पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मानगढ धाम की गौरव गाथा’ या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात आदिवासी वीरांच्या बलिदानाला आणि हुतात्म्यांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी धुनी दर्शन घेतले आणि गोविंद गुरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आपल्या आदिवासी शूरवीरांच्या तपस्या, त्याग, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या मानगडच्या पवित्र भूमीत येणे नेहमीच प्रेरणादायी असते. “मानगढ हा राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील लोकांचा सामायिक वारसा आहे”, असे पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. गोविंद गुरु यांची 30 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी होती, त्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.
गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने, गुजरातचा भाग असलेल्या मानगड प्रदेशाची सेवा करण्याची संधी मिळाली होती असे पंतप्रधान म्हणाले. गोविंद गुरू आयुष्याच्या शेवटच्या काळात काही वर्षे येथे होते. त्यांची ऊर्जा आणि ज्ञान आजही या भूमीच्या मातीत जाणवते असे पंतप्रधान म्हणाले. इथला प्रदेश आधी ओसाड होता, मात्र वनमहोत्सवाच्या व्यासपीठावरून सर्वांना आवाहन केल्यावर हा संपूर्ण परिसर हिरवाईने पालटून गेल्याचं त्यांनी सांगितले. या मोहिमेसाठी निस्वार्थपणे काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी आदिवासी समुदायाचे आभार मानले.
विकासामुळे केवळ स्थानिक लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाली नाही तर गोविंद गुरूंच्या शिकवणीचा प्रसार देखील झाला असे पंतप्रधान म्हणाले. "गोविंद गुरूंसारखे महान स्वातंत्र्यसैनिक हे भारताच्या परंपरा आणि आदर्शांचे प्रतिनिधी होते", "गोविंद गुरूंनी त्यांचे कुटुंब गमावले, परंतु त्यांचे मन कधीही खचले नाही. प्रत्येक आदिवासी व्यक्तीला त्यांनी कुटुंबच मानले." गोविंद गुरू यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, त्याचवेळी एक समाजसुधारक, अध्यात्मिक नेते, संत आणि नेते असल्याने त्यांनी त्यांच्याच समाजातील कुप्रथांविरुद्धही मोहीम चालवली होती, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यांचे बौद्धिक आणि तात्विक पैलू त्यांच्या धैर्य आणि सामाजिक कार्याप्रमाणेच प्रभावी होते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी, मानगढ येथील 17 नोव्हेंबर 1913 च्या हत्याकांडाचे स्मरण करून हे भारतातील ब्रिटीश राजवटीच्या अत्यंत क्रूरतेचे उदाहरण असल्याचे सांगितले. “एकीकडे स्वातंत्र्य मागत असलेले निष्पाप आदिवासी होते, तर दुसरीकडे ब्रिटीश वसाहतवादी राज्यकर्त्यांनी मानगडच्या डोंगराला वेढा घातल्यानंतर, एक हजार पाचशेहून अधिक निष्पाप मुले, पुरुष, महिला, वृद्ध यांची दिवसाढवळ्या कत्तल केली." दुर्दैवी परिस्थितीमुळे स्वातंत्र्यलढ्याच्या अशा महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक घटनेला इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळू शकले नाही, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारत, ही पोकळी भरून काढत आहे आणि दशकांपूर्वी झालेल्या चुका सुधारत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
“भारताचा भूतकाळ, इतिहास, वर्तमान आणि भारताचे भविष्य आदिवासी समाजाशिवाय कधीही पूर्ण होणार नाही असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या गाथेचे प्रत्येक पान आदिवासींच्या शौर्याने भरलेले आहे. तिलका मांझी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या 1780 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील संथाल संग्राम या गौरवशाली संघर्षांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. त्यांनी 1830-32 चाही उल्लेख केला. त्यावेळी देशाने बुधू भगत यांच्या नेतृत्वाखाली लरका आंदोलन पाहिले. 1855 मध्ये सिद्धू-कान्हू क्रांतीने देशाला ऊर्जा दिली. भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या उर्जेने आणि देशभक्तीने सर्वांना प्रेरित केले. “शतकांपूर्वी गुलामगिरीच्या सुरुवातीपासून, ते 20 व्या शतकापर्यंत, आदिवासी समाजावे स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली नाही असा कोणताही काळ तुम्हाला सापडणार नाही,” असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू यांचा उल्लेख केला. त्याआधीही राजस्थानात आदिवासी समाज महाराणा प्रताप यांच्या पाठीशी उभा राहिला. “आम्ही आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या बलिदानाचे ऋणी आहोत. या समाजाने निसर्ग, पर्यावरण, संस्कृती आणि परंपरांमध्ये भारताचे चारित्र्य जपले आहे. त्यांची सेवा करून राष्ट्राने त्यांचे आभार मानण्याची आज वेळ आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी 15 नोव्हेंबर रोजी देश आदिवासी गौरव दिवस साजरा करणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. "आदिवासी गौरव दिवस म्हणजे भारतीय स्वतंत्रलढ्यात आदिवासी समुदायाने दिलेल्या योगदानाबद्दल जनतेला प्रबोधन करण्याचा एक प्रयत्न आहे" असे ते म्हणाले. आदिवासी समाजाचा इतिहास, समाजातील प्रत्येकाला ज्ञात व्हावा यादृष्टीने देशभरात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित अशी वस्तुसंग्रहालये उभारली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. हा अनमोल वारसा, तरुण पिढीच्या विचारधारेचा एक भाग बनून त्यांना सदैव प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशकार्यात आदिवासी समाजाची भूमिका विस्तारावी यादृष्टीने एका समर्पण भावनेने कार्य करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राजस्थानपासून ते गुजरातपर्यंत आणि ईशान्य भारतापासून ओरिसापर्यंत विखुरलेल्या वैविध्यपूर्ण आदिवासी समाजाच्या हितासाठी देश स्पष्ट धोरणांसह काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वसुधैव कुटुंबकम योजनेअंतर्गत देशातील आदिवासी समाजाला पाणी आणि वीज जोडणी , शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे ते म्हणाले. आज देशातील वनक्षेत्र वाढत असून साधनसंपत्तीचे देखील जतन होत आहे, त्याचवेळी आदिवासी बहुल भाग डिजिटल इंडियाशी जोडला जात आहे, असे ते म्हणाले. याशिवाय आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना पारंपरिक कौशल्यासोबतच आधुनिक शिक्षणाची संधी देणाऱ्या एकलव्य निवासी शाळांचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. गोविंद गुरु जींच्या नावे असलेल्या विद्यापीठाच्या भव्य प्रशासकीय परिसराचे उद्घाटन करण्यासाठी ते जांबुघोडा येथे जाणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.
पंतप्रधानांनी काल संध्याकाळीच अहमदाबाद-उदयपूर ब्रॉडगेज मार्गावरील ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्याची माहिती दिली. राजस्थानच्या जनतेसाठी या 300 किमी लांबीच्या मार्गाचे महत्त्व अधिक आहे कारण हा मार्ग गुजरातमधील अनेक आदिवासी भागांना राजस्थानच्या आदिवासी भागांशी जोडेल आणि या प्रदेशांमधील औद्योगिक विकास आणि रोजगाराला चालना देईल, असे पंतप्रधान म्हणाले.
मानगड धामच्या सर्वांगीण विकासाबाबत झालेल्या चर्चेविषयी पंतप्रधानांनी माहिती दिली आणि मानगड धामचा भव्य विस्तार व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांनी एकत्रितपणे विस्तृत चर्चा करून गोविंद गुरु जींच्या वारसा स्थळाच्या विस्तारासाठी दिशादर्शक आराखडा तयार करावा जेणेकरून हे स्थान जगाच्या नकाशावर विराजमान होईल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “ मानगड धामचा विकास झाल्यावर हा परिसर नवीन पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल अशी मला खात्री आहे”, असे सांगून पंतप्रधानांनी समारोप केला.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते, खासदार, आमदार आदी यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वंतंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजातील अनामवीरांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये १५ नोव्हेंबर (आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांची जयंती) हा दिवस आदिवासी गौरव दिवस', म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यायोगे आदिवासी बांधवांनी समाजासाठी दिलेले योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या बलिदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देशभरात आदिवासी संग्रहालये उभारणे इ. कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान, स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात आदिवासी वीर आणि शहीदांच्या बलिदानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजस्थानच्या बांसवाडा येथील मानगढ हिल येथे ‘मानगढ धाम की गौरव गाथा’ या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी भिल्ल स्वातंत्र्यसैनिक श्री गोविंद गुरु यांना आदरांजली वाहिली आणि भिल्ल आदिवासी आणि प्रदेशातील इतर आदिवासी लोकांच्या मेळाव्याला संबोधित केले.
राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश मधील आदिवासी समाज आणि भिल्ल समुदायाकरता मानगढ धाम ला विशेष महत्व आहे. स्वातंत्र्य संग्रामात जिथे भिल्ल आणि इतर जमाती इंग्रजांशी प्रदीर्घ संघर्षात गुंतल्या होत्या, त्यावेळी 17 नोव्हेंबर 1913 रोजी श्री गोविंद गुरूंच्या नेतृत्वाखाली 1.5 लाखाहून अधिक भिल्लांनी मानगड टेकडीवर मोर्चा काढला. ब्रिटीशांनी या मेळाव्यावर गोळीबार केला, ज्यामुळे मानगढ हत्याकांड घडले जिथे अंदाजे 1500 आदिवासी शहीद झाले.