धन्यवाद, अध्यक्ष महोदय,
आपण आता भारताविषयी जे उद्गार काढलेत, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि सरदार पटेल यांचे जे श्रद्धापूर्वक स्मरण केलेत, भारतीय लोकांच्या सामर्थ्याविषयी जे बोललात, भारताचे यश,इथली संस्कृती याविषयी आपण बोललात, माझ्याविषयी देखील बोललात… या तुमच्या सगळ्या अभिप्रयाविषयी, मी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केवळ भारताचा गौरव वाढवलेला नाही तर अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरीकासाठी देखील हे गौरवोद्गार आहेत.
श्री राष्ट्राध्यक्ष महोदय, आज जिथून आपण भारतीयांशी संवाद साधलात, ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. खेळाविषयीच्या काही सुविधांचे बांधकाम इथे अद्याप सुरु आहे. मात्र तरीही, आपले इथे येणे, क्रीडाविश्वाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा उत्साह वाढवणारे आहे. मी आज इथे गुजरात क्रिकेट संघटनेचेही आभार मानतो. त्यांनी हे भव्य आणि शानदार स्टेडियम या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले. कदाचित यामुळे त्यांच्या कामात काही अडथळे आले असतील, पण मला पूर्ण विश्वास आहे की ते हे बांधकाम वेळेतच पूर्ण करतील.
मित्रांनो,
दोन व्यक्ती असोत किंवा मग दोन देशांचे संबंध असोत, त्याचा सर्वात मोठा आधार असतो विश्वास! एकमेकांप्रती असलेला विश्वास. आपल्याकडे म्हंटले जाते- तन् मित्रम् यत्र विश्वास:॥ म्हणजे जिथे विश्वास अढळ आहे, तिथेच खरी मैत्री असते.
गेल्या काही वर्षांत, भारत आणि अमेरिकेदरम्यानचा विश्वास ज्या नव्या उंचीवर पोहचला आहे, जितका मजबूत झाला आहे, ते एक ऐतिहासिक यश आहे.अमेरिकेच्या माझ्या प्रत्येक दौऱ्यात मी हा विश्वास दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होतांना स्वतः अनुभवला आहे.
मला आठवतं, जेव्हा मी वॉशिंग्टन इथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा ते मला म्हणाले होते– “India has a true friend in the White House”.म्हणजेच, “भारत हा व्हाईट हाउसचा खरा मित्र आहे”
अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताविषयीचा आपला स्नेह नेहमीच दर्शवला आहे. जेव्हा व्हाईट हाऊस मध्ये दिवाळीचा सण साजरा केला जातो, तेव्हा अमेरिकेत राहणाऱ्या 40 लाख भारतीयांना देखील अमेरिकेची समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गावरचे सहकारी असल्याबद्दल अभिमान वाटतो.
मित्रांनो,
अमेरिकेप्रमाणेच आज भारतातही, परिवर्तनासाठी लोकांच्या मनात अभूतपूर्व अधीरता, उत्सुकता आहे. आज 130 कोटी भारतीय एकत्र येऊन नव्या भारताची निर्मिती करत आहेत.
आपली युवा शक्ती आकांक्षांनी भरलेली, प्रेरोत झालेली आहे. मोठी उद्दिष्ट्ये ठेवणे, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आणि ती साध्य करणे, ही आज नव्या भारताची ओळख झाली आहे.
• आज भारतात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडीयमच उभारलेले नाही, तर जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना देखील सुरु आहे.
• आज भारतात केवळ जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प तयार होत नाहीये तर सर्वात मोठी स्वच्छता योजना देखील राबवली जात आहे.
• आज भारत केवळ एकाच वेळी सर्वात जास्त उपग्रह अवकाशात पाठवण्याचा जागतिक विक्रम बनवत नाहीये, तर सर्वात व्यापक आर्थिक समावेशन करण्याचाही जागतिक विक्रम बनवतो आहे.
एकविसाव्या या शतकात, आमच्या पायाभूत सुविधा असो किंवा मग सामाजिक क्षेत्रे, आम्ही जागतिक मानक आणि निकषांच्या आधारावरच वाटचाल करतो आहोत.
गेल्या काही वर्षात भारताने 1500 कालबाह्य कायदे रद्द केलेत, मात्र त्यासोबतच, समाज अधिक सशक्त करण्यासाठी अनेक नवे कायदेही आम्ही तयार केले आहेत.
तृतीयपंथी व्यक्तींना अधिकार देणारा कायदा असो, तिहेरी तलाक च्या विरोधात कायदा तयार करुन मुस्लीम महिलांचा सन्मान करणे असो, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देणारा कायदा असो, महिलांना बाळंतपणासाठी 26 आठवडे रजा देणारा नियम असो असे अनेक अधिकार आम्ही समाजातील वेगवेगळ्या वर्गांना दिले आहेत.
मित्रांनो,
मला अत्यंत आनंद आहे की भारतात होणाऱ्या या परिवर्तनाच्या प्रवासात अमेरिका, भारताचा एक विश्वासार्ह भागीदार ठरला आहे.
आज अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
आज भारताची सैन्यदले अमेरिकेच्या सैन्यदलांसोबत सर्वाधिक युध्दसराव करत आहेत.
आज भारत अमेरिकेसोबतच सर्वात व्यापक संशोधन आणि विकास प्रकल्पांचा भागीदार बनला आहे.
आज मग संरक्षण क्षेत्र असो, उर्जा क्षेत्र असो,आरोग्य असो किंवा माहिती-तंत्रज्ञान आमच्या संबंधांची व्याप्ती सातत्याने वाढत चालली आहे.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकाच्या या दशकात, नवा भारत, पुनरुत्थानासाठी उत्सुक असलेल्या अमेरिकेसाठी देखील अनेक संधी घेऊन आला आहे.
विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात दोन्ही देशांकडे मिळवण्यासाठी खूप काही आहे.
भारतात उत्पादन क्षेत्रात वाढ होणे, पायाभूत सुविधा क्षेत्रात वाढ होणे यातूनही अमेरिकेसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत.
चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या या काळात भारतात डिजिटल अर्थव्यवस्था विकसित होते आहे, विस्तारते आहे, यातून अमेरिकेसाठी देखील गुंतवणुकीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत.
माननीय अध्यक्ष,
गेल्या दशकात डिजिटल तंत्रज्ञानाने भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांना आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. भारतीय गुणवत्ता आणि अमेरिकेचे तंत्रज्ञान यामुळे या क्षेत्राला नवे नेतृत्व मिळाले होते..
आणि मला विश्वास आहे, की एकविसाव्या शतकातही, भारत आणि अमेरिका एकत्रितपणे या डिजिटल युगाचे, चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करु शकेल.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकात नव्या संतुलीत रचना, नव्या स्पर्धा, नवी आव्हाने आणि नव्या संधी यातून बदलाचा एक पाया रचला जात आहे.
अशा स्थितीत, एकविसाव्या शतकात जगाची दिशा निश्चित करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणि सहकार्याची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
माझे असे स्पष्ट मत आहे की भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार आहेत.
आपण केवळ भारत-प्रशांत महासागर परिसरातच नाही, तर संपूर्ण जगातील शांतता, प्रगती आणि सुरक्षिततेसाठी एक मोठे योगदान देऊ शकतो.
दहशतवादाला पराभूत करण्यासाठी अमेरिकेने व्यक्त केलेली कटिबद्धता आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व म्हणजे मानवतेचीच सेवा आहे आणि म्हणूनच, माझे असे मत आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासारखे विलक्षण नेता आणि भारताचे अनन्य मित्र यांचे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात भारतात येणे, ही स्वतःच एक मोठी संधी आहे.
गेल्या काळात, भारत- अमेरिका संबंध अधिक सशक्त करण्यासाठी आपण सुरुवात केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या भेटीने त्याचा नवा अध्याय सुरु झाला आहे.
आपण दोघेही एका दीर्घकालीन दूरदृष्टीने प्रेरित आहोत, आपल्याला केवळ तात्कालिक यश मिळवायचे नाही. आपले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होत जाणार आहेत, आपली आर्थिक भागीदारी अधिक विस्तारणार आहे, आपले डिजिटल सहकार्य वृद्धिंगत होणार आहे.
आणि मला विश्वास आहे की, नवनव्या उंची गाठून आज भारत जी स्वप्ने उराशी बाळगून ब्वात्चाल करतो आहे, आणि अमेरिका जी स्वप्ने घेऊन चालते आहे, ती दोघांचीही स्वप्ने आपण एकत्र येऊन पूर्ण करु शकतो. आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वागत आणिआदरातिथ्य करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे सौभाग्य समजतो. पुन्हा एकवार, ‘नमस्ते ट्रम्प’ चा नाद आसमंतात घुमू द्या, असा आग्रह आपल्या सगळ्यांना करतो आहे. आणि माझ्यासोबत म्हणा—
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत अमेरिका मैत्री चिरायू होवो!
खूप खूप धन्यवाद!!