देते, असे सांगितले. कनेक्टिव्हिटीमध्ये भारताच्या वेगवान प्रगतीची प्रशंसा करत, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, 2025 च्या सुरुवातीपासूनच, भारत 1000 किलोमीटर पेक्षा जास्त मेट्रो रेल्वे जाळ्याचा विस्तार करून आपल्या उपक्रमांना गती देत आहे. यावेळी त्यांनी काल सुरू झालेल्या दिल्ली- मेट्रो प्रकल्पासहित अलीकडेच उद्घाटन झालेल्या दिल्ली-एनसीआरमधील नमो भारत ट्रेनचा उल्लेख केला. जम्मू आणि काश्मीर, ओदिशा आणि तेलंगण येथे सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे देशाच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडच्या भागातील आधुनिक कनेक्टिव्हिटीमध्ये एक मोठी झेप घेतल्याने संपूर्ण देशाने एक पाऊल पुढे टाकल्याचा दाखला आजचा कार्यक्रम देत आहे, असे मोदी म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या विकास प्रकल्पांबद्दल त्यांनी या राज्यांतील लोकांचे आणि भारतातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले.

 

|

देशभरात समर्पित फ्रेट कॉरिडॉरसारख्या आधुनिक रेल्वे नेटवर्कचे काम वेगाने सुरू असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या विशेष कॉरिडॉरमुळे नियमित रेल्वेमार्गावरचा ताण कमी होतो आणि जलदगती रेल्वेगाड्यांसाठी अधिक संधी निर्माण होत आहेत. मेड इन इंडिया प्रकल्पाला गती देण्याबरोबरच  रेल्वेमध्ये कायापालट होत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मेट्रो आणि रेल्वेसाठी आधुनिक डब्यांची निर्मिती केली जात आहे. स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे, स्थानकांवर सौर पॅनेल बसवले जात आहेत आणि रेल्वे स्थानकांवर एक स्थानक एक उत्पादन स्टॉल्स उभारले जात आहेत. या सर्व उपक्रमांमुळे रेल्वे क्षेत्रात लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. गेल्या दशकभरात, रेल्वे मध्ये लाखो तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. नवीन रेल्वेगाडीचे डबे तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये कच्च्या मालाच्या मागणीमुळे इतर क्षेत्रातही नोकरीच्या संधी मिळतात,” असे ते म्हणाले. रेल्वेशी संबंधित विशेष कौशल्ये लक्षात घेत देशात पहिल्या गती शक्ती विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. जसजसे रेल्वेचे नेटवर्क विस्तारात आहे, नवीन विभाग आणि नवीन मुख्यालये उभारण्यात येत आहेत, त्यामुळे जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि लेह-लडाख या प्रदेशांना लाभ होत आहे. रेल्वेविषयक पायाभूत सेवा सुविधांमध्ये जम्मू काश्मीर नवीन टप्पे गाठत आहे, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाविषयी संपूर्ण देशभरात चर्चा आहे. चिनाब या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या  रेल्वे कमान सेतूच्या निर्मितीमुळे  हा प्रदेश उर्वरित भारताशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावेल आणि लेह लडाख मधील लोकांना सुविधा मिळेल. देशातील पहिला केबल-आधारित रेल्वे पूल असलेला अंजी खड्ड पुल  देखील याच प्रकल्पाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. चिनाब पुल आणि अंजी खड्ड पुल हे या प्रदेशात आर्थिक प्रगती आणण्याचे आणि समृद्धीला चालना देण्याचे अभियांत्रिकीचे एक अद्वितीय उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या देशाच्या दृढतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.  “हे उद्दिष्ट साध्य करण्यात भारतीय रेल्वेचा विकास केंद्रस्थानी आहे. गेल्या दशकभरात, भारतीय रेल्वेत ऐतिहासिक परिवर्तन घडून आले आहे, त्यामुळे देशाची प्रतिमा बदलली आहे आणि नागरिकांचे मनोबलही लक्षणीयरित्या उंचावले आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.  भारतीय रेल्वेचा विकास चार महत्त्वाच्या मानकांनुसार होत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. ही मानके - पहिले, रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण;  दुसरे, प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांची तरतूद;  तिसरे, देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे संपर्काचा विस्तार;  आणि चौथे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच रेल्वेच्या माध्यमातून उद्योगांना पाठिंबा, असेही ते म्हणाले.  “आजचा कार्यक्रम हा या दृष्टीकोनाचा दाखला आहे. नवीन विभाग आणि रेल्वे टर्मिनल्सच्या स्थापनेमुळे भारतीय रेल्वेचे  21व्या शतकातील आधुनिक रेल्वेसेवेत रूपांतरित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल”, असेही पंतप्रधान म्हणाले.  या घडामोडी आर्थिक समृद्धीच्या परिसंस्थेला चालना देतील, रेल्वेचे कार्यान्वयन वाढवतील, अधिक गुंतवणुकीच्या संधी निर्माण करतील आणि नवीन रोजगार निर्माण करतील, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

 

|

वंदे भारत ट्रेन, अमृत भारत स्थानके आणि नमो भारत रेल्वेने भारतीय रेल्वेसाठी नवीन आदर्श स्थापित केला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  "आकांक्षी भारत आज कमी वेळेत अधिक उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे," असेही ते म्हणाले.  सध्या, वंदे भारत गाड्या 50 हून अधिक मार्गांवर चालत असून 136 सेवा प्रवाशांना प्रवासाचा सुखद अनुभव देत आहेत.  “काही दिवसांपूर्वी, मी वंदे भारत ट्रेन आपल्या ट्रायल रनदरम्यान ताशी 180 किलोमीटर वेगाने धावणारी नवीन स्लीपर रेल्वे दाखवणारा व्हिडिओ पाहिला.  अशा उपलब्धी प्रत्येक भारतीयाचे ऊर अभिमानाने भरून टाकतात,” असे पंतप्रधान म्हणाले. या सर्व उपलब्धी म्हणजे केवळ सुरुवात असून भारत लवकरच आपली पहिली बुलेट ट्रेन धावण्याच्या घटनेचा साक्षीदार होईल, यावर पंतप्रधानांनी भर दिला

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव सुधारण्यावर भर देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यासाठी देशभरातील 1,300 हून अधिक अमृत स्थानकांचे नूतनीकरण सुरू आहे, असे ते म्हणाले. गेल्या दशकात रेल्वे संपर्कामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  2014 मध्ये केवळ 35% असलेले रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आज सुमारे 100% पर्यंत पोहोचले आहे. 30,000 किमी पेक्षा जास्त नवीन रेल्वे रूळ  टाकण्यात आले आहेत तर शेकडो रोड ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिज बांधले गेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  याव्यतिरिक्त, ब्रॉडगेज मार्गावरील सर्व मानवरहित क्रॉसिंग काढून टाकण्यात आले आहेत, त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा सुधारली असून अपघात कमी झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ओदिशाला विपुल नैसर्गिक संसाधने आणि लांबच लांब समुद्र किनाऱ्याचे वरदान लाभले असून ओदिशात आंतरराष्ट्रीय व्यापाराची मोठी क्षमता आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ओदिशा राज्यात 70,000 कोटींहून अधिक किमतीचे विविध रेल्वे प्रकल्प सुरू आहेत, यासोबतच 7 गती शक्ती कार्गो टर्मिनल्सच्या स्थापनेचे काम सुरू आहे. असे  पंतप्रधान म्हणाले. यामुळे ओदिशातील व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज ओडिशातील रायगडा रेल्वे विभागाची पायाभरणी करण्यात आली आहे, ज्यामुळे ओडिशा विशेषत: आदिवासी कुटुंबांची संख्या जास्त असलेल्या दक्षिण ओडिशामध्ये  पर्यटन, व्यवसाय आणि रोजगाराला चालना देणारी राज्याची रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

|

तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन करताना आज पंतप्रधानांनी आऊटर रिंग रोडला जोडून प्रादेशिक विकासाला गती देण्याच्या या प्रकल्पाच्या क्षमतेवर प्रकाश टाकला.  "आऊटर रिंग रोडला जोडलेले हे स्टेशन या प्रदेशातील विकासाला लक्षणीय चालना देईल," असे ते म्हणाले. फलाट, लिफ्ट, एस्केलेटर, सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध क्रियांसह स्थानकाच्या आधुनिक सुविधांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने पुढे टाकलेले हे एक पाऊल आहे.” असेही ते म्हणाले. या नवीन टर्मिनलमुळे सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचीगुडा येथील सध्याच्या स्थानकांवरचा दबाव कमी होईल, यामुळे लोकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल, हे त्यांनी अधोरेखित केले. असे प्रकल्प केवळ राहणीमानात सुलभता वाढवत नाहीत तर भारताच्या व्यापक पायाभूत सुविधांच्या उद्दिष्टांशी सुसंगत व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देतात, यावर पंतप्रधानांनी  भर दिला. भारत सध्या एक्स्प्रेसवे, जलमार्ग आणि मेट्रो नेटवर्कसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विस्तार करत आहे, असे ते म्हणाले. 2014 मध्ये असलेल्या विमानतळांची संख्या 74 वरून आज 150 वर पोहोचली आहे आणि मेट्रो सेवा 5 शहरांवरून देशभरातील 21 शहरांपर्यंत विस्तारली आहे, असेही त्यांनी सांगितले. "हे प्रकल्प विकसित भारताकडे जाणाऱ्या मोठ्या मार्गदर्शक आराखड्याचा भाग आहेत, जे आता या देशातील प्रत्येक नागरिकाचे ध्येय आहे.", असेही पंतप्रधानांनी सांगितले.

भारताच्या वाढीबाबत विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, "मला खात्री आहे की आपण एकत्रितपणे या वाढीला आणखी गती देऊ." त्यांनी या उपलब्धींबद्दल भारतातील नागरिकांचे अभिनंदन केले आणि राष्ट्र उभारणीसाठी सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री  जी किशन रेड्डी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय  राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री  व्ही. सोमण्णा, राज्यमंत्री  रवनीत सिंह बिट्टू, केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार, ओडिशाचे राज्यपाल  हरी बाबू कंभामपती, तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल  मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री  ओमर अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंथ  रेड्डी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री  मोहन चरण माझी आणि इतर मान्‍यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

|

पार्श्वभूमी

या प्रदेशातील संपर्क आणि दळणवळणाला  आणखी चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा नवीन जम्मू रेल्वे विभागाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे  उद्घाटन केले.

पठाणकोट - जम्मू - उधमपूर - श्रीनगर - बारामुल्ला, भोगपूर सिरवाल - पठाणकोट, बटाला - पठाणकोट आणि पठाणकोट ते जोगिंदर नगर या विभागांचा समावेश या रेल्‍वे विभागात आहे. एकूण 742.1  किलोमीटर  लांबीच्या जम्मू रेल्वे विभागाच्या निर्मितीमुळे जम्मू आणि काश्मीर तसेच  आसपासच्या प्रदेशांना बराच फायदा होईल, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वे विभागाच्‍या मागणीची  पूर्तता होणार आहे.  लोकांच्या  आकांक्षा आणि भारताच्या इतर भागांशी संपर्क सुधारेल ,  यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पायाभूत सुविधांचा विकास होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण -  सामाजिक-आर्थिक विकास होईल.

तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्‍थानकासाठी सुमारे 413 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्‍ये  दुसऱ्या प्रवेशद्वाराची  तरतूद केली असून  नवीन ‘कोचिंग’ टर्मिनल म्हणून विकसित केले आहे. हे टर्मिनल  पर्यावरण-स्नेही असून, त्यामध्‍ये  उत्तम प्रवासी सुविधा देण्‍यात आल्या आहेत. सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचेगुडा यांसारख्या शहरातील विद्यमान ‘कोचिंग’ टर्मिनल्सवरील गर्दी कमी होवू शकेल.

पंतप्रधानांनी पूर्व तटीय रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणीही केली. हे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागात संपर्क, दळणवळण  सुधारेल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास करेल.

 

Click here to read full text speech

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Artificial intelligence & India: The Modi model of technology diffusion

Media Coverage

Artificial intelligence & India: The Modi model of technology diffusion
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 मार्च 2025
March 22, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Progressive Reforms Forging the Path Towards Viksit Bharat