श्री अरविंदो यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त होणारा महोत्सव योग्य पद्धतीने आयोजित व्हावा यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषविले. या समितीची अधिसूचना 20 डिसेंबर 2021 रोजी जारी करण्यात आली होती. या समितीमध्ये जीवनाच्या विविध क्षेत्रांतील 53 सदस्यांचा समावेश आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी हा महोत्सव साजरा करण्याच्या आराखड्याचे सादरीकरण केले आणि श्री अरविंदो यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त होणारा महोत्सव योग्य पद्धतीने आयोजित करण्यासाठी समितीच्या माननीय सदस्यांनी आपल्या सूचना दिल्या. या प्रसंगी बोलताना समितीच्या सन्माननीय सदस्यांनी श्री अरविंदो यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या महोत्सवाबद्दल त्यांचे मौल्यवान विचार आणि सूचना मांडल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्री अरविंदो यांच्या तत्वज्ञानातील ‘क्रांती’ आणि ‘उत्क्रांती’च्या दोन पैलूंचे अत्यंत महत्त्व आहे आणि हा उत्सव साजरा करताना त्यावर भर द्यायला हवा असे ते म्हणाले. श्री अरविंदो यांनी मांडलेल्या सिद्धांताप्रमाणे, महामानवाची निर्मिती करण्यासाठी नर ते नारायण या तत्वात अंतर्भूत असलेल्या महानतेच्या संकल्पनेप्रती तरुणांना प्रोत्साहित केले पाहिजे असे त्यांनी पुढे सांगितले.
अध्यात्मिक विषयांवर विश्वाचे नेतृत्व करणाऱ्या भारताने, जगभरातील देशांसाठी अध्यात्मवादाच्या बाबतीत योगदान देणे ही आपलीजबाबदारी आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. देशभरातील दीडशे विद्यापीठांनी श्री अरविंदो यांच्या जीवनाच्या विविध पैलूंची माहिती देणारे लेख लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे आणि असे दीडशे लेख या प्रसंगी प्रसिध्द केले पाहिजेत अशी सूचना त्यांनी केली..
श्री अरविंदो यांच्या स्मरणार्थ होणारा उत्सव, राष्ट्रीय युवक दिनी पुदुचेरी येथून सुरु करावा असा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला.यामुळे, युवकांना श्री अरविंदो यांनी 1910 ते 1950 हा कालावधी जेथे व्यतीत केला त्या पुदुचेरी गावाला भेट देऊन अरविंदो यांचे जीवन आणि शिकवण याविषयी माहिती मिळविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी, ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना, श्री अरविंदो यांचे शिष्य किरीट जोशी यांच्याशी झालेली चर्चा आणि विचारविनिमय यांची अत्यंत सुखद आठवण सांगितली. ते म्हणाले की या भेटीमुळे श्री अरविंदो यांच्या विचारांनी मला समृध्द केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्याचे काम करताना हे विचार सखोलतेने त्यात प्रतिबिंबित झाले. किरीट जोशी यांचे श्री अरविंदो यांच्याविषयीचे साहित्य जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांनी अमूल्य सूचना केल्याबद्दल आणि त्यासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानून बैठकीचा सामोरोप केला.
उच्चस्तरीय समितीची आजची बैठक मिश्र पद्धतीने घेण्यात आली. 16 सन्माननीय सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते तर 22 सदस्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत भाग घेतला. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. सदस्यांनी या बैठकीत मौलिक सूचना केल्या.श्री अरविंदो यांच्या एकात्मिक शिक्षण संकल्पनेचा अंतर्भाव नव्या शैक्षणिक धोरणात केला जावा आणि महाविद्यालये तसेच विद्यापीठ पातळीवरील अभ्यासक्रमांमध्ये त्याचा समावेश असावा असे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले.