पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज महाराष्ट्रात पुणे येथे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आरंभ टिळक स्मारक संस्थेने 1983 मध्ये केला. पंतप्रधानांनी पुरस्काराची रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला देणगी म्हणून दिली.
कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि हा दिवस त्यांच्यासाठी विशेष असल्याचे सांगितले. याप्रसंगी आपल्या भावनांना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले की, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. "लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे 'तिलक' आहेत" असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी समाजाच्या कल्याणासाठी अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या अद्वितीय आणि अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराज , चापेकर बंधू, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या भूमीला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
आज आपल्याला लोकमान्यांशी थेट संबंध असलेल्या शहरात आणि संस्थेने दिलेला सन्मान 'अविस्मरणीय' असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी काशी आणि पुणे यांच्यातील साम्य सांगताना ही दोन्ही बुद्धिमत्तेची केंद्र असल्याचे सांगितले. जेव्हा एखाद्याला पुरस्कार प्राप्त होतो, तेव्हा त्या व्यक्तीची जबाबदारी आणखी वाढते, विशेषतः जेव्हा तो पुरस्कार लोकमान्य टिळकांच्या नावे दिला जातो, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी हा पुरस्कार 140 कोटी देशवासियांना समर्पित केला. देशातील नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या पुरस्काराची रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दान करण्याच्या त्यांच्या निर्णयाची माहितीही पंतप्रधानांनी दिली.
लोकमान्य टिळकांचा प्रभाव त्यावेळच्या सर्व नेत्यांवर आणि स्वातंत्र्य लढ्यातील घटनांवर स्पष्टपणे दिसून येतो त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांची भूमिका, त्यांचे योगदान केवळ काही घटना आणि शब्दांमध्ये मांडता येणार नाही." एवढेच नव्हे तर ब्रिटिशांना देखील लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणावे लागले, असे पंतप्रधान म्हणाले. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे' या आपल्या ब्रीदवाक्याने लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्याची दिशा बदलून टाकली. भारताच्या परंपरा या मागासलेपणाचे प्रतिक आहेत, असा समज ब्रिटिशांनी तयार केला होता, तो देखील लोकमान्य टिळक यांनी चुकीचा असल्याचे सिद्ध करून दाखवले. खुद्द महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले होते, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली.
लोकमान्य टिळकांच्या संस्था उभारणीच्या अजोड क्षमतेला पंतप्रधानांनी अभिवादन केले. लाला लजपत राय आणि बिपिन चंद्र पाल यांच्यासोबत त्यांनी केलेले कार्य हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा सुवर्ण अध्याय आहे. टिळकांनी वृत्तपत्रे आणि पत्रकारितेचा केलेला वापरही पंतप्रधानांनी यावेळी विशद केला. केसरी वृत्तपत्र महाराष्ट्रात आजही प्रकाशित होते आणि वाचले जाते. “हे सर्व लोकमान्य टिळकांच्या मजबूत संस्था उभारणीची साक्ष देते”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
संस्था उभारणीसह टिळकांनी विविध परंपरांचे संवर्धन कशाप्रकारे केले हे सांगताना पंतप्रधानांनी लोकमान्य टिळक यांनी सुरु केलेल्या गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श समाजात रुजावेत याउद्देशाने सुरु केलेल्या शिव जयंती उत्सवाचे उदाहरण दिले. या दोन्ही गोष्टी म्हणजे भारताला एका सांस्कृतिक धाग्यात गुंफण्यासाठी सुरु केलेले अभियान होते तसेच ते संपूर्ण स्वराज्याची संकल्पना साकारणारे होते. हेच भारताचे वैशिष्ट्य आहे जिथे नेत्यांनी स्वातंत्र्यासारख्या मोठ्या उद्दिष्टांसाठी लढा दिला आणि त्याचवेळी सामाजिक सुधारणांची मोहीमही चालवली,” असे पंतप्रधान म्हणाले.
देशातील तरुणाईवर लोकमान्य टिळकांच्या असलेल्या विश्वासाचा उल्लेख करून, त्यांनी वीर सावरकरांना केलेले मार्गदर्शन आणि लंडनमध्ये छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती आणि महाराणा प्रताप शिष्यवृत्ती या दोन शिष्यवृत्ती चालवणाऱ्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे केलेल्या सावरकरांच्या शिफारशीचे पंतप्रधानांनी यावेळी स्मरण करून दिले. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना हा या दूरदृष्टीचा एक भाग आहे. “व्यवस्थाप्रणाली तयार करण्यापासून ते संस्था उभारणी करेपर्यंत, संस्था उभारणीपासून ते वैयक्तिक कार्यकर्तृत्व सिध्द करणे, आणि वैयक्तिक सिध्दतेपासून ते राष्ट्र निर्माण करायची दृष्टी तयार करणे हा राष्ट्राच्या भवितव्यासाठी त्यांनी आखलेला एक आराखडा आहे आणि देश या आराखड्याचे प्रभावीपणे पालन करत आहे”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
महाराष्ट्रातील लोकांच्या लोकमान्य टिळकांशी असलेल्या विशेष नात्याचा विशेष उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, की गुजरातमधील लोकांच्या मनातही असेच नाते त्यांच्याशी जोडले गेलेले आहे.लोकमान्य टिळकांनी अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात सुमारे दीड महिन्याचा कालावधी व्यतीत केला याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की,त्याकाळी म्हणजे 1916 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह 40,000 हून अधिक लोक टिळकांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आले होते. या भाषणाच्या प्रभाव इतका होता की पुढे अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना सरदार पटेल यांनी अहमदाबादमध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारला. “ लोकमान्य टिळकांच्या वज्रमुठीची चिन्हे सरदार पटेलांमध्ये दिसून येतात”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. व्हिक्टोरिया गार्डनमधील या पुतळ्याच्या स्थानाविषयी सांगताना पंतप्रधानांनी माहिती दिली, की 1897 मध्ये राणी व्हिक्टोरिया यांच्या राज्याभिषेकाच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या स्मरणार्थ हे मैदान ब्रिटिशांनी विकसित केले होते आणि तिथेच लोकमान्य टिळकांचा पुतळा बसविण्यात यावा, या सरदार पटेलांच्या क्रांतिकारक कृतीवर पंतप्रधानांनी भर दिला. ब्रिटीशांचा विरोध असतानाही 1929 मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते,अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हा एक असा भव्य पुतळा आहे ज्यात टिळकजी स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करत विश्राम घेत पहुडलेले दृष्टीस येतात, असे या पुतळ्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले.
"गुलामगिरीच्या काळातही सरदार साहेबांनी संपूर्ण ब्रिटिश राजवटीला भारताच्या या सुपुत्राचा सन्मान करण्याचे आव्हान दिले होते. मात्र आज परदेशी आक्रमणकर्त्याऐवजी भारतीय व्यक्तीचे नाव देऊन केवळ एखाद्या रस्त्याचे नाव बदलण्याचा सरकार प्रयत्न करते, तेव्हा काही लोक त्याबद्दल आरडाओरड करतात, असा शेरा देत पंतप्रधानांनी आजच्या परिस्थितीबाबत हळहळ व्यक्त केली.
लोकमान्यांच्या गीतेवरील श्रध्देला देखील पंतप्रधानांनी स्पर्श केला. दूरवरच्या मंडालेत तुरुंगवास भोगत असतानाही लोकमान्यांनी गीतेचा अभ्यास सुरू ठेवला आणि ‘गीतारहस्य’ या ग्रंथरूपाने एक अनमोल देणगी भारतीयांना दिली.
प्रत्येकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या लोकमान्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल पंतप्रधानांनी सांगितले. स्वातंत्र्य, इतिहास आणि संस्कृतीसाठी दिलेल्या लढ्यासाठी टिळकांनी लोकांच्यात आत्मविश्वास जागृत केला. लोकांवर, कामगारांवर आणि उद्योजकांवर त्यांचा विश्वास होता. "टिळकांनी भारतीयांमधील न्यूनगंडाची मिथके मोडून काढली आणि आपली क्षमता दाखवून देणयाची संधी दिली", असे पंतप्रधान म्हणाले.
अविश्वासाच्या वातावरणात देशाचा विकास होणे शक्य नाही या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. पुणे येथील मनोज पोचट नामक सद्गृहस्थांनी केलेले ट्विट वाचल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. या ट्विटमध्ये सदर गृहस्थांनी पंतप्रधानांचा निर्देश करून त्यांना 10 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या पुणे भेटीची आठवण करून दिली होती. टिळकांनी स्थापन केलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान, आपण तेव्हा भारतातील विश्वासाच्या अभावाबाबत बोललो होतो अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. त्या वेळी विश्वासाच्या अभावाचा मुद्दा मांडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले की आता आपला देश विश्वासाच्या अभावाकडून भरभरुन विश्वास असणाऱ्या स्थितीत पोहोचला आहे.
या अतीव विश्वासामुळे गेल्या 9 वर्षांत देशात घडून आलेल्या प्रमुख बदलांची उदाहरणे पंतप्रधानांनी दिली. भारत या विश्वासाच्या बळावर जगातील 5 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे याकडे त्यांनी निर्देश केला. कोणत्याही देशाला स्वतःविषयी वाटणाऱ्या विश्वासाबद्दल देखील त्यांनी चर्चा केली आणि भारतात तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या सफलतेचा उल्लेख केला. ही मोठी झेप घेण्यात पुण्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. भारतीयांची मेहनत आणि सचोटी यांच्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक म्हणून मुद्रा योजने अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या तारण विरहीत कर्जांबद्दल देखील त्यांनी भाष्य केले. त्याच प्रकारे, देशातील बहुतेक सेवा आता मोबाईल फोनच्या माध्यमातून उपलब्ध होऊ लागल्या असून नागरिकांना आता स्वतःची कागदपत्रे स्वतःच साक्षांकित करण्याची मुभा देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. या अतूट विश्वासाच्या बळावरच देशात स्वच्छता अभियान तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान यांनी लोकचळवळीचे स्वरूप घेतले यावर देखील मोदी यांनी भर दिला. या सगळ्यामुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागले आहे असे ते पुढे म्हणाले.
लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान सोडून द्यावे असे आवाहन केले होते, त्यानुसार लाखो लोकांनी ही सुविधा घेतली नाही, याची आठवण काढून ते म्हणाले की अनेक देशांविषयी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की भारतातील जनतेला त्यांच्या सरकारबद्दल सर्वात जास्त विश्वास आहे.हा वाढता सार्वजनिक विश्वास भारतातील लोकांच्या प्रगतीचे माध्यम होत आहे यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी देश अमृत काळाकडे कर्तव्य काळ म्हणून पाहत असून प्रत्येक भारतीय आपापल्या स्तरावरून देशाची स्वप्ने आणि निश्चय लक्षात घेऊन त्यानुसार काम करत आहे ही बाब भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की, आपण आज करत असलेले प्रयत्न संपूर्ण मानवतेसाठी खात्रीलायक झाले आहेत आणि याच कारणामुळे आज संपूर्ण जग देखील भविष्यात भारतासोबत काम करण्याचे स्वप्न बघत आहे. लोकमान्य टिळक यांचे विचार आणि आशीर्वाद यांच्या सामर्थ्याने भारताचे नागरिक सशक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न नक्कीच साकार करतील असे ते म्हणाले. सामान्य जनतेला लोकमान्य टिळकांच्या विचारांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे कार्य हिंद स्वराज्य सभा यापुढेही सुरु ठेवेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संसद सदस्य शरदचंद्र पवार, टिळक स्मारक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष डॉ.दीपक टिळक, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.रोहित टिळक तसेच टिळक स्मारक विश्वस्त संस्थेचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
लोकमान्य टिळक यांच्या महान विचारांचा वारसा जपण्याच्या उद्देशाने टिळक स्मारक मंदिर समितीने वर्ष 1983 पासून या पुरस्कारांची सुरुवात केली. देशाची प्रगती आणि विकास यासाठी कार्य करणाऱ्या तसेच त्यासाठी उल्लेखनीय आणि विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे दरवर्षी 1 ऑगस्टला या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पुरस्काराचे 41 वे मानकरी ठरले आहेत. याआधी डॉ. शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई. श्रीधरन इत्यादी दिग्गज व्यक्तींचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
आज हम सबके आदर्श और भारत के गौरव बाल गंगाधर तिलक जी की पुण्यतिथि है।
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
साथ ही, आज अण्णाभाऊ साठे की जन्मजयंती भी है: PM @narendramodi pic.twitter.com/FChs84O2h1
In Pune, PM @narendramodi remembers the greats. pic.twitter.com/uGBhUvWzf5
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
मैं लोकमान्य तिलक नेशनल अवार्ड को 140 करोड़ देशवासियों को समर्पित करता हूँ: PM @narendramodi pic.twitter.com/TxsntxtX2i
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
मैंने पुरस्कार राशि नमामि गंगे परियोजना के लिए दान देने का निर्णय लिया है: PM @narendramodi pic.twitter.com/1acxxfway3
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
भारत की आज़ादी में लोकमान्य तिलक की भूमिका को, उनके योगदान को कुछ घटनाओं और शब्दों में नहीं समेटा जा सकता है: PM @narendramodi pic.twitter.com/rFkfP1XOH4
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
अंग्रेजों ने धारणा बनाई थी कि भारत की आस्था, संस्कृति, मान्यताएं, ये सब पिछड़ेपन का प्रतीक हैं।
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
लेकिन तिलक जी ने इसे भी गलत साबित किया: PM @narendramodi pic.twitter.com/ybdwBoeY9L
लोकमान्य तिलक ने टीम स्पिरिट के, सहभाग और सहयोग के अनुकरणीय उदाहरण भी पेश किए। pic.twitter.com/lUZGmbiK5b
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
तिलक जी ने आज़ादी की आवाज़ को बुलंद करने के लिए पत्रकारिता और अखबार की अहमियत को भी समझा। pic.twitter.com/lS9Btzauj0
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
लोकमान्य तिलक ने परम्पराओं को भी पोषित किया था। pic.twitter.com/gkb8q8ynt8
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
लोकमान्य तिलक इस बात को भी जानते थे कि आज़ादी का आंदोलन हो या राष्ट्र निर्माण का मिशन, भविष्य की ज़िम्मेदारी हमेशा युवाओं के कंधों पर होती है: PM @narendramodi pic.twitter.com/O48snUAacB
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
व्यवस्था निर्माण से संस्था निर्माण,
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
संस्था निर्माण से व्यक्ति निर्माण,
और व्यक्ति निर्माण से राष्ट्र निर्माण। pic.twitter.com/eYshkS0svy
तिलक जी ने सरदार साहब के मन में एक अलग ही छाप छोड़ी। pic.twitter.com/MvUukvnyTH
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023