रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.
भारतातील 45 हून अधिक शहरांमध्ये 71,000 पेक्षा अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत, त्यामुळे इतक्या कुटुंबांसाठी आनंदाचे एक नवीन पर्व सुरू होईल असे या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारने, धनत्रयोदशीच्या दिवशी 75,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. “केंद्र सरकार देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे, याचाच आजचा रोजगार मेळावा पुरावा आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
महिन्याभरापूर्वी रोजगार मेळाव्याला सुरुवात केल्याचे त्यांनी स्मरण करून देत, अनेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्ये वेळोवेळी अशा रोजगार मेळ्यांचे आयोजन करत राहतील असे ते म्हणाले. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली तसेच चंदीगड येथे हजारो तरुणांना तिथल्या सरकारांकडून नियुक्ती पत्रे देण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गोवा आणि त्रिपुरा देखील काही दिवसांतच अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करत आहेत असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या जबरदस्त कामगिरीचे श्रेय दुहेरी-इंजिन सरकारला दिले आणि भारतातील तरुणांना सक्षम करण्यासाठी वेळोवेळी असे रोजगार मेळावे आयोजित केले जातील, असे आश्वासन दिले.
तरुण हे देशाची सर्वात मोठी ताकद आहे, त्यांची प्रतिभा आणि ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी वापरण्यास केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे (लोकसेवकांचे) स्वागत आणि कौतुक केले. ते ही महत्त्वाची जबाबदारी अत्यंत विशेष काळात म्हणजे अमृत काळात स्वीकारत असल्याचे स्मरण पंतप्रधानांनी करुन दिले. अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या देशाच्या संकल्पातील त्यांची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका आणि कर्तव्ये सर्वसमावेशकपणे समजून घेतली पाहिजेत, कर्तव्ये पार पाडण्यासाठी क्षमता वाढवण्यावर सतत भर दिला पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आज सुरू झालेल्या कर्मयोगी भारत तंत्रज्ञान मंचावर प्रकाश टाकताना, सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनेक ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेची पंतप्रधानांनी माहिती दिली. त्यांनी कर्मयोगी प्रारंभ या सरकारी कर्मचार्यांसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमावर भर दिला आणि नवीन नियुक्त झालेल्यांना याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले. त्याचे फायदे सांगत, कौशल्य विकासासाठी हे एक उत्तम स्रोत ठरेल तसेच आगामी काळात त्यांचा फायदा होईल असे पंतप्रधान म्हणाले.
महामारी आणि युद्धामुळे जागतिक स्तरावर तरुणांसमोर निर्माण झालेल्या संकटाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते म्हणाले की या कठीण काळातही जगभरातील तज्ञ भारताच्या विकासाच्या वाटचालीबाबत आशावादी आहेत. पंतप्रधान म्हणाले की, तज्ज्ञांच्या मते, भारत, सेवा क्षेत्रातील एक मोठी शक्ती बनला आहे आणि लवकरच जगाचं उत्पादन केंद्रही बनणार आहे. पंतप्रधान म्हणाले की, पीएलआय सारखे उपक्रम यामध्ये मोठी भूमिका बजावतील, आणि याचा मुख्य पाया देशाचे तरुण आणि कुशल मनुष्यबळ असेल. पीएलआय योजनेमुळे देशात 60 लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. मेक इन इंडिया, व्होकल फॉर लोकल यासारख्या मोहिमा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत, असेही ते म्हणाले. “सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी सातत्त्याने वाढत आहेत. महत्वाचे म्हणजे, तरुणांसाठीच्या या संधी त्यांच्या स्वतःच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये निर्माण होत आहेत. यामुळे तरुणांचे सक्तीचे स्थलांतर कमी होत आहे आणि ते आपल्या प्रदेशाच्या विकासात आपली भूमिका बजावू शकत आहेत”, ते म्हणाले.
पंतप्रधानांनी स्टार्टअप ते स्वयंरोजगार आणि अंतराळ ते ड्रोन या क्षेत्रांमध्ये सरकारने केलेल्या उपाययोजनांद्वारे निर्माण केलेल्या नवीन संधींवर प्रकाश टाकला. 80,000 स्टार्टअप्स, तरुणांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी देत आहेत. औषधोपचार, कीटक नाशके, स्वामित्व योजनेचे मॅपिंग आणि संरक्षण क्षेत्रात ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे तरुणांसाठी नवा रोजगार निर्माण होत आहे, ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारतातील खाजगी क्षेत्राने भारताच्या पहिल्या अंतराळ रॉकेटचे प्रक्षेपण केल्याचे स्मरण करून, पंतप्रधानांनी खासगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. कारण यामुळे भारतातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मुद्रा योजने अंतर्गत मंजूर झालेल्या 35 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या कर्जाचे त्यांनी उदाहरण दिले. संशोधन आणि नवोन्मेष या दिशेने केलेल्या प्रगतीला श्रेय देत पंतप्रधान म्हणाले की यामुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.
नियुक्त झालेल्यांनी त्यांना मिळालेल्या नव्या संधींचा पूर्ण फायदा करून घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी अधोरेखित केले की ही नियुक्ती पत्रे त्यांच्यासाठी केवळ विकासाचे जग खुले करणारे प्रवेश बिंदू आहेत, आणि त्यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि आपल्या वरिष्ठांकडून शिकून पात्र उमेदवार बनावे असे आवाहन केले. पंतप्रधानांनी आपला शिकण्याचा अनुभव सांगून भाषणाचा समारोप केला आणि सांगितले की, कोणीही आपल्यामधील विद्यार्थी सतत जागृत ठेवावा. पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन काही शिकण्याची संधी ते कधीच दवडत नाहीत. नियुक्त झालेल्यांनी आपला ऑनलाईन प्रशिक्षणाचा अनुभव सामायिक करावा आणि कर्मयोगी व्यासपीठामध्ये सुधारणा करण्यासाठी रचनात्मक अभिप्राय द्यावा, असे पंतप्रधान म्हणाले. “आपण आधीच भारताला विकसित देश बनवण्याच्या मार्गावर आहोत. हाच दृष्टीकोन घेऊन पुढे जाण्याचा आपण संकल्प करूया”, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
पार्श्वभूमी
रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. रोजगार मेळा रोजगार निर्मिती आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्यासाठी प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळ्याअंतर्गत 75,000 नियुक्तीपत्रे नव्याने नियुक्ती झालेल्यांना देण्यात आली होती.
नव्याने नियुक्त झालेल्यांना त्यांच्या नियुक्ती पत्रांची प्रत्यक्ष प्रत देशभरातील 45 स्थळांवर सुपूर्त करण्यात येईल (गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता). यापूर्वी भरण्यात आलेली पदे वगळता, शिक्षक, व्याख्याता, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदे देखील भरली जात आहेत. विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सीएपीएफ) गृह मंत्रालयाकडून लक्षणीय संख्येने पदे भरली जात आहेत.
पंतप्रधानांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्युलचा देखील शुभारंभ केला. हे मॉड्यूल, विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन नियुक्त्यांसाठी संबंधित विभागाचा परिचय करून देणारा एक ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. यामध्ये सरकारी नोकर वर्गासाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणची नीतिमत्ता आणि सचोटी, मनुष्यबळ विकास धोरणे आणि इतर फायदे आणि भत्ते यांचा समावेश असेल, जे त्यांना धोरणांशी जुळवून घ्यायला आणि नवीन भूमिकांमध्ये सहजतेने संक्रमण करायला मदत करेल. igotkarmayogi.gov.in या व्यासपीठावर, त्यांना आपले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी इतर अभ्यासक्रम पाहण्याची आणि शिकण्याची संधी देखील मिळेल.
Working in mission mode to provide government jobs. pic.twitter.com/A7f6WGmQ08
— PMO India (@PMOIndia) November 22, 2022
Youth are the biggest strength of our country. pic.twitter.com/hb8rl5Nn7X
— PMO India (@PMOIndia) November 22, 2022
The 'Karmayogi Bharat' technology platform which has been launched, has several online courses. This will greatly help in upskilling. pic.twitter.com/KWSirYDxF8
— PMO India (@PMOIndia) November 22, 2022
Experts around the world are optimistic about India's growth trajectory. pic.twitter.com/Pe4h6gQin0
— PMO India (@PMOIndia) November 22, 2022
New opportunities are being created for the youth in India. pic.twitter.com/sZwRbhULJg
— PMO India (@PMOIndia) November 22, 2022