“रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा आमचा मंत्र राहिला आहे”
“गेल्या दशकात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी नव-मध्यम वर्गाची निर्मिती केली आहे”
“भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे प्रत्येक भारतीयाची आकांक्षा आहे”
“पायाभूत सुविधा हे आपल्या नागरिकांचे जीवनमान सुकर आणि आरामदायी करण्याचे एक साधन आहे”
“21 व्या शतकाचे हे तिसरे दशक भारताला एका वेगळ्या उंचीवर नेणारे दशक आहे.
“आमची धोरणे आम्ही भूतकाळावर नव्हे तर भविष्यकाळावर नजर ठेवून तयार करत आहोत”
“आजचा भारत हा संधींची भूमी आहे. आजचा भारत संपत्ती निर्मात्यांचा बहुमान करत आहे”
“समृद्ध भारत जागतिक समृद्धीचा मार्ग प्रशस्त करेल”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले.

या मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय उत्तम चर्चा झाली असेल आणि या चर्चा अशा वेळी होत आहेत ज्यावेळी जगाचा भारतावर विश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

आज भारत एक नवीन यशोगाथा लिहित आहे आणि अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या माध्यमातून या  सुधारणांचा प्रभाव लक्षात येऊ शकतो, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. भारताने अनेक वेळा अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे, यावर त्यांनी भर दिला. गेल्या 10 वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ 90 टक्के झाली आहे, तर जागतिक अर्थव्यवस्था 35 टक्के वाढली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. दिलेल्या आश्वासनानुसार साधलेल्या शाश्वत विकासाला त्यांनी याचे श्रेय  दिले आणि भविष्यातही तो कायम राहील, अशी ग्वाही दिली.

 

गेल्या काही वर्षांत सरकारने लोकांच्या कल्याणासाठी केलेल्या सर्वांगीण बदलांना अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, या प्रयत्नांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनावर प्रभाव पडला आहे. "लोकांना सुशासन देण्याचा सरकारचा संकल्प आहे", पंतप्रधान मोदी म्हणाले, "रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा आमचा मंत्र आहे."

सरकारचा सेवाभाव आणि गेल्या 10 वर्षात देशाने केलेली कामगिरी भारतातील जनतेने पाहिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळेच भारतातील लोकांमध्ये नव विश्वास निर्माण झाला आहे असे त्यांनी सांगितले. हा विश्वास म्हणजे स्वत:वर विश्वास, देशाची प्रगती, धोरणे, निर्णय आणि सरकारचे हेतू यावरील विश्वास आहे असेही ते म्हणाले. जगाच्या विविध भागात होत असलेल्या निवडणुकांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, लोकांनी बहुतांश देशांमध्ये परिवर्तनासाठी मतदान केले आहे, तर अनेक देशांच्या सरकारांना अडचणींचा सामना करावा लागला. याउलट भारतीय मतदारांनी गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच एखाद्या  सरकारला हॅटट्रिक करण्याची संधी दिली आहे. भारतातील आकांक्षी युवा आणि महिलांनी सातत्य, राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकासाला आपले मत  दिले आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

 

"भारताची प्रगती जागतिक मथळ्यांचा भाग होत आहे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आकडेवारीचे स्वतःचे असे महत्त्व असले तरी, किती लोकांचे जीवन बदलले आहे हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. भारताच्या भवितव्याचे रहस्य उत्तरार्धात दडलेले आहे, असेही ते म्हणाले. "गेल्या दशकात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत आणि नव-मध्यमवर्ग निर्माण केला आहे", यावर मोदींनी भर दिला. ते पुढे म्हणाले की याचा वेग आणि प्रमाण ऐतिहासिक आहे आणि यापूर्वी जगातील कोणत्याही लोकशाही समाजात असे घडले नव्हते. गरीबांविषयी सरकारच्या दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे हा बदल शक्य झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आकांक्षा आणि संघर्ष करण्याची वृत्ती असूनही मूलभूत सुविधांच्या अभावी गरिबांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, असे ते म्हणाले. गरिबांच्या मार्गातील या अडचणी दूर करून त्यांना पाठबळ देऊन त्यांच्या  सक्षमीकरणाचा मार्ग सरकारने स्वीकारला, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या मार्गामुळे डिजिटल व्यवहार आणि तारणमुक्त कर्ज यांसारख्या फायद्यांच्या माध्यमातून परिवर्तन घडले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

दळणवळणीय सुविधा आणि जोडणी तसेच उपकरणांच्या उपयोगाने आज अनेक गरीब उद्योजक बनत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे सगळे जण आता अधिक सुजाण आणि माहिती संपन्न नागरिक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.  दारिद्र्याच्या स्थितीतून बाहेर पडत असलेल्या प्रत्येकात प्रगती साधण्याची तीव्र इच्छा आहे, त्यांची स्वप्ने आणि त्यांच्या आकांक्षांमुळे नवीन पायाभूत सुविधांचाही विकास झाला असल्याची बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठळकपणे अधोरेखित केली. एकीकडे अशा प्रत्येकामधली सर्जनशीलता नवोन्मेषाचे नव नवे मार्ग आखत आहे,  तर दुसरीकडे त्यांच्याकडचे कौशल्य उद्योगांच्या वाटचालीची दिशा ठरवत आहेत, त्यांच्या गरजा बाजारपेठांची दिशा ठरवू लागल्या आहेत, आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे बाजारपेठांमधली मागणीही वाढत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपल्या देशातील नव मध्यमवर्गाने स्वतःला देशाच्या प्रगतीमय वाटचालीतील सर्वात मोठी शक्ती सिद्ध केली असल्याचे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजघटकाची प्रशंसाही केली.

निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आपण आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगाने काम करण्याचे वचन दिले होते, याचे स्मरणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी करून दिले. आपण त्यावेळी दिलेल्या वचनामागचा आपला हेतू आज अधिकच दृढ झाला असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. देशातील नागरिकांप्रमाणेच आपल्या नेतृत्वातले सरकारही नव्या विश्वासाने आणि आशेने भारलेले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या नेतृत्वातील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला अद्याप 100 दिवस पूर्ण झालेले नाहीत, मात्र हे सरकार भौतिक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, सामाजिक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणांसह पुढची वाटचाल करण्यावर भर देत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. गेल्या केवळ 3 महिन्यांतच आपल्या नेतृत्वातील सरकारने गरीब, युवक, महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.  गरिबांसाठी तीन कोटी पक्की घरे, एकात्मिक निवृत्तीवेतन योजना, कृषी पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी एक लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद, शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रतीच्या बियाणांच्या वाणांच्या वाटपाला सुरुवात, देशभरातील चार कोटींपेक्षा जास्त तरुणांना थेट लाभ मिळवून देणारे दोन लाख कोटी रुपयांचे प्रधानमंत्री पॅकेज आणि ग्रामीण भागात राहात असलेल्या 11 लाख नव्या लखपती दीदी या सर्व कामांचा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केला. लखपती दीदी या उपक्रमाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावली असल्याचे ते या उपक्रमाबद्दल सांगताना म्हणाले.

 

नुकतीच 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रात पालघर जिल्ह्याला दिलेली भेट, आणि तिथे 75 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन केल्याच्या प्रसंगाबद्दलही  नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. तीनच दिवसांपूर्वी आपण 30 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या तरतुदीसह 12 नवीन औद्योगिक शहरांचा विकास, 50 हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीसह 9 उच्च गती कॉरिडॉरची बांधणी आणि 30 हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीसह पुणे, ठाणे आणि बेंगळुरू मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. लडाखमध्ये जगातील सर्वात उंच बोगद्याचे बांधकाम सुरू झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज आपण तीन नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला,  या गाड्यांची सुरुवात म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आपल्या नेतृत्वातील सरकारचा दृष्टिकोन परिवर्तनवादी आहे ही बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. आपल्या नेतृत्वातील सरकारसाठी पायाभूत सुविधा म्हणजे केवळ लांबी, रुंदी आणि उंची वाढवणे नाही तर, देशभरातील  नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याचे साधन आहे असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय रेल्वे सेवेत वेगाने होत असलेल्या बदलांबद्दलही उपस्थितांना सांगितले. या आधीपासूनच रेल्वेच्या डब्यांची बांधणी होत आली आहे, मात्र आता वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्या सुरू केल्या जात आहेत, या गाड्या प्रवाशांना वेग आणि आरामदायक प्रवास दोन्हींचा अनुभव देतात. आपला देश वेगाने आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करतो आहे,  या बदलांनुरुप निर्माण झालेल्या देशाच्या गरजांशी सुसंगत क्रांती आपल्या दळणवळणविषयक पायाभूत सुविधांमध्ये घडवून आणण्याचा सरकारचा व्यापक दृष्टीकोन आहे, त्याचाच एक भाग म्हणून या नवीन गाड्यांची सुरुवात केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

 

आपल्या नेतृत्वातले सरकार देशाची दळणवळणीय जोडणी अद्ययावत करण्याच्या स्वतःच्या वचनबद्धतेला विस्तारत आहे, या आधीही देशात रस्ते बांधले गेले आहेत, पण आपल्या नेतृत्वातले सरकार संपूर्ण देशभरात आधुनिक द्रुतगती मार्गांचे जाळे तयार करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दळणवळणीय जोडणीचा विस्तार करण्यासाठी, विशेषत: छोट्या शहरांच्या हवाई जोडणीचा विस्तार करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची  सविस्तर माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. याआधीही देशात विमानतळ अस्तित्वात होते, मात्र आपल्या नेतृत्वातील सरकार टियर -2 आणि टियर -3 स्तरातील शहरांना हवाई वाहतूक सुविधेने जोडत आहे, आणि वाहतुकीच्या आधुनिक सुविधांचा लाभ देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहे असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी पीएम गति शक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याचा देखील उल्लेख केला ज्याचा उद्देश सरकारी विभागांमधील विकेंद्रीकरण दूर करून पायाभूत सुविधांच्या विकासाप्रति  एकत्रित , समन्वित दृष्टीकोन निर्माण करणे हा आहे. "या प्रयत्नांमुळे रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण होत आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि उद्योगावर त्याचे खोल सकारात्मक परिणाम होत आहेत," असे सांगत सरकारच्या उपक्रमांचे व्यापक आर्थिक लाभ त्यांनी अधोरेखित केले.

21 व्या शतकातील तिसरे दशक हे भारतासाठी मोठी झेप घेण्याच्या  दशकासारखे आहे. विकासाचे लाभ देशभरातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतील याकडे लक्ष देऊन  या गतीला चालना देण्यासाठी सामूहिक जबाबदारीवर त्यांनी भर दिला. भारताची अर्थव्यवस्था आणि खाजगी क्षेत्रातील हितधारकांना संबोधित करताना, त्यांनी भारताच्या प्रगतीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने गती  देणाऱ्या स्तंभांवर भर दिला, "हे स्तंभ केवळ भारताच्या समृद्धीचे  आधारस्तंभ नाहीत तर जागतिक समृद्धीचे आधारस्तंभ देखील आहेत " असे ते म्हणाले.  भारतामध्ये विविध क्षेत्रांमधील संधींमध्ये वाढ होत असून देशाच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला हातभार लावणाऱ्या  सर्व उपक्रमांना सरकारचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.  उत्तुंग झेप  घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आणि यासाठी सरकार दीर्घकालीन दृष्टीकोनावर काम करत असल्याचे सांगितले.

"भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे ही प्रत्येक भारतीयाची आकांक्षा आहे", असे मोदींनी अधोरेखित केले. जगाचीही भारताकडून  हीच अपेक्षा आहे  आणि आज या दिशेने देशात क्रांती होत आहे, असे ते म्हणाले. आज एमएसएमईंना देशात अत्यंत आवश्यक असलेला  पाठिंबा मिळत आहे जो यापूर्वी कधी मिळाला नव्हता असे पंतप्रधानांनी नमूद  केले. विविध  उपक्रमांचा उल्लेख  करत मोदी म्हणाले की, शहरांमध्ये प्लग-अँड-प्ले औद्योगिक पार्क आणि आर्थिक कॉरिडॉर तयार केले जात आहेत तसेच महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे.   उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनांनी भारतात जे यश मिळवले आहे ते अभूतपूर्व आहे असे ते पुढे म्हणाले.

 

गुलामगिरीपूर्वीच्या कालखंडाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, आपली ज्ञान प्रणाली हा भारताच्या समृद्धीचा एक प्रमुख आधार होता , जो विकसित भारताचा देखील एक महत्त्वाचा स्तंभ आहे. भारताला कौशल्य, ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाचे  केंद्र बनवण्यासाठी सरकार उद्योग आणि शैक्षणिक समुदायाला भागीदार बनवत आहे यावर त्यांनी भर दिला.मोदी पुढे म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पात यावर खूप भर देण्यात आला आहे, जो 1 लाख कोटी रुपयांच्या संशोधन निधीतून दिसून येतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले परदेशात शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात याकडे लक्ष वेधत  मोदी म्हणाले की, अव्वल परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरु व्हावेत यासाठी सरकार अनेक  उपाययोजना करत आहे, जेणेकरून लोकांचा अतिरिक्त खर्च वाचण्यास मदत होईल. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 7 दशकात देशात एमबीबीएस-एमडीच्या  80 हजार जागा होत्या , त्या तुलनेत गेल्या दशकात सुमारे 1 लाख नवीन जागा वाढवण्यात आल्या आहेत यावर मोदींनी भर दिला. आगामी  5 वर्षात  वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करण्याबाबत  यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या घोषणेचीही त्यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले की, यामुळे नजीकच्या काळात  भारत आरोग्य आणि निरामयतेचे जगातील  एक महत्त्वाचे केंद्र बनेल.

‘ग्लोबल फूड बास्केट’ बनण्याची देशाची महत्वाकांक्षा त्यांनी अधोरेखित केली . जगातील प्रत्येक जेवणाच्या टेबलावर भारतात बनवलेला किमान एक खाद्यपदार्थ असावा  या सरकारच्या संकल्पावर त्यांनी भर दिला. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सरकार भारतातील दुग्ध उत्पादन आणि सागरी खाद्य  उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासोबतच सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देत आहे असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या वर्षभरातील भारताच्या कामगिरीबाबत बोलताना  मोदी यांनी भारताच्या पुढाकाराने जगभरात साजरे करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचा उल्लेख केला. "जगात भरड धान्याचा सर्वात मोठा उत्पादक देश कोण आहे? भारत आहे असे त्यांनी अभिमानाने नमूद केले. " निसर्ग आणि प्रगती या दोन्हीसाठी या सुपरफूडचे  दुहेरी फायदे आहेत यावर त्यांनी भर दिला. आघाडीच्या जागतिक खाद्यपदार्थांच्या ब्रँडमध्ये भारत आपले स्थान बनवत आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले जे खाद्यान्न  उद्योगातील देशाच्या वाढत्या प्रतिष्ठेचे  द्योतक आहे.

विकसित भारताच्या आणखी एका महत्त्वपूर्ण स्तंभावर लक्ष केंद्रीत करत, पंतप्रधानांनी हरित ऊर्जा क्षेत्राच्या महत्त्वावर भर  दिला. त्यांनी जी-20 मधील  भारताच्या यशाचा उल्लेख केला, ज्यात हरित  हायड्रोजन उपक्रमाला सर्व देशांचा पाठिंबा मिळाला आणि 2030 पर्यंत 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजन तयार करण्याची क्षमता विकसित करण्याचे भारताचे महत्वाकांक्षी लक्ष्य जाहीर केले, तसेच त्याच वर्षात 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य देखील जाहीर केले.

पंतप्रधान मोदींनी पर्यटन क्षेत्राची भूमिका तंत्रज्ञानासोबत भारताच्या वाढीचा एक मजबूत स्तंभ म्हणून अधोरेखित केली,  ज्याने देशाच्या प्रगतीला गती दिली आहे. “जगभरातील सर्व पर्यटकांसाठी भारत सर्वोच्च पसंतीचे स्थान बनण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे त्यांनी नमूद  केले आणि भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास आणि लहान समुद्रकिनारे विकसित करण्याचे प्रयत्न अधोरेखित केले. त्यांनी ‘देखो अपना देश, पीपल्स चॉइस’ या मोहिमेवरही प्रकाश टाकला, ज्यामध्ये  नागरिक भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांच्या निवडीसाठी मतदान करतात  आणि त्यानंतर  ती पर्यटन स्थळे विशेष मोहीम आखून विकसित केली जातील. “ही योजना महत्त्वपूर्ण रोजगाराच्या संधी निर्माण करेल,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

 

पंतप्रधानांनी समावेशक जागतिक विकासाचे, विशेषत: ग्लोबल साउथसाठीचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या जी-20 अध्यक्षतेवर बोलतांना त्यांनी सांगितले, “भारताने ग्लोबल साउथचा आवाज बुलंद केला आणि आपल्या आफ्रिकन मित्रांना सशक्त करण्यात मदत केली.” त्यांनी ग्लोबल साउथमध्ये सर्वात जास्त क्षमता असलेल्या भविष्याची कल्पना मांडली , ज्यात  भारत जागतिक बंधुत्वाच्या भावनेतून या देशांचा आवाज म्हणून कार्य करेल. “आम्हाला अशी  जागतिक व्यवस्था हवी आहे जी सर्वांसाठी, विशेषत: ग्लोबल साउथसाठी सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जगाची गतिशीलता लक्षात घेऊन  भारत सरकारची धोरणे आणि रणनिती  त्याला अनुकूल असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.  “आमचे लक्ष भविष्यावर आहे. उद्याची आव्हाने आणि संधींसाठी आम्ही आज देशाला तयार करत आहोत,” असे त्यांनी सांगितले, ग्रीन हायड्रोजन मिशन, क्वांटम मिशन, सेमीकंडक्टर मिशन, आणि डीप ओशन मिशन यांसारख्या उपक्रमांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.  सरकारने नुकतेच  अंतराळ तंत्रज्ञानासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद  केली  असल्याचे त्यांनी सांगितले, “आजचा भारत हा अनेक संधींची भूमी  आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भविष्यातील भारत आणखी उज्ज्वल असेल" असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आपल्या  भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या भारताच्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला. त्यांनी सर्व नागरिक आणि हितधारकांना या प्रवासात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आणि भारतातील अधिकाधिक कंपन्या जागतिक ब्रँड बनाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. “आम्हाला भारताने प्रत्येक क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडी घेतलेली  पाहायची आहे,” असे त्यांनी सांगितले. “आम्ही सुविधा, सुधारणा आणि स्थिर धोरणाची हमी देतो. तुम्ही नवोन्मेष , कामगिरी, सकारात्मक बदल आणि उच्च गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन द्या " असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  भारताच्या यशोगाथा  लिहिण्यासाठी मोठा  विचार करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करत, त्यांनी सांगितले की “आजचा भारत संपत्ती निर्माण करणार्‍यांचा आदर करतो. संपन्न भारतच जागतिक समृद्धीचा मार्ग सुकर  करू शकतो. त्यांनी नवोन्मेष , समावेशकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार हा मंत्र लक्षात ठेवायला सांगितले तसेच   देशात व परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला आवाहन केले की “या मार्गावर एकत्र चालू या, कारण भारताच्या समृद्धीतच जगाची समृद्धी आहे.”  त्यांनी या ध्येयाच्या प्राप्तीबाबत विश्वास व्यक्त करून आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India