लोकसभेच्या अध्यक्षपदी श्री ओम बिर्ला यांची सदनाने निवड केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.
ओम बिर्ला, सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी बिर्ला यांना सदनातर्फे शुभेच्छा दिल्या. अमृत काळामध्ये बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होत असल्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. बिर्ला यांचा मागील पाच वर्षांचा अनुभव आणि सदस्यांचा त्यांच्यासोबतचा कामकाजाचा अनुभव यामुळे या महत्त्वपूर्ण काळात ते सदनाला चांगले मार्गदर्शन करू शकतील. अध्यक्षांचे विनम्र आणि संयत व्यक्तिमत्त्व तसेच त्यांचे स्मितहास्य त्यांना सदनाचे कामकाज चालवण्यात सहाय्यभूत ठरत असल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
पुनर्निर्वाचित अध्यक्ष यशस्वीपणे काम करत राहतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर सलग लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड होणारे बलराम जाखड, हे पहिले अध्यक्ष ठरले होते. त्यानंतर आज ओम बिर्ला, 17 व्या लोकसभेच्या यशस्वी कार्यकाळानंतर पुन्हा 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत आहेत. पंतप्रधानांनी त्यानंतर मधल्या सुमारे 20 वर्षांच्या कालखंडाचा कल विशद केला. या काळात जे अध्यक्ष म्हणून निवडून आले त्यांच्यापैकी कोणी एक तर पुन्हा निवडणूक लढवली नाही किंवा ते जिंकू तरी शकले नाही. पण लोकसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून येऊन ओम बिर्ला यांनी इतिहास रचला असल्याचे ते म्हणाले.
संसद सदस्य म्हणून अध्यक्षांच्या कामकाजाच्या पद्धतीचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ओम बिर्ला यांनी त्यांच्या मतदारसंघात राबवलेल्या 'निरोगी माता आणि निरोगी मूल' या यशस्वी अभियानाविषयी पंतप्रधानांनी सांगितले. कोटा या आपल्या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांंची प्रशंसा पंतप्रधानांनी केली. मतदारसंघात खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दलही बिर्ला यांचे कौतुक त्यांनी केले.
गेल्या लोकसभेत बिर्ला यांनी केलेल्या नेतृत्वाची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. तो काळ आपल्या संसदीय इतिहासातील सुवर्णकाळ असल्याचे ते म्हणाले. 17 व्या लोकसभेत घेतलेल्या परिवर्तनकारी निर्णयांची आठवण करून पंतप्रधानांनी अध्यक्षांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. नारी शक्ती वंदन अधिनियम, जम्मू काश्मीर पुनर्गठन, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक, ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण विधेयक, प्रत्यक्ष कर- विवाद से विश्वास विधेयक, हे सर्व ऐतिहासिक कायदे ओम बिर्ला यांच्या अध्यक्ष कारकिर्दीत संमत झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
लोकशाहीच्या दीर्घ प्रवासात असे अनेक थांबे आहेत; जे नवनवीन विक्रम रचण्याची संधी देतात, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.भारताला आधुनिक राष्ट्र बनवण्याच्या दिशेने 17 व्या लोकसभेत केलेल्या कार्याचे कौतुक करत भारतातील लोक 17व्या लोकसभेला तिच्या कामगिरीबद्दल भविष्यातही आदर राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नवीन संसद भवन माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली अमृत कालावधीचा मार्ग प्रशस्त करेल, असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. श्री मोदींनी विद्यमान अध्यक्षांच्या कालावधीअंतर्गत झालेल्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उदघाटनाचे स्मरण केले आणि लोकशाही पद्धतींचा पाया मजबूत करण्यासाठी उचललेल्या पावलांची प्रशंसा केली. कागदविरहीत कामकाज आणि सभागृहातील चर्चेला चालना देण्यासाठी अध्यक्षांनी सुरू केलेल्या पद्धतशीर ब्रीफिंग प्रक्रियेसाठी देखील त्यांचे अभिनंदन केले.
G-20 राष्ट्रांमधील विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या P-20 या परिषदेसाठी केलेल्या परीश्रमांसाठी पंतप्रधानांनी अध्यक्षांची प्रशंसा केली, ज्यामध्ये विक्रमी संख्येने देश उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले की, संसद भवन केवळ भिंती नसून ते 140 कोटी नागरिकांच्या आकांक्षेचे केंद्र आहे. सभागृहाचे कामकाज, आचार आणि जबाबदारी आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत करतात यावर त्यांनी भर दिला. 17 व्या लोकसभेच्या कामकाजाचा वेग विक्रमी 97 टक्के राहिल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. कोविड महामारीच्या काळात सभागृहातील सदस्यांसाठी सभापतींनी वैयक्तिक स्पर्श आणि संसर्गाविरोधी घेतलेली काळजी यांचाही श्री मोदींनी उल्लेख केला.त्यावेळी कामकाज 170 टक्क्यांवर पोहोचले होते आणि महामारीमुळे सभागृहाचे कामकाज ठप्प होऊ न दिल्याबद्दल त्यांनी श्री बिर्ला यांचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदींनी सभागृहाचे पावित्र्य राखण्यासाठी सभापतींनी दाखवलेल्या संतुलनाचे कौतुक केले. ज्यामध्ये अनेक कठोर निर्णय घेणे देखील समाविष्ट होते.परंपरा जपत सभागृहाची मूल्ये जपण्याचे कार्य केल्याबद्दल अध्यक्षांविषयी आपली कृतज्ञता प्रकट केली.
18वी लोकसभा जनतेची सेवा करून आणि त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करून यशस्वी होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी श्री ओम बिर्ला यांच्यावर सोपवलेल्या निर्णायक जबाबदारीसाठी आणि देशाला यशाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी त्यांना अनेकानेक शुभेच्छा दिल्या.