पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीत देशातील कोविड लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा तसेच कोविड स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर देशातील लसीकरणाच्या प्रगतीबाबतचे सादरीकरण केले. तसेच वयोगटानुसार सुरु असलेल्या लसीकरणाची माहितीही पंतप्रधानांना देण्यात आली. विविध राज्यात आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कोरोना योद्धे आणि सर्वसामान्य जनतेचे किती लसीकरण झाले आहे, याची माहितीही त्यांना देण्यात आली.
येत्या काही महिन्यात देशात लसींचा किती पुरवठा होणार आहे, त्याबाबतची तसेच लसींचा पुरवठा आणखी वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.
गेल्या सहा दिवसांत देशभरात 3.77 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. ही संख्या, मलेशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडासारख्या देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. तसेच देशातील 128 जिल्ह्यांत, 45 पेक्षा अधिक वयोगटाच्या लोकांचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण करण्यात आले आहे, तर 16 जिल्ह्यांमध्ये याच वयोगटातील लोकांचे 90% पेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले तसेच, ही गती पुढेही कायम ठेवली जावी, यावर त्यांनी भर दिला.
लसीकरणासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी अभिनव मार्ग शोधले जाऊन त्याची अंमलबजावणी केली जावी, यादृष्टीने राज्य सरकारांशी चर्चा सुरु आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. या कामात विविध स्वयंसेवी संस्था आणि इतर संघटनांची मदत घ्यावी, अशी सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत केली.
कोविड रूग्णांचा माग काढणे आणि संसर्ग रोखण्यासाठीचे प्रभावी आयुध म्हणून चाचण्यांचा वापर होत असल्याचे सांगत, चाचण्यांचे प्रमाण आणि गती कमी होणार नाही, याची राज्यांच्या सरकारांनी खातरजमा करत रहावी असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले.
जागतिक पातळीवर कोविन अॅप प्लॅटफॉर्मच्या तंत्रज्ञानाविषयी अनेक देशांनी उत्सुकता दर्शवली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. ज्या ज्या देशांनी यासाठी मदत मागितली असेल, त्यांना ती देण्यासाठी प्रयत्न केले जावेत , असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.