पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास 5 तास 30 मिनिटात होईल. यावेळी पंतप्रधानांनी 182 रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.
आज तीन विकास कामांची पूर्तता एकाच वेळी होत असल्याने आजचा दिवस ईशान्य भागाच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने सर्वात मोठा दिवस आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना सांगितले. या संदर्भात सविस्तर माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, पहिली बाब म्हणजे ईशान्य भागाला त्याची पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळत आहे तर पश्चिम बंगालला जोडणारी ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे. दुसरी बाब म्हणजे, आसाम आणि मेघालयमधील सुमारे 425 किलोमीटर लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तर तिसरी बाब म्हणजे आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचे उद्घाटन करण्यात आले आहे. या संस्मरणीय प्रसंगी पंतप्रधानांनी आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालसह संपूर्ण ईशान्य भारताच्या नागरिकांचे अभिनंदन केले.
गुवाहाटी- जलपायगुडी वंदे भारत ट्रेन आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक शतकांपासून असलेल्या संबंधांना बळकटी देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. यामुळे आरामदायी प्रवासात वाढ होईल आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतील आणि पर्यटन आणि व्यवसायातून निर्माण होणाऱ्या रोजगारसंधींमध्ये वाढ होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. कामाख्या मातेचे मंदिर, काझीरंगा, मानस नॅशनल पार्क आणि पोबितोरा वन्यजीव अभयारण्य या भागांसोबत या वंदे भारत गाडीमुळे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिलॉन्ग, मेघालयमधील चेरापुंजी आणि अरुणाचल प्रदेशमधील तवांग आणि पासिघाटमधील प्रवास आणि पर्यटनात वाढ होईल याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
गेली 9 वर्षे सत्तेत असलेल्या रालोआ सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले या वर्षांमध्ये संपूर्ण देशाने नव्या भारताच्या उभारणीसाठी अनेक प्रकारच्या उल्लेखनीय कामगिरींचा आणि अभूतपूर्व विकासाचा अनुभव घेतला आहे. नव्याने उद्धाटन झालेल्या अतिशय भव्य संसद भवनाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि त्यांनी सांगितले की हे भवन भारताच्या हजारो वर्षे जुन्या लोकशाही इतिहासाला भविष्यातील समृद्ध लोकशाहीसोबत जोडेल. यापूर्वीच्या सरकारांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी याकडे निर्देश केला की 2014 पूर्वी भ्रष्टाचाराने सर्व प्रकारचे विक्रम मोडीत काढले होते ज्याचा सर्वात जास्त परिणाम गरिबांवर आणि राज्यांवर झाला आणि ते विकासामध्ये मागे राहिले. “आमच्या सरकारने गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य दिले आहे”, घरे, शौचालये, नळावाटे पिण्याचे पाणी, वीज, गॅस पाईपलाईन, एम्सचा विकास, रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग, बंदरे यांसारख्या पायाभूत सुविधांना दिलेली चालना आणि मोबाईल कनेक्टिविटी यांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी नमूद केले. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकारने पूर्ण क्षमतेने काम केले आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पायाभूत सुविधांमुळे जनतेचे जीवन सुकर होते, रोजगार संधी निर्माण होतात आणि विकासासाठी एक पाया तयार होतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या गतीची संपूर्ण जगात चर्चा होत आहे, असे त्यांनी सांगितले. या पायाभूत सुविधा, गरीब, मागास, दलित, आदिवासी आणि समाजाच्या इतर उपेक्षित घटकांना बळकटी देत आहेत आणि त्यांचे सक्षमीकरण करत आहेत, असे ते म्हणाले.
“पायाभूत सुविधा सर्वांसाठी आहेत आणि त्या भेदभाव करत नाहीत” असे पंतप्रधान म्हणाले आणि त्यांनी पायाभूत सुविधांचा विकास हाच खरा सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता आहे, असे अधोरेखित केले.
पायाभूत सुविधांच्या विकासाचे सर्वात मोठे लाभार्थी पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्ये आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. पूर्वी ईशान्येकडील जनता अनेक दशके मूलभूत सुविधांपासून देखील वंचित होती, असे ते म्हणाले. 9 वर्षांपूर्वी वीज, टेलिफोन किंवा चांगल्या रेल्वे सुविधा, हवाई सुविधांचा अभाव असलेली खूप मोठ्या संख्येने गावे आणि कुटुंबे ईशान्येकडील होती, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
सेवेच्या भावनेने काम करण्याचे उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सादर केली. ईशान्येकडील रेल्वे कनेक्टिव्हिटीचे झालेले काम, हा सरकारच्या कामाचा वेग, प्रमाण आणि हेतू याचा पुरावा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. वसाहतवादाच्या काळातही आसाम, त्रिपुरा आणि बंगाल या प्रदेशातील नैसर्गिक संसाधने, स्त्रोतांची लूट करण्याच्या उद्देशाने हे भाग रेल्वेने जोडले गेले होते, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र, स्वातंत्र्यानंतरही या प्रदेशातील रेल्वेच्या विस्ताराकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अखेर 2014 नंतर हे काम विद्यमान सरकारने पार पडले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण ईशान्येकडील लोकांच्या दृष्टीने संवेदनशील असलेले विषय आणि त्यांना सुविधा देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परिवर्तन दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. 2014 पूर्वी, ईशान्येकडीज रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वेचे सरासरी सुमारे 2500 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. यावर्षी हे अंदाजपत्रक 10 हजार कोटी रूपयांपेक्षाही अधिक झाले आहे, म्हणजे अंदाजपत्रकामध्ये चारपटींनी वाढ झाली आहे. आता मणिपूर, मिझोराम, नागालँड, मेघालय आणि सिक्कीम ही राजधानीची शहरे देशाच्या इतर भागांशी जोडण्यात येत आहेत. “लवकरच ईशान्येकडील सर्व राजधानींची शहरे ब्रॉडगेज नेटवर्कने जोडली जाणार आहेत”, असे सांगून मोदी म्हणाले, “या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.’’
“सरकारचा विकासकामे करण्याचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे”, अशी पंतप्रधानांनी टिपणी केली, आणि त्यांनी नमूद केले की, ईशान्येमध्ये पूर्वीपेक्षा तिप्पट वेगाने नवीन रेल्वे मार्ग टाकले जात आहेत आणि रेल्वे मार्गिका दुहेरी होत आहेत. हे काम पूर्वीपेक्षा 9 पट वेगाने केले जात आहे. गेल्या 9 वर्षांत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू झाले आणि सरकार लवकरच कमाल मर्यादेपर्यंत म्हणजे संपृक्ततेपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने काम करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
ज्या जलदगतीने ईशान्येकडील अनेक दुर्गम भाग रेल्वेने जोडले गेले, त्या वेगाला विकासाच्या गतीचे श्रेय पंतप्रधानांनी दिले. जवळपास 100 वर्षांनंतर नागालँडला दुसरे रेल्वे स्थानक मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले, जिथे एकेकाळी कमी वेगाची क्षमता असलेली नॅरोगेज लाइन उभी होती, त्याच मार्गिकेवरून आता, वंदे भारत सेमी हाय-स्पीड ट्रेन आणि तेजस एक्स्प्रेस धावत आहेत. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या भारतीय रेल्वेच्या व्हिस्टा डोम डब्यांचाही त्यांनी उल्लेख केला.
“भारतीय रेल्वे वेगासोबत मने, समाज आणि संधींना जनतेशी जोडणारे एक माध्यम बनले आहे”, अशी टिपणी पंतप्रधानांनी गुवाहाटी रेल्वे स्थानकावरील पहिल्या ट्रान्सजेंडर चहाच्या स्टॉलला अधोरेखित करत केली. समाजाकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करणाऱ्यांना सन्मानाचे जीवन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. 'एक स्टेशन, एक उत्पादन' योजनेंतर्गत, ईशान्येकडील रेल्वे स्थानकांवर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत, त्यामुळे स्थानिक कारागिरांना आणि कारागिरांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे; वोकल फॉर लोकलवर यामुळे भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्येतील शेकडो स्थानकांवर देण्यात आलेल्या वाय-फाय सुविधांचे उदाहरणही त्यांनी दिले. “संवेदनशीलता आणि वेगाने केलेले काम, या संयुक्त घटकांनीच ईशान्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल आणि विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करेल, ‘’ असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
पार्श्वभूमी
अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेसमुळे या भागातील लोकांना वेगवान आणि आरामात प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. गुवाहाटी आणि न्यू जलपाईगुडी दोन ठिकाणे जोडली असल्यामुळे सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत नवीन वंदे भारत गाडीने सुमारे एक तासाचा प्रवास वेळ वाचविण्यासाठी मदत करणार आहे. वंदे भारत हा प्रवास 5 तास 30 मिनिटांत पूर्ण करेल. तर सध्याच्या सर्वात वेगवान एक्सप्रेसने हाच प्रवास पूर्ण करण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागतात.
पंतप्रधानांनी 182 रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे लोकार्पण केले. यामुळे जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांसह प्रदूषणमुक्त वाहतूक उपलब्ध करून देण्यात मदत होईल आणि गाड्यांचा धावण्याचा वेळ कमी होईल. यामुळे मेघालयात जाण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावणाऱ्या गाड्यांचा मार्ग मोकळा होईल.
आसाममधील लुमडिंग येथे नव्याने बांधलेल्या डेमू/मेमू शेडचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. ही नवीन सुविधा या प्रदेशात कार्यरत डेमू रेकची देखभाल करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे दैनंदिन कामामध्ये अधिक चांगली व्यवहार्यता निर्माण होईल.
आज असम सहित पूरे नॉर्थ ईस्ट की रेल कनेक्टिविटी के लिए बहुत बड़ा दिन है। pic.twitter.com/2g1A4bAMBo
— PMO India (@PMOIndia) May 29, 2023
बीते 9 साल, भारत के लिए अभूतपूर्व उपलब्धियों के रहे हैं, नए भारत के निर्माण के रहे हैं। pic.twitter.com/oCmIpRoN51
— PMO India (@PMOIndia) May 29, 2023
हमारी सरकार ने आने के बाद सबसे ज्यादा गरीब कल्याण को प्राथमिकता दी। pic.twitter.com/NElpAL0KtI
— PMO India (@PMOIndia) May 29, 2023
इंफ्रास्ट्रक्चर सबके लिए है, समान रूप से है, बिना भेदभाव के है।
— PMO India (@PMOIndia) May 29, 2023
इसलिए ये इंफ्रास्ट्रक्चर निर्माण भी एक तरह से सच्चा सामाजिक न्याय है, सच्चा सेकुलरिज्म है। pic.twitter.com/7WyQbvSUMv
गति के साथ-साथ भारतीय रेल आज दिलों को जोड़नें, समाज को जोड़ने और लोगों को अवसरों से जोड़ने का भी माध्यम बन रही है। pic.twitter.com/TnryZSrPrj
— PMO India (@PMOIndia) May 29, 2023