पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही आठवी वंदे भारत एक्सप्रेस आहे, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली रेल्वे असणार आहे. ही रेल्वे या भागातील 700 किलोमीटर भागातून धावेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तसेच तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबा घेईल.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सणासुदीच्या सुरू असलेल्या हंगामाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या शुभ काळात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला एक अशी भव्य भेट मिळत आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा परस्पर सामायिक वारसा एकमेकांशी जोडला जाणार आहे. यानिमीत्त त्यांनी दोन्ही राज्यातील जनतेचे अभिनंदनही केले. लष्कर दिनानिमित्त त्यांनी लष्कराला मानवंदनाही वाहिली. भारताचे लष्कर आपल्या शौर्य आणि व्यावसायिकतेसाठी ओळखले जाते, अशा शब्दांत त्यांनी लष्कराचा गौरवही केला.
देशाच्या सर्व भागांना जोडणाऱ्या सण उत्सवांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय रेल्वे देखील देशाच्या कानाकोपऱ्यातून धावत अशाच रितीने सर्व भागांना जोडते. भारतीय रेल्वे एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेतून देशाच्या विविध भागांना समजून घेण्याची, जाणून घेण्याची आणि परस्परांसोबत जोडून घेण्याची संधी देते.
वंदे भारत एक्स्प्रेसमुळे यात्रेकरू आणि पर्यटक अशा दोन्ही घटकांना मोठा लाभ होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. यासोबतच वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यानच्या प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार असल्याची माहिती दिली.
"वंदे भारत हे नव भारताच्या क्षमता आणि संकल्पाचे प्रतीक आहे", असं पंतप्रधान म्हणाले, ही रेल्वे वेगवान विकासाचा मार्ग निवडणाऱ्या भारताचे प्रतिनिधीत्व करणारी रेल्वे असल्यांचंही ते म्हणाले. आपल्या स्वप्ने आणि आकांक्षांच्या पुर्ततेसाठी उत्सुक असलेल्या, आपले ध्येय साध्य करू इच्छिणाऱ्या, उत्कृष्टतेसाठी झटणाऱ्या, तसेच आपल्या नागरिकांना सर्वोत्तम सेवा सुविधा देऊ इच्छिणाऱ्या आणि गुलामगिरीच्या मानसिकतेचे जोखड तोडून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचे ठळक प्रतिबींब या ट्रेनमध्ये दिसते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
वंदे भारत गाड्यांच्या प्रकल्पाचे काम वेगाने होत असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावर्षी केवळ 15 दिवसांच्या आत दुसरी वंदे भारत कार्यान्वित होत असल्याचे नमूद करत, यातून, प्रत्यक्ष जमिनीवर वेगाने बदल होत असल्याचं दिसतं असं ते म्हणाले. वंदे भारत रेल्वेचे स्वदेशी स्वरूप आणि त्यामुळेच या रेल्वेचा लोकांच्या मनावर पडलेला प्रभाव, त्यांना याचा वाटत असलेल्या अभिमानाचाही त्यांनी उल्लेख केला. आत्तापर्यंत देशातल्या 7 वंदे भारत रेल्वे गाड्यांनी, देशभारतले एकूण 23 लाख किलोमीटर इतके अंतर पार केले असून, ते पृथ्वीच्या 58 फेऱ्यांइतके असल्याची माहिती त्यांनी दिली. वंदे भारत ट्रेनमधून आतापर्यंत 40 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दळणवळणीय जोडणी आणि वेग तसेच त्यांचा 'सबका विकास' या संकल्पनेशी त्याचा असलेला थेट संबंध याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. दळणवळणीय जोडणी संबंधीत पायाभूत सुविधा केवळ दोन ठिकाणांना जोडत नाहीत तर त्या स्वप्नांना वास्तवाशी, उत्पादनाला बाजारपेठेशी, कौशल्याला योग्य व्यासपीठाशी जोडतात असं ते म्हणाले. दळणवळणीय जोडणीमुळे विकासाच्या शक्यता वाढतात असं ते म्हणाले. 'जिथे गती आहे, तिथे प्रगती आहे, ज्यावेळी प्रगती होते तेव्हा समृद्धीचीही खात्री असते", असं त्यांनी सांगितलं.
कधीकाळी आधुनिक दळणवळणीय जोडणीच्या सुविधांचे फायदे केवळ काही निवडक लोकांपुरते मर्यादित होते आणि लोकसंख्येचा एक मोठा भागाचा, महागड्या वाहतुक व्यवस्थेमुळे बराचसा वेळ वाया जात होता अशी आठवण त्यांनी करून दिली. याच विचारसरणीला मागे टाकत, प्रत्येकाला वेग आणि प्रगतीशी जोडण्याचा दृष्टीकोण म्हणजे काय, याचे वंदे भारत रेल्वेगाडी हे उदाहरण आहे अस ते म्हणाले. एक काळ असा होता जेव्हा केवळ बहाणे बनवले जात, रेल्वेची प्रतिमाही खराब झाली होती, रेल्वेबद्दलचा दृष्टीकोनही घातक होता, मात्र जेव्हापासून चांगल्या आणि प्रामाणिक हेतूने या समस्या सोडवल्या गेल्या, तेव्हापासून परिस्थितीकडे अशा निराशाजनक वृत्तीने पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, आणि गेल्या आठ वर्षांत याच मंत्राने भारतीय रेल्वेचा कायापालट झाला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
आज भारतीय रेल्वेने प्रवास करणे हा एक सुखद अनुभव ठरू लागला आहे असे पंतप्रधान म्हणाले. असंख्य रेल्वे स्थानकांमधून आधुनिक भारताचेच प्रतिबिंब दिसते असे त्यांनी सांगीतले. गेल्या सात-आठ वर्षांत केलेल्या कामामुळे येत्या सात ते आठ वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा कायापालट झाल्याचे दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हिस्टाडोम कोच आणि हेरिटेज रेल्वेगाडी, शेतमाल दूरवरच्या बाजारपेठांमध्ये नेण्यासाठी किसान रेल्वे, दोन डझनहून अधिक शहरांना मिळालेले मेट्रो रेल्वे तसेच वेगाने उदयाला येत असलेली भविष्यातील जलद रेल्वे वाहतूक व्यवस्था अशा उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी उपस्थितांना दिली.
रेल्वे विभागाने तेलंगणात गेल्या 8 वर्षांत केलेल्या उत्तम कामगिरीकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 8 वर्षांपूर्वी 2014 साली तेलंगणामध्ये रेल्वेसाठी 250 कोटी रुपयांहून कमी निधीचा अर्थसंकल्प होता, परंतु आज तो 3000 कोटी रुपये झाल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणातील मेदक सारखे अनेक भाग आता पहिल्यांदाच रेल्वे सेवेने जोडले गेल्याची माहिती त्यांनी दिली. 8 वर्षांपूर्वी 2014 च्या काळात तेलंगणामध्ये 125 किलोमीटरहून कमी नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात आले होते, तर गेल्या वर्षांत तेलंगणात सुमारे 325 किलोमीटरच्या नवीन रेल्वे लाईन बांधण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तेलंगणामध्ये 250 किलोमीटरहून अधिक लांबीच्या ‘ट्रॅक मल्टी ट्रॅकिंग’चे कामही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आणि या विद्युतीकरणाच्या काळात राज्यातील रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण 3 पटीने वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. “तेलंगणातील सर्व ब्रॉडगेज मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम लवकरच पूर्ण करणार आहोत”, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
एकीकडे आंध्र प्रदेश वंदे भारत योजनेशी जोडलेला असून त्याचवेळी केंद्र सरकार देखील आंध्र प्रदेशातील रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी सतत काम करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. आंध्र प्रदेशात गेल्या काही वर्षांत 350 किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग आणि सुमारे 800 किलोमीटर मल्टी-ट्रॅकिंगचे बांधकाम करण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी इज ऑफ लिव्हिंग तसेच इज ऑफ डुइंग बिझनेसला चालना देण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करताना सांगितले. 2014 पूर्वी आंध्र प्रदेशात मागील सरकारच्या काळात केवळ 60 किलोमीटर रेल्वे मार्गाचे वार्षिक विद्युतीकरण केले जात होते, मात्र तुलनेने हा वेग वाढला असून तो वार्षिक 220 किलोमीटरहून अधिक झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
“वेग आणि प्रगतीची ही प्रक्रिया अशीच चालू राहील'' असे आश्वासन देत तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनबद्दल सर्वांचे अभिनंदन करुन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री आणि संसद सदस्य जी. किशन रेड्डी, यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
भारतीय रेल्वेने सादर केलेली ही आठवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली एक्सप्रेस सुमारे 700 किमीचे अंतर पार करते. या एक्सप्रेसमुळे सिकंदराबाद ते विशाखापट्टणम प्रवासाचा वेळ साडेबारा तासांवरून कमी होऊन साडेआठ तासांवर येईल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तर तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर या एक्सप्रेसचे थांबे असतील.
वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशात संकल्पित आणि निर्मित रेल्वे अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे. प्रवाशांना ही रेल्वे जलद, अधिक आरामदायी आणि अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देईल.
या सेवेच्या प्रारंभामुळे या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल तसेच जनतेला प्रवासाचा आरामदायी आणि जलद मार्ग उपलब्ध होईल. देशात दाखल होणारी ही आठवी वंदे भारत ट्रेन असून पूर्वीच्या वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत ही प्रगत आवृत्ती आहे. ही ट्रेन तुलनेत वजनाला खूपच हलकी असून कमी कालावधीत जास्त वेग पकडण्यास सक्षम आहे. वंदे भारत 2.0 ही अधिक प्रगत आणि सुधारित वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून ती 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 52 सेकंदात धारण करते आणि 180 किलोमीटर प्रति तासापर्यंतच्या कमाल वेगाने धावू शकते. सुधारित वंदे भारत एक्सप्रेसचे वजन 392 टन आहे. या आधीच्या वंदे भारत आवृत्तीचे वजन 430 टन होते. वंदे भारत 2.0 मध्ये मागणीनुसार वाय-फाय कंटेंट सुविधाही उपलब्ध असेल. प्रत्येक कोचमध्ये 32 इंची स्क्रीन आहेत यावर प्रवाशांना माहिती आणि इंफोटेनमेंट प्रदान केली जाईल. यापूर्वीच्या आवृत्तीत 24 इंची स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. नव्या वंदे भारत आवृत्ती मधील वातानुकूलन यंत्रे 15% जास्त ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे ही एक्स्प्रेस पर्यावरणपूरकही असेल. ट्रॅक्शन मोटरच्या धूळ-मुक्त स्वच्छ हवा कूलिंग प्रणालीमुळे प्रवास अधिक आरामदायक होईल. यापूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवाशांना दिलेली साइड रिक्लायनर सीट सुविधा आता सर्व वर्गांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180 अंशात फिरणारी आसने हे याचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी रूफ-माउंटेड पॅकेज युनिट (RMPU) मध्ये प्रकाश-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली कार्यान्वित केली आहे. सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIO) चंदीगडच्या शिफारसीनुसार रेल्वेमध्ये येणारी ताजी हवा तसेच बाहेर जाणारी हवा सुक्ष्म जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादीपासून मुक्त करुन गाळलेली आणि स्वच्छ हवा पुरवण्यासाठी ही प्रणाली रूफ-माउंटेड पॅकेज युनिटच्या दोन्ही टोकांवर स्थापित केली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस 2.0 विविध उत्कृष्ट सुविधा आणि विमानासारखा प्रवास अनुभव देणारी आहे. ही एक्सप्रेस प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून रेल्वे गाड्यांची समोरासमोर धडक टाळण्यासाठी स्वदेशात विकसित प्रणाली 'ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम - KAVACH' यात समाविष्ट करण्यात आली आहे.
A gift for the people of Telangana and Andhra Pradesh. pic.twitter.com/xrlGUMd5CT
— PMO India (@PMOIndia) January 15, 2023
The Indian Army is known for its bravery and professionalism. pic.twitter.com/RG3sMpyRpv
— PMO India (@PMOIndia) January 15, 2023
The Vande Bharat Express between Secunderabad and Visakhapatnam will boost tourism, cut down travel time. pic.twitter.com/wL9JMcMqK3
— PMO India (@PMOIndia) January 15, 2023
The Vande Bharat Express is a symbol of the resolve and potential of New India. pic.twitter.com/APgxDz0osJ
— PMO India (@PMOIndia) January 15, 2023
The Vande Bharat Express signifies that India wants the best of everything. pic.twitter.com/kMrJJwqcId
— PMO India (@PMOIndia) January 15, 2023
कनेक्टिविटी अपने साथ विकास की संभावनाओं का विस्तार करती है। pic.twitter.com/ROQteV4ZgC
— PMO India (@PMOIndia) January 15, 2023
Transforming Indian Railways. pic.twitter.com/znnppvIDVs
— PMO India (@PMOIndia) January 15, 2023