गुणवत्ता किंवा तंत्रज्ञानाचा विचार करताना सर्वात आधी मनात येतो “ब्रँड बंगळूरु”
“इन्व्हेस्ट कर्नाटक 2022” हे स्पर्धात्मक आणि सहकारी संघवादाचे सुयोग्य उदाहरण
अनिश्चिततेच्या या कालखंडात भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत तत्वाबाबत जग आश्वस्त ”
“गुंतवणूकदारांना लाल फितीमध्ये अडकवून ठेवण्यापेक्षा आम्ही गुंतवणुकीसाठी लाल गालिचाची अनुभूती देणारे वातावरण निर्माण केले”
“नव भारताची उभारणी केवळ धाडसी सुधारणा, मोठ्या पायाभूत सुविधा आणि सर्वोत्तम गुणवत्ता यांच्या माध्यमातूनच शक्य”
“गुंतवणुकीवर आणि मानवी भांडवलावर भर देऊनच विकासाची लक्ष्ये साध्य करणे शक्य होईल”
“डबल इंजिन सरकार कर्नाटकच्या विकासाला चालना देत आहे”
“भारतामध्ये गुंतवणूक म्हणजे समावेशकतेमध्ये गुंतवणूक, लोकशाहीमध्ये गुंतवणूक, जगासाठी गुंतवणूक आणि अधिक चांगल्या, स्वच्छ आणि सुरक्षित ग्रहासाठी गुंतवणूक”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इन्व्हेस्ट कर्नाटक या जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या उद्‌घाटन समारंभाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

पंतप्रधानांनी कर्नाटकच्या जनतेला त्यांच्या काल झालेल्या राज्योत्सवाबद्दल शुभेच्छा दिल्या. कर्नाटक म्हणजे परंपरा आणि तंत्रज्ञानाचा, निसर्ग आणि संस्कृतीचा, आश्चर्यकारक स्थापत्य आणि उत्साहाने सळसळत्या स्टार्ट अप्सचा संगम आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ज्यावेळी गुणवत्ता किंवा तंत्रज्ञानाचा विचार केला जातो तेव्हा मनामध्ये सर्वात आधी नाव येते ते “ब्रँड बँगळूरु” .  हे नाव केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रस्थापित झाले आहे, असे मोदी म्हणाले.

गुंतवणूकदारांच्या या परिषदेचे कर्नाटकमध्ये आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि हे स्पर्धात्मक आणि सहकारी संघवादाचे अगदी योग्य उदाहरण असल्याचे सांगितले. निर्मिती प्रक्रिया आणि उत्पादन मुख्यत्वे राज्य सरकारची धोरणे  आणि नियंत्रण यावर अवलंबून असतात. या जागतिक गुंतवणूकदार  परिषदेच्या माध्यमातून राज्यांना विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करता येईल आणि इतर देशांसोबत भागीदारी प्रस्थापित करता येईल, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. या परिषदेच्या निमित्ताने देशातील युवकांच्या रोजगाराला चालना देणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या भागीदारीचे नियोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणाले की 21व्या शतकात भारताला सध्याच्या स्थानावरून केवळ पुढेच जायचे आहे. गेल्या वर्षी भारतामध्ये 84 अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली. भारताविषयी जागतिक पातळीवर वाढत चाललेल्या आशावादाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “ सध्याच्या या अनिश्चिततेच्या काळात देखील बहुतेक देश भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत तत्वाबाबत आश्वस्त आहेत. सध्याच्या विभाजन प्रक्रियेच्या काळात भारत जगासोबत वाटचाल करत आहे आणि जगासोबत काम करण्यावर भर देत आहे. विस्कळीत पुरवठा साखळीच्या काळात भारत संपूर्ण जगाला औषधे आणि लसींच्या पुरवठ्याची हमी देऊ शकतो, असे ते म्हणाले. बाजारात संतृप्ततेचे( नवी मागणी नसल्याचे ) वातावरण असूनही आपल्या स्थानिक बाजारपेठा नागरिकांच्या आकांक्षांमुळे भक्कम आहेत. जागतिक संकटाच्या काळातही तज्ञ, विश्लेषक आणि अर्थतज्ञांनी भारत म्हणजे उल्लेखनीय कामगिरीच्या अपेक्षा असणारा देश म्हणून त्याची प्रशंसा केली आहे ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. “ भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी बळकट करण्यासाठी मूलभूत बाबी अधिक  भक्कम करण्यासाठी आम्ही प्रत्येक दिवसागणिक सातत्याने प्रयत्न करत आहोत.” असे ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेचे मार्गक्रमण लक्षात घेण्यावर त्यांनी भर दिला.  एके काळी धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या समस्यांसोबत झगडणाऱ्या देशात गेल्या 9-10 वर्षात दृष्टीकोनामध्ये झालेल्या बदलाविषयी त्यांनी माहिती दिली. गुंतवणूकदारांना लाल फितीमध्ये अडकवण्यापेक्षा आम्ही त्यांच्यासाठी लाल गालिचाची अनुभूती देणारे वातावरण निर्माण केले आणि किचकट नवे कायदे निर्माण करण्यापेक्षा आम्ही त्यांना तर्कसंगत केले असे त्यांनी अधोरेखित केले.

नव्या भारताची उभारणी केवळ धाडसी सुधारणा, विशाल पायाभूत सुविधा आणि सर्वोत्तम गुणवत्तेच्या माध्यमातूनच शक्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये धाडसी सुधारणांचा अवलंब केला जात आहे, असे त्यांनी जीएसटी, आयबीसी, बँकिंग सुधारणा, यूपीआय, कालबाह्य झालेले 1500 कायदे आणि 40 हजार अनावश्यक अनुपालनांना रद्दबातल करणे यांचे दाखले देऊन सांगितले. कंपनी कायद्यातील काही तरतुदी  गुन्हेगारी कक्षेतून हटवणे  , ओळखरहित मूल्यांकन, थेट परदेशी गुंतवणुकीसाठी नवी क्षेत्रे, ड्रोन नियमांमध्ये शिथिलता, भूअवकाशीय आणि अवकाश क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रांचे उदारीकरण यांसारख्या पावलांमुळे अभूतपूर्व उर्जा निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठ वर्षात परिचालन सुरू असलेल्या विमानतळांची संख्या दुप्पट झाली असून मेट्रोचे जाळे 20 पेक्षा जास्त शहरात विस्तारल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 

पीएम गतीशक्ती राष्ट्रीय बृहद योजनेचे उद्दिष्ट अधोरेखित करत,  हे एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासाचे उद्दिष्ट आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ही योजना अंमलात आणताना सर्वात कार्यक्षम मार्गावर चर्चा करताना केवळ पायाभूत सुविधांच्या विकासासाठीच नव्हे तर विद्यमान पायाभूत सुविधांसाठीही  मार्गदर्शक आराखडा  तयार केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटच्या टोकापर्यंत  कनेक्टिव्हिटी आणि उत्पादन किंवा सेवा यात सुधारणा करून  जागतिक दर्जाचे बनवण्यावर मोदी यांनी  भर दिला. या प्रवासात तरुणांनी दिलेले योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि भारतातील प्रत्येक क्षेत्र युवा शक्तीच्या सामर्थ्याच्या जोरावर वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुंतवणूक आणि मानवी भांडवलावर लक्ष केंद्रित करूनच विकासाची उद्दिष्टे साध्य करता येतील यावर पंतप्रधानांनी भर दिला.या विचाराने  वाटचाल करत आम्ही आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले असून  उत्पादकता वाढवणे तसेच मानवी भांडवल सुधारणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.  आरोग्य हमी योजनांसह उत्पादन प्रोत्साहन, व्यवसाय सुलभता तसेच आरोग्य आणि निरामयता  केंद्रे; महामार्गांचे जाळे तसेच शौचालये आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था; भविष्यातील पायाभूत सुविधा तसेच स्मार्ट शाळा  यांसारख्या गोष्टींना  एकाच वेळी चालना दिल्याचा  उल्लेख पंतप्रधानांनी  केला. “हरित विकास आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने राबवत असलेल्या उपक्रमांनी  अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. ज्यांना आपल्या गुंतवणुकीचा परतावा हवा आहे  आणि या धरणीप्रति जबाबदारी पूर्ण करायची आहे, ते भारताकडे आशेने पाहत आहेत, असे पंतप्रधानांनी देशाच्या पर्यावरणपूरक विकासावर बोलताना सांगितले.

कर्नाटकातील डबल-इंजिन सरकारचे सामर्थ्य प्रतिबिंबित करताना पंतप्रधान म्हणाले की, राज्यातील अनेक क्षेत्रांच्या गतिमान  विकासाचे हे एक कारण आहे. व्यवसाय सुलभतेमध्ये  कर्नाटकने आपले स्थान कायम राखले आहे आणि याचे श्रेय म्हणजे थेट परदेशी गुंतवणुकीच्या  बाबतीत आघाडीच्या राज्यांच्या यादीत त्याचा समावेश आहे, असे पंतप्रधानांनी यासंबंधित उदाहरणे देऊन सांगितले. "फॉर्च्युन 500 पैकी 400 कंपन्या येथे आहेत आणि भारतातील 100 पेक्षा जास्त युनिकॉर्नपैकी 40 पेक्षा जास्त कर्नाटकात आहेत", ही बाब त्यांनी अधोरेखित केली. उद्योग, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक तंत्रज्ञान ,जैव तंत्रज्ञान , स्टार्टअप तसेच शाश्वत उर्जेचे माहेरघर असलेले कर्नाटक आज जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान क्लस्टर म्हणून गणले जात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.“ इथे प्रत्येक क्षेत्रात विकासाची नवी गाथा  लिहिली जात आहे”, असे त्यांनी सांगितले. कर्नाटकचे विकासाचे अनेक  मापदंड भारतातील इतर राज्यांनाच नव्हे तर काही देशांनाही आव्हान देत आहेत, असे ते म्हणाले. भारत उत्पादन क्षेत्राच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे हे अधोरेखित करून, पंतप्रधानांनी राष्ट्रीय सेमीकंडक्टर अभियानाचा  उल्लेख केला आणि  येथील तंत्रज्ञान कार्यक्षेत्र  चिप डिझाइन आणि उत्पादनाला नवीन उंचीवर नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुंतवणुकदाराच्या आणि भारताच्या दृष्टीकोनात साधर्म्य असल्याचे  सांगत , एक गुंतवणूकदार मध्यम आणि दीर्घकालीन दृष्टीकोन  घेऊन पुढे जात असताना, भारताकडेही दीर्घकालीन प्रेरक  दृष्टीकोन आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. नॅनो युरिया, हायड्रोजन ऊर्जा , हरित अमोनिया, कोळसा गॅसिफिकेशन आणि अंतराळ उपग्रहांची  उदाहरणे देत आज भारत जगाच्या विकासाचा मंत्र घेऊन वाटचाल करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “हा भारताचा अमृत काळ आहे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील जनतेने  नवा  भारत घडवण्याचा  संकल्प  घेत वाटचाल सुरु केली आहे.”,असे त्यांनी सांगितले. भारताने 2047 पर्यंत विकसित देश  बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यासाठी गुंतवणूक आणि भारताची प्रेरणा एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे तरच सर्वसमावेशक, लोकशाहीवादी  आणि सशक्त भारताचा विकास जगाच्या विकासाला गती देईल. "भारतातील गुंतवणूक म्हणजे सर्वसमावेशकतेमध्ये गुंतवणूक करणे, लोकशाहीमध्ये गुंतवणूक करणे, जगासाठी गुंतवणूक करणे आणि अधिक चांगल्या, स्वच्छ आणि सुरक्षित पृथ्वीसाठी  गुंतवणूक करणे",, असे सांगत  पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

पार्श्वभूमी

संभाव्य गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि आगामी दशकासाठी विकास योजना तयार करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. बंगळुरू येथे 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमात 80 हून अधिक वक्त्यांची  सत्रे होतील. वक्त्यांमध्ये  कुमार मंगलम बिर्ला, सज्जन जिंदाल आणि विक्रम किर्लोस्कर यांसारख्या प्रमुख उद्योजकांचा समावेश आहे.यासह, तीनशेहून अधिक प्रदर्शकांसह अनेक व्यावसायिक प्रदर्शने आणि देशांची  सत्रे समांतररित्या आयोजित करण्यात आली आहेत. फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, दक्षिण कोरिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया - भागीदार देशांद्वारे प्रत्येक देशाच्या  सत्राचे आयोजन केले जाईल.  संबंधित देशांतील उच्चस्तरीय मंत्री आणि औद्योगिक शिष्टमंडळे यात सहभागी होतील. या जागतिक स्तरावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर कर्नाटकला आपली संस्कृती जगासमोर प्रदर्शित करण्याची  संधी मिळेल.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi