प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे केले उद्‌घाटन आणि पायाभरणी
"खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा चेन्नई या सुंदर शहरात होत आहेत ही खूप आनंदाची बाब आहे"
"खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा – 2024 वर्षाची उत्तम सुरुवात"
"तामिळनाडूच्या भूमीने अनेक विजेते घडवले "
"भारताला एक अव्वल क्रीडा राष्ट्र बनवण्यासाठी भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे"
"वीरा मंगई वेलू नाचियार या नारी शक्तीचे प्रतीक आहेत, आज सरकारच्या अनेक निर्णयांमधूनत्यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होते"
"गेल्या 10 वर्षात, भारतात सरकारने अनेक सुधारणा केल्या, खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आणि संपूर्ण क्रीडा व्यवस्थेचे स्वरूप पालटले. "
"आज आम्ही युवा खेळाडू खेळाकडे येण्याची वाट पाहत नाही, तर आम्हीच खेळ युवकांकडे घेऊन जात आहोत"
"आज आपल्या शाळा-महाविद्यालयांमधील ज्या युवकांना खेळाशी संबंधित क्षेत्रात आपले करिअर करायचे आहे, त्यांचे उज्वल भविष्य ही मोदींची हमी आहे"

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा  2023 सोहळ्याचे उद्घाटन केले. मोदी यांनी  प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणीही केली. यावेळी आयोजित  सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचे प्रतीक म्हणून  त्यांनी दोन खेळाडूंनी दिलेली स्पर्धेची  मशाल एका मोठ्या भांड्यात (cauldron) ठेवली.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी 13व्या खेलो इंडिया स्पर्धेत सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की 2024 ची सुरुवात करण्याचा हा एक उत्तम  मार्ग आहे. ते म्हणाले की याप्रसंगी जमलेले लोक युवा भारताचे प्रतिनिधित्व करतात, एक नवीन भारत ज्याची ऊर्जा देश क्रीडा जगतात नवीन उंचीवर घेऊन जात आहे. देशभरातून चेन्नईत दाखल झालेल्या सर्व खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. “एकत्रितपणे तुम्ही एक भारत श्रेष्ठ भारताची खरी भावना प्रदर्शित करत आहात ”असे ते महणाले. तामिळनाडूचे प्रेमळ  लोक, सुंदर तामिळ भाषा,इथली संस्कृती आणि खाद्यपदार्थ खेळाडूंना घरी असल्याची प्रचिती देतील. तमिळनाडूचे आदरातिथ्य सर्वांची मने जिंकेल आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा  कौशल्य दाखवण्याची संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "येथे केलेली नवीन मैत्री आयुष्यभर टिकेल", असे ते म्हणाले.

दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या ज्या  प्रकल्पांचे उद्घाटन  आणि पायाभरणी आज करण्यात आली त्या प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की 1975 मध्ये प्रसारण सुरू करणारे  चेन्नई केंद्र आज एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.  12 आकाशवाणी एफएम प्रकल्पांद्वारे 8 राज्यांमधील 1.5 कोटी लोकांपर्यंत  सेवा पोहचेल.

 

भारतातील क्रीडा क्षेत्रात तमिळनाडूच्या योगदानाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की ही चॅम्पियन घडवणारी भूमी आहे. टेनिस चॅम्पियन अमृतराज बंधू , ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा हॉकी कर्णधार भास्करन, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, प्रज्ञानंद  आणि पॅरालिम्पिक चॅम्पियन मरियप्पन यांचा उल्लेख करत  पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, सर्व खेळाडू तामिळनाडूच्या भूमीकडून  प्रेरणा घेतील.

पंतप्रधानांनी खेळाडूंसाठी संधीचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यासाठी देशात मोठ्या  क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या उपयुक्ततेवर भर दिला. ते पुढे म्हणाले की, खेलो इंडिया अभियान या भव्य स्पर्धेत सहभागी होणारे तळागाळातील प्रतिभावान खेळाडू  शोधण्याची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान  मोदीं यांनी  12 खेलो इंडिया क्रीडा स्पर्धाचा उल्लेख केला.  खेलो इंडिया युवा स्पर्धा , खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा , खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा  आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स या,  खेळण्यासाठी आणि प्रतिभावान खेळाडू  शोधण्यासाठी उत्तम संधी असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, आता तामिळनाडूची  चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोईमतूर  ही चार भव्य शहरे खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. “ सहभागी खेळाडू असोत  किंवा प्रेक्षक असो, चेन्नईचे मोहक  समुद्रकिनारे सर्वांना आकर्षित करतील”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी मदुराईची भव्य मंदिरे, त्रिचीची मंदिरे आणि तेथील कला आणि कारागिरी  आणि कोईमतूर  या औद्योगिक  शहराचाही उल्लेख केला आणि तमिळनाडूच्या प्रत्येक शहरातील अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत, भारतातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूंचा सहभाग पाहायला मिळेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. “खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेदरम्यान 5,000 हून अधिक खेळाडू असलेल्या  स्पर्धेचे वातावरण अविस्मरणीय अनुभव घेण्यासारखे असेल” असे पंतप्रधानांनी सांगितले.  तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन आणि स्क्वॅश तसेच तमिळनाडूमध्ये उगम पावलेली युद्ध कला सिलांबम या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांचा उल्लेख त्यांनी केला.

 

“खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्व क्रीडापटूंचा संकल्प, वचनबद्धता आणि विश्वास यांचा संगम पाहायला मिळेल  आणि देश त्यांच्या समर्पण, आत्मविश्वास, कधीही हार न मानण्याची  भावना आणि असाधारण कामगिरी करण्यासाठी असलेली  उत्कटता यांचा साक्षीदार असेल”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी संत तिरुवल्लुवर यांचे स्मरण केले आणि  संत तिरुवल्लुवर यांनी आपल्या लेखणीतून तरुणांना प्रेरणा दिली तसेच त्यांना दिशा दिली असे सांगितले. पंतप्रधानांनी या महान संताच्या वचनांना उद्धृत करत प्रतिकूल परिस्थितीत खंबीर राहण्याच्या त्यांच्या शिकवणीचा उल्लेख केला.खेलो इंडिया स्पर्धेच्या बोधचिन्हात संत तिरुवल्लूवर यांची प्रतिमा आहे.  क्रीडा स्पर्धेच्या या आवृत्तीची शुभंकर वीरा मंगाई वेलू नाचियार  असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “वास्तविक जीवनातील व्यक्तिमत्त्वाची शुभंकर म्हणून निवड होणे ही अभूतपूर्व गोष्ट आहे.वीरा मंगाई वेलू नाचियार हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज सरकारच्या अनेक निर्णयांमधून या राणीचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होते. तिच्यापासून प्रेरित होऊन सरकार क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी महिला खेळाडूंच्या क्रीडा पराक्रमाचे प्रदर्शन करण्याच्या संधी म्हणून ‘दस का दम’ सारख्या उपक्रमांची आणि 20 क्रीडा प्रकारांची यादी वाचली.

2014 नंतरच्या क्रीडा क्षेत्रातील भारताच्या अलीकडच्या काळातील यशांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमधील भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, आशियाई खेळ आणि पॅरा गेम्समधील ऐतिहासिक कामगिरी आणि विद्यापीठ क्रीडा स्पर्धामधील पदकांच्या नवीन विक्रमाचा उल्लेख केला.  हे एका रात्रीत मिळालेले यश नाही, भूतकाळातही खेळाडू उत्साही होते, याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत त्यांना सरकारकडून उत्साह आणि पाठिंबा मिळाला आहे.  “गेल्या 10 वर्षात, भारतात सरकारने सुधारणा केल्या, खेळाडूंनी कामगिरी केली आणि संपूर्ण क्रीडा व्यवस्थेचा कायापालट झाला”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.  देशातील हजारो खेळाडूंना 50,000 रुपये मासिक सहाय्य देणारी खेलो इंडिया मोहीम आणि 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना (TOPS) उपक्रमाचा त्यांनी उल्लेख केला.  टॉप्स योजनेने खेळाडूंचे प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि आघाडीच्या खेळाडूंसाठी मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग सुनिश्चित केला आहे.  "या वर्षी होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिक आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर नजर ठेवून TOPS उपक्रमांतर्गत भारतीय खेळाडूंना शक्य ती सर्व मदत केली जात आहे", असे त्यांनी सांगितले.

 

“आज आम्ही तरुणांनी खेळाकडे वळण्याची वाट पाहत नाही, तर आम्ही खेळांना तरुणांकडे घेऊन जात आहोत” असे पंतप्रधान म्हणाले. खेलो इंडिया सारख्या मोहिमांमुळे ग्रामीण, गरीब, आदिवासी आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांची स्वप्ने साकार होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  ‘व्होकल फॉर लोकल या मंत्राला अनुसरून स्थानिक प्रतिभेला संधी देण्यासह  स्थानिक प्रतिभेच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी केलेल्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.  गेल्या 10 वर्षांत भारतात अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दीव येथे नुकत्याच झालेल्या समुद्र किनारी क्रीडा स्पर्धांचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, या स्पर्धेत 8 पारंपारिक भारतीय खेळांमध्ये 1600 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमुळे किनारपट्टीवरील शहरांना खूप फायदा होईल कारण या खेळांमुळे समुद्रकिनारी खेळ आणि क्रीडा पर्यटनाचे नवीन युग सुरू झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी  देण्याचा सरकारचा संकल्प पंतप्रधानांनी अधोरेखित केला आणि भारत जागतिक क्रीडा परिसंस्थेचे एक महत्त्वाचे केंद्र होत  आहे असेही सांगितले. “म्हणूनच, आम्ही  2030  मध्ये युवा ऑलिम्पिक आणि 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी  परिश्रमपूर्वक काम करत आहोत.” असे पंतप्रधान म्हणाले. खेळ केवळ  क्रीडांगणपुरते मर्यादित नसून तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करणारी एक मोठी अर्थव्यवस्था आहे, यावर भर देत पंतप्रधानांनी भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याच्या आपल्या हमीचा पुनरुच्चार केला. सरकार गेल्या 10 वर्षांत क्रीडा अर्थव्यवस्थेतील वाटा वाढविण्यासाठी आणि क्रीडा संबंधित क्षेत्रांचा विकास करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. क्रीडा व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी सरकारने कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि देशात क्रीडा उपकरणांचे उत्पादन आणि सेवा परिसंस्थेची निर्मिती केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकार देशातील क्रीडा विज्ञान, नवोन्मेष, उत्पादन, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा मानसशास्त्र आणि खेळाडूंच्या सकस आहाराशी संबंधित व्यावसायिकांना मंच उपलब्ध करून देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत भारतातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत देशातील 300 हून अधिक प्रतिष्ठित अकादमींची निर्मिती, 1,000 खेलो इंडिया केंद्रे आणि 30 हून अधिक उत्कृष्टता केंद्रे यांचा उल्लेख त्यांनी केला. देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात क्रीडा प्रकारांना मुख्य अभ्यासक्रमाचा एक भाग बनवल्यामुळे बालपणातच खेळांना करिअर म्हणून निवडण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात मदत होत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

 

भारताच्या क्रीडा उद्योग उलाढालीत एक लाख कोटी रुपयांपर्यंतच्या अपेक्षित वाढीबद्दल बोलतांना, पंतप्रधान मोदी यांनी  क्रीडा क्षेत्राबाबतची नवीन जागरूकता आणि परिणामी प्रसारण, क्रीडा साहित्य, क्रीडा पर्यटन आणि खेळाडूंना लागणाऱ्या कपड्यांच्या व्यवसायात होणारी वाढ नमूद केली. देशाच्या विविध भागांमध्ये क्रीडा विषयक सामग्रीसाठी उत्पादन क्लस्टर तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी यांनी  सांगितले.

खेलो इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या क्रीडा पायाभूत सुविधा या रोजगाराचा एक उत्तम स्रोत बनत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. विविध क्रीडा लीग  देखील नवीन रोजगार निर्माण करत असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी  क्रीडा-संबंधित क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयातील युवांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याचीही हमी दिली.

नवीन भारताने जुने विक्रम मोडून नवीन प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे यावर भर देताना पंतप्रधान म्हणाले “भारत केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात लहरी निर्माण करत  आहे.” त्यांनी भारतातील तरुणांची क्षमता, त्यांचा विश्वास, दृढनिश्चय, मनोबल आणि जिंकण्याची जिद्द याबाबत खात्री व्यक्त केली. आजचा भारत मोठी उद्दिष्टे ठेवू शकतो आणि ती साध्य करू शकतो हे सांगत त्यांनी हे वर्ष देशासाठी आणि जगासाठी नवीन विक्रमांचे आणि नवीन कामगिरीचे साक्षीदार ठरेल असा विश्वास व्यक्त केला. “तुम्हाला प्रगती करायची आहे कारण भारत तुमच्यासोबत प्रगती करेल. एकत्र या, जिंका आणि देशाला विजयी करा. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चा प्रारंभ झाल्याचे घोषित करून पंतप्रधानांनी आपल्या  भाषणाचा समारोप केला.

 

तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, केंद्रीय माहिती आणि प्रसारण व  युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

तळागाळातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी आणि नवोदित क्रीडा प्रतिभेचे संवर्धन करण्याच्या पंतप्रधानांच्या अतूट वचनबद्धतेचे फलित म्हणजे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची सुरुवात होय. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान प्रमुख पाहुणे होते. दक्षिण भारतात प्रथमच खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. 19 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत चेन्नई, मदुराई, त्रिची आणि कोईम्बतूर या तमिळनाडूच्या चार शहरांमध्ये हे खेळ खेळले जातील.

 

खेळांचे शुभंकर म्हणजे वीरा मंगाई, राणी वेलू नाचियार, जिला प्रेमाने वीरा मंगाई संबोधले जाते ती एक भारतीय राणी होती तिने  ब्रिटीश वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा दिला. शुभंकर भारतीय महिलांच्या शौर्याचे आणि भावनांचे प्रतीक असून स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचे मूर्त रूप आहे. खेळांच्या बोधचिन्हात कवी तिरुवल्लुवर यांच्या चित्राचा समावेश आहे.

यावर्षीच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये 5600 हून अधिक खेळाडू सहभागी होत असून 15 ठिकाणी 13 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 26 क्रीडा प्रकार, 275 हून अधिक स्पर्धात्मक कार्यक्रम आणि 1 क्रीडा प्रात्यक्षिकाचा समावेश आहे. 26 क्रीडा प्रकारांमध्ये प्रचलित फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन इ. खेळांबरोबरच कलारीपायट्टू, गटका, थांग ता, कबड्डी आणि योगासन यांसारख्या पारंपरिक खेळांचे वैविध्यपूर्ण मिश्रण आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच तामिळनाडूचा पारंपरिक खेळ सिलांबम हा क्रीडा प्रात्यक्षिक म्हणून सादर केला जात आहे.

उद्घाटन कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणीही केली. यामध्ये डीडी तमिळ म्हणून नामकरण झालेल्या सुधारित डीडी पोधिगाई वाहिनीचा; 8 राज्यांमध्ये 12 आकाशवाणी एफएम प्रकल्प; आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये 4 दूरदर्शन प्रक्षेपकांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, पंतप्रधानांनी  12 राज्यांमध्ये 26 नवीन एफएम प्रक्षेपक प्रकल्पांची पायाभरणी केली.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi