पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथील रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्रात काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या सांगता सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे 1115 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 16 अटल निवासी विद्यालयांचे उद्घाटन केले. मोदी यांनी काशी संसद खेल प्रतियोगितेच्या नोंदणीसाठी पोर्टलचे देखील उदघाटन केले. काशी संसद सांस्कृतिक महोत्सवातील विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसेही देण्यात आली. कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी अटल निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
महादेवाच्या आशीर्वादाने काशीबद्दलचा आदर निरंतर वाढत चालला आहे आणि शहरासाठीची धोरणे नव्या उंचीवर पोहोचत आहेत, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. पंतप्रधानांनी जी 20 शिखर परिषदेच्या यशातील काशीचे योगदान अधोरेखित केले. ज्यांनी या शहराला भेट दिली त्यांनी काशीची सेवा, स्वाद, संस्कृती आणि संगीत आपल्यासोबत नेले आहे असे पंतप्रधान म्हणाले. जी 20 शिखर परिषदेचे यश हे भगवान महादेवाच्या आशीर्वादाचे ऋणी आहे.
महादेवाच्या आशीर्वादाने काशी विकासाचे अभूतपूर्व आयाम गाठत आहे. वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची केलेली पायाभरणी आणि 16 अटल निवासी शाळांचे लोकार्पण याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काशीचे, उत्तर प्रदेशमधील लोकांचे तसेच श्रमिकांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले.
2014 पासून या मतदारसंघाचा खासदार म्हणून काशीच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न अखेर प्रत्यक्षात साकार होत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी काशी सांस्कृतिक महोत्सवातील मोठ्या सहभागाची प्रशंसा केली तसेच या भागातील विविध प्रतिभावंतांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रथमच हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की सुमारे 40,000 कलाकारांनी यात भाग घेतला होता आणि लाखोंच्या संख्येने लोक महोत्सव पाहण्यासाठी जमले. लोकांच्या पाठिंब्याने काशी संसद सांस्कृतिक महोत्सव आगामी काळात स्वत:ची नवी ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काशी हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
काशी आणि संस्कृती ही एकाच उर्जेची दोन नावे असून काशीला भारताच्या सांस्कृतिक राजधानीचा मान आहे असे मोदी म्हणाले. शहराच्या कानाकोपऱ्यात संगीताचा प्रवाह स्वाभाविक आहे, कारण शेवटी हे नटराजाचे शहर आहे. महादेव हे सर्व कलांचे उगमस्थान असल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की या कला भारतमुनींसारख्या प्राचीन ऋषींनी विकसित केल्या आणि प्रचलित केल्या. स्थानिक सण आणि उत्सवांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की काशीतील प्रत्येक गोष्टीत संगीत आणि कला आहे.
पंतप्रधानांनी शहराची वैभवशाली शास्त्रीय संगीत संस्कृती आणि प्रादेशिक गीतांचा उल्लेख केला आणि हे शहर तबला, सनई, सतार, सारंगी आणि वीणा अशा वाद्यांचे एकत्रीकरण आहे असे नमूद केले. वाराणसीने ख्याल, ठुमरी, दादरा, चैती आणि कजरी या संगीत शैली शतकानुशतके जतन केल्या आहेत आणि गुरू-शिष्य परंपरा देखील जपली असून पिढ्यानपिढ्या भारताचा मधुर आत्मा जिवंत ठेवला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी तेलिया घराणा, पियारी घराणे आणि रामपुरा कबीरचौरा मुहल्लाच्या संगीतकारांचाही उल्लेख केला आणि सांगितले की वाराणसीने संगीत क्षेत्रात अनेक दिग्गज घडवले आहेत ज्यांनी जागतिक मंचावर आपला ठसा उमटवला आहे. वाराणसीतील अनेक दिग्गज संगीतकारांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आज प्रारंभ करण्यात आलेल्या काशी संसद क्रीडा स्पर्धा या पोर्टलचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की क्रीडा स्पर्धा असो किंवा काशी संसद सांस्कृतिक महोत्सव असो, ही काशीमधील नवीन परंपरांची केवळ सुरुवात आहे. आता काशी संसद ज्ञान स्पर्धा देखील आयोजित केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. " काशीची संस्कृती, खानपान आणि कला याबद्दल जागरूकता वाढवण्याचा हा प्रयत्न आहे", असे ते म्हणाले. "काशी संसद ज्ञान स्पर्धा काशीच्या ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळ्या स्तरावर आयोजित केली जाईल."
शहरातील लोक काशीचे सर्वोत्तम जाणकार आहेत आणि प्रत्येक रहिवासी काशीचा खरा ब्रँड ॲम्बेसेडर आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ज्ञानाचा योग्य प्रकारे प्रसार व्हावा या उद्देशाने या नागरिकांना सुसज्ज करुन शहराचे योग्य वर्णन करू शकतील अशा दर्जेदार पर्यटक मार्गदर्शकांची व्यवस्था भक्कम करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला. त्यासाठी काशी संसद पर्यटक मार्गदर्शक स्पर्धाही आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “मला हे करायचे आहे, कारण जगाने माझ्या काशीबद्दल जाणून घ्यावे असे मला वाटते. काशीच्या पर्यटक मार्गदर्शकांना जगातील सर्वात आदराचे स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे,” असेही ते म्हणाले.
जगभरातून अनेक विद्वान संस्कृत शिकण्यासाठी काशीला भेट देतात हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले की हा विश्वास लक्षात घेऊन आज 1100 कोटी रुपये खर्चाच्या अटल आवासीय विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. श्रमिकांसह समाजातील दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या शाळांचे उद्घाटन करण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “कोविड साथरोगाच्या काळात ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या मुलांना या शाळांमध्ये कोणतेही शुल्क न आकारता प्रवेश दिला जाईल”, असे पंतप्रधान म्हणाले. नेहमीच्या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त संगीत, कला, हस्तकला, तंत्रज्ञान आणि क्रीडा यासारख्या सुविधाही या विद्यालयात उपलब्ध करून दिल्या जातील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आदिवासी समाजासाठी 1 लाख एकलव्य निवासी शाळांच्या विकासाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. “नवीन शैक्षणिक धोरणामुळे सरकारने लोकांची विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे. शाळा आधुनिक होत आहेत आणि वर्ग स्मार्ट होत आहेत,” असे ते म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील हजारो शाळांचे आधुनिकीकरण करण्याच्या पंतप्रधान श्री मोहिमेवर त्यांनी प्रकाश टाकला.
काशी शहरासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये शहरातील लोकांचे पूर्ण सहकार्य असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
स्थलांतरित मजुरांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी सर्व राज्यांना उपलब्ध असलेल्या तरतुदीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की अनेक राज्यांनी हा निधी निवडणुकीच्या संधीसाधू उद्देशांसाठी वापरला आहे, मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींच्या नेतृत्वाखाली तो निधी समाजाच्या गरीब वर्गातील मुलांच्या भविष्यासाठी वापरला जातो आहे. निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. “माझे शब्द लिहून ठेवा, पुढील 10 वर्षात तुम्हाला या शाळांमधून काशीचे वैभव बाहेर पडताना दिसून येईल”, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री उपस्थित होते.
पार्श्वभूमी
काशीचे सांस्कृतिक चैतन्य बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून काशी संसद सांस्कृतिक महोत्सवाची संकल्पना तयार झाली आहे. महोत्सवात 17 शाखांमधील 37,000 हून अधिक व्यक्तींचा सहभाग होता, ज्यांनी गायन, वादन, पथनाट्य, नृत्य इत्यादीमध्ये आपले कौशल्य प्रदर्शित केले. गुणवंत सहभागींना रुद्राक्ष इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचे सांस्कृतिक कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने, केवळ कामगार, बांधकाम मजूर यांची मुले आणि कोविड-19 साथरोगामुळे प्रभावित झालेली अनाथ मुले यांच्यासाठी सुमारे 1115 कोटी रुपये खर्चून उत्तर प्रदेशात बांधलेली 16 अटल आवासीय विद्यालये सुरू करण्यात आली आहेत. या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासात मदत करणे हे या विद्यालयांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यालय 10 ते 15 एकर परिसरावर बांधण्यात आले असून यामध्ये वर्गखोल्या, क्रीडांगण, मनोरंजन क्षेत्र, एक छोटे सभागृह, वसतिगृह संकुल, भोजनालय आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी सदनिकांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रत्येक निवासी विद्यालयात 1,000 विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे.
बाबा की कृपा से काशी अब विकास के ऐसे आयाम गढ़ रही है, जो अभूतपूर्व हैं। pic.twitter.com/sVatuqxAWk
— PMO India (@PMOIndia) September 23, 2023
2014 में जब मैं यहाँ आया था, तो मैंने जिस काशी की कल्पना की थी, विकास और विरासत का वो सपना अब धीरे-धीरे साकार हो रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/WsaB5vZQGD
— PMO India (@PMOIndia) September 23, 2023
Varanasi has been a centre of learning for centuries. pic.twitter.com/Sona7VFkYq
— PMO India (@PMOIndia) September 23, 2023
नई राष्ट्रीय शिक्षा नीति के जरिए हमने शिक्षा व्यवस्था की पुरानी सोच को भी बदला है। pic.twitter.com/ThPr6hrdem
— PMO India (@PMOIndia) September 23, 2023