“यशस्वी क्रीडापटू त्यांच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करतात आणि त्या मार्गात येणारे सर्व अडथळे पार करतात”
“खेल महाकुंभ सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनातून, खासदार नव्या पिढीचे भविष्य घडवत आहेत”
“सांसद खेल महाकुंभाची प्रादेशिक गुणवत्ता आणि कौशल्य शोधण्याचे आणि त्याला पैलू पाडण्यात महत्वाची भूमिका”
“आज समाजात क्रीडा क्षेत्राचा यथोचित सन्मान”
“टॉप्स म्हणजे टारगेट ऑलिंपिक्स पोडियम योजनेअंतर्गत 500 ऑलिंपिक स्पर्धक घडवण्याचे काम सुरु”
“स्थानिक पातळीवर राष्ट्रीय पातळीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न”
“योगामुळे तुमचे शरीर तर निरोगी होतेच; तसेच तुमचे मनही सचेत राहते ”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सांसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. उत्तरप्रदेशातील बस्तीचे खासदार हरीश  द्विवेदी 2021 पासून दरवर्षी बस्ती जिल्ह्यात, सांसद खेल महाकुंभचे आयोजन करतात. या खेल महाकुंभाअंतर्गत, कुस्ती, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा  इनडोअर आणि आउटडोअर खेळ स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याशिवाय निबंध लेखन, चित्रकला, रंगकाम, रांगोळी अशा स्पर्धाही घेतल्या जातात.

 

बस्ती ही महर्षी वशिष्ठांची पवित्र भूमी आहे. ही भूमी श्रम आणि ध्यान, तप आणि त्याग यांनी बनलेली आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. ध्यान आणि तपश्चर्या  यांचे  क्रीडापटूच्या जीवनाशी साधर्म्य साधून पंतप्रधान म्हणाले की, यशस्वी क्रीडापटू त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करतात.

ज्या मोठ्या प्रमाणात महाकुंभमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. अशा स्पर्धांद्वारे भारताच्या क्रीडा क्षेत्रातील पारंपारिक कौशल्याला एक नवा आयाम  मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  सुमारे 200 खासदारांनी त्यांच्या- त्यांच्या मतदारसंघात अशा खेल महाकुंभाचे आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. वाराणसीचे खासदार या नात्याने आपण वाराणसीमध्येही अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याची माहिती त्यांनी दिली. “खेल महाकुंभसारखे कार्यक्रम आयोजित करून खासदार नवीन पिढीचे भविष्य घडवत आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले.

अशा स्पर्धांच्या माध्यमातूनच भारतीय क्रीडा प्राधिकरणा उत्तम खेळाडूंची पुढच्या  प्रशिक्षणासाठी निवड करते, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. खेल महाकुंभमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिपटीने अधिक म्हणजे सुमारे  40,000 खेळाडू सहभागी होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी, खो खो चा सामना बघता आल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या सामन्यात, आपल्या भूमीतील मुलींनी अतिशय कौशल्य, चपळाई आणि सांघिक भावनेचं प्रदर्शन केलं असे गौरवोद्गार  त्यांनी काढले. या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देत भविष्यातही त्यांनी उत्तम कामगिरी करावी, अशा सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

 

सांसद खेल महाकुंभमध्ये मुलींच्या सहभाग ही विशेष गोष्ट असल्याचं अधोरेखित करत, उत्तरप्रदेशातील पूर्वांचल, बस्तीच्या आणि देशभरातल्या क्रीडाक्षेत्रातल्या मुली जागतिक स्पर्धांमध्ये  आपले क्रीडा कौशल्य आणि नैपुण्य दाखवतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. 

महिलांच्या 19 वर्षाखालील T-20 क्रिकेट विश्वचषकाची आठवण करून देताना, पंतप्रधानांनी संघाची कर्णधार  शेफाली वर्मा हिच्या शानदार कामगिरीचा उल्लेख केला. शेफालीने या स्पर्धेत, सलग पाच चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत एका षटकात 26 धावा केल्या होत्या. आज देशाच्या कानाकोपऱ्यात अशी प्रतिभा उपलब्ध आहे आणि संसदेचा खेल महाकुंभ सारख्या स्पर्धा अशा खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या कौशल्याला पैलू पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, असे त्यांनी नमूद केले.

एक काळ असा होता, ज्यावेळी क्रीडाक्षेत्र, हा केवळ एक अभ्यासेतर उपक्रम मानला जात असे, आणि त्याला फार महत्त्व न देता केवळ एक छंद किंवा उपक्रम म्हणून त्याकडे बघितले जाई, याची आठवण करत, ही मानसिकता देशासाठी फार घातक ठरली, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे, क्षमता असलेले अनेक गुणवान खेळाडू त्यांना मिळू शकणाऱ्या संधीपासून वंचित राहिले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या आठ-नऊ वर्षात, देशाने या मानसिकतेतून आणि त्रुटीतून बाहेर निघण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले, आणि खेळांसाठी देशात उत्तम पोषक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. यामुळेच, आज अनेक युवा, खेळांकडे एक करियर म्हणून बघत आहेत. त्याशिवाय सार्वजनिक जीवनातही, तंदुरुस्ती, आरोग्य, संघभावना, ताणतणावापासून मुक्ती, व्यावसायिक यश आणि एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास असे फायदे या क्रीडासंस्कृतीमुळे मिळत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

खेळाबाबत लोकांच्या विचारप्रक्रियेवर  पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. बदलाचे परिणाम देशाच्या क्रीडा क्षेत्रातील यशातून दिसून येतात, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीची उदाहरणे दिली आणि विविध क्रीडा क्षेत्रातील भारताची कामगिरी जगात चर्चेचा विषय ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

खेळाला समाजात प्रतिष्ठा मिळत आहे, त्यामुळे ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि इतर स्पर्धांमध्ये अभूतपूर्व कामगिरी झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. “ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे”,असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

“खेळ म्हणजे  कौशल्य आणि स्वभाव  आहे, खेळ हे प्रतिभा आणि संकल्प आहेत.”,असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी खेळाच्या विकासासाठी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.  खेळाडूंना त्यांचे प्रशिक्षण कसे झाले आहे हे जोखण्याची संधी मिळण्यासाठी क्रीडा स्पर्धा सुरू ठेवाव्यात, असे पंतप्रधानांनी सुचवले. विविध स्तरांवर आणि प्रदेशांवरील क्रीडा स्पर्धा खेळाडूंना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतात. त्यामुळे त्यांना त्यांचे तंत्र विकसित करण्यासाठी मदत होते तसेच प्रशिक्षकांना  उणिवा ओळखता येतात आणि त्या सुधारण्यासाठी वाव मिळतो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. . युवा, विद्यापीठ आणि हिवाळी खेळ खेळाडूंना सुधारण्यासाठी अनेक संधी देत आहेत. खेलो इंडियाच्या माध्यमातून 2500 खेळाडूंना दरमहा 50,000 रुपयांचे  आर्थिक सहाय्यही दिले  जात आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) अंतर्गत ऑलिम्पिकसाठी सुमारे 500 संभाव्य खेळाडू तयार केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन काही खेळाडूंना 2.5 कोटी ते 7 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे.

 

पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांची  माहिती दिली. पुरेशी साधनसंपत्ती, प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी आणि खेळाडूंच्या निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यावर विशेष भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांची दखल पंतप्रधानांनी घेतली.  बस्ती आणि इतर जिल्ह्यांमध्ये स्टेडियम बांधली जात आहेत आणि प्रशिक्षकांची व्यवस्था केली जात आहे. देशभरात एक हजाराहून अधिक खेलो इंडिया जिल्हा केंद्रे स्थापन केली जात आहेत, त्यापैकी 750 हून अधिक केंद्रे पूर्ण झाली आहेत. खेळाडूंना प्रशिक्षण घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी देशभरातील सर्व क्रीडांगणांचे जिओ टॅगिंगही केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारने याआधी ईशान्येतील तरुणांसाठी मणिपूरमध्ये एक क्रीडा विद्यापीठ बांधले. आता उत्तर प्रदेशात  मेरठ येथे आणखी एक क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येत  आहे, असे त्यांनी सांगितले. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये वसतिगृहेही चालवली जात आहेत, असे त्यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांविषयी सांगितले. “स्थानिक स्तरावर राष्ट्रीय स्तरावरील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत,”असे मोदी पुढे म्हणाले.

प्रत्येक खेळाडूला फिटनेसचे महत्त्व माहीत आहे असे सांगत त्यांनी फिट इंडिया चळवळीच्या महत्त्वाविषयी सांगितले.   खेळाडूंनी  दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे पंतप्रधान म्हणाले, “योगामुळे तुमचे शरीरही निरोगी राहील आणि तुमचे मनही जागृत राहील. याचा फायदा तुम्हाला तुमच्या खेळातही मिळेल.”2023 हे वर्ष  आंतरराष्ट्रीय भरड धान्य  वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे, खेळाडूंच्या पोषणामध्ये भरड धान्य मोठी भूमिका बजावू शकेल, असे त्यांनी सांगितले.  आपले युवक खेळातून शिकतील आणि देशाला ऊर्जा देतील, असा विश्वास पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि खासदार हरीश द्विवेदी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

खेळ महाकुंभाचा पहिला टप्पा 10 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत झाला तर  18 ते 28 जानेवारी 2023 दरम्यान खेळ महाकुंभाचा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला आहे.

खेळ महाकुंभ अंतर्गत कुस्ती, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस इत्यादी इनडोअर आणि आउटडोअर खेळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. खेळ महाकुंभ दरम्यान निबंध लेखन, चित्रकला, रांगोळी काढणे या स्पर्धाही घेतल्या जातात.

 

 

बस्ती जिल्हा आणि आजूबाजूच्या भागातील तरुणांना त्यांच्या क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी खेळ महाकुंभ या अभिनव उपक्रमाद्वारे मिळत आहे.  हा उपक्रम खेळाडूंसाठी व्यासपीठ उपलब्ध करतो आणि खेळाला करिअरचा एक पर्याय म्हणून निवडण्यासाठी प्रवृत्त करतो. तसेच या भागातील तरुणांमध्ये शिस्त, सांघिक भावना, निकोप स्पर्धा, आत्मविश्वास आणि राष्ट्रवादाची भावना रुजवण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi