आयआयटी भिलाई, आयआयटी तिरूपती, आयआयटीडीएम कुर्नुल, आयआयएम बोध गया, आयआयएम जम्मू, आयआयएम विशाखापट्टणम् आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्किल्स(आयआयएस) कानपूर सारख्या अनेक महत्त्वाच्या शिक्षण संस्थांच्या संकुलांचे केले लोकार्पण
देशभरातील अनेक उच्च शिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधा सुधारणांकरिता विविध प्रकल्पांचे केले उद्‌घाटन,लोकार्पण आणि पायाभरणी
एम्स जम्मूचे केले उद्‌घाटन
जम्मू विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची आणि जम्मूमधील सामाईक वापर सुविधा पेट्रोलियम डेपोची बसवली कोनशिला
जम्मू आणि काश्मीरमधील अनेक महत्त्वाच्या रस्ते आणि रेल्वे संपर्कव्यवस्था प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी
जम्मू आणि काश्मीरमधील नागरी आणि शहरी पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या विविध प्रकल्पांचे केले उद्‌घाटन आणि पायाभरणी
“आजच्या प्रकल्पांमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये समग्र विकासाला चालना मिळेल”
“आम्ही विकसित जम्मू काश्मीर सुनिश्चित करू”
“विकसित जम्मू आणि काश्मीर निर्माण करण्यासाठी, सरकारचे लक्ष गरीब आणि शेतकरी, युवक आणि नारी शक्ती केंद्रित आहे”
“नवा भारत सध्याच्या पिढीला आधुनिक शिक्षण देण्यासाठी अधिकाधिक खर्च करत आहे”
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र जम्मू आणि काश्मीरच्या विकासाचा पाया आहे”
“पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या सर्वसामान्य लोकांना भारताच्या राज्यघटनेतील सामाजिक न्यायाची हमी मिळत आहे”
“370 वे कलम रद्दबातल केल्यामुळे विकासामधील सर्वात मोठा अडथळा दूर झाल्याने एक नवे जम्मू काश्मीर अस्तित्वात येत आहे”
“विकसित जम्मू आणि काश्मीरसाठी जग उत्सुक आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये 32,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक, पेट्रोलियम आणि नागरी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित आहेत. पंतप्रधानांनी यावेळी जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे 1500 नवनियुक्तांना नियुक्ती आदेश देखील वितरित केले. त्यांनी ‘विकसित भारत विकसित जम्मू’  या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला.

 

किश्तवार जिल्ह्यातील वीणा देवी यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की त्यांनी उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला असून त्यामुळे त्यांचे आयुष्य अधिक सुकर झाले आहे आणि त्यांना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आता वेळ काढता येत आहे. यापूर्वी स्वयंपाक करण्यासाठी त्यांना जंगलात जाऊन सरपण आणावे लागत होते. त्यांच्या कुटुंबाकडे आयुष्मान भारत कार्डे देखील आहेत अशी माहिती देखील त्यांनी पंतप्रधानांना दिली आणि त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी वीणा देवी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

कथुआच्या राष्ट्रीय आजीविका अभियानच्या लाभार्थी किर्ती शर्मा यांनी बचत गटासोबत जोडले गेल्यामुळे होत असलेल्या फायद्यांची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यांनी 30,000 रुपयांच्या कर्जाने आपला उद्योग सुरू केला आणि नंतर दुसऱ्यांदा एक लाख रुपयांचे कर्ज घेऊन तीन गायींसह आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. त्यांनी केवळ आपल्या बचत गटासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील महिला स्वयंपूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली. त्यांच्या बचत गटाने बँकेचे कर्ज चुकते केले आहे आणि आता त्यांच्याकडे 10 गायी आहेत. त्या आणि त्यांच्या गटातील सदस्यांना अनेक सरकारी योजनांचे लाभ मिळाले आहेत. 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या प्रकल्पात संपूर्ण सहकार्य देण्याचे त्यांनी पंतप्रधानांना आश्वासन दिले.

पूंछ जिल्ह्यातील शेतकरी लाल मोहम्मद यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की  ते सीमावर्ती भागात राहात असून  मातीच्या गा-यापासून  बांधलेल्या त्यांच्या घराला सीमेपलीकडून होणाऱ्या तोफगोळ्यांच्या भडीमाराला तोंड द्यावे लागत होते. यावेळी त्यांनी पीएम आवास योजने अंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी मिळालेल्या  1,30,000 रूपयांबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले, ज्या घरात आता ते राहात आहेत. सरकारच्या योजना देशाच्या सर्वात जास्त दुर्गम भागातही पोहोचत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि पक्क्या घराबद्दल लाल मोहम्मद यांचे त्यांच्या पक्क्या घराबद्दल अभिनंदन केले. लाल मोहम्मद यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ ‘विकसित भारत’ या विषयावर एक दोहा देखील म्हणून दाखवला.    

बांदीपोरा येथील एका बचत गटाच्या सदस्य शाहीदा बेगम यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की त्या सामाजिक शास्त्राच्या  पदव्युत्तर पदवीधर आहेत मात्र तरीही बेरोजगारीमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. 2018 मध्ये त्या महिला बचत गटाच्या सदस्य बनल्या आणि मधुशेती व्यवसायासाठी कर्ज घेतले आणि नंतर राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनच्या मदतीने या व्यवसायाचा विस्तार केला आणि आपल्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आणि लखपती दीदी बनल्या.

पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आणि अतिशय दुर्गम भागातील महिला लखपती दीदी बनण्यासाठी पुढाकार घेऊन संधींचा लाभ घेत असल्याबद्दल आऩंद व्यक्त केला आणि त्यांना प्रेरणा मिळाली आहे, असे सांगितले.

आपल्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी किसान क्रेडीट कार्डचे लाभ मिळवत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या लाभार्थी महिलेच्या पदव्युत्तर शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधानांनी तिच्या पालकांची प्रशंसा केली आणि कामाविषयीच्या तिच्या बांधिलकीचे देखील कौतुक केले.महिलांना त्यांची स्वप्ने साकार करता यावीत यासाठी त्यांचा विकास आणि सक्षमीकरण याविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “ मोदींच्या राजवटीत प्रत्येक गोष्ट शक्य आहे”.

 

जलजीवन मिशनचे लाभार्थी असलेले पुलवामाचे रियाझ अहमद कोळी यांनी पंतप्रधानांना सांगितले की त्यांच्या गावातील प्रत्येक घरात नळाने पाणी येत आहे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात प्रचंड मोठे परिवर्तन झाले आहे. या गावातील महिलांनी पंतप्रधानांना आशीर्वाद दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कलम 370 रद्दबातल केल्यानंतर त्यांना त्यांच्या जमिनीचे मालमत्ता हक्क मिळाले. त्यांना आणि आदिवासी समुदायाच्या इतर सदस्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला. पंतप्रधानांनी त्यांच्या राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याच्या दिवसात गुज्जर समुदायाने केलेल्या आदरातिथ्थ्याच्या आठवणींना उजाळा दिला.

 

मेळाव्याला संबोधित करताना,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी आपण जम्मू दौरे केले, त्‍यांची आणि आज प्रचंड संख्‍येने जमलेल्या या सभेची  तुलना केली. आजच्या या कार्यक्रमाला  अतिशय प्रतिकूल  हवामान असतानाही लोक इतक्या  मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ मोठ्या स्क्रीनवर सभा पहात आहेत. जम्मूच्या नागरिक मोठ्या संख्येने जमलेल्या 3 वेगवेगळ्या ठिकाणांबद्दलही त्यांनी माहिती दिली.  यावेळी  मोदी यांनी  जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या या  भावनेचे कौतुक केले आणि  हा कार्यक्रम म्हणजे त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले. आजचा प्रसंग केवळ विकसित भारतापुरता मर्यादित नसून देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील लाखो लोकांचा यात समावेश असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जम्मू आणि काश्मीरमधील 285 ब्लॉकमधील नागरिक या कार्यक्रमाचे साक्षीदार होत असल्याची माहिती त्यांनी दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांमधील उत्साहाचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधलेल्या लाभार्थ्यांनी सरकारी योजनांमुळे  लाभांची   प्रशंसा केली. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या विकसित भारत- विकसित जम्मू आणि काश्मीर आणि विकसित भारत संकल्प यात्रेमुळे झालेल्या कामांविषयी त्यांचे कौतुक केले. प्रत्येक लाभार्थीच्या दारापर्यंत पोहोचण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी आश्वासन दिले की,  कोणताही पात्र लाभार्थी मागे राहणार नाही. “माझा तुमच्यावर  पूर्ण विश्वास आहे. आम्ही विकसित जम्मू काश्मीर नक्कीच निर्माण करू. 70 वर्षांपासून अपूर्ण राहिलेली स्वप्ने मोदी लवकरच पूर्ण करतील, असे पंतप्रधान म्हणाले.

आता निराशा आणि अलिप्ततावादाचे दिवस मागे टाकून जम्मू काश्मीर विकसित करण्याचा संकल्प करून, आपण पुढे जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, आज सुरू झालेले 32,000 कोटी रुपयांचे प्रकल्प शिक्षण, कौशल्य, नोकरीच्या संधी , आरोग्य, उद्योग आणि कनेक्टिव्हिटीला चालना देतील. त्यांनी आयआयएम, आयआयटीसाठी  नियुक्ती पत्र मिळालेल्या देशातील तरुणांचे अभिनंदन केले.

 

जम्मू आणि काश्मीर हे अनेक पिढ्यांपासून घराणेशाहीच्या राजकारणाचे बळी ठरले. या प्रदेशातील  लोकांच्या कल्याणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आणि तरुणांचे मोठे नुकसान झाले, असे सांगून पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, अशी सरकारे तरुणांसाठी धोरणे बनवण्यास कधीच  प्राधान्य देत नाहीत. “स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणाचा विचार करणारे,  सर्वसामान्य नागरिकांचा विचार कधीच करणार नाहीत”, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हणाले.  केंद्रशासित प्रदेशातील घराणेशाहीचे राजकारण आता संपुष्टात येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा  विकास  करण्यासाठी सरकार गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला शक्तीवर लक्ष केंद्रित करत आहे. जम्मू आणि काश्मीर झपाट्याने शिक्षण आणि कौशल्य विकासाचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. 2013 मध्ये  याच ठिकाणी जम्मू-काश्मीरमध्ये आयआयटी आणि आयआयएम निर्माण करण्याबाबत पंतप्रधानांनी हमी दिल्याचे आठवते; ती हमी आज पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच लोक म्हणतात “मोदीची हमी म्हणजे हमी पूर्ण करण्याची हमी”, असेही ते म्हणाले.

आजच्या कार्यक्रमातील शैक्षणिक पायाभूत सुविधा प्रकल्पांची यादीच पंतप्रधानांनी  सादर केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रांची या  प्रमाणात होणारी प्रगती लक्षात घेताना  दहा वर्षांपूर्वी वस्तुस्थिती कशी बिकट  होती यावर भर दिला. “पण, आजचा  नवा भारत आहे”, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आजचे सरकार वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी जास्तीत जास्त खर्च करते. गेल्या 10 वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये 50 नवीन पदवी महाविद्यालयांसह देशाने विक्रमी संख्येने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू केलेले पाहिले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. ते पुढे म्हणाले की, शाळेत न गेलेल्या 45,000 नवीन मुलांना आता प्रवेश देण्यात आला आहे आणि मुलींना शिक्षणासाठी जास्त प्रवास करण्याची गरज पडणार नाही,  याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “एक काळ होता जेव्हा शाळा चालवल्या जात होत्या, आज शाळा वाढवल्या जात आहेत”, पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरमधील सुधारित आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 2014 मध्ये 4 वरून आज 12 झाली आहे.  2014 मध्ये 500 जागा एमबीबीएसच्या होत्या.  आता 1300 एमबीबीएसच्या जागा आणि 650 हून अधिक जागा पदव्युत्तर पदवीच्या  आहेत. 2014 मध्ये वैद्यकीय पदव्युत्तर पदवीची एकही  जागा नव्हती. गेल्या 4 वर्षात 45 नर्सिंग आणि पॅरामेडिकल  कॉलेजची स्थापना झाल्याची माहितीही त्यांनी दिली. जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन एम्स उभारण्यात येत आहेत त्यापैकी जम्मू एम्सचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पीएम मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत देशात 15 नवीन एम्स मंजूर करण्यात आली आहेत.

कलम 370  रद्द करण्याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की,  नवीन जम्मू काश्मीर अस्तित्वात येत आहे कारण त्याच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे आणि हा प्रदेश संतुलित विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कलम 370 वरील आगामी चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला.

 

विकास योजनांपासून कोणीही मागे राहणार नाही,  या तरुणांच्या विश्वासाला पंतप्रधानांनी दुजोरा दिला आणि ज्यांना अनेक दशकांपासून उपेक्षित वाटत होते त्यांना आता प्रभावी सरकारची उपस्थिती जाणवू शकते. घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण दूर करणारी नवी लाट देशात निर्माण झाली आहे, हे  त्यांनी अधोरेखित केले. "जम्मू आणि काश्मीरचे तरुण विकासाचे बिगुल फुंकत  आहेत आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी ते  पुढे जात आहेत", पंतप्रधानांनी केंद्रशासित प्रदेशातील वातावरणातील सकारात्मक बदलाची नोंद केली. जम्मू-काश्मीरच्या लोकांबद्दल तसेच संरक्षण दलाच्या जवानांकडे मागील सरकारांनी केलेल्या दुर्लक्षाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या प्रदेशातील  माजी सैनिकांसह सर्व सैनिकांना  लाभ देणारी वन रँक वन पेन्शनची प्रलंबित मागणी सध्याच्या सरकारने पूर्ण केल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.

पंतप्रधान म्हणाले की, सामाजिक न्यायाचे घटनात्मक  वचन अखेर निर्वासित कुटुंबे, वाल्मिकी समुदाय आणि सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचले. वाल्मिकी समाजाला एससी दर्जा मिळाला, वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाली.  पड्डारी, पहाडी, गड्डा ब्राह्मण आणि कोळी यांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला आहे. विधानसभेत अनुसूचित जनजाती आरक्षण आणि पंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’’  हा मंत्र जम्मू-काश्मीरच्या विकासाचा पाया आहे.”

जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे महिलांना सर्वाधिक फायदा झाला यावर प्रकाश टाकत पंतप्रधान मोदींनी पीएम घरकूल  योजनेंतर्गत महिलांच्या नावावर पक्की घरे, ‘हर घर जल’  योजनेंतर्गत नळाव्दारे पाणी,  शौचालय बांधकाम आणि आयुष्मान कार्डचे वितरण यांचा उल्लेख केला. "कलम 370 रद्द केल्याने महिलांना ते अधिकार मिळाले आहेत ज्यापासून त्या पूर्वी वंचित होत्या", असेही त्यांनी नमूद केले.

महिलांना ड्रोन पायलट बनण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या नमो ड्रोन दीदी योजनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. शेती आणि बागकामात मदतगार म्हणून सरकारने हजारो बचत गटांना लाखो रुपयांचे ड्रोन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. याद्वारे खते किंवा कीटकनाशके फवारणीचे काम अधिक सुलभ होऊन अतिरिक्त उत्पन्नही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आज संपूर्ण देशात एकाच वेळी विकासकामे होत असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरशी वाढत्या संपर्क सुविधेबाबत  माहिती दिली. जम्मू विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम, काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वे जोडणी, श्रीनगर ते सांगलदान आणि सांगलदान ते बारामुल्ला या गाड्या सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. “तो दिवस दूर नाही जेव्हा लोक काश्मीरमधून ट्रेनने देशभर प्रवास करू शकतील”, असे पंतप्रधान मोदींनी उद्धृत केले. देशात सुरू असलेल्या रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या मोठ्या मोहिमेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमध्ये आज पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सुरू झाल्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन केले.

वंदे भारत सारख्या आधुनिक ट्रेनचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की ट्रेनच्या सुरुवातीच्या मार्गांमध्ये जम्मू काश्मीरची निवड करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन वंदे भारत गाड्या धावत असून माता वैष्णव देवीला जाण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पीएम मोदींनी या भागातील रस्ते प्रकल्पांची माहिती दिली. आजच्या प्रकल्पांपैकी, त्यांनी श्रीनगर रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचा उल्लेख केला ज्यामुळे मानसबल तलाव आणि खीर भवानी मंदिरापर्यंतचा मार्ग सुकर होईल. तसेच श्रीनगर-बारामुल्ला-उरी महामार्गामुळे शेतकरी आणि पर्यटनाला फायदा होणार आहे. दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गामुळे जम्मू आणि दिल्ली दरम्यानचा प्रवास सुलभ होणार आहे.

केंद्रशासित प्रदेशातील गुंतवणुकीबाबत अधिक सकारात्मक असलेल्या आखाती देशांच्या त्यांच्या अलीकडील दौऱ्याची आठवण सांगताना पंतप्रधान म्हणाले, “आज संपूर्ण जगामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विकासाबद्दल खूप उत्साह आहे.” पीएम मोदींनी जम्मू आणि काश्मीरमध्ये आयोजित केलेल्या अनेक जी 20 बैठकांचा उल्लेख करून संपूर्ण जग तेथील निसर्ग सौंदर्याने मंत्रमुग्ध झाल्याचे आवर्जून सांगितले. त्यांनी माहिती दिली की, जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या वर्षी 2 कोटींहून अधिक पर्यटकांची नोंद झाली होती, तर अमरनाथ आणि श्री माता वैष्णव देवीला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या गेल्या दशकात सर्वाधिक झाली आहे. पायाभूत सुविधांचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता पर्यटकांचा ओघ वाढता राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

सर्वोच्च 5 जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताच्या स्थानाचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी सुधारित अर्थव्यवस्थेमुळे कल्याणकारी योजनांवर खर्च करण्याच्या सरकारच्या वाढत्या क्षमतेची दखल घेतली. सुधारित अर्थव्यवस्थेमुळे भारत मोफत रेशन, वैद्यकीय उपचार, पक्की घरे, गॅस कनेक्शन, शौचालये आणि पीएम किसान सन्मान निधी देऊ शकतो असे त्यांनी सांगितले. “आता आगामी 5 वर्षात आपल्याला भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. यामुळे गरीब कल्याण आणि पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची देशाची क्षमता अनेक पटींनी वाढेल. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक कुटुंबाला याचा फायदा होईल”, असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह उपस्थित होते.

पार्श्वभूमी

शिक्षण क्षेत्रात मोठी चालना

देशभरातील शिक्षण आणि कौशल्य पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण आणि विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधानांनी सुमारे 13,375 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी, उदघाटन आणि लोकार्पण केले.

पंतप्रधानांनी आयआयटी भिलाई, आयआयटी तिरुपती, आयआयएसईआर तिरुपती, आयआयआयटीडीएम कुर्नूलचे कायमस्वरूपी संकुल; आयआयटी पाटणा आणि आयआयटी रोपर मधील शैक्षणिक आणि निवासी संकुल; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे दोन कायमस्वरूपी संकुल - देवप्रयाग (उत्तराखंड) आणि आगरतळा (त्रिपुरा) राष्ट्राला समर्पित केले.

पंतप्रधानांनी आयआयएम विशाखापट्टणम, आयआयएम जम्मू आणि आयआयएम बोधगयाच्या कायमस्वरूपी संकुलाचे उद्घाटन केले. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयएएस) या कानपूरमधील प्रगत तंत्रज्ञानावरील एक अग्रणी कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन देखील केले.

 

पंतप्रधानांनी आयआयटी जम्मू, एनआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर, एनआयटी दुर्गापूर, आयआयएसईआर बेहरामपूर, एनआयटी अरुणाचल प्रदेश, आयआयआयटी लखनौ, आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, केरळ कासारगोड सेंट्रल युनिव्हर्सिटी इ.सारख्या देशभरातील अनेक उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये वसतिगृहे, शैक्षणिक गट, प्रशासकीय इमारती, ग्रंथालये, सभागृह इत्यादी सुधारित पायाभूत सुविधांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण केले.

पंतप्रधानांनी देशभरातील अनेक उच्च शैक्षणिक संस्थांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये सिंधू सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि आयआयआयटी रायचूरच्या कायमस्वरूपी कॅम्पसच्या बांधकामाचा समावेश आहे; याशिवाय आयआयटी मुंबईमध्ये प्रशासनिक दालन, वसतिगृह, शिक्षकांची निवासस्थाने इत्यादींचे बांधकाम; आयआयआयटी  गांधीनगरमध्ये वसतिगृह आणि  कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे  बांधकाम,  बीएचयू मध्ये मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम यासह इतर  बांधकामाचा समावेश आहे.

एम्स जम्मू

जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना सर्वसमावेशक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक क्षेत्रीय काळजी आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या एक पाऊल म्हणून पंतप्रधानांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स),जम्मूमधील विजयपूर (सांबा) येथील, इस्पितळाचे उद्घाटन केले. या संस्थेची  पायाभरणीही पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती. ही संस्था केंद्रीय क्षेत्रातील प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन केली जात आहे.

1660 कोटींहून अधिक खर्च करून उभारलेले आणि 227 एकर क्षेत्रफळात पसरलेले हे  हॉस्पिटल 720 खाटा, 125 सीट्स उपलब्ध असलेले वैद्यकीय महाविद्यालय, 60 सीट्स उपलब्ध असलेले नर्सिंग महाविद्यालय, 30 खाटांसह आयुष ब्लॉक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निवास, रात्र निवारा, अतिथीगृह, सभागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, अत्याधुनिक हृदयरोग रुग्णालय , गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीसह 18 विशेष आणि 17 सुपर विशेषत्वामध्ये ज्यात नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, एंडोक्राइनोलॉजी, बर्न्स आणि प्लास्टिक सर्जरी चा समावेश आहे त्यांना उच्च दर्जाची रुग्ण सेवा प्रदान करेल.  तसेच या संस्थेमध्ये अतिदक्षता  केंद्र, आपत्कालीन आणि ट्रॉमा केंद्र, 20 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज,रक्तपेढी, औषध विक्रीकेंद्र  इत्यादी  सेवा  उपलब्ध असतील. हे  इस्पितळ जम्मू आणि काश्मीर क्षेत्राच्या दुर्गम भागात पोहोचण्यासाठी डिजिटल आरोग्य पायाभूत सोयीसुविधांचा देखील फायदा घेईल.

 

नवीन टर्मिनल बिल्डिंगजम्मू विमानतळ

पंतप्रधानांनी जम्मू विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. 40,000 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेली, नवीन टर्मिनल इमारत गर्दीच्या वेळेत सुमारे 2000 प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. नवीन टर्मिनल इमारत पर्यावरणपूरक असेल आणि त्या प्रदेशातील स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवेल अशा प्रकारे बांधण्यात येणार आहे. यामुळे हवाई संपर्क मजबूत होईल, पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल आणि क्षेत्राच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होईल.

रेल्वे प्रकल्प

बनिहाल-खारी-संबर-सांगलदान (48 किमी) आणि नव्याने विद्युतीकृत बारामुल्ला-श्रीनगर-बनिहाल-सांगलदान विभाग (185.66 किमी) दरम्यान नवीन रेल्वे मार्गासह जम्मू आणि काश्मीरमधील विविध रेल्वे प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांनी खोऱ्यातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि सांगलदान स्टेशन आणि बारामुल्ला स्टेशन दरम्यान रेल्वे सेवेलाही सुरुवात केली.

बनिहाल-खारी-संबर-सांगलदान विभाग सुरू करणे महत्त्वपूर्ण आहे कारण त्यात बॅलास्ट लेस ट्रॅक (बीएलटी) चा वापर सर्व मार्गावर प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव प्रदान करते. तसेच, खारी-सुंबर दरम्यानचा भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगदा टी-50 (12.77 किमी) या भागात आहे. हे रेल्वे प्रकल्प संपर्कसेवा सुधारतील, पर्यावरणीय स्थिरता सुनिश्चित करतील आणि क्षेत्राच्या एकूण आर्थिक विकासाला चालना देतील.

रस्ते प्रकल्प

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी जम्मू आणि कटरा यांना जोडणाऱ्या दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्गावरील दोन रस्ते (44.22 किमी),श्रीनगर रिंगरोडच्या चौपदरीकरणाचा दुसरा टप्पा; 161 किमी लांबीच्या एनएच -01 महामार्गावरील रस्त्यांच्या आधुनिकीकरणासाठी असलेल्या पाच मार्गावरील  सोयीसुविधा, श्रीनगर-बारामुल्ला-उरी भाग; आणि एनएच -444 वरील कुलगाम आणि पुलवामा उपमार्गाचे (बायपास)बांधकाम अशा विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली.

 

दिल्ली-अमृतसर-कटरा थेट रस्त्याच्या  दोन्ही बाजूंकडील,या रस्त्यांची कामे  पूर्ण झाल्यावर यात्रेकरूंना माता वैष्णोदेवीच्या  मंदिराला  जाण्याची सोय होईल आणि या विभागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. 

श्रीनगर रिंगरोडच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सध्याच्या NH-1महामार्गावरील सुंबल-वायुल मार्गाचे आधुनिकीकरण समाविष्ट आहे.24.7 किमी लांबीचा हा ब्राउनफिल्ड प्रकल्प, श्रीनगर शहर आणि आसपासची वाहतूक कोंडी कमी करेल.तसेच या रस्त्यांमुळे मानसबल तलाव आणि खीरभवानी मंदिर यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांशी असलेले दळणवळण सुधारेल तसेच लेह, लडाखच्या प्रवासासाठी लागणारा वेळ  कमी होईल; NH-01 महामार्गाच्या 161 किमी लांबीच्या श्रीनगर-बारामुल्ला-उरी पट्ट्याच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प धोरणात्मक महत्त्वाचा आहे. त्यामुळे बारामुल्ला आणि उरीच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल; तसेच NH-444 महामार्गावरील कुलगाम बायपास आणि पुलवामा उपमार्गांमुळे  (बायपास)  काझीगुंड - कुलगाम - शोपियान - पुलवामा - बडगाम - श्रीनगर जोडले जाऊन या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांना चालना मिळेल.

सीयूएफ पेट्रोलियम डेपो

पंतप्रधानांनी जम्मू येथे सीयूएफ (सामान्य ग्राहक सुविधा) पेट्रोलियम डेपो विकसित करण्याच्या प्रकल्पाची पायाभरणीही केली. सुमारे 677 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या अत्याधुनिक पूर्ण स्वयंचलित डेपोत, मोटर स्पिरिट (MS), हाय स्पीड डिझेल (HSD),सुपीरियर रॉकेल तेल (SKO),आकाशमार्गे  जाणाऱ्या वाहनांसाठी इंधन (ATF), इथेनॉल, बायोडिझेल आणि विंटरग्रेड एचएसडी इत्यादी साठवण्यासाठी सुमारे 100000 केएल इतकी साठवण क्षमता असेल.

इतर विविध प्रकल्प

पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये नागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक सुविधांच्या तरतूदीसाठी 3150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये रस्ते प्रकल्प आणि पुलांसह; ग्रिड स्टेशन्स, ट्रान्समिशन लाईन रिसीव्हिंग स्टेशन्स प्रकल्प; कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प ; पदवी महाविद्यालयाच्या अनेक इमारती; श्रीनगर शहरातील वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आधुनिक नरवाल फळमंडई; कठुआ येथे औषध चाचणी प्रयोगशाळा; आणि निवास - गांदरबल आणि कुपवाडा येथे 224 निवासस्थाने यांचा समावेश आहे.

ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली जात आहे त्यात जम्मू आणि काश्मीरमधील पाच नवीन औद्योगिक वसाहतींचा विकास समाविष्ट आहे; जम्मू स्मार्ट सिटीच्या एकात्मिक नियंत्रण आणि नियमन सेंटर केंद्रात माहितीकक्ष/आपत्कालीन मदतकक्ष  (डिझास्टर रिकव्हरी सेंटर); परिमपोरा श्रीनगर येथील ट्रान्सपोर्ट नगरचे आधुनिकीकरण अनंतनाग, कुलगाम, कुपवाडा, शोपियान आणि पुलवामा या जिल्ह्यांमध्ये नऊ ठिकाणी 2816 संक्रमणकालीन निवासस्थाने - 62 रस्ते प्रकल्प आणि 42 पुलांचे आधुनिकीकरण आणि संक्रमणकालीन निवासस्थाने विकासासाठी प्रकल्प यांचा समावेश आहे.

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi