पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे सेमीकॉनइंडिया 2023 परिषदेचे उद्घाटन केले. ‘भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देणे ' ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. ही संकल्पना, सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासात भारताला जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने देशाची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण यांची दर्शक आहे.
याप्रसंगी उद्योजकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. भारताच्या इतिहासात प्रथमच, सेमीकंडक्टर उत्पादनात भू-राजकीय परिस्थिती, देशांतर्गत राजकारण आणि सुप्त क्षमता एकमेकांशी संलग्न होत भारतासाठी अनुकूल बनल्या आहेत, असे सेमीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मिनोचा यावेळी बोलताना म्हणाले. मायक्रॉनने भारतात केलेली गुंतवणूक इतिहास रचत आहे आणि ही गुंतवणूक इतरांसाठी अनुकरणीय ठरेल, असेही मिनोचा यांनी सांगितले. सेमीकंडक्टर परिसंस्था समजून घेणारे नेतृत्व हेच आजच्या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे, असेही ते म्हणाले. भारत हे आशियातील सेमीकंडक्टरचे आगामी पॉवरहाऊस असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एएमडीचे कार्यकारी उपप्रमुख तसेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्क पेपरमास्टर यांनी अलीकडेच व्हाईट हाऊसमध्ये एएमडीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीची आठवण करून दिली. त्यांनी घोषणा केली की एएमडी भारतात पुढील 5 वर्षांमध्ये सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल. एएमडी आपल्या संशोधन आणि विकास क्षमता वाढवेल, असेही त्यांनी सांगितले. "आम्ही बेंगळुरूमध्ये आमचे सर्वात मोठे डिझाइन सेंटर तयार करू", असे आश्वासन त्यांनी दिले.
पंतप्रधान मोदींच्या भक्कम दूरदृष्टीमुळे भारत जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात मध्यवर्ती भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे, असे सेमिकंडक्टर प्रॉडक्ट ग्रुप अप्लाइड मटेरिअल्सचे अध्यक्ष डॉ. प्रभू राजा यावेळी म्हणाले. " हीच भारताची तेजाने तळपण्याची वेळ आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे", असे ते म्हणाले. कोणतीही कंपनी किंवा देश या क्षेत्रातील आव्हानांवर एकट्याने मात करू शकत नाही, त्यामुळे या क्षेत्रात सहयोगी भागीदारीची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. हे नवीन सहयोगी प्रारुप आपल्याला आम्हाला या क्षेत्रातील उत्प्रेरक बनण्यासाठी सामर्थ्य प्रदान करू शकते, यावर त्यांनी भर दिला. "भारताच्या सेमीकंडक्टर दृष्टिकोनामध्ये आम्हाला एक मौल्यवान भागीदार मानल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो", असेही ते म्हणाले.
भारताने सरतेशेवटी सेमीकंडक्टर्स क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली हे पाहणे खरोखरच आनंददायी असे मत कॅडेन्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देवगण यांनी व्यक्त केले. भारत सरकार संपूर्ण परिसंस्थेमध्ये गुंतवणूक करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
भारतातील सिलिकॉन व्हॅली बनवण्यासाठी गुजरात हे योग्य ठिकाण असल्याचे तज्ञांचे मत आहे, असे वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितले. भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनावर त्यांनी प्रकाश टाकला. “गेल्या दशकात भारताचा कसा कायापालट झाला आहे हे आपण पाहिले आहे आणि आता तरुण भारतीयांच्या आकांक्षा खरोखरच उच्च झाल्या आहेत, असे ते म्हणाले.
मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांनी भारताला जागतिक सेमीकंडक्टर हब बनवण्याच्या जागतिक दृष्टीबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. मेहरोत्रा यांनी गुजरात राज्यात सेमीकंडक्टर असेंब्ली आणि मेमरी साठी चाचणी सुविधा उभारल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि हा प्रकल्प येत्या काही वर्षांत परिसरात सुमारे 5,000 नोकऱ्यांसह 15,000 अतिरिक्त नोकऱ्या निर्माण करणार आहे, असे सांगितले. राज्यात सेमीकंडक्टर उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. नवोन्मेष, व्यवसाय वाढ आणि सामाजिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी पंतप्रधानांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. “डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया हे उपक्रम देशात खरोखरच एक परिवर्तनकारी ऊर्जा निर्माण करत आहेत. ही उर्जा निरंतर सकारात्मक प्रगती करत राहील”, असेही ते म्हणाले.
फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी तैवान सेमीकंडक्टर उद्योगाच्या तक्रार न करता कठोर परिश्रम करण्याची क्षमता असणाऱ्या सुसंवादी भावनेवर प्रकाश टाकला आणि याच भावनेने भारतात देखील काम केले जाऊ शकते असे सांगितले. भारत सरकारच्या उच्च होकार गुणोत्तराचा संदर्भ देत लिऊ यांनी विश्वासाचे आणि एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक वर्षांपूर्वी तैवानने याच मार्गाचा अवलंब करून आव्हानांवर मात केली होती, असेही ते म्हणाले. लिऊ यांनी सेमीकंडक्टर उद्योगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारच्या इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयावर विश्वास दाखवत आशावाद व्यक्त केला. “आयटी म्हणजे इंडिया आणि तैवान”, असेही ते म्हणाले. लिऊ यांनी पंतप्रधानांचा हवाला देत सेमीकंडक्टर उद्योगात तैवान हा भारताचा सर्वात विश्वासार्ह भागीदार असेल असे आश्वासन दिले.
“सेमिकॉन सारखे कार्यक्रम हे सॉफ्टवेअर अपडेटसारखे असतात जिथे तज्ञ आणि प्रमुख उद्योजक एकमेकांना भेटतात आणि परस्परांकडील ज्ञान, माहितीची देवाण घेवाण करतात.” यावर पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना भर दिला. “आपापसातल्या संबंधातील समन्वयासाठी हे महत्त्वाचे असते” असे पंतप्रधान म्हणाले. कार्यक्रमस्थळी असलेले प्रदर्शन बघून मोदींनी या क्षेत्रातील नवनवीन शोध आणि प्रज्ञेबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वांनी, विशेषत: तरुण पिढीने सध्या सुरू असलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाची ताकद समजून घ्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
सेमीकॉनच्या गेल्या वर्षीच्या पहिल्या आवृत्तीतील सहभागाची आठवण देताना पंतप्रधानांनी भारतात सेमीकंडक्टर उद्योगात गुंतवणूक करण्याबाबत त्यावेळी उपस्थित झालेल्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. एका वर्षाच्या कालावधीत प्रश्नांचे स्वरुप 'भारतात गुंतवणूक का करावी' वरून 'भारतात गुंतवणूक का करू नये' एवढे बदलले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. “प्रमुख उद्योजकांच्या प्रयत्नांमुळे दिशात्मक बदल झाला आहे”, असे उद्गार भारतावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना पंतप्रधानांनी काढले. ते म्हणाले की, भारताच्या आकांक्षा आणि क्षमता स्वतःच्या भविष्य आणि स्वप्नांशी निगडीत केले आहे. “भारत निराश होत नाही”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी 21 व्या शतकातील भारतात असणाऱ्या विपुल संधी अधोरेखित केल्या आणि भारतातील लोकशाही, लोकसंख्या आणि लाभांश यामुळे भारतातील व्यवसायात दुप्पट, तिप्पट वाढ होईल असे ते म्हणाले.
घातांकिय वाढीबद्ल मुख्यत्वे सांगणाऱ्या मूरच्या नियमाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातही तितकीच वेगवान वृद्धी दिसत आहे. जागतिक स्तरावरील इलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारताचा वाटा अनेक पटींनी वाढल्याची माहिती त्यांनी दिली. 2014 मध्ये भारतातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन 30 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होते, जे आज100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे. गेल्या 2 वर्षात इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल उपकरणांची निर्यात दुपटीने वाढली आहे. 2014 नंतर भारतातील तांत्रिक विकासावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की 2014 पूर्वी भारतात फक्त दोन मोबाईल उत्पादन युनिट्स होती तर आज ही संख्या 200 च्या पुढे गेली आहे. देशातील ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. 6 कोटींवरून 80 कोटींवर तर इंटरनेट जोडण्यांची संख्या 25 कोटींवरून आज 85 कोटींहून अधिक झाली आहे. या आकडेवारीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी यावर भर दिला की ते केवळ भारताच्या प्रगतीचे नव्हे तर देशातील वाढत्या व्यवसायांचेही सूचक आहे. मोदींनी सेमीकॉन उद्योगाचे उद्दिष्ट असलेल्या घातांकीय वाढीत असलेल्या भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.
“जग आज चौथ्या औद्योगिक क्रांतीचे साक्षीदार आहे”, असे सांगत मोदी यांनी नमूद केले की विशिष्ट क्षेत्रातील लोकांच्या आकांक्षा हा जगातील कोणत्याही औद्योगिक क्रांतीचा आधार असतो. “एके काळी औद्योगिक क्रांती आणि अमेरिकन ड्रीम यांचा संबंध होता”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी चौथी औद्योगिक क्रांती आणि भारतीय आकांक्षा यांच्यातील साधर्म्य मांडले. ते म्हणाले की, भारतीय आकांक्षा ही भारताच्या विकासामागील प्रेरक शक्ती आहे. गरीबी अतिशय वेगाने कमी होत आहे ज्यामुळे देशात नव-मध्यम वर्गाचा उदय होत आहे, असे अलीकडच्या एका अहवालात मांडले असल्याचा संदर्भ त्यांनी दिला. तंत्रज्ञान-अनुकूल स्वभाव आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत भारतीय लोकांची उत्सुकता लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की स्वस्त डेटा दर, दर्जेदार डिजिटल पायाभूत सुविधा आणि खेड्यांमध्ये अखंड वीजपुरवठा यामुळे डिजिटल उत्पादनांचा वापर वाढत आहे. “आरोग्य असो, शेती असो किंवा वाहतूक असो, भारत स्मार्ट तंत्रज्ञान वापराच्या दृष्टीकोनातून काम करत आहे”, मोदी म्हणाले. त्यांनी नमूद केले की भारतात असे लोक आहेत ज्यांनी मूलभूत घरगुती उपकरणे वापरली नसतील परंतु ते एकमेकांशी जोडलेल्या स्मार्ट उपकरणांचा वापर करणार आहेत. त्याचप्रमाणे, पंतप्रधान म्हणाले की, एखाद्या विशिष्ट लोकसंख्येतील विद्यार्थीवर्गाने यापूर्वी सायकल वापरली नसेल, परंतु आज त्यांना स्मार्ट इलेक्ट्रिक बाइक्स वापरण्याची सुविधा आहे. "भारताचा वाढणारा नव-मध्यमवर्ग हा भारतीय आकांक्षांचे शक्तीस्थान बनला आहे", असे पंतप्रधान म्हणाले. चिप-निर्मिती उद्योग ही संधींनी भरलेली बाजारपेठ आहे हे त्यांनी अधोरेखित केले आणि जे लवकर सुरुवात करतात त्यांना ते प्रथम-प्रवर्तक असल्यामुळे इतरांहून अधिक फायदा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
साथीच्या रोगाचा आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या दुष्परिणामांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की जगाला विश्वासार्ह पुरवठा साखळीची गरज आहे. "जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीएवढा विश्वासू भागीदार कोण असू शकतो", असा प्रश्न त्यांनी केला. भारतावर जगाचा विश्वास वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “गुंतवणूकदार भारतावर विश्वास ठेवतात कारण भारताकडे स्थिर, जबाबदार आणि सुधारणा-केंद्रित सरकार आहे. प्रत्येक क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास होत असल्याने उद्योगांचा भारतावर विश्वास आहे. तंत्रज्ञान क्षेत्राचा भारतावर विश्वास आहे कारण येथे तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. सेमीकंडक्टर उद्योग भारतावर विश्वास ठेवतो कारण आमच्याकडे प्रचंड प्रतिभासंचय आहे”, असे ते म्हणाले. “कुशल अभियंते आणि अभिकल्पक ही आमची ताकद आहे. जगातील सर्वात सळसळत्या आणि एकसंध बाजारपेठेचा भाग बनू इच्छिणाऱ्या कोणाचाही भारतावर विश्वास आहे. जेव्हा आम्ही 'मेक इन इंडिया' सांगतो तेव्हा त्यात 'लेट्स मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' हे अध्याहृत असते”, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताला आपल्या जागतिक जबाबदाऱ्या ठाऊक आहेत आणि मित्र देशांसोबत सर्वसमावेशक आराखड्यावर काम करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच भारत एक ऊर्जाशील सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करत आहे. अलिकडेच राष्ट्रीय क्वांटम अभियानाला मंजुरी देण्यात आली. तसेच नॅशनल रिसर्च फाऊंडेशन विधेयकही संसदेत मांडण्यात येणार आहे. सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्यासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सुधारणा केली जात आहे. भारतात अशी 300 हून अधिक नामांकित महाविद्यालये निवडण्यात आली आहेत, जिथे सेमीकंडक्टरचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील अशी माहिती त्यांनी दिली. चिप्स टू स्टार्टअप कार्यक्रम अभियंत्यांना मदत करेल. “पुढील 5 वर्षांत आपल्या देशात एक लाखाहून अधिक डिझाइन इंजिनीअर्स तयार होतील असा अंदाज आहे. भारताच्या वाढत्या स्टार्ट-अप परिसंस्थेमुळे सेमीकंडक्टर क्षेत्राला बळकटी मिळणार आहे” असे त्यांनी नमूद केले.
कंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये साम्य आहे, यात ऊर्जा कंडक्टर्सद्वारे जाऊ शकते, इन्सुलेटरमधून नाही असे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की सेमीकंडक्टर उद्योगासाठी एक चांगला ऊर्जा वाहक बनण्यासाठी भारत प्रत्येक अटी पूर्ण करत आहे. या क्षेत्रासाठी विजेची महत्वपूर्ण गरज नमूद करत पंतप्रधानांनी सांगितले की, भारताची सौरऊर्जा स्थापित क्षमता मागील दशकात 20 पटीने वाढली आहे आणि 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे नवे उद्दिष्ट या दशकाच्या अखेरपर्यंत साध्य केले जाईल. त्यांनी सौर पीव्ही मोड्यूल्स, हरित हायड्रोजन आणि इलेक्ट्रोलायझर्सच्या निर्मितीसाठी केलेल्या महत्त्वाच्या उपाययोजनाचाही उल्लेख केला. भारतात होत असलेल्या धोरणात्मक सुधारणांचा सेमीकंडक्टर व्यवस्थेच्या उभारणीवर सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी अधोरेखित केले. नवीन उत्पादन उद्योगासाठी लागू झालेल्या अनेक कर सवलतींबद्दल त्यांनी माहिती दिली तसेच भारतातील कॉर्पोरेट कराचा सर्वात कमी दर, फेसलेस आणि वेगवान कर आकारणी प्रक्रिया, जुने कायदे रद्द करणे, व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी अनुपालन आणि सेमीकंडक्टर उद्योगासाठी विशेष प्रोत्साहने आदी सुधारणांचा उल्लेख केला. हे निर्णय आणि धोरणे सेमीकंडक्टर उद्योगासाठी भारत पायघड्या घालत आहे या वस्तुस्थितीचे प्रतिबिंब असल्याचे मोदींनी नमूद केले. “भारत सुधारणांच्या मार्गावर पुढे वाटचाल करत जाईल तसतशा नवीन संधी निर्माण होतील" असे ते म्हणाले.
जागतिक पुरवठा साखळी, कच्चा माल, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीच्या गरजा भारताला माहित आहेत असे पंतप्रधान म्हणाले. “ज्या क्षेत्रात आम्ही खाजगी कंपन्यांबरोबर एकत्रितपणे काम केले आहे त्या क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे. मग ते अंतराळ क्षेत्र असो की भू-स्थानिक क्षेत्र, आम्हाला सगळीकडेच उत्कृष्ट परिणाम मिळाले आहेत” यावर पंतप्रधानांनी भर दिला. मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. सेमिकॉन इंडिया कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या वाढीव प्रोत्साहनाबद्दल त्यांनी सांगितले. आता तंत्रज्ञान कंपन्यांना भारतात सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा उभारण्यासाठी 50 टक्के आर्थिक सहाय्य दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. “देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने धोरणात्मक सुधारणा करत आहोत” असे मोदी म्हणाले.
'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या भारताच्या जी 20 संकल्पनेबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारताला सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवण्यामागे हीच भावना आहे यावर भर दिला. संपूर्ण जगाला आपल्या कौशल्य, क्षमता आणि कार्यकुशलतेचा लाभ मिळावा अशी भारताची इच्छा आहे यावर त्यांनी भर दिला. ग्लोजगाच्या कल्याणासाठी आणि उत्तम जगासाठी भारताची क्षमता वाढवण्यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी या उपक्रमातील सहभाग, सूचना आणि विचारांचे स्वागत केले आणि भारत सरकार प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत उभे आहे असे आश्वासन उद्योजकांना दिले. भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची आठवण करून दिली. “हीच वेळ आहे. हीच योग्य वेळ आहे. केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी" असे ते म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, केडन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देवगण, फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ, वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, मायक्रॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा, एएमडीचे सीटीओ मार्क पेपरमास्टर आणि सेमीकंडक्टर प्रॉडक्ट्स ग्रुप AMAT चे अध्यक्ष प्रभु राजा यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
‘कॅटलायझिंग इंडियाज सेमीकंडक्टर इकोसिस्टम’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख उद्योजक, शिक्षण संस्था आणि संशोधन संस्था यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित केली आहे. सेमीकंडक्टरची रचना, निर्मिती तसेच तंत्रज्ञान विकास क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने तयार केलेली भारताची सेमीकंडक्टर नीती आणि धोरणे यांची माहिती या परिषदेत दिली जाणार आहे. सेमीकॉन इंडिया 2023 या परिषदेमध्ये मायक्रॉन टेक्नॉलॉजी, अप्लाईड मटेरियल्स, फॉक्सकॉन,एसईएमआय, कॅडेन्स, एएमडी यांच्यासह इतर अनेक प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
Come, invest in India. pic.twitter.com/HWWAaRiNct
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023
21वीं सदी के भारत में अवसर ही अवसर हैं। pic.twitter.com/Pou3NaR3Ts
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023
India is witnessing exponential growth in digital sector, electronics manufacturing. pic.twitter.com/Nrfcx0Mrcp
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023
Today Indian aspirations are driving the country's development. pic.twitter.com/appzE6Us7h
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023
The country's growing neo-middle class has become the powerhouse of Indian aspirations. pic.twitter.com/fUwsSKjl6Q
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023
India is emerging as a trusted partner in the global chip supply chain. pic.twitter.com/fOtqJsPACS
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023
The world's confidence in India is rising. pic.twitter.com/lF6uiR18Ec
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023
Make in India, Make for India, Make for the World. pic.twitter.com/fHbgosS0yi
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023