फ्रान्सचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून 14 जुलै 2023 रोजी चॅम्प्स-एलिसीस येथे बॅस्टिल डे निमित्त आयोजित संचलनाला सन्माननीय अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले.
भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त, लष्करी बँडच्या नेतृत्वाखाली तिन्ही भारतीय सेनादलांचा समावेश असलेले 241 सदस्यीय पथक देखील या संचलनात सहभागी झाले होते. राजपुताना रायफल्स रेजिमेंटसह पंजाब रेजिमेंटने भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व केले.
हाशिमारा येथील 101 लढाऊ विमानांच्या तुकडी मधील भारतीय हवाई दलाच्या राफेल जेटने संचलनादरम्यान फ्लाय पास्ट केले.
फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान 14 जुलै, 1789 रोजी बॅस्टिल तुरुंगावर हल्ला झाल्याचा वर्धापन दिन दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा केला जातो आणि भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या राज्यघटनेची मध्यवर्ती संकल्पना असलेल्या 'स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता' या लोकशाही मूल्यांचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.