डेलावेर मध्ये विल्मिंग्टन येथे क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर बायडेन ज्युनियर यांनी आयोजित केलेल्या क्वाड कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.
गर्भाशयमुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणे, शोध लावणे आणि उपचार करणे या उद्देशाने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आखलेल्या या विचारशील उपक्रमाची पंतप्रधानांनी मनापासून प्रशंसा केली. हिंद-प्रशांत देशांतील लोकांना परवडणारी, उपलब्धतेस सुकर आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा दीर्घकालीन उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले. भारत देशातसुद्धा गर्भाशयमुख कर्करोग चाचणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या आरोग्य सुरक्षा प्रयत्नांबद्दल सांगताना त्यांनी नमूद केले की देशाने गर्भाशयमुख कर्करोगाची लस विकसित केली आहे आणि रोगासाठी कृत्रिम बुद्धिमतत्तेवर आधारित उपचार शिष्टाचार नियमावलीवर काम सुरु आहे.
कर्करोग मूनशॉट उपक्रमात भारताचे योगदान म्हणून पंतप्रधानांनी एक वसुंधरा, एक आरोग्य या भारताच्या संकल्पनेला अनुसरून, हिंद-प्रशांत क्षेत्रातील कर्करोग चाचणी, तपासणी आणि निदानासाठी 75 लाख अमेरिकी डॉलर्सचे अनुदान देण्याचे जाहीर केले. हिंद-प्रशांतमध्ये कर्करोग प्रतिबंधासाठी रेडिओथेरपी उपचार आणि क्षमता बांधणीसाठी भारत सहाय्य करेल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. GAVI आणि QUAD कार्यक्रमांतर्गत भारताकडून लसीच्या 4 कोटी मात्रांच्या पुरवठ्याचा हिंद-प्रशांत देशांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. जेव्हा क्वाड कार्य करते तेव्हा ते केवळ राष्ट्रांसाठी नसते, ते लोकांसाठी असते आणि हेच त्याच्या मानव-केंद्रित दृष्टिकोनाचे खरे सार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
भारत हिंद-प्रशांत प्रदेशातील स्वारस्य असलेल्या देशांना DPI अर्थात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा कर्करोग तपासणी, काळजी आणि सातत्य यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या डिजिटल आरोग्य -जागतिक उपक्रमाद्वारे 10 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या योगदानाच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्य देऊ करेल.
कर्करोग मूनशॉट उपक्रमाद्वारे, क्वाड नेत्यांनी हिंद-प्रशांत देशांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाची काळजी आणि उपचार परिसंस्थेतील तफावत दूर करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी वचनबद्धता प्रतीत केली. याप्रसंगी संयुक्त कर्करोग मूनशॉट वस्तुस्थिती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.