QuoteNewsX World माध्यम समुहाच्या वाहिनीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
Quoteजग 21व्या शतकातील भारतावर बारकाईने लक्ष ठेवून आहे: पंतप्रधान
Quoteआज जग भारताच्या आयोजन आणि नाविन्यपूर्ण कौशल्याचा साक्षीदार झाला आहे : पंतप्रधान
Quoteकाही वर्षांपूर्वी, आपण व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल या दृष्टिकोनाची कल्पना राष्ट्रासमोर मांडली होती; आणि आज आपण सगळेच ही कल्पना वास्तवात आल्याचे पाहत आहोत: पंतप्रधान
Quoteआज भारत जगाची नवीन फॅक्ट्री बनत आहे, आजचा भारत केवळ एक मनुष्यबळ असलेला देश नाही तर एक जागतिक शक्ती आहे आहे: पंतप्रधान
Quoteकिमान सरकार आणि कमाल सुशासन हाच कार्यक्षम आणि प्रभावी सुशासनाचा मंत्र: पंतप्रधान
Quoteभारत अमर्याद नवोन्मेषाची भूमी बनू लागली आहे: पंतप्रधान
Quoteभारताच्या युवा वर्ग आमच्या सर्वेोच्च प्राधान्यक्रमावर: पंतप्रधान
Quoteनव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून मुलांना पाठ्यपुस्तकांपलीकडे विचार करण्याची संधी दिली: पंतप्रधान

नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने  आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

आपण यापूर्वीही माध्यम जगताने आयोजित केलेल्या अशाच प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता, परंतु NewsX World ने आज एक नवी परंपराच आखून दिली असल्याची बाबही पंतप्रधानांनी नमूद केली. त्यांनी या यशासाठी NewsX Worldचे विशेष अभिनंदनही केले. आपल्या देशात अशा प्रकारच्या माध्यम कार्यक्रमांची एक परंपरा आहे, परंतु NewsX World ने त्याला एक नवा आयाम मिळवून दिला असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या समुहाने आयोजित केलेल्या ही शिखर परिषद धोरण-केंद्रित आहे, यात राजकारणाऐवजी धोरणांना केंद्रस्थानी ठेवले असले असल्याचे त्यांनी सांगितले. या शिखर परिषदेत विविध क्षेत्रातील अनेक तज्ञ मान्यवर व्यक्तीमत्वांसोबतच्या चर्चा आणि विचारमंथनाला खूप महत्त्व देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. या समुहाने या परिषदेला अभिनव स्वरुप मिळवून देण्यावर भर दिल्याची दखलही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून घेतली, आणि आता इतर माध्यम संस्थाही या नव्या परंपरेला आणि स्वरुपाला स्वतःच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांनी समृद्ध करतील अशी आशा व्यक्त केली.

 

|

आज जग 21व्या शतकातील भारतावर बारकाईने लक्ष ठेवून आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. आज जगभरातील लोक भारताला भेट देऊन हा देश समजून घेऊ इच्छित असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज भारत हा एक सकारात्मक घडामोडींचा, दररोज नवीन विक्रम नोंदवणारा आणि दररोज काहीतरी नवीन घडवणार देश बनला असल्याचे ते म्हणाले. अलिकडेच 26 फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे संपन्न झालेल्या महाकुंभाचा उल्लेखही त्यांनी केला. या महाकुंभात नदीकाठी वसवलेल्या तात्पुरत्या शहरात कोट्यावधी लोक स्नान करताना पाहून जग आश्चर्यचकित झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज जग भारताच्या आयोजन आणि नाविन्यपूर्ण कौशल्याचा साक्षीदार झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत सेमीकंडक्टर्सपासून ते विमानवाहू नौकांपर्यंत सर्व प्रकारची उत्पादने घेऊ लागला आहे आणि जग भारताच्या यशाचा तपशीलवार अभ्यास करू इच्छित आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. जगाची ही इच्छा म्हणजे ही NewsX World साठी एक महत्त्वाची संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी भारताने जगातील सर्वात मोठी निवडणूक आयोजित केली होते आणि 60 वर्षांत प्रथमच सलग तिसऱ्यांदा विद्यमान सरकार पुन्हा  सत्तेवर आल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. जनतेने दाखवलेला हा विश्वास गेल्या 11 वर्षांत भारताने मिळवलेल्या अनेक यशांवर आधाररेला असल्याचे त्यांनी सांगितले. आता या नव्याने सुरू होत असलेल्या माध्यम वाहिन्या भारताच्या वास्तविक कथा कोणत्याही पक्षपाताशिवाय जगापर्यंत पोहोचवतील आणि कोणत्याही पक्षपाताशिवाय देशाची खरे वास्तव जगासमोर मांडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही वर्षांपूर्वी, आपण व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल या दृष्टिकोनाची कल्पना राष्ट्रासमोर मांडली होती आणि आज आपण सगळेच ही कल्पना वास्तवात आल्याचे पाहत आहोत असे पंतप्रधानांनी सांगितले. भारताच्या आयुष उत्पादनांनी आणि योगाने स्थानिक पातळीवरून जागतिक पातळी गाठली आहे असे त्यांनी सांगितले. आज ‘श्री अन्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरडधान्यासह मखाना हे भारताचे सुपरफूड देखील जागतिक स्तरावर ओळख मिळवू लागले असल्याचे त्यांनी सांगितले. आपले मित्र असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबट यांनी दिल्ली हाट येथे भारतीय भरडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचा स्वतः आस्वाद घेतला आहे आणि त्या त्यांना प्रचंड आवडल्याही होत्या हा अनुभव देखील पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामायिक केला.

 

|

केवळ भरडधान्येच नाही तर भारताची हळद देखील स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. आज जगभरातील हळदीच्या पुरठ्यापैकी 60 टक्क्याहून अधिक हळदीचा पुरवठा भारत करतो ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. भारताच्या कॉफीने देखील जगभरात ओळख निर्माण केली आहे, आणि आता भारत जगातील सातव्या क्रमांकाचा कॉफी निर्यातदार बनला असल्याचे त्यांनी सांगितले. भारताचे मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि औषधे जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करू लागले असल्याचेही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. आज भारत अनेक जागतिक उपक्रमांचे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्समध्ये झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेत (AI Action Summit) सहभागी झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भारत या परिषदेचा  भारत सह आयोजक देश होता आणि आता भारत आयोजकाची जबाबदारी पार पाडणार असल्याची बाब त्यांनी नमूद केली. भारताच्या G-20 अध्यक्षपदाच्या काळात झालेल्या यशस्वी शिखर परिषदेचा उल्लेखही त्यांनी केला. त्यावेळी भारत-मध्यपूर्व-युरोप कॉरिडॉर हा एक नवीन आर्थिक मार्ग म्हणून सादर करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारत ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांचा मजबूत आवाज झाला आहे आणि भेट स्वरुपातील देशांच्या हितांना भारताने प्राधान्य दिले आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी, भारताने जगासमोर Mission LiFE हा अनोखा दृष्टी मांडला असेही पंतप्रधानांनी सांगितले. आज भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यायोग्य पायाभूत सुविधा विषयक संघटना यांसारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांचे नेतृत्व करत असल्याचै उल्लेखही पंतप्रधानांनी केला. जसजसे अनेक भारतीय ब्रँड्स जागतिक स्तरावर पोहोचत आहेत, तसतसे भारतातली माध्यमे देखील जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या संधी समजून घेत त्या स्वीकारत असल्याचे पाहून आपल्याला समाधान वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक दशकांपासून जग भारताला त्यांचे बॅक ऑफिस म्हणून संबोधत होते, परंतु आज भारत जगाची नवीन फॅक्ट्री बनत आहे असे ते म्हणाले. भारत केवळ एक मनुष्यबळ असलेला देश नाही तर एक जागतिक शक्ती आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले. जो देश एकेकाळी अनेक उत्पादनांची आयात करत होता, तो आज निर्यातीचे केंद्र म्हणून उदयाला येत आहेअसे ते म्हणाले. एकेकाळी शेतकरी फक्त स्थानिक बाजारांपुरते मर्यादित होते, मात्रा ते आता त्यांच्या उत्पादनांसह जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचू लागले आहेत ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. पुलवामातील स्नो पीज, महाराष्ट्रातील पुरंदरची अंजीरे आणि काश्मीरच्या क्रिकेट बॅट्सची जागतिक मागणी वाढू लागली असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या संरक्षण उत्पादनांतून जगाला भारतीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या शक्तीचे दर्शन घडू लागले असल्याचे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ऑटोमोबाईल क्षेत्रापर्यंत भारताची व्याप्ती आणि क्षमतेचे जग साक्षीदार होत आहे असे ते म्हणाले. भारत केवळ जगाला उत्पादने पुरवत नाही तर तो जागतिक पुरवठा साखळीतील एक विश्वासार्ह आणि विश्वासू भागीदार बनू लागला असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

 

|

आज भारत विविध क्षेत्रांचे करत असलेले नेतृत्व हे अनेक वर्षांच्या कष्ट आणि पद्धतशीर धोरणात्मक निर्णयांचे फलित आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षांत भारताने केलेल्या प्रगतीचाही उल्लेख केला. आता अर्धवट पूल आणि रखडलेल्या रस्त्यांच्या जागी आता चांगले रस्ते आणि उत्कृष्ट दृतगती मार्ग बांधले गेले आहेत, यामुळे नवीन गतीने पुढे जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे असे ते म्हणाले. प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी झाल्यामुळे उद्योगांचा मालवाहतुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात लागणारा वेळ कमी करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे वाहन उद्योग क्षेत्राला मोठा फायदा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. आता वाहनांची मागणी वाढली असून इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाला प्रोत्साहन मिळू लागले असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज भारत वाहनांचा एक प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून उदयाला येऊ लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

आज देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्येही असेच परिवर्तन दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत, 2.5 कोटी कुटुंबांपर्यंत पहिल्यांदाच वीजेची सुविधा पोहोचली, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मागणी आणि उत्पादन वाढले ही बाब त्यांनी अधोरेखित केली. देशात डेटा स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्यामुळे मोबाईल फोन्सची मागणी वाढली आहे आणि मोबाईल फोन्सवरील सेवांच्या उपलब्धतेमुळे डिजिटल उपकरणांचा वापरही वाढला आहे असे त्यांनी सांगितले. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनांसारख्या उपाययोजनांमुळे या मागणीला संधीमध्ये रूपांतरित केले आहे, यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि सेवांचा एक प्रमुख निर्यातदार देश बनला आहे असे ते म्हणाले. मोठी उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्याची भारताची  क्षमता किमान सरकार, अधिक सुशासन या मंत्रांवरच आधारलेली असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आज कोणत्याही सरकारी हस्तक्षेप किंवा दबावाशिवाय कार्यक्षम आणि प्रभावी शासनाची सुनिश्चित होऊ शकली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. गेल्या दहा वर्षांत सरकारने सुमारे 1,500 कालबाह्य कायदे रद्द केले आहेत, यांपैकी अनेक कायदे ब्रिटिश राजवटीत लागू करण्यात आले होते. नाट्यमय सादरीकरण विषयक कायदा हा त्यातलाच एक कायदाहोता, याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी नृत्य करणाऱ्या लोकांना अटक करता येत होती. हा कायदा स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपर्यंत अस्तित्वात होता आणि सध्याच्या सरकारने तो रद्द केला हे उदाहरणही त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. यावेळी पंतप्रधानांनी बांबूचे उदाहरण देखील दिले, बांबू हे आदिवासी भाग आणि ईशान्य भारताची जीवनरेखा आहे. पूर्वी, बांबू कापल्या तर अटक होऊ शकत होती, कारण त्याला झाड म्हणून वर्गीकृत केले होते. आता सरकारने हा दशकांपूर्वीचा कायदा बदलून बांबूला गवत म्हणून वर्गीकृत केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी या पूर्वीच्या नेत्यांची आणि लुटियन्स इथल्या अभिजन वर्गाची या कालबाह्य कायद्यांबद्दल मौनता बाळगण्याच्या वृत्तीचाही उल्लेख केला. यापुढेही आपले सरकार अश प्रकारचे कायदे रद्दबातल करण्याच्या प्रयत्न करत राहील असे त्यांनी सांगितले.

 

|

दहा वर्षांपूर्वी, एका सामान्य व्यक्तीसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणे हे एक कठीण काम होते, परंतु आज ते काही क्षणात पूर्ण केले जाऊ शकते आणि काहीच दिवसांमध्ये परतावा देखील खात्यात जमा होतो हे बाब त्यांनी अधोरेखित केली. प्राप्तिकर विषयक कायद्यांना सुलभीकरणाची प्रक्रिया सध्या संसदेत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने 12 लाख रुपयांपर्यंते उत्पन्न प्राप्तिकरातून मुक्त केले आहे, ज्यामुळे वेतनावर अवलंबून असलेल्या वर्गाला मोठा फायदा झाला आहे असे त्यांनी सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पातून युवा व्यावसायिकांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास आणि त्यांची बचत वाढवण्यास मदत केली असल्याचे ते म्हणाले. देशाच्या नागरिकांना आणि त्यांच्या आकांक्षांना पाठबळ देत त्यांना जगण्यातली सुलभता, व्यवसाय सुलभता आणि मोकळे आकाश उपलब्ध करून देणे हेच आपले ध्येय आहेअसे ते म्हणाले. अनेक स्टार्टअप्स जिओस्पेशियल डेटाचा लाभ घेत आहेत असे त्यांनी नमूद केले. यासाठी यापूर्वी नकाशे तयार करण्यासाठी सरकारी परवानगी आवश्यक होती. सरकारने ही परिस्थिती बदलून स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांना या डेटाचा उत्कृष्ट वापर करण्याची संधी दिली आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

ज्या भूमीने जगाला शून्याची देणगी दिली, ती आज अनंत नाविन्यपूर्ण कल्पनांची नवोन्मेषाची भूमी बनू लागली असल्याचे त्यांनी सांगितले. भारत केवळ नवोन्मेषच नाही तर इंडोव्हेटिंग करत आहे, म्हणजे भारतीय पद्धतीने नावोन्मेषाधारी कल्पनांना आकार देत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत स्वस्त, सुलभ आणि अनुकूलनीय अशा उपाययोजनांची  निर्मिती करू लागला आहे आणि या उपाययोजना जगाला स्वतःच्या अधिपत्याशिवाय देऊ करत आहे असे ते म्हणाले. जेव्हा जगाला एक सुरक्षित आणि किफायतशीर डिजिटल पेमेंट सिस्टमची आवश्यकता होती, तेव्हा भारताने UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) सिस्टम विकसित केली ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. प्राध्यापक कार्लोस मॉन्टेस UPI तंत्रज्ञानाच्या लोक-अनुकूल स्वरूपाने प्रभावित झाले होते आणि आज फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती तसेच सिंगापूरसारख्या देशांनी UPI ला त्यांच्या आर्थिक परिसंस्थेत अंतर्भूत केले आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक देश भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभू सुविधा तसेच इंडिया स्टॅकसोबत सव्तःला जोडून घेण्यासाठी करार करत आहेत हे ही त्यांनी नमूद केले. कोविड 19 महामारी दरम्यान, भारताच्या लसीने जगाला देशाच्या गुणवत्तापूर्ण आरोग्यविषयक सेवांच्या बाबतीतल्या उपाययोजनांचे दर्शन घडवले असे ते म्हणाले. आरोग्य सेतू अॅपचा जगालाही लाभ मिळावा यासाठी हे अॅप ओपन सोर्स केले गेले ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. आज भारत एक प्रमुख अंतराळ शक्ती आहे आणि इतर देशांना त्यांच्या अंतराळ आकांक्षा साध्य करण्यात मदत करत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारत सार्वजनिक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर काम करत आहे आणि त्याचा अनुभव आणि कौशल्य जगासोबत सामायिक करत आहे ही बाब त्यांनी नमूद केली.

 

|

यावेळी पंतप्रधानांनी ITV नेटवर्कने अनेक पाठ्यवृत्ती सुरू केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. भारताच्या युवा वर्गाला विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी आणि हितधारक म्हणून प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून मुलांना पाठ्यपुस्तकांपलीकडे विचार करण्याची संधी दिली आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यापासूनच मुलांना कोडिंग शिकवले जात आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच डेटा सायन्ससारख्या क्षेत्रांसाठी तयार केले जात आहे असे त्यांनी सांगितले. यावेई पंतप्रधानांनी अटल टिंकरिंग लॅब्सचाही उल्लेख केला. या प्रयोगशाळांमुळे मुलांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ लालला आहे असे त्यांनी सांगितले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 50,000 नवीन अटल टिंकरिंग लॅब्स तयार करण्याची घोषणा करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आज बातम्यांच्या जगात, विविध वृत्त संस्थांचे सदस्यत्व घेतल्यामुळे चांगल्या बातम्या देण्यात मदत होते असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माहितीचे शक्य तितके स्रोत सहजपणे उपलब्ध होण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केल. पूर्वी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संशोधन विषयक नियतकालिकांचे महागडी सदस्यता घ्यावे लागत होते, परंतु सरकारने वन नेशन, वन सब्सक्रिप्शन या उपक्रमाच्या माध्यमातून संशोधकांची ही समस्याच दूर केली आहे, यामुळे देशातील प्रत्येक संशोधकाला जगभरातील प्रतिष्ठित संशोधन विषयक नियतकालिके मोफत उपलब्ध होतात असे त्यांनी सांगितले. सरकार या उपक्रमासाठी 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करणार आहे, असे त्यांनी सांगितले. सरकार प्रत्येक विद्यार्थ्याला अवकाश संशोधन, जैव तंत्रज्ञान संशोधन किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामध्ये सर्वोत्तम संशोधन सुविधा उपलब्ध करून देत आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भारताची मुले भविष्यातील नेते म्हणून उदयाला येत आहेत. यावेळी पंतप्रधानांनी डॉ. ब्रायन ग्रीन यांच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबतच्या भेटीचा तसेच अंतराळवीर माईक मसिमिनो यांच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच्या भेटीच्या अनुभवांचा उल्लेखही केला. भविष्यातील महत्वाचे शोध हे भारतातील एका लहान शाळेतून आलेले असतील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

|

प्रत्येक जागतिक मंचावर भारताचा झेंडा फडकताना पाहणे हीच भारताची आकांक्षा आणि दिशा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आताचा काळ हा छोटे विचारांचा किंवा लहान पावले उचलण्याचा नाही याची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली. एक माध्यम समूह म्हणून NewsX World ने ही बाब समजून घेतली असल्याचे पाहून आपल्याला समाधान वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. दहा वर्षांपूर्वी, देशातील विविध राज्यांपर्यंत पोहोचण्यावर भर होता, परंतु आज या माध्यम समुहाने जागतिक स्तरावर पोहोचण्याचे धाडस केले आहे असे ते म्हणाले. ही प्रेरणा आणि संकल्पना प्रत्येक नागरिक आणि उद्योजकामध्ये असायला हवी असे आवाहनही त्यांनी केले. जगभरातील प्रत्येक बाजारात, प्रत्येक माझ घरात आणि जेवणाच्या टेबलवर एक भारतीय ब्रँड दिसावा हाच आपला दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. मेड इन इंडिया हा जगाचा मंत्र बनावा हा आपला मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या मनात आजारी पडल्यावर उपचारासाठी हील इन इंडिया आणि लग्नाचे नियोजन करताना वेड इन इंडिया असा विचार यायला हवा, आणि त्यांनी प्रवास, परिषदा, प्रदर्शने आणि संगीताच्या कार्यक्रमांसाठी भारताला प्राधान्य द्यायला हवे असा भारत घडवण्याचे आपले स्वप्न पंतप्रधानांनी उपस्थितीतांसोबत सामायिक केले. अश प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास बाळगण्याचे महत्त्वही त्यांनी उपस्थितांना सांगितले. या प्रयत्नात हे माध्यम समुह आणि त्यांच्या वाहिन्यांची भूमिका देखील महत्वाची असेल असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज आपल्यासमोर अमर्याद संधी उपलब्ध आहेत आणि आता धैर्य तसेच संकल्पाच्या आधारे त्यांना वास्तव स्वरूप मिळवून देणे आपल्यावर अवलंबून आहे याची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली.

आगामी 25 वर्षांत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या संकल्पासह आजचा भारत वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ITV समुहाने ही असाच संकल्प करून जागतिक मंचावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले, आणि यात ते यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला.

 

|

या कार्यक्रमाला ITV मीडिया नेटवर्कचे संस्थापक आणि राज्यसभेचे खासदार कार्तिकेय शर्मा, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबट, श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India emerges as a global mobile manufacturing powerhouse, says CDS study

Media Coverage

India emerges as a global mobile manufacturing powerhouse, says CDS study
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जुलै 2025
July 24, 2025

Global Pride- How PM Modi’s Leadership Unites India and the World