“राष्ट्रीय सुरक्षा आणि श्रद्धेची भूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये तुमच्यासोबत असणे माझ्यासाठी आशीर्वादासमान आहे.”
“उत्तराखंडची प्रगती आणि इथल्या नागरिकांचे कल्याण, आमच्या सरकारच्या मिशनच्या केंद्रस्थानी आहे.”
“हे दशक उत्तराखंडचे दशक ठरणार आहे”
“उत्तराखंडच्या गावागावात सर्वत्र देशाचे रक्षक आहेत”
“जे लोक ही गावे सोडून गेले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, या गावांमध्ये पर्यटनवाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
“आमच्या माता आणि भगिनींचे सगळे कष्ट आणि अडचणी दूर करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.”
“दुहेरी इंजिनाच्या सरकारने उत्तराखंडमधील पर्यटन आणि तीर्थयात्रा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फळे आता दिसत आहेत”
“उत्तराखंडमधील दळणवळणाचा विस्तार या राज्याच्या विकासाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल”
“अमृत काळ हा देशातील प्रत्येक प्रदेशाला एकमेकांशी जोडण्याचा आणि देशातील प्रत्येक घटकाला सुविधा,सन्मान आणि समृद्धी मिळवून देण्याचा काळ”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तराखंडच्या पिथौरागड इथे सुमारे 4200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये, ग्रामीण विकास,रस्ते, ऊर्जा, सिंचन, पेयजल, पीक उद्यान शास्त्र, शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रांचा समावेश आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच, उत्तराखंडच्या लोकांकडून मिळत असलेले अभूतपूर्व प्रेम आणि अमर्याद आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि ते म्हणाले, “हा अनुभव, म्हणजे गंगेच्या पाण्याने आपल्याला प्रेमाचा वर्षाव करावा असा अनुभव आहे” या श्रद्धा आणि शौर्याच्या भूमीला, विशेषतः इथल्या धैर्यवान वीरमातांना पंतप्रधानांनी वंदन केले.

 

बैद्यनाथ धाम इथे जय बद्री विशालच्या घोषणेने गढवाल रायफल्सच्या सैनिकांचा आवेश आणि उत्साह वाढतो आणि गंगोलीहाट इथल्या काली मंदिरात घंटानाद केल्याने कुमाऊं रेजिमेंटच्या सैनिकांमध्ये नवी ऊर्जा संचारते, असे पंतप्रधान म्हणाले. मानसखंडमध्ये, पंतप्रधानांनी बैद्यनाथ, नंदादेवी, पूरनगिरी, कासारदेवी, कैंचीधाम, कटरमल, नानकमत्ता, रेठा साहिब आणि इतर अगणित देवस्थानांचा उल्लेख केला जे जमिनीची भव्यता आणि वारसा बनवतात. "जेव्हा मी तुमच्यामध्ये उत्तराखंडमध्ये असतो तेव्हा मला कृतकृत्य वाटते", असे पंतप्रधान म्हणाले.

त्याआधी, पंतप्रधानांनी पार्वती कुंड इथे पूजा आणि दर्शन घेतले. “मी इथे प्रत्येक भारतीयाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि विकसित भारताच्या संकल्पाला बळ देण्यासाठी प्रार्थना केली. उत्तराखंडच्या लोकांच्या सर्व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी मी आशीर्वाद मागितले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जवान, कलाकार आणि बचत गटांच्या महिलांशी झालेल्या बैठकांचाही उल्लेख केला. सुरक्षा, समृद्धी आणि संस्कृतीचे आधारस्तंभ असलेल्या या सर्व लोकांना भेटल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हे दशक उत्तराखंडचे दशक असेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

"आमचे सरकार उत्तराखंडमधील लोकांच्या प्रगतीसाठी आणि जीवन सुलभतेसाठी काम करण्यासाठी पूर्ण समर्पण आणि सचोटीने काम करत आहे", असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी उत्तराखंडसोबतचा त्यांचा दीर्घ संबंध आणि स्नेहमय नात्याचा उल्लेख केला. नारीशक्ती वंदन अधिनियमाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी उत्तराखंडमधून मिळालेला पाठिंबा आणि प्रतिसादाचा उल्लेख केला.

 

भारताने केलेल्या विकासाच्या वाटचालीबद्दल बोलतांना ते म्हणाले. "आज जग भारत आणि भारतीयांच्या योगदानाची दखल घेत आहे. भूतकाळातील निराशाजनक परिस्थितीचे स्मरण करत, आज मात्र जागतिक आव्हानांचा सामना करतांना विविध मंचांवर भारताचा बुलंद आवाज ऐकला जातो आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. G20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेच्या आयोजनाचे आज जगभरात कौतुक होत आहे, असा उल्लेख त्यांनी केला. देशाच्या या यशाचे संपूर्ण श्रेय देशातील जनतेला आहे कारण त्यांनी प्रदीर्घ काळानंतर एका स्थिर आणि भक्कम सरकारची निवड केली आहे. जागतिक मंचावर 140 कोटी, लोकांचा विश्वास आणि आत्मविश्वास घेऊन जातो, असे त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षात 13.5 कोटी भारतीय दारिद्र्य रेषेच्या वर आले अशी माहिती त्यांनी दिली, तसेच सरकारच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे देशाच्या  दुर्गम भागात असलेल्या सर्वांपर्यंत, सरकारी योजनांचे लाभ पोहोचत आहेत असे त्यांनी सांगितले. या 13.5 कोटी लोकांपैकी काही लोक दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणारे आहेत, हे पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे, आणि भारत आपल्या देशांतील गरीबीचे समूळ उच्चाटन करू शकते, यांचे हे 13.5 कोटी लोक प्रत्यक्ष पुरावाच असल्याचे त्यांनी सांगितले.

या आधीच्या सरकारांनी ‘गरीबी हटाओ’ चा नारा तर दिला, मात्र, त्याची जबाबदारी मोदींनी घेतली आणि गरीबी संपवली जाऊ शकते हे सिद्ध केले, असे त्यांनी सांगितले.  “आपण सगळे मिळून गरिबी हटवू शकतो”, यावर त्यांनी भर दिला.  भारताच्या चांद्रयान मोहिमेचा उल्लेख करत, आजवर कोणतेही राष्ट्र जिथे पोहोचू शकले नाही, त्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पोहोचण्याचे उद्दिष्ट आपण साध्य केले’असे पंतप्रधान म्हणाले. “चांद्रयान जिथे उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे आणि उत्तराखंडची ओळख आता चंद्रावर आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. उत्तराखंडमध्ये प्रत्येक पावलावर शिवशक्ती चा प्रत्यय आपल्याला येतो.”असे त्यांनी सांगितले.भारताने  क्रीडा क्षेत्रामध्‍ये केलेली  उत्तुंग कामगिरी पंतप्रधानांनी अधोरेखित केली  आणि देशाने आत्तापर्यंत  सर्वाधिक  पदके मिळविल्याबद्दल  आनंद व्यक्त केला.  उत्तराखंडमधून  8 खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेला गेले होते.  त्यापैकी  लक्ष्य सेन आणि वंदना कटारिया यांच्या संघांनी पदके जिंकली. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार, यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या  मोबाईल फोनचे  फ्लॅशलाइट्स सुरू केले आणि  या खेळाडूंना मिळवलेल्या  यशाचा आनंद व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले की, सरकार खेळाडूंना प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा देण्‍यासाठी सर्वतोपरी  मदत करत आहे. आज हल्दवानी येथील हॉकी मैदान आणि रुद्रपूर येथील वेलोड्रोमची पायाभरणी करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी  केलेल्या  तयारीबद्दल  पंतप्रधानांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

 

“उत्तराखंडमधील प्रत्येक गावाने भारताच्या सीमांचे रक्षण करणारे लोक निर्माण केले आहेत”, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, सध्याच्या सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ ची त्यांची दशकापूर्वीची  मागणी पूर्ण केली आहे. पंतप्रधानांनी माहिती दिली की,  ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेअंतर्गत माजी सैनिकांना 70,000 कोटींहून अधिक रक्कम आधीच हस्तांतरित करण्यात आली आहे ज्यामुळे माजी सैनिकांच्या 75,000 हून अधिक कुटुंबांना मोठा फायदा झाला आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. ते पुढे म्हणाले,   “सरकारच्या प्राधान्य क्षेत्रांपैकी एक म्हणजे सीमावर्ती भागाचा विकास, हे कार्य आहे.’’  नवीन सेवांचा विकास येथे वेगाने होत आहे. मागील सरकारच्या काळात सीमावर्ती भागात विकासाचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले.  पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शेजारील राष्ट्रांकडून असा विकसित भूभाग बळकावला जाईल, याची भीती जणू आधीच्या सरकारला होती. मात्र,  नव्या भारताला कशाचीच भीती वाटत नाही,  इतरांना   भीती वाटावी, असे काही करीत नाही”,  असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सीमावर्ती भागात होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाविषयी भाष्य केले. गेल्या 9 वर्षांत सीमावर्ती भागात 4,200 किलोमीटरहून अधिक रस्ते, 250 पूल आणि 22 बोगदे बांधण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आजच्या प्रकल्पांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, सीमावर्ती भागामध्‍ये   रेल्वे पोहोचवण्यासाठी  योजना सुरू आहेत.

पंतप्रधान म्हणाले की,  ‘व्हायब्रंट व्हिलेज’  योजनेमुळे सीमेवरची अगदी टोकाला असलेली शेवटची गावे, देशाच्या दृष्‍टीने आता पहिली गावे बनली आहेत. “या  गावांतून आपले घरदार  सोडून गेलेल्या लोकांना परत गावामध्‍ये  आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला या गावांमध्ये पर्यटन वाढवायचे आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले,  पाणी, औषध, रस्ते, शिक्षण, वैद्यकीय सुविधांबाबत भूतकाळातील चुकीच्या धोरणांमुळे लोकांना घरे सोडावी लागली.  मात्र उत्तराखंडमध्ये या भागात नवीन सुविधा आणि पायाभूत सुविधा येत आहेत. ते म्हणाले की,  रस्ते आणि सिंचन सुविधा यांच्यामुळे सफरचंदाचे उत्पादन घेणाऱ्यांना लाभ होवू शकणार आहे  आणि आज सुरू करण्यात आलेल्या पॉलिहाऊस योजनेचाही  फायदा होईल. या प्रकल्पांवर 1100 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. “उत्तराखंडमधील आमच्या छोट्या शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी इतका पैसा खर्च केला जात आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना आतापर्यंत 2200  कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे,” असे ते म्हणाले.

उत्तराखंडमध्ये अनेक पिढ्यांपासून पिकवण्‍यात येत असलेल्या भरड धान्य म्हणजेच  श्रीअन्न पिकांच्या विषयाला  पंतप्रधानांनी स्पर्श केला. आता हे श्रीअन्न   जगभर नेण्यासाठी सरकार करीत असलेल्या  प्रयत्नांवर त्यांनी  प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी  नमूद केले की,  देशभरात याविषयी  मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्याचा उत्तराखंडमधील लहान शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

महिलांच्या नेतृत्वाखालील विकास सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाय योजनांवर  बोलताना पंतप्रधान म्हणाले, “आमचे सरकार माता-भगिनींची प्रत्येक अडचण आणि प्रत्येक गैरसोय दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणूनच आमच्या सरकारने गरीब भगिनींना कायमस्वरूपी घरे दिली. आम्ही आमच्या भगिनी  आणि मुलींसाठी शौचालये बांधली, त्यांना गॅस कनेक्शन दिले, बँक खाती उघडली, मोफत उपचार आणि मोफत रेशनची व्यवस्था केली. हर घर जल योजनेंतर्गत, उत्तराखंडमधील 11 लाख कुटुंबांतील  भगिनींना नळाद्वारे पाण्याची सुविधा मिळाली आहे. यावेळी पंतप्रधानांनी लाल  किल्ल्यावरून जाहीर केलेल्या महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्याच्या योजनेचाही उल्लेख केला. हे ड्रोन शेती आणि उत्पादनांच्या वाहतुकीतही मदत करतील. "महिला बचत गटांना दिलेले ड्रोन उत्तराखंडला आधुनिकतेच्या नव्या उंचीवर घेऊन जाणार आहेत", असे  पंतप्रधान यावेळी म्हणाले.

 

“उत्तराखंडमध्ये प्रत्येक गावात गंगा आणि गंगोत्री आहे. भगवान शिव आणि नंदा येथील हिमशिखरांवर राहतात,” अशी टिपणी पंतप्रधानांनी केली. उत्तराखंडमधील जत्रा, कौथिग, थौल, गाणी, संगीत आणि खाद्यपदार्थ यांची स्वतःची वेगळी ओळख असून पांडव नृत्य, छोलिया नृत्य, मंगल गीत, फुलदेई, हरेला, बागवाल आणि राममन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही भूमी समृद्ध झाली आहे. इथल्या सुजलाम भूमीमध्‍ये पिकणा-या  आणि बनणाऱ्या  विविध स्वादिष्ट पदार्थांचा  विशेषत्वाने उल्लेख  केला.  आरसे, झांगो-यची  खीर, काफुली, पकोडा, रायता, अल्मोराची बाल मिठाई आणि सिंगोरी यांचा उल्लेख त्यांनी केला. काली गंगा आणि चंपावत येथील अद्वैत आश्रमाच्या भूमीशी तयार झालेले आपले ऋणानुबंध  कायम असल्याचे पंतप्रधानांनी सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. चंपावत येथील अद्वैत आश्रमात  काही काळ व्यतीत करण्‍याची  इच्छाही त्यांनी व्यक्त केली.उत्तराखंडची वाढती कनेक्टिव्हिटी राज्याच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी चारधाम भव्य प्रकल्प  आणि सर्व हवामानात तग धरून राहणारे रस्ते   तसेच ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाचा उल्लेख केला. उडान योजनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी , या संपूर्ण प्रदेशात किफायतशीर हवाई सेवेचा  देखील विस्तार केला जात आहे, असे सांगितले. बागेश्वर ते कनालीचीना, गंगोलीहाट ते अल्मोडा आणि टनकपूर घाटापासून पिथौरागढपर्यंतच्या रस्त्यांसह आजच्या प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला. यामुळे सर्वसामान्यांना केवळ सुविधाच मिळणार नाहीत तर पर्यटनातून उत्पन्नाच्या संधीही वाढतील. असे त्यांनी सांगितले. अधिकाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून पर्यटन क्षेत्राचा  उल्लेख करून   मोदी यांनी  सरकारने होमस्टेला प्रोत्साहन दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.“येत्या काळात पर्यटन क्षेत्र खूप विस्तारणार आहे. कारण आज संपूर्ण जगाला भारतात यायचे आहे. आणि ज्याला भारत पाहायचा आहे त्याला नक्कीच उत्तराखंडमध्ये यायला आवडेल,” असे ते म्हणाले.

येत्या 4-5 वर्षात नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या  प्रकल्पांवर  4000 कोटी रुपये खर्च केले जातील, असे आपत्ती-प्रवण उत्तराखंडला अधोरेखित करताना त्यांनी सांगितले.  आपत्तीच्या वेळी मदत आणि बचाव कार्य लवकर करता येईल अशा प्रकारच्या सुविधा उत्तराखंडमध्ये   निर्माण केल्या जातील '', असे  ते म्हणाले.

 

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की हा भारताचा अमृत काळ  आहे.“देशातील प्रत्येक प्रदेश आणि प्रत्येक विभागाला सुविधा, सन्मान आणि समृद्धी यांनी जोडण्याची हीच वेळ आहे. बाबा केदार आणि बद्री विशाल यांच्या आशीर्वादाने देश लवकरात लवकर संकल्प साध्य करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंड सरकारमधील इतर मंत्र्यांसह उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि राष्ट्रार्पण   केलेल्या प्रकल्पांमध्ये, पीएमजीएसवाय  अंतर्गत ग्रामीण भागात बांधण्यात आलेले 76 ग्रामीण रस्ते आणि 25 पूल  ; 9 जिल्ह्यांमधील  बीडीओ कार्यालयांच्या 15 इमारती; कौसानी बागेश्वर रस्ता, धारी-दौबा-गिरीचीना रस्ता आणि नागाळा-किच्चा रस्ता हे केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत बांधण्यात आलेले  तीन सुधारित रस्ते ; राष्ट्रीय महामार्गावरील अल्मोडा पेटशाल - पनुवानौला - दन्या (एनएच 309बी) आणि टनकपूर - चालठी (एनएच 125) या दोन रस्त्यांचे नूतनीकरण ;  38 पंपिंग पिण्याच्या पाण्याच्या योजना, 419  गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीपुरवठा योजना आणि तीन कूपनलिकांवर  आधारित पाणीपुरवठा योजना हे   पिण्याच्या पाण्याशी संबंधित तीन प्रकल्प; पिथौरागढमधील थरकोट कृत्रिम तलाव; 132 केव्ही पिथोरागढ-लोहाघाट (चंपावत) पॉवर ट्रान्समिशन लाइन; आपत्ती पुनर्प्राप्ती प्रकल्पांतर्गत संपूर्ण उत्तराखंड राज्यात जागतिक बँकेच्या वित्तीय मदतीतून बांधण्यात आलेले 39 पूल  आणि  डेहराडूनमधील उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (यूएसडीएमए ) इमारतीचा समावेश आहे.

 

ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये  21,398 पॉली-हाऊस बांधण्याच्या योजनेचा समावेश आहे, यामुळे  फुले आणि  भाजीपाला उत्पादन वाढण्यास आणि त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल; जास्त घनता असलेल्या सघन  सफरचंद बागांच्या लागवडीची योजना; राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांच्या सुधारणांसाठी पाच प्रकल्प; राज्यात आपत्तीसाठी सज्जता आणि प्रतिरोधासाठी  अनेक पावले उदा.  पुलांचे बांधकाम, डेहराडून मधील राज्य आपत्कालीन परिचालन केंद्राची सुधारणा; बालियानाला, नैनिताल येथे भूस्खलन रोखण्यासाठी पावले आणि अग्नी, आरोग्य आणि जंगलाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा; राज्यातील 20 आदर्श  पदवी महाविद्यालयात वसतिगृहे आणि संगणक प्रयोगशाळा विकसित करणे; सोमेश्वर, अल्मोडा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय; चंपावतमध्ये 50 खाटांचा रुग्णालय विभाग ;हल्द्वानी स्टेडियम, नैनिताल येथे अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान;रुद्रपूर येथील वेलोड्रोम स्टेडियम;जागेश्वर धाम (अलमोडा), हाट कालिका (पिथौरागढ)आणि नैना देवी (नैनिताल) या मंदिरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मानसखंड मंदिर माला अभियान  योजना ;हल्दवणीमध्ये पिण्याच्या पाण्याची तरतूद करण्यासाठी प्रकल्प;  उधम सिंह नगर.सितारगंज,येथील  33/11 केव्ही उपकेंद्राचे बांधकाम या प्रकल्पांचीही पायाभरणी करण्यात आली.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi