पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील काशी येथे आयोजित गंगा पुष्करालु उत्सवामध्ये व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन केले. गंगा पुष्करालु उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि प्रत्येकाचे मनःपूर्वक स्वागत केले. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जण त्यांचे स्वतःचे अतिथी आहेत आणि भारतीय संस्कृतीमध्ये अतिथींना देवाप्रमाणे मानले जाते, असे त्यांनी सांगितले. “मी या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसलो तरीही मनाने मी तुमच्यासोबतच आहेl”, पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी काशी-तेलगु समिती आणि खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांचे अभिनंदन केले. काशीच्या घाटांवर आयोजित केलेला गंगा-पुष्करालु उत्सव जणू काही गंगा आणि गोदावरीचा संगमच आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की भारताच्या प्राचीन सभ्यता, संस्कृती आणि परंपरांच्या संगमाचा हा उत्सव आहे. यावेळी त्यांनी काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी आयोजित झालेल्या काशी-तामिळ संगममची आठवण करून दिली आणि काही दिवसांपूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगमममध्ये सहभाग घेतला होता त्याचा देखील उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्याचा अमृतकाळ म्हणजे भारताच्या विविधता आणि संस्कृती यांचा संगम असल्याचे सांगितले होते.
“विविधतांच्या या संगमातून राष्ट्रवादाचे अमृत बाहेर पडत आहे जे भविष्यात भारतासाठी संपूर्ण ऊर्जा सुनिश्चित करेल”, पंतप्रधान म्हणाले.
काशी पिढ्यानपिढ्या या सर्वांचे स्वागत करत आहे आणि हे नाते या शहराइतकेच प्राचीन आहे, असे पंतप्रधानांनी काशी आणि तेथील रहिवाशांच्या तेलुगुशी असलेल्या खोल संबंधांवर प्रकाश टाकत सांगितले. तेलुगू पार्श्वभूमी असलेल्या काशीतील लोकांची श्रद्धा काशीइतकीच पवित्र आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. काशीला जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लोकांची संख्या लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले. “तेलुगू भाषिक राज्यांनी काशीला अनेक महान संत, अनेक आचार्य आणि ऋषी दिले आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. काशीचे लोक आणि यात्रेकरू जेव्हा बाबा विश्वनाथांच्या दर्शनाला जातात तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तैलंग स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी ते त्यांच्या आश्रमालाही भेट देतात. पंतप्रधानांनी तैलंग स्वामींचा उल्लेख केला ज्यांचा जन्म विजयनगरममध्ये झाला होता परंतु स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना काशीचे जिवंत शिव म्हटले होते. ज्यांचे आजही काशीमध्ये स्मरण केले जाते अशा जिद्दू कृष्णमूर्ती आणि त्यांच्यासारख्या इतर महान आत्म्यांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.
ज्याप्रमाणे तेलुगू लोकांनी काशीला आपल्या आत्म्याशी जोडून ठेवले आहे त्याचप्रमाणे काशीने त्यांना समजून घेत आपलेसे केले यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्याला दक्षिण काशी असे संबोधले जाते त्या वेमुलवाडा या पवित्र मंदिराचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. आंध्र आणि तेलंगणातील मंदिरांमध्ये हातावर बांधलेल्या काळ्या धाग्याला काशी दारम म्हणतात, असे त्यांनी सांगितले. काशीचे वैभव तेलुगू भाषा आणि साहित्यात खोलवर रुजलेले आहे हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी श्रीनाथ महाकवी यांनी लिहिलेल्या काशी खंडमू ग्रंथाचा तसेच इंगुल विरस्वामय्या यांच्या काशी यात्रा पात्र आणि लोकप्रिय काशी मजिली कथालू यांचा उल्लेख केला. एवढ्या दूर असलेली शहरे मनाने इतके जवळ कसे असू शकतात यावर विश्वास ठेवणे एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला कठीण जाते असे पंतप्रधान म्हणाले. पण “हा भारताचा वारसा आहे ज्याने 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा विश्वास अनेक शतके जिवंत ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
“काशी ही मुक्ती आणि मोक्षाची भूमी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. काशीला पोहोचण्यासाठी तेलुगू लोक हजारो किलोमीटर पायी चालत जायचे त्या काळाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की आधुनिक काळात परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. त्यांनी एकीकडे विश्वनाथ धामचे दिव्य वैभव तर दुसरीकडे गंगा तीरावरच्या घाटांची भव्यता याची उदाहरणे दिली; एका बाजूला काशीचे रस्ते तर दुसरीकडे नवीन रस्ते आणि महामार्गांचे जाळे याचेही उदाहरण दिले. त्यांनी अधोरेखित केले की आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पूर्वी काशीला येऊन गेलेल्या लोक या शहरात होत असलेला बदल जाणवला असेलच. नवीन महामार्गाच्या बांधकामामुळे विमानतळावरून दशाश्वमेध घाटापर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ कमी झाल्याचेही त्यांना जाणवले असेल असे पंतप्रधान म्हणाले.
शहरातील विकासाची उदाहरणे देताना पंतप्रधानांनी बहुतेक भागात विदुयत तारांची जोडणी भूमिगत स्वरूपात केल्याचे तसेच शहरातील कुंड, मंदिरांचे मार्ग आणि सांस्कृतिक स्थळांचे पुनरुज्जीवन केल्याचे आणि गंगा नदीत सी एन जी वर चालणाऱ्या बोटींचे उदाहरण दिले. याशिवाय काशी मधील नागरिकांना लाभदायी ठरणाऱ्या आगामी रोपवे चा देखील त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी स्वच्छता मोहिमेचे यश आणि घाटांच्या स्वच्छतेचे श्रेय शहरातील युवावर्गाने मोठ्या प्रमाणावर केलेल्या जनजागृतीला दिले.
काशी मधील लोक, अतिथींच्या स्वागतामध्ये कोणतीही कसूर ठेवणार नाहीत , असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. “बाबांचे आशीर्वाद, काल भैरवाचे आणि अन्नपूर्णा मातेचे दर्शन या गोष्टी अतिशय विलोभनीय आहेत. गंगा नदीत मारलेली एक डुबकी आपल्या आत्म्याला प्रसन्न करते”, असे सांगून पंतप्रधानांनी लस्सी, थंडाई, चाट, लिट्टी चोखा आणि बनारसी पानाचा उल्लेख केला आणि या सर्व गोष्टींचा आस्वाद घेऊन आपली यात्रा अधिक संस्मरणीय होते, असे ते म्हणाले. एटिकोपका खेळणी ही वाराणसीच्या लाकडी खेळण्यांप्रमाणेच असून आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील बांधव त्यांच्यासोबत बनारसी साड्या अवश्य घेऊन जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
“आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या प्रकारे भारताच्या समृद्ध जाणीवा जपल्या ज्या एकत्रितपणे भारतमाता म्हणून पूर्ण स्वरूपात ओळखल्या जातात”, असे पंतप्रधान म्हणाले. काशीतील बाबा विश्वनाथ आणि विशालाक्षी शक्तीपीठ, आंध्र प्रदेशामधील मल्लिकार्जुन, तेलंगणातील भगवान राज-राजेश्वर, आंध्रमधील माँ भ्रामराम्बा आणि तेलंगणातील राज राजेश्वरी यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि ही सर्व पवित्र स्थळे भारताची महत्वाची सांस्कृतिक केंद्र आणि सांस्कृतिक ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचे पूर्ण स्वरूप आणि क्षमता तेव्हाच साकार होऊ शकते जेव्हा आपण देशाची विविधता त्याच्या संपूर्णतेमध्ये पाहतो, असे आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सांगितले. “केवळ तेव्हाच आपण आपल्या पूर्ण क्षमतेला जागृत करू शकतो”, असे ते म्हणाले. गंगा-पुष्करलू सारखे सण -महोत्सव देशसेवेचे व्रत पुढे चालू ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.