2450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण
सुमारे 19,000 घरकुलांच्या ‘गृहप्रवेश’ कार्यक्रमात झाले सहभागी आणि लाभार्थ्यांकडे सोपवल्या घराच्या चाव्या
“पीएम- आवास योजनेने गृहनिर्माण क्षेत्राचा कायापालट केला.यामुळे विशेष करून गरीब आणि मध्यम वर्गाला लाभ झाला आहे.”
“गुजरातमधील ‘डबल इंजिन सरकार’दुप्पट वेगाने काम करत आहे”
“देशाचा विकास हा आमच्यासाठी एक दृढविश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”
“धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ आहे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे”
“आम्ही दारिद्रयाविरोधातील लढाईत घर हा एक भक्कम आधार बनवला आहे, गरीबांच्या सक्षमीकरणाचे आणि आत्मसन्मानाचे साधन बनवले आहे”
“पीएमएवाय हे अनेक योजनांचे एक पॅकेज आहे”
“आज आम्ही जीवन सुलभता आणि शहरी नियोजनात जीवनमानाचा दर्जा यावर समान भर देत आहोत”
या लाभार्थ्यांसोबत त्यांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून संवाद देखील साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुमारे 4400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये शहर विकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि परिवहन विभाग आणि खाणकाम आणि खनिज विभाग यांच्याशी संबंधित 2450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनाचा समावेश होता. पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजनेच्या(ग्रामीण आणि शहरी) सुमारे 1950 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली आणि या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सुमारे 19,000 घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी या घरांच्या चाव्या लाभांर्थ्यांकडे सुपूर्द केल्या. या लाभार्थ्यांसोबत त्यांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून संवाद देखील साधला.

 

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की,  त्यांच्यासाठी राष्ट्र उभारणी हा एक सुरू असलेला ‘महायज्ञ’ आहे. अलीकडेच झालेल्या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सरकारच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या विकासाच्या गतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी अलीकडेच मांडण्यात आलेल्या गुजरातच्या गरीबाभिमुख असलेल्या 3 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाचा उल्लेख केला. वंचितांना प्राधान्य देण्याच्या भावनेने काम करत असल्याबद्दल त्यांनी या राज्याची प्रशंसा केली. 

25 लाख आयुष्मान कार्डे, पीएम मातृ वंदना योजनेमधून 2 लाख मातांना मदत, 4 नवीन  वैद्यकीय महाविद्यालये आणि हजारो कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा अशा अलीकडच्या  काळातील काही उपक्रमांची पंतप्रधानांनी माहिती दिली. यातून असे दिसत आहे की, गुजरातमधील डबल इंजिन सरकार दुप्पट वेगाने काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.      

गेल्या 9 वर्षात अभूतपूर्व विकासकामांचा जनता अनुभव घेत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. एकेकाळी मूलभूत सुविधासुद्धा नागरिकांसाठी दुर्मिळ होत्या याची त्यांनी आठवण करून दिली. देश या निराशाजनक वातावरणातून बाहेर पडू लागला आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकार प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि विविध योजनांचे पुरेपूर लाभ 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

“देशाचा विकास हा आमच्यासाठी एक दृढविश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारच्या सर्व योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे म्हणजे ‘सॅच्युरेशन’ साठी सरकार झटत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. सरकारच्या या दृष्टीकोनामुळे भ्रष्टाचार आणि भेदभाव यांचे उच्चाटन झाले आहे, असे ते म्हणाले.  “ धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ आहे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. समाजातील प्रत्येकाला लाभ देण्याच्या उद्देशाने जेव्हा सरकार काम करते तेव्हा सामाजिक न्याय निर्माण होतो, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी सुमारे 32,000 घरे बांधून पूर्ण झाली आणि ती लाभार्थ्यांना सोपवण्यात आली, अशी माहिती देत गरिबांना जीवनातील मूलभूत गरजांविषयी किमान चिंता असेल तर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड वाढ होते असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

 

“अयशस्वी धोरणांच्या मार्गावर वाटचाल करून देश आपले नशीब बदलू शकत नाही आणि विकसित राष्ट्र बनू शकत नाही” असे सांगून पंतप्रधानांनी सध्याच्या सरकारची आणि भूतकाळातील सरकारच्या कार्यसंस्कृतीमधील फरक अधोरेखित केला. गेल्या दशकातील आकडेवारीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले  की, धोरणे अस्तित्वात असतानाही ग्रामीण भागातील सुमारे 75 टक्के घरांमध्ये शौचालयाची सुविधा नव्हती.

2014 नंतर सरकारने  आपले कार्य  गरीबांना छत पुरविण्यापुरते मर्यादित ठेवले नाही तर घरांना गरीबीविरोधात लढण्याचा एक ठोस आधार बनवले आणि त्यांचा सन्मान मजबूत करण्यासाठीचे  एक माध्यम बनवले असे पंतप्रधान म्हणाले. "पंतप्रधान आवास योजना अंतर्गत, लाभार्थींना त्यांना इच्छेप्रमाणे घरांचे बांधकाम करता येते आणि यासाठी  सरकार  थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत हस्तांतरित करते" असे सांगून पंतप्रधानांनी अशा घरांच्या जिओटॅगिंगचा उल्लेख केला.

 

पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे ही अनेक योजनांचे पॅकेज आहे. या घरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय, सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी , उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी जोडणी , जलजीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे पाणी आहे असे त्यांनी सांगितले.या गोष्टींव्यतिरिक्त मोफत वैद्यकीय उपचार आणि मोफत अन्नधान्य हे गरीबांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणावरही भर दिला जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 9 वर्षात सुमारे 4 कोटी घरे गरीब कुटुंबांना सुपूर्द करण्यात आल्याची  माहिती त्यांनी दिली. त्यापैकी 70 टक्के घरे महिलांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत  घरे बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो हे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, कोट्यवधी महिला लाभार्थी आता लखपती झाल्या आहेत. या कोट्यवधी महिलांकडे पहिल्यांदाच एखादी मालमत्ता आहे. त्यांनी ‘लखपती दीदींना’ शुभेच्छा दिल्या.

भविष्यातील आव्हाने आणि देशातील वाढते शहरीकरण लक्षात घेऊन सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. राजकोटमध्ये एक हजाराहून अधिक घरे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आली आहेत आणि त्यामुळे वेळेची आणि पैशाची बचत झाली असून ती तितकीच सुरक्षित आहेत असे त्यांनी नमूद केले.  ‘लाइट हाऊस’  प्रकल्पांतर्गत हा प्रयोग देशातील 6 शहरांमध्ये राबवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या तंत्रज्ञानामुळे स्वस्त आणि आधुनिक घरे बांधण्यास मदत झाली आहे. आगामी काळात गरीबांसाठी अशी घरे उपलब्ध होणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना खूप त्रास सहन करावा लागल्या अशा गृहनिर्माण  क्षेत्रातील वाईट प्रथा आणि फसवणूक दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. रेरा कायद्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना घर खरेदी करताना आश्वासन दिलेल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कायदेशीर संरक्षण  प्रदान केले. मध्यमवर्गीय कुटुंबांना गृहकर्जासाठी व्याजदरात अभूतपूर्व सवलत दिली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. गुजरातमध्ये 5 लाख कुटुंबांना 11 हजार कोटींची मदत मिळाली आहे.

 

अमृत कालच्या 25 वर्षांत विशेषत: द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे अर्थव्यवस्थेला गती देतील असे पंतप्रधान म्हणाले. गुजरातमधील अनेक शहरांमधील यंत्रणा भविष्यातील गरजांनुसार सुधारण्यात  येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अमृत मिशन अंतर्गत 500 शहरांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत आणि 100 शहरांना स्मार्ट सुविधा मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

“आज आपण  शहर नियोजनात जीवनमान  सुलभता आणि जीवनमानाचा दर्जा  यावर समान भर देत आहोत”, असे पंतप्रधान म्हणाले.लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल या संकल्पनेतून देशातील मेट्रोचे जाळे विस्तारण्यात  येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. . देशातील 20 शहरांमध्ये मेट्रो धावत असल्याचे नमूद करत देशातील मेट्रो जाळे 2014 पूर्वीच्या  250 किलोमीटरवरून गेल्या 9 वर्षांत 600 किलोमीटरने वाढले आहे. “अहमदाबाद-गांधीनगर सारखी जुळी शहरे देखील आज वंदे भारत एक्सप्रेससारख्या रेल्वेने  जोडली जात आहेत आणि गुजरातच्या अनेक शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसच्या ताफ्यातही वाढ होत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

देशातील महानगरपालिका क्षेत्रात  मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याबाबत गांभीर्य  कमी असल्याबद्दल सांगत , देशातील कचरा प्रक्रिया 2014 मधील 14-15 टक्क्यांवरून आज 75 टक्क्यांवर पोहोचली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “जर हे पूर्वी घडले असते, तर आज आपल्या शहरांमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिले नसते”, आणि आपल्या शहरांतील कचऱ्याचे ढीग दूर करण्यासाठी सरकार मिशन मोडवर काम करत आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. “जेव्हा आपल्याला स्वच्छ वातावरण आणि शुद्ध हवा मिळेल तेव्हाच आपल्या शहरांतील जीवनमानाचा दर्जा उंचावणे  शक्य आहे ”, असे पंतप्रधान म्हणाले.

गुजरातच्या जलव्यवस्थापन आणि पाणीपुरवठा मॉडेलचे पंतप्रधानांनी कौतुक केले.  15 हजार गावे आणि 250 शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या  3 हजार किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिन्या आणि 1.25 लाख किलोमीटर वितरण वाहिन्यांचा त्यांनी  उल्लेख केला.त्यांनी गुजरातमधील अमृत सरोवरसाठीच्या उत्साहाचीही प्रशंसा केली.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विकासाचा हा वेग कायम ठेवण्याचे आवाहन केले. “आपले अमृत काळाचे  संकल्प सर्वांच्या  प्रयत्नाने  पूर्ण होतील”  असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री   भूपेंद्र पटेल, खासदार   सी आर पाटील आणि गुजरात सरकारचे मंत्री उपस्थित होते.

पार्श्वभूमी

उद्‌घाटन केलेल्या  प्रकल्पांमध्ये बनासकांठा जिल्ह्यातील बहु-ग्राम पेयजल पुरवठा योजना, अहमदाबादमधील नदीवरील पूल ,  नरोडा येथील  गुजरात औद्योगिक विकास महामंडळाचे जलनिःस्स्सारण संकलन  जाळे मेहसाणा आणि अहमदाबादमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि दहेगाममधील सभागृह यांचा समावेश आहे.जुनागढ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील जलवाहिनी  प्रकल्प, गांधीनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे विस्तारीकरण, उड्डाणपुलांचे बांधकाम, नवीन पाणी वितरण केंद्र आणि विविध नगर नियोजन रस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.

पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील  (ग्रामीण आणि शहरी) प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली आणि योजनेअंतर्गत बांधलेल्या सुमारे 19,000 घरांच्या गृहप्रवेशकार्यक्रमात  सहभागी झाले.या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी योजनेच्या लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द केल्या. या प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे 1950 कोटी रुपये आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers

Media Coverage

Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जानेवारी 2025
January 02, 2025

Citizens Appreciate India's Strategic Transformation under PM Modi: Economic, Technological, and Social Milestones