पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्यांनी ‘सुरक्षित जावे, प्रशिक्षित जावे’ या संकल्पनेवर आधारित स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आणि “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव - परदेशातील भारतीय समुदायाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान” या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले.
परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संवादात सहभागी करून घेऊन त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच विविध देशांतील भारतीय समुदायांना परस्परांशी संवाद साधता येणे शक्य करून देण्यासाठी या उपक्रमाने महत्त्वाचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने राबवलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. “परदेशातील भारतीय समुदाय: भारताच्या अमृत काळातील प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार” ही या वर्षीच्या पीबीडी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील सुमारे 70 देशांतील भारतीय समुदायांच्या साडेतीन हजारांहून अधिक सदस्यांनी या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनातील सहभागासाठी नोंदणी केली आहे.
उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की चार वर्षांच्या अंतरायानंतर संपूर्ण दिमाखात हा प्रवासी भारतीय दिवस साजरा होत आहे. या संमेलनातील व्यक्तिगत संवादाचे महत्त्व आणि त्यातील आनंद यांच्यावर त्यांनी भर दिला. या समारंभाला उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाचे 130 कोटी भारतीयांतर्फे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की हा कार्यक्रम भारताचे हृदयस्थान समजल्या जाणाऱ्या आणि नर्मदेचे पवित्र जल, हिरवागार निसर्ग , आदिवासी संस्कृती आणि अध्यात्मिक पार्श्वभूमी यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेश राज्यात होत आहे. नुकतेच राष्ट्रार्पण करण्यात आलेल्या ‘महा काल महा लोक’ या स्थळाचा उल्लेख करून या कार्यक्रमासाठी जमलेल्या मान्यवरांनी आणि प्रतिनिधींनी या स्थळाला अवश्य भेट द्यावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे यजमान शहर असलेल्या इंदोरबद्दल बोलताना ते म्हणाले की हे केवळ शहर नसून तो एक टप्पा देखील आहे. “असा टप्पा जो स्वतःच्या वारशाचे जतन करतानाच काळाच्या पुढे वाटचाल करतो.” पंतप्रधानांनी या शहराची सुप्रसिद्ध खाद्य संस्कृती तसेच स्वच्छता अभियानात मिळविलेल्या यशाचा देखील उल्लेख केला.
भारताने देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे नुकतीच पूर्ण केली असल्याने हा प्रवासी भारतीय दिवस अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताच्या वैभवशाली युगाचे पुन्हा एकदा दर्शन घडेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. भारताच्या आगामी 25 वर्षांच्या अमृतकाळातील वाटचालीमध्ये प्रवासी भारतीयांच्या असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देत ते म्हणाले की भारताची वैशिष्ट्यपूर्ण जागतिक दृष्टी आणि जागतिक व्यवस्थेतील त्याची भूमिका यांना प्रवासी भारतीयांमुळे आणखी मजबुती मिळेल.
संपूर्ण विश्वाला स्वतःच्या देशाप्रमाणेच मान देण्याच्या आणि संपूर्ण मानव जातीला आपल्या बंधू-भगिनी मानण्याच्या भारतीय तत्वज्ञानाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की आपल्या पूर्वजांनी भारताच्या सांस्कृतिक विस्ताराचा पाया घातला. आजच्या जगाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय जगाच्या सर्व भागांमध्ये पोहोचले असून विविध संस्कृती आणि परंपरा यांच्यासह ते नांदत आहेत आणि तरीही व्यापारी भागीदारीच्या माध्यमातून समृद्धीची कवाडे खुली करण्याचे मार्ग शोधून काढत आहेत. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आम्ही जगाच्या नकाशावर विविध देशांत स्थायिक करोडो परदेशी भारतीयांकडे पाहतो तेव्हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या कल्पनेचे चित्र साकार करणाऱ्या अगणित प्रतिमा एकाचवेळी उदय पावलेल्या दिसतात आणि जेव्हा कोणत्याही परदेशी भूमीवर दोन प्रवासी भारतीय एकमेकांना भेटतात तेव्हा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ही भावना व्यक्त होताना दिसते. “जगाच्या विविध भागांमध्ये स्थायिक प्रवासी भारतीय सर्वात लोकशाहीवादी, शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध नागरिक आहेत अशी चर्चा जेव्हा ऐकायला येते तेव्हा आपला देश लोकशाहीची जननी असल्याची अभिमानाची भावना अनेक पटींनी वाढते,” पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा हे विश्व प्रवासी भारतीयांच्या योगदानाविषयी चर्चा करते तेव्हा प्रत्येक प्रवासी भारतीय हा भारताचा राष्ट्रीय राजदूत असून ते सर्वजण सामर्थ्यवान आणि सक्षम भारताचा प्रतिध्वनी आहेत. “तुम्ही भारताच्या वारशाचे, मेक इन इंडिया अभियानाचे, योग आणि आयुर्वेद शास्त्राचे, भारताच्या कुटिरोद्योगांचे आणि हस्तकलांचे राष्ट्रदूत म्हणजेच राष्ट्रीय राजदूत आहात,” ते म्हणाले, “आणि त्याच बरोबर, तुम्ही भारतातील भरड धान्यांचे सदिच्छा दूत सुद्धा आहात.” वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर झाले आहे याकडे निदेश करून पंतप्रधानांनी प्रत्येकाला घरी जाताना भरड धान्यांपासून तयार केलेली उत्पादने घेऊन जाण्याची विनंती केली.
जगाची भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा पूर्ण करण्यात प्रवासी भारतीयांची आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. जग भारताकडे उत्सुकतेने पाहत आहे असे पंतप्रधान म्हणाले. अलिकडच्या वर्षांत देशाने केलेल्या असामान्य कामगिरीवर पंतप्रधानानी प्रकाश टाकला. यासंदर्भात पंतप्रधानांनी मेक इन इंडिया लसीचे उदाहरण दिले आणि भारतीयांना दिलेल्या 220 कोटींहून अधिक मोफत विक्रमी लसमात्रांची आकडेवारी सांगितली. सध्याच्या अस्थिरतेच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा उदय आणि जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील वाढती स्टार्टअप परिसंस्था आणि मेक इन इंडियाची उदाहरणेही पंतप्रधानांनी दिली. त्यांनी तेजस लढाऊ विमाने, विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत आणि आण्विक पाणबुडी अरिहंत यांवर प्रकाश टाकत या कामगिरीमुळेच जगभरातील लोकांना भारताबद्दल उत्सुकता असणे स्वाभाविक असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी भारताच्या कॅशलेस इकॉनॉमी आणि फिनटेकचाही उल्लेख केला. जगातील 40% डिजिटल व्यवहार भारतात केले जातात, असे ते म्हणाले. भारत एकाच वेळी शेकडो उपग्रह प्रक्षेपित करण्याचे अनेक विक्रम करत आहे, असे पंतप्रधानांनी अंतराळ तंत्रज्ञानाबद्दल बोलताना सांगितले. त्यांनी भारतातील सॉफ्टवेअर आणि डिजिटल तंत्रज्ञान उद्योगावरही प्रकाश टाकला. या क्षेत्रांची क्षमता काळाबरोबर वाढत आहे, असे ते म्हणाले. "भारताच्या संदेशाचे आगळे महत्त्व आहे", म्हणूनच भविष्यात देशाचे सामर्थ्य कायम वर्धित होत राहणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित प्रत्येकाने भारताच्या संस्कृती आणि परंपरेबद्दलच नव्हे तर देशाच्या प्रगतीबद्दलचे ज्ञान समृद्ध करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
भारत या वर्षी G-20 अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहे आणि शाश्वत भविष्यासाठी भारताच्या भूतकाळातील अनुभवांची जगाला जाणीव करून देण्याची तसेच या अनुभवांमधून शिकण्यासाठी उत्तम संधी या जबाबदारीसोबत आली आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “G-20 हा केवळ राजनैतिक कार्यक्रम नसून जिथे ‘अतिथी देवो भव’ या भावनेचे दर्शन घडवणारा असा लोकसहभागाचा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरावा” असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील विविध शहरांमध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचा भाग म्हणून 200 हून अधिक बैठका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक देशांच्या प्रतिनिधींशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची ही एक उत्तम संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
आज भारताला केवळ ज्ञान केंद्रच नाही तर जगाची कौशल्य राजधानी बनण्याची संधी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी भारतीय तरुणांचे कौशल्य, मूल्ये आणि कार्य नैतिकता अधोरेखित केली. “ही कौशल्य राजधानी जागतिक विकासाचे इंजिन बनू शकते”, असे पंतप्रधान म्हणाले. पुढच्या पिढीतील प्रवासी भारतीय तरुणांमधील उत्साहाची पंतप्रधानांनी दखल घेतली. उपस्थितांनी या प्रवासी भारतीय तरुणांना त्यांच्या देशाबद्दल सांगावे आणि आपल्या देशाला भेट देण्याची संधी द्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “पारंपरिक जाण आणि आधुनिक दृष्टिकोनामुळे हे तरुण प्रवासी जगाला भारताबद्दल अधिक प्रभावीपणे सांगू शकतील. तरुणांमध्ये भारताविषयीची उत्सुकता वाढल्याने पर्यटन, संशोधन आणि भारताचे वैभव वाढेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उत्साही तरुण सणांच्या काळात भारताला भेट देऊ शकतात किंवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.
विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या माध्यमातून प्रवासी भारतीयांचे जीवन, त्यांचा संघर्ष आणि आपापल्या देशांसाठी दिलेले योगदान यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न व्हायला हवा, असे पंतप्रधानांनी सुचवले. प्रत्येक भारतवंशी संपूर्ण भारत आपल्यासोबत घेऊन जातो, असे पंतप्रधान म्हणाले. “गेल्या 8 वर्षांत भारताने आपला प्रवासी भारतीय समुदाय मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जिथेही असाल तिथे देश तुमच्या आवडी आणि अपेक्षांसाठी उपस्थित असेल ही भारताची वचनबद्धता आहे,” असे ते म्हणाले.
विशेष अतिथी, रिपब्लिक ऑफ गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली आणि सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष एच.ई. श्री चंद्रिकापरसाद संतोखी यांनी केलेल्या भाष्य आणि सूचनांसाठी पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी विशेष सन्माननीय निमंत्रित असलेले गयाना सहकारी प्रजासत्ताक देशाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली, सुरिनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, व्ही मुरलीधरन आणि डॉ. राजकुमार रंजन सिंह उपस्थित होते.
पार्श्वभूमी
प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) संमेलन हा भारत सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संवादात सहभागी करण्यासाठी तसेच विविध देशांतील भारतीय समुदायांना परस्परांशी संवाद साधता येणे शक्य करून देण्यासाठी या उपक्रमाने महत्त्वाचा मंच उपलब्ध करून दिला आहे. मध्य प्रदेश राज्य सरकारच्या भागीदारीसह केंद्र सरकारने 08 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन केले आहे. “भारतीय समुदाय: अमृत काळातील भारताच्या प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार” ही या वर्षीच्या पीबीडी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील सुमारे 70 देशांतील भारतीय समुदायांच्या साडेतीन हजारांहून अधिक सदस्यांनी या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनातील सहभागासाठी नोंदणी केली आहे.
या अधिवेशनात नागरिकांच्या सुरक्षित,कायदेशीर,शिस्तबद्ध आणि कुशल स्थलांतराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘सुरक्षित जावे,प्रशिक्षित जावे’ या संकल्पनेवर आधारित स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव-परदेशातील भारतीय समुदायाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान” या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे उद्घाटन देखील झाले.
पीबीडी अधिवेशनात पाच संकल्पनाधारित पूर्ण सत्रे होतील:
- परदेशी भारतीय समुदायांतील युवकांची अभिनव संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान यांच्या संदर्भातील भूमिका’ या पहिल्या पूर्ण सत्राचे अध्यक्षपद केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर भूषवणार आहेत.
- दुसऱ्या पूर्ण सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय अध्यक्ष म्हणून तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग सहअध्यक्ष म्हणून ‘अमृत काळात भारतीय आरोग्य सेवा परीसंस्थेला चालना देण्यात भारतीय समुदायांची भूमिका: व्हिजन@2047’ या विषयावरील चर्चासत्र घेतील.
- ‘भारतातील सुप्त सामर्थ्याला चालना- हस्तकला,पाककला आणि सर्जकता यांच्या माध्यमातून सदिच्छा निर्मिती’ या संकल्पनेवर आधारित तिसऱ्या चर्चासत्राचे अध्यक्षपद केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी भूषवतील.
- ‘भारतीय कार्यबळाची जागतिक गतिशीलता सक्षम करताना- भारतीय समुदायाची भूमिका’ या चौथ्या सत्राच्या अध्यक्षपदी केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे मंत्री धर्मेंद्र प्रधान असतील.
- ‘राष्ट्र उभारणीसाठी समावेशक दृष्टीकोनाप्रती भारतीय समुदायातील उद्योजकांच्या सामर्थ्याचा वापर’ या पाचव्या चर्चासत्राचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भूषवणार आहेत.
- या सर्व चर्चासत्रांमध्ये भारतीय समुदायांतील सन्मानीय निमंत्रितांच्या गटांमध्ये चर्चा घडवून आणली जाईल.
या 17 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोविड-19 महामारीची सुरवात झाल्यापासून चार वर्षांच्या काळानंतर प्रथमच प्रत्यक्ष पद्धतीने या अधिवेशनाचे आयोजन होत आहे. 2021 मध्ये कोविड काळात आभासी पद्धतीने याधीचे अधिवेशन भरवण्यात आले होते.
Our Pravasi Bharatiyas have a significant place in India's journey in the 'Amrit Kaal.' pic.twitter.com/OEcKLXvXm2
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
हमारे लिए पूरा संसार ही हमारा स्वदेश है। pic.twitter.com/QhD6yZfumn
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
प्रवासी भारतीयों को जब हम global map पर देखते हैं, तो कई तस्वीरें एक साथ उभरती हैं। pic.twitter.com/szb6SNPLNO
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
Indian diaspora are our 'Rashtradoots.' pic.twitter.com/vwJwLZyXbp
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
Today, India is being looked at with hope and curiosity. India's voice is being heard on global stage. pic.twitter.com/rv0CcqTQ0A
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
हमें G-20 केवल एक diplomatic event नहीं, बल्कि जन-भागीदारी का एक ऐतिहासिक आयोजन बनाना है। pic.twitter.com/Ai0bhW0ZUX
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
India's talented youth are the country's strength. pic.twitter.com/ZHxaBzyUzB
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023