महर्षी दयानंद सरस्वती यांच्या स्मरणार्थ एक प्रतिकचिन्ह प्रकाशित
"महर्षी दयानंद सरस्वतींनी दाखवलेल्या मार्गावरून चालत असताना करोडो लोकांच्या मनात आशा पल्लवीत झाल्या होत्या "
"धर्माला चिकटलेल्या विपरीत गोष्टी दूर करत स्वामीजींनी धर्मावर सत्य प्रकाश टाकून उजळवला"
"स्वामीजींनी वेदांवर प्रकाश टाकत ते समाजासाठी पुनरुज्जीवित केले"
"महर्षी दयानंद सरस्वती यांची 200 वी जयंती अमृत कालात पावनदायी प्रेरणा म्हणून आली आहे"
"आज देश आत्मविश्वासाने आपल्या परंपरेचा अभिमान बाळगत आहे"
"आपल्यासाठी, धर्माचा पहिला अर्थ कर्तव्य हा आहे"
"गरीब, मागासलेल्या, दीनदुबळ्यांची सेवा हे आज देशातील पहिले पवित्र कर्म आहे"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी स्वामिजींच्या स्मरणार्थ एक लोगोही प्रकाशित केला.

कार्यक्रमस्थळी आल्यावर पंतप्रधानांनी आर्य समाजाचा मंडप आणि थेट प्रवचनाचा आस्वाद घेतला आणि सुरु असलेल्या यज्ञात आहुती देखील अर्पण केली. त्यानंतर, महर्षी दयानंद सरस्वती यांचा संदेश उर्वरित भारत आणि जगापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रज्वलित केलेली प्रतीकात्मक एलईडी मशाल त्यांनी युवा प्रतिनिधींकडे सुपूर्द केली.

महर्षी दयानंद सरस्वती यांचा 200 वा जयंती उत्सव हा एक ऐतिहासिक सोहळा असून संपूर्ण जगाचे भविष्य आणि प्रेरणा निर्माण करण्याचा समारंभ आहे, असे पंतप्रधानांनी या मेळाव्याला संबोधित करताना म्हटले. महर्षी दयानंदांच्या जगाला एक उत्तम स्थान बनवण्याच्या आदर्शाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, की या कलह, हिंसाचार आणि अस्थिरतेच्या काळात महर्षी दयानंदांनी दाखवलेला मार्ग आपल्यासाठी आशादायी आहे.

दोन वर्षे हा शुभ सोहळा साजरा केला जाईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित करत  महर्षी दयानंद सरस्वती यांची 200 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मानवतेच्या कल्याणासाठी अखंड सुरू असलेल्या साधनेवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी तेथे सुरू असलेल्या यज्ञात आहुती अर्पण करू शकल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्या भूमीत स्वामीजींचा जन्म झाला त्याच भूमीत जन्म घेण्याचे भाग्य लाभले असल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी महर्षी दयानंदांच्या आदर्शांचे त्यांच्या जीवनात सतत आकर्षण वाटत असल्याचे नमूद केले.

दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला तेव्हा भारताच्या स्थितीचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, शतकानुशतकांच्या गुलामगिरीनंतर भारत अशक्त आणि कमकुवत झाला होता आणि आपली आभा आणि आत्मविश्वास गमावून बसला होता. भारतातील आदर्श, संस्कृती आणि मुळे चिरडण्यासाठी सुरू असलेल्या असंख्य प्रयत्नांची त्यांनी आठवण करून दिली. स्वामीजींनी हे दाखवून दिले की भारतातील परंपरा आणि धर्मग्रंथांमध्ये कोणतीही कमतरता नसून त्यांचा खरा अर्थ विसरला गेला आहे.जेव्हा वेदांचा चुकीचा अर्थ लावून भारताला कमी लेखले जात होते आणि परंपरांचे विकृतीकरण केले जात होते, अशा वेळी महर्षी दयानंद यांचे प्रयत्न तारणहार म्हणून पुढे आले याचे स्मरण पंतप्रधानांनी त्या काळाची आठवण करून देत दिले "महर्षीजींनी भेदभाव आणि अस्पृश्यता यांसारख्या सामाजिक दुर्गुणांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली." 21 व्या शतकातील एक आव्हान म्हणून त्यांनी कर्तव्यावर भर दिला असे सांगत त्या काळातील महर्षींच्या प्रयत्नांची विशालता स्पष्ट करण्यासाठी त्याबद्दलच्या प्रतिक्रियांचा उल्लेख श्री मोदींनी केला. “धर्मात ज्या वाईट गोष्टी अंतर्भूत केल्या गेल्या होत्या,त्या स्वामीजींनी धर्माच्याच प्रकाशाने दूर केल्या,” असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. स्वामीजींचा अस्पृश्यतेविरुद्धचा लढा हे त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे महात्मा गांधींनी म्हटले होते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

महर्षी दयानंदजी यांनी महिलांबाबत समाजात वाढलेल्या रूढीवादी विचारसरणींविरुद्ध तार्किक आणि प्रभावी आवाज उठविला, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. महर्षी दयानंदजींनी महिलांवरील भेदभावाला कडाडून विरोध केला आणि महिलांच्या शिक्षणासाठी मोहिमा सुरू केल्या, ही वस्तुस्थिती 150 वर्षांहून अधिक जुनी असल्याचे अधोरेखित केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आजच्या काळात आणि युगातही, असे काही समाज आहेत जे महिलांना त्यांच्या शिक्षणाचा आणि सन्मानापासून वंचित ठेवतात, परंतु महर्षी दयानंद यांनीच आवाज उठवला जेव्हा पाश्चिमात्य देशांतूनसुध्दा महिलांना समान अधिकार मिळणे ही दूरची गोष्ट होती.

महर्षीजींनी केलेल्या कार्यावर आणि प्रयत्नांच्या विलक्षण स्वरूपावर पंतप्रधानांनी भर दिला.आर्य समाजाच्या स्थापनेच्या दिडशे वर्षांनंतर आणि स्वामिजींच्या जन्माच्या दोनशे वर्षांनंतरही त्यांच्याबद्दल लोकांच्या मनातील भाव आणि आदर यांचे महर्षी प्रमुख स्थान आहेत, हे राष्ट्राच्या वाटचालीचे द्योतक आहे,असे पंतप्रधान म्हणाले. अमृत काळामध्ये, महर्षी दयानंद सरस्वती यांची दोनशेवी जयंती एक पवित्र प्रेरणा घेऊन आली आहे, असे ते पुढे म्हणाले.

श्री मोदी म्हणाले की, देश मोठ्या आत्मविश्वासाने स्वामीजींच्या शिकवणीचे पालन करत आहे. स्वामीजींच्या 'वेदांकडे परत' या आवाहनाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, "आज देश आत्मविश्वासाने एकाच वेळी 'आपल्या परंपरांचाअभिमान' बाळगत आधुनिकतेचा मार्ग पत्करत असून संस्कृती समृद्ध करण्याचा हा  भारतातील लोकांचा आत्मविश्वास आपण लक्षात घेतला पाहिजे."

पंतप्रधानांनी भारतातील धर्माच्या विस्तृत संकल्पनेवर लक्ष केंद्रित केले, जे कर्मकांडाच्या पलीकडे जाते आणि संपूर्ण जीवनपद्धती म्हणून परिभाषित करते. ‘आमच्याकडे धर्माची पहिली व्याख्या कर्तव्य हीच आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान म्हणाले, स्वामीजींनी सर्वसमावेशक आणि एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारला आणि राष्ट्राच्या जीवनातील अनेक आयामांची जबाबदारी आणि नेतृत्व स्वीकारले. तत्त्वज्ञान, योग, गणित, धोरण, कूटनीती, विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्रातील भारतीय ऋषीमुनींच्या कामगिरीचा उल्लेख करून पंतप्रधानांनी भारतीय जीवनातील ऋषी-मुनींच्या व्यापक भूमिकेचे महत्व यावेळी विशद केले. त्या प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यात स्वामीजींची मोठी भूमिका होती, असेही पंतप्रधान म्हणाले.

महर्षी दयानंद यांच्या शिकवणीचे प्रतिबिंब दर्शविणाऱ्या त्यांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांची नोंद पंतप्रधानांनी घेतली. महर्षी क्रांतिकारी विचारसरणीने जगले असले तरी, महर्षींनी त्यांच्या सर्व संकल्पनांना सुव्यवस्थेशी कसे जोडले आणि अनेक दशकांपासून विविध क्षेत्रांमध्ये सक्रियपणे कल्याणकारी कार्ये करणाऱ्या विविध संस्थांची स्थापना कशी केली हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. परोपकारिणी सभेचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले की, या संस्थेची स्थापना महर्षींनीच केली होती आणि आज गुरुकुल आणि प्रकाशन या माध्यमांद्वारे या संस्थेतर्फे वैदिक परंपरांचा प्रसार केला जातो.त्यांनी कुरुक्षेत्र गुरुकुल, स्वामी श्रद्धानंद ट्रस्ट आणि महर्षि दयानंद ट्रस्ट यांची देखील उदाहरणे दिली आणि या संस्थांनी असंख्य तरुणांच्या जीवनाला आकार दिल्याची नोंद केली. 2001च्या गुजरातमधील भूकंपात जीवन प्रभात ट्रस्टच्या सामाजिक सेवा आणि बचाव कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानाचीही पंतप्रधानांनी दखल घेत, ही संस्था सुध्दा महर्षीजींच्या आदर्शांनी प्रेरित असल्याचे अधोरेखित केले.

भेदभावरहित धोरणे आणि स्वामीजींनी प्राधान्य दिलेल्या प्रयत्नांमुळे देश प्रगती करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. "गरीब, मागासलेल्या, दीनदुबळ्यांची सेवा हे आज देशातील पहिले पवित्र कर्म (यज्ञ) आहे." त्यांनी यासंदर्भात गृहनिर्माण, वैद्यकीय उपचार आणि महिला सक्षमीकरणाचा उल्लेख केला. नवीन शैक्षणिक धोरण स्वामीजींनी शिकवलेल्या भारतीयतेवर भर देऊन आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे.

पंतप्रधानांनी स्वामीजींनी साकारलेल्या व्यक्तीच्या व्याख्येचे स्मरण करत सांगितले की, जो माणूस घेतो त्यापेक्षा जास्त देतो, तोच सगुण व्यक्ती होय. पर्यावरणासह असंख्य क्षेत्रात हे तत्त्व मान्य आहे. स्वामीजींनी वेदांचे हे ज्ञान खोलवर समजून घेतले, म्हणून महर्षीजी वेदांचे विद्यार्थी आणि ज्ञानमार्गाचे संत होते, असे पंतप्रधान म्हणाले. शाश्वत विकासाच्या प्रगतीत भारत जगाचे नेतृत्व करत आहे. पंतप्रधानांनी या संदर्भात मिशन लाइफचा संदर्भ दिला आणि सांगितले की पर्यावरण हा जी-20 देशांसमोरील विशेष अजेंडा म्हणून पुढे येत आहे. प्राचीन ज्ञानाचा पाया मजबूत ठेवून आधुनिक आदर्शांचा प्रसार करून आर्य समाज मोठी भूमिका बजावू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यास सांगितले.

महर्षींच्या व्यक्तिमत्त्वातून बरेच काही शिकता येते यावर जोर देऊन, पंतप्रधानांनी महर्षींना भेटायला आलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याची कहाणी सांगितली आणि त्याने महर्षींना भारतामध्ये सतत ब्रिटीश राजवट राहावी यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले, त्यावेळी महर्षींनी निर्भयपणे त्याला उत्तर दिले, “भारताचे स्वातंत्र्य हा माझा आत्मा आणि भारताचा आवाज आहे" पंतप्रधान म्हणाले, की असंख्य स्वातंत्र्य सैनिक आणि संस्था निर्माते आणि देशभक्तांनी स्वामींपासून प्रेरणा घेतली ज्यात लोकमान्य टिळक, नेताजी सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर, लाला लजपत राय, लाला हरदयाळ, चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी महात्मा हंसराज, स्वामी श्रद्धानंद जी, भाई परमानंद जी आणि इतर अनेक नेत्यांची उदाहरणे दिली, ज्यांनी महर्षीपासून प्रेरणा घेतली.

पंतप्रधान म्हणाले की, आर्य समाजाला स्वामीजींच्या शिकवणीचा वारसा आहे आणि देशाला प्रत्येक ‘आर्यवीराकडून' खूप अपेक्षा आहेत. पुढील वर्षी आर्य समाजाचे 150 वे वर्ष सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या महत्त्वाच्या प्रसंगाचे उत्तम नियोजन, अंमलबजावणी आणि व्यवस्थापन  केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. “अमृत काळामध्ये, महर्षी दयानंदजींच्या प्रयत्नातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळू दे”, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हटले.

गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतिक राज्यमंत्री श्री अर्जुन राम मेघवाल आणि श्रीमती मीनाक्षी लेखी, दिल्ली आर्य प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष, श्री दरम पाल आर्य, दिल्ली आर्यचे महामंत्री प्रतिनिधी सभा, श्री विनय आर्य, आणि सर्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष श्री सुरेशचंद्र आर्य हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

महर्षि दयानंद सरस्वती यांचा जन्म दिनांक 12 फेब्रुवारी 1824 रोजी झाला, ते स्वातंत्र्य पूर्व काळातील समाजसुधारक होते. त्यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि त्या काळात प्रचलित असलेल्या सामाजिक विषमतेला विरोध केला. आर्य समाजाने सामाजिक सुधारणा आणि शिक्षणावर भर देऊन देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.

समाजसुधारक आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती ज्यांचे, विशेष योगदान अद्याप अखंड भारताच्या स्तरावर आलेले नाही, त्यांचा गौरव करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. भगवान बिरसा मुडा यांची जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित करण्यापासून ते श्री अरबिंदांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यापर्यंत, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी अशा उपक्रमांचे  नेतृत्व करत आहेत.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India