पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जोधपूर येथे सुमारे 5000 कोटी रुपयांच्या रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमध्ये एम्स जोधपूर येथे 350 खाटांचे ट्रॉमा सेंटर आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक, पीएम-एबीएचआयएम अंतर्गत 7 क्रिटिकल केअर ब्लॉक, आणि जोधपूर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीचा विकास यांचा समावेश आहे. त्यांनी आयआयटी जोधपूर संकुल आणि राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठाला अद्ययावत पायाभूत सुविधांचे लोकार्पण केले. त्यांनी अनेक रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि 145 किमी लांबीच्या देगना-राय का बाग, आणि 58 किमी लांबीच्या देगना-कुचमन सिटी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह इतर दोन रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. मोदी यांनी जैसलमेर ते दिल्लीला जोडणाऱ्या रुनिचा एक्सप्रेस आणि मारवाड जंक्शन - खांबळी घाटला जोडणाऱ्या नवीन हेरिटेज गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी वीर दुर्गादास यांच्या भूमीला नतमस्तक होऊन अभिवादन केले. सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे परिणाम आजच्या प्रकल्पांमधून पाहता आणि अनुभवता येतात हे त्यांनी अधोरेखित केले आणि त्यासाठी राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले.
राजस्थान हे असे राज्य आहे जिथे देशाच्या शौर्य, समृद्धी आणि संस्कृतीत प्राचीन भारताच्या वैभवाचे दर्शन घडते असे पंतप्रधान म्हणाले. नुकत्याच जोधपूरमध्ये झालेल्या जी-20 बैठकीचीही त्यांनी आठवण करून दिली. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी सनसिटी जोधपूरचे आकर्षण त्यांनी अधोरेखित केले. “भारताच्या भूतकाळातील वैभवाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजस्थानने भारताच्या भविष्याचेही प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे. हे तेव्हाच घडेल जेव्हा मेवाडपासून मारवाडपर्यंत संपूर्ण राजस्थान विकासाची नवीन उंची गाठेल आणि इथे आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील”, असे पंतप्रधान म्हणाले.
ते म्हणाले की, बिकानेर आणि बाडमेरमधून जाणारा जामनगर द्रुतगती मार्ग आणि दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्ग ही राजस्थानमधील उच्च तंत्रज्ञान- युक्त पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत.
यावर्षी राजस्थानमध्ये रेल्वेसाठी सुमारे 9500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील सरकारच्या सरासरी अर्थसंकल्पिय तरतुदीपेक्षा 14 पटीने अधिक आहे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की राजस्थानमध्ये स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत केवळ 600 किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले होते , मात्र सध्याच्या सरकारने गेल्या 9 वर्षात 3700 किमी पेक्षा अधिक मार्गाचे विद्युतीकरण केले आहे. “आता या मार्गावर डिझेल इंजिनच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक गाड्या धावतील”, असे पंतप्रधान म्हणाले . यामुळे प्रदूषण कमी होण्यास आणि राज्यातील हवा स्वच्छ ठेवण्यास मदत होईल असे ते म्हणाले. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत राजस्थानमधील 80 हून अधिक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे असे पंतप्रधान म्हणाले. देशातील विमानतळांच्या विकासाप्रमाणेच गरीबांकडून नियमितपणे वापर होणाऱ्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जोधपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आल्याचे त्यांनी संगितले.
आजचे रेल्वे आणि रस्ते प्रकल्प राज्यातील विकासाला गती देतील असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे रेल्वेच्या प्रवासाच्या वेळेत घट झाली असून जैसलमेर ते दिल्लीला जोडणारी रुनिचा एक्स्प्रेस आणि मारवाड जंक्शन- खांबळी घाटला जोडणाऱ्या नव्या हेरिटेज गाडीला आज हिरवा झेंडा दाखवला तसेच काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्याचा त्यांनी उल्लेख केला. आज 3 रस्ते प्रकल्पांची पायाभरणी तसेच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारत विकासासाठी पायाभरणी केल्याचे त्यांनी सांगितले. आज पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलेले प्रकल्प प्रादेशिक अर्थव्यवस्था मजबूत करण्याबरोबरच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतील आणि राज्यातील पर्यटन क्षेत्रालाही नवी ऊर्जा देतील, असे मोदी यांनी अधोरेखित केले .
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात राजस्थानचे विशेष स्थान असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी कोटाच्या योगदानाचा उल्लेख केला. राजस्थान हे शिक्षणासोबतच वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे केंद्र बनायला हवे असे ते म्हणाले.
यासाठी अपघात, आपत्कालीन आणि अति दक्षता विभाग जोधपूरच्या एम्समध्ये तयार होत आहे त्याचप्रमाणे "प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा योजना (PM-ABHIM) अंतर्गत राजस्थानमध्ये सात अति दक्षता विभाग विकसित होत आहेत. "एम्स जोधपुर आणि आयआयटी जोधपुर यासारख्या महत्त्वाच्या संस्था केवळ राजस्थान मध्येच नाहीत तर देशभरात विकसित झाल्या तर मला खूप आनंद होईल" असे त्यांनी सांगितले. "एम्स आणि आयआयटी जोधपुर या संस्थांनी मिळून वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन शक्यतांवर काम सुरू केले आहे. उच्च तंत्रज्ञानाचा वापर असणारे रोबोटिक सर्जरी सारखे वैद्यकीय तंत्रज्ञान भारताला संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रात नवीन उंची गाठून देईल. यामुळे वैद्यकीय पर्यटनालासुद्धा प्रोत्साहन मिळेल." असे त्यांनी नमूद केले.
"राजस्थान ही निसर्ग आणि पर्यावरणावर प्रेम करणाऱ्यांची भूमी आहे." असे सांगत पंतप्रधानांनी गुरु जांभेश्वर आणि बिश्नोई असे समूह नैसर्गिक जीवनशैली जगतात आणि त्यामुळे त्यासाठी जगात अनुसरले जातात त्यांचा खास उल्लेख केला."परंपरांच्या आधारे भारत आज जगाला मार्गदर्शन करत आहे", असे पंतप्रधान म्हणाले. भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर विश्वास व्यक्त करत राजस्थानच्या विकासाबरोबरच भारताचा विकास होईल असा निष्कर्ष त्यांनी मांडला. "आपण एकत्रितपणे राजस्थानचा विकास करायला हवा आणि या राज्याला वैभवशाली बनवायला हवे " असेही मोदी म्हणाले.
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि कैलास चौधरी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी:-
राजस्थानमधील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. या प्रकल्पांमध्ये एम्स जोधपुरमधील साडेतीनशे खाटांचा अपघात आणि अतिदक्षता रुग्णालय विभाग आणि राजस्थानात विकसित करण्यात येणार असलेल्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा योजना अंतर्गत सात अतिदक्षता विभाग यांचा समावेश आहे. एम्स जोधपुरमध्ये उभारण्यात येत असलेले 'अपघात, आपत्कालीन आणि अति दक्षता विभाग एकात्मिक केंद्र' हे साडेतीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारण्यात येणार आहे. अनुमान, निदान, डे केअर रुग्णालय कक्ष, खाजगी कक्ष, आधुनिक शल्यक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग आणि डायलिसिस विभाग अशासारख्या अनेक सुविधा इथे उपलब्ध असतील. अपघात आणि तातडीच्या रुग्णांसाठी बहुशाखीय आणि सर्वसमावेशक उपचार रुग्णांना उपलब्ध करून देऊन आपत्कालीन काळजी व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टिकोन अवलंबिला जाईल.
राजस्थानमध्ये होत असलेल्या या सात क्रिटिकल केअर विभागांमुळे जिल्हास्तरीय क्रिटिकल केअरसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडेल. ज्याचा लाभ या राज्यामधील नागरिकांना होईल.
जोधपुर विमानतळाच्या नवीन अत्याधुनिक विमानतळ इमारतीची पायाभरणी सुद्धा पंतप्रधानांनी केली. 480 कोटी रुपये खर्चाची ही नवीन टर्मिनल इमारत 24,000 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळावर उभारण्यात येत आहे. आणि गर्दीच्या वेळीसुद्धा 2500 प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज असेल. ही सुविधा वर्षाला 35 लाख प्रवाशांना सेवा देईल आणि या भागातील कनेक्टिव्हिटीत सुधारणा करून पर्यटन या क्षेत्राच्या विकासाला हातभार लावेल.
पंतप्रधानांनी आयआयटी जोधपुरचे संकुल देशाला समर्पित केले. हा अत्याधुनिक परिसर उभारण्यासाठी 1135 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला जाणार आहे.उच्च दर्जाचे समग्र शिक्षण देण्याच्या तसेच अत्याधुनिक संशोधन आणि नवोन्मेष यांना बळ देण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे.
पंतप्रधानांनी राजस्थान केंद्रीय विद्यापीठातील सोयी सुविधांमधील सुधारणा म्हणजे केंद्रीय इन्स्ट्रुमेंटेशन प्रयोगशाळा, कर्मचारी निवास तसेच योगा आणि क्रीडा विज्ञान इमारत सुविधा या देशाला समर्पित केल्या.
राजस्थानमधील रस्त्यांसंबधित सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल म्हणून पंतप्रधानांनी अनेक रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये कारवार ते NH 125A या राष्ट्रीय महामार्गावरील जोधपुर रिंग रोडवरच्या कारवार ते डांगियावाज विभागातील रस्त्याचे चौपदरीकरण, NH 325 जालोर मार्गे जाणाऱ्या आणि बालोतरा ते सांदराव विभाग यामध्ये सात बायपास आणि महत्त्वाच्या शहरांचे रीअलाइनमेंट, NH 25 वरील पाचद्र बान्गुडी विभागातील रस्त्याचे चौपदरीकरण असे प्रकल्प समाविष्ट आहेत. या रस्ते प्रकल्पांचा एकूण खर्च 1475 कोटी रुपये आहे. जोधपुर रिंग रोड मुळे वाहतुकीचा ताण कमी होईल आणि शहरातील वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुद्धा कमी होईल. हे प्रकल्प कनेक्टिव्हिटी वाढवणे, व्यापाराला वेग, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास गोष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील.
पंतप्रधानांनी राजस्थानमध्ये दोन नवीन ट्रेन सेवांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये जैसलमेर ते दिल्ली यांना जोडणारी रुणिचा एक्सप्रेस तसेच मारवाड जंक्शन आणि खांबली घाट यांना जोडणारी नवीन वारसा रेल्वे गाडी यांचा समावेश आहे.रुणिचा एक्सप्रेस ही जोधपुर देगना कछमान शहर, फुलेरा, रिंगा, श्रीमाधोपुर, नीमका थाणा, नरनौल, अटेली, रेवारी या भागातून जाईल आणि या शहरांची राष्ट्रीय राजधानीशी कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत करेल. नवीन हेरिटेज रेल्वे गाडी ही मारवाड जंक्शन आणि खांबली घाट यांना जोडणारी आहे. ती पर्यटनाला चालना देईल आणि या भागातील रोजगार निर्मितीला मदत करेल. याशिवाय पंतप्रधानांनी अजून दोन रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले यामध्ये 'देगना राय का बाग' या 145 किमी रेल्वे मार्गा चे दुपदरीकरण आणि 58 किलोमीटर लांबीच्या देगना कछमान सिटी रेल्वे लाईन याचे दुपदरीकरण यांचा समावेश आहे.