पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे ‘विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल’ कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये 4500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी चहाच्या सुंदर भूमीला भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आजचे प्रकल्प विकसित पश्चिम बंगालच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे असे ते म्हणाले. .
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की पश्चिम बंगालचा उत्तर भाग हा ईशान्य प्रदेशचे प्रवेशद्वार आहे आणि शेजारील देशांबरोबर याच मार्गाने व्यापार होतो. त्यामुळे राज्याच्या उत्तर भागासह पश्चिम बंगालच्या विकासाला सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
त्यांनी आधुनिक रेल्वे आणि रस्ते संबंधी पायाभूत सुविधांच्या गरजेवर भर दिला आणि एकलाखी - बालूरघाट, राणीनगर जलपाईगुडी - हल्दीबारी आणि सिलीगुडी - अलुआबारी या रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याचे नमूद केले. यामुळे उत्तर आणि दक्षिण दिनाजपूर, कूचबिहार आणि जलपायगुडी या भागातील गाड्यांचा वेग वाढेल. तसेच सिलीगुडी - समुक्तला मार्गामुळे लगतच्या वनक्षेत्रातील प्रदूषण कमी होईल. बारसोई - राधिकापूर मार्गाच्या विद्युतीकरणामुळे बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांना फायदा होईल असे ते म्हणाले. राधिकापूर आणि सिलीगुडी दरम्यान नवीन रेल्वे सेवेला हिरवी झेंडा दाखवल्यासंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमधील रेल्वेच्या बळकटीकरणामुळे विकासाच्या नवीन संधींना गती मिळेल आणि सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होईल.
पंतप्रधान म्हणाले की, या प्रदेशातील गाड्यांची गती देशाच्या उर्वरित भागांप्रमाणेच ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि आधुनिक जलद गाड्या सुरू केल्या जात आहेत. त्यांनी बांगलादेशबरोबर रेल्वे कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला . मिताली एक्स्प्रेस न्यू जलपाईगुडी ते ढाका कँट दरम्यान धावत आहे आणि बांगलादेश सरकारच्या सहकार्याने राधिकापूर स्थानकापर्यंत तिची कनेक्टिव्हिटी वाढवली जात आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये पूर्व भारताच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्मरण करून देत पंतप्रधान म्हणाले की, सध्याचे सरकार पूर्व भारताला देशाच्या विकासाचे इंजिन मानते. म्हणूनच या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे. पश्चिम बंगालचा वार्षिक सरासरी रेल्वे अर्थसंकल्प जो केवळ 4,000 कोटी रुपये होता त्यात वृद्धी होऊन आता तो सुमारे 14,000 कोटी रुपये झाला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. उत्तर बंगाल ते गुवाहाटी आणि हावडा अशी अर्ध- जलदगती वंदे भारत ट्रेन आणि अद्यतनीकरणासाठी हाती घेतलेल्या 500 अमृत भारत स्थानकांमध्ये सिलीगुडी स्थानकाचा समावेश याबाबत पंतप्रधानांनी सांगितले. “या 10 वर्षांत आम्ही रेल्वेचा विकास पसेंजर रेल्वेच्या गती वरून एक्सप्रेस ट्रेनच्या वेगापर्यंत नेला आहे. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात हा विकास सुपरफास्ट वेगाने साधला जाईल”, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
उत्तर पश्चिम बंगालमध्ये सुमारे 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन रस्ते प्रकल्पांच्या उद्घाटनाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. राष्ट्रीय महामार्ग 27 च्या घोषपुकुर - धुपगुडी विभागाचे चौपदरीकरण आणि इस्लामपूर बायपासच्या चौपदरीकरणामुळे जलपाईगुडी, सिलीगुडी आणि मैनागुडी या शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच सिलीगुडी, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार या भागांसाठी उत्तम संपर्क सुविधा उपलब्ध होईल, असेही पंतप्रधान म्हणाले. "दुआर, दार्जिलिंग, गंगटोक आणि मिरिक सारख्या पर्यटन स्थळांवर पोहोचणे देखील सोपे होईल", असे पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे व्यापार, उद्योग आणि या भागातील चहाच्या मळ्यांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम बंगालच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असे सांगून आजच्या विकास प्रकल्पांसाठी नागरिकांचे अभिनंदन करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस, केंद्रीय राज्यमंत्री निषिथ प्रामाणिक आणि संसद सदस्य राजू बिस्ता यांच्यासह इतर अनेक संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी उत्तर बंगाल आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांना लाभप्रद ठरणाऱ्या रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये एकलखी - बालूरघाट विभाग; बारसोई - राधिकापूर विभाग; राणीनगर जलपाईगुडी - हल्दीबारी विभाग; सिलीगुडी - बागडोगरा मार्गे अलुआबारी विभाग आणि सिलीगुडी - शिवोक - अलीपुरद्वार जंक्शन - समुक्तला (अलिपुरद्वार जंक्शन - न्यू कूचबिहारसह) विभाग यांचा समावेश आहे.
यावेळी पंतप्रधानांनी महत्त्वाचे इतर रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित केले. यामध्ये मणिग्राम - निमतिता विभागातील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पासह अंबारी फलकाटा - अलुआबारी मधील स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग तसेच नवीन जलपाईगुडीमधील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी सिलीगुडी आणि राधिकापूर दरम्यान नवीन प्रवासी रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवला. हे रेल्वे प्रकल्प रेल्वे संपर्क सुविधा सुधारतील, मालवाहतूक सुलभ करतील आणि या भागातील रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीला हातभार लावतील.
पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील 3,100 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग 27 च्या घोषपुकुर - धुपगुडी विभागाचे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग 27 च्या इस्लामपूर बायपासच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. घोषपुकुर - धुपगुडी विभाग हा पूर्व भारताला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणाऱ्या उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरचा भाग आहे. या विभागाच्या चौपदरीकरणामुळे उत्तर बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अखंड संपर्क सुविधा निर्माण होईल. इस्लामपूर बायपासच्या चौपदरीकरणामुळे इस्लामपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या रस्ते प्रकल्पांमुळे या भागातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.