अयोध्या येथे सूर्यवंशी भगवान श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आटोपून दिल्लीत परतल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी, 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्देशाने “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की, यामुळे प्रत्येक घराला त्याच्या छतावर सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांचे वीज बिल कमी करता येईल आणि त्यांना त्यांच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवता येईल.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा आहे.
मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा पॅनेलचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.