गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या दुर्दैवी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथे, दुर्घटनेबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
पंतप्रधान म्हणाले की अधिकाऱ्यांनी दुर्घटना बाधित कुटुंबांच्या संपर्कात राहावे आणि या दुःखद प्रसंगी त्यांना सर्व प्रकारची मदत मिळेल, याची खात्री करावी.
अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना बचाव कार्य आणि दुर्घटना बाधितांना पुरवण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली.
पंतप्रधान म्हणाले की या दुर्घटनेशी संबंधित सर्व पैलूंची माहिती मिळवण्यासाठी सविस्तर आणि व्यापक चौकशी करणे ही तातडीची गरज आहे. या चौकशीमधून लक्षात आलेल्या उपाययोजना लवकरात लवकर लागू करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहराज्यमंत्री हर्ष संघवी, गुजरात सरकारमधील मंत्री ब्रिजेश मेरजा, गुजरातचे मुख्य सचिव, राज्याचे डीजीपी, स्थानिक जिल्हाधिकारी, एसपी, पोलिस महानिरीक्षक, आमदार आणि खासदार आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
त्यापूर्वी, मोरबी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी पूल दुर्घटनेच्या स्थळाला भेट दिली. दुर्घटनेतील जखमी उपचार घेत असलेल्या स्थानिक रुग्णालयात ते गेले. बचाव आणि मदत कार्यात सहभागी झालेल्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याची प्रशंसा केली.