पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे हिंदुस्थान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद 2024 ला (Hindustan Times Leadership Summit 2024) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या हस्ते हिंदुस्थान टाईम्सच्या प्रवासाची सुरूवात झाली असल्याची घटना आपल्या संबोधनात नमूद केली आणि हिंदुस्थान टाईम्सच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आणि प्रारंभापासून या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचे अभिनंदनही केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी आयोजनस्थळी उभारलेल्या हिंदुस्थान टाईम्सच्या प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनाला भेट देणे हा समृद्ध करणारा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत, सर्व प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटना लागू झाली तेव्हाची जुनी वर्तमानपत्रं आपण पाहिली असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मार्टिन ल्युथर किंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. एम. एस. स्वामीनाथन अशा अनेक दिग्गजांनी हिंदुस्थान टाईम्ससाठी लेख लिहिले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हिंदुस्थान टाईम्सचा प्रवास प्रचंड प्रदीर्घ आहे, हा प्रवास स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे, आणि त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळात आशेच्या दिशेने वाटचाल करणारा हा प्रदीर्घ प्रवास अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1947 सालच्या ऑक्टोबर महिन्यात आपणही इतर नागरिकांप्रमाणेच काश्मीर भारतात विलीन झाल्याची बातमी वाचली होती, आणि ही बातमी वाचून आपला इतरांप्रमाणे प्रचंड उत्साह वाटला होता हा अनुभवही पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मात्र अनिर्णयकी वृत्तीमुळे काश्मीर सात दशके हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असल्याची जाणिवही आपल्याला त्या क्षणाने करून दिली होती असेही त्यांनी सांगितले. पण आजच्या स्थितीत जम्मू - काश्मीरमधील निवडणुकीत विक्रमी प्रमाणात मतदान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत, आणि ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. एकदा एका वर्तमानपत्रात एका बाजूला आसामला अशांत क्षेत्र घोषित केल्याची बातमी छापलेली होती, तर दुसऱ्या बाजुला अटलजींनी भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केल्याची बातमी छापलेली बातमी आपण पाहिल्याचा अनुभवही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसोबत सामायिक केला. याच अनुभवाचा संदर्भ देत आज भाजपा आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे आणि हा मनाला शांती देणारा योगायोग आहे असे ते म्हणाले.
कालच झालेल्या पहिल्या बोडोलँड मोहोत्सोवात आपण सहभागी झाल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. मात्र या कार्यक्रमाला प्रसार माध्यमांमधून फारच अत्यल्प प्रसिद्धी मिळाली, हे पाहून आपल्याला खंत वाटल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. खरे तर तब्बल पाच दशकांनंतर तिथल्या युवा आणि सामान्य नागरिकांनी हिंसाचाराला सोडचिठ्ठी दिली आणि, त्यानंतर आता त्यांनी दिल्लीमध्ये मोठा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला, हे लक्षणीय यश आहे ही बाबही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केली. 2020 मध्ये बोडो शांतता करार झाल्यापासून तिथल्या नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. हिंदुस्थान टाईम्सने मांडलेल्या प्रदर्शनात आपण मुंबईवरील 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रे पाहिल्याचे त्यांनी सांगितले. याचाच संदर्भ देत त्यांनी, एक काळ असा होता ज्यावेळी आपल्या शेजारी देशांकडून पुरस्कृत दहशतवादामुळे आपल्या नागरिकांना स्वतःच्याच घरात आणि शहरांमध्ये असुरक्षित वाटत होते ही बाब नमूद केली. मात्र, आता काळ बदलला आहे, आणि आता दहशदवाद्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात आपण सुरक्षित असल्याचे वाटत नाही असे ते म्हणाले.
भारताचे भवितव्य घडवणाऱ्या संस्थांसह हिंदुस्तान
हिंदुस्थान टाईम्स समूहाने 100 वर्षांच्या कारकिर्दीत 25 वर्षांची गुलामगिरी आणि 75 वर्षांचे स्वातंत्र्य अनुभवले आहे आणि भारतातील सामान्य माणसाच्या क्षमता आणि शहाणपणासह देशाला दिशा दाखवली आहे असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. ते पुढे म्हणाले की भारताच्या सामान्य नागरिकाची ही क्षमता ओळखण्यात तज्ञांनी देखील अनेकदा चुका केल्या आहेत.इतिहासाला स्पर्श करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा ब्रिटीश भारत सोडून जात होते तेव्हा असे अनुमान वर्तवण्यात आले की आता हा देश विस्कळीत होईल आणि तुकड्यांमध्ये विखुरला जाईल. आणि जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा काही लोकांनी गृहीत धरले की आता ही आणीबाणी कायमसाठी लागू राहील, तर काही व्यक्ती आणि संस्था आणीबाणी लादलेल्यांच्या आश्रयाला गेले होते. अशा काळी देखील भारताच्या नागरिकांनी ठाम भूमिका घेतली आणि आणीबाणी उखडून फेकली असे पंतप्रधानांनी सांगितले. सामान्य माणसाच्या ताकदीचे आणखी स्पष्टीकरण देताना पंतप्रधान मोदी यांनी कोविड महामारीच्या संकटाविरुद्ध कणखरपणे लढणाऱ्या सामान्य नागरिकांच्या इच्छाशक्तीचे कौतुक केले.
भूतकाळातील दाखले देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 1990 च्या आसपास जेव्हा भारताने 10 वर्षांच्या काळात 5 निवडणुकांना तोंड दिले. त्याकाळी देश किती अस्थिर झाला होता हे त्यातून दिसून येते. ते पुढे म्हणाले की, देशातील ही परिस्थिती अशीच राहील असे अनुमान वर्तमानपत्रात लिखाण करणाऱ्या तज्ञ मंडळींनी वर्तवले होते मात्र भारतातील नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा चुकीचे ठरवले. पंतप्रधान मोदी म्हणाले की आजघडीला जगभरात अनिश्चितता आणि अस्थिरतेची चर्चा सुरु आहे आणि जगातील अनेक देशांमध्ये नवीन संस्था सत्तेत येत आहेत, अशावेळी भारतात मात्र जनतेने तिसऱ्यांदा तेच सरकार निवडून आणले आहे.
भूतकाळातील धोरणांबाबत बोलताना मोदी म्हणाले की, ‘उत्तम अर्थशास्त्र म्हणजे वाईट राजकारण’ या म्हणीला तज्ञांकडून प्रोत्साहन दिले जात होते आणि सरकारकडून समर्थन मिळत होते. पूर्वीच्या सरकारांनी वाईट राज्यकारभार आणि अकार्यक्षमता झाकण्यासाठीचा मार्ग म्हणून या म्हणीचा वापर केला असे ते म्हणाले. या सगळ्यामुळे देशात असंतुलित विकास झाला आणि त्यातून लोकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत झाला. पंतप्रधान म्हणाले की आमच्या सरकारने लोकांची प्रगती, लोकांद्वारे प्रगती आणि लोकांसाठी प्रगती या तत्वाची सुनिश्चिती करून जनतेचा विश्वास परत मिळवला. नव्या आणि विकसित भारताची उभारणी करणे हे सरकारचे उद्दिष्ट होते आणि देशवासीयांनी त्यांच्या विश्वासाच्या भांडवलासह या सरकारवर विश्वास ठेवला असे ते म्हणाले. समाज माध्यमांचा पगडा असलेल्या या युगात चुकीची माहिती तसेच अपप्रचार होत असूनही भारतीय नागरिकांनी आमच्यावर, आमच्या सरकारवर विश्वास ठेवला.
जेव्हा लोकांच्या विश्वासात वाढ होते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यातून देशाच्या विकासावर वेगळाच परिणाम दिसून येतो यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. जोखीम स्वीकारण्याचे महत्व अधिक ठळकपणे सांगत ते म्हणाले की आपल्या पूर्वजांनी जोखीम स्वीकारली आणि त्यामुळे आपल्याला भारतीय वस्तू आणि सेवा यांची परदेशांमध्ये जाहिरात करण्यात तसेच भारताला व्यापार आणि संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यात मदत मिळाली. मात्र, स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सरकारांनी जोखीम घेण्याची ही संस्कृती विस्मृतीत हरवली असे ते पुढे म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की गेल्या 10 वर्षांत जेव्हापासून त्यांचे सरकार सत्तेवर आले आणि देशवासियांमध्ये जोखीम स्वीकारण्याच्या संस्कृतीला नवी उर्जा प्रदान केली तेव्हापासून भारतात विकास आणि बदल घडताना दिसत आहेत. ते पुढे म्हणाले की, आता आपले तरुण संधींचा शोध घेत आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये जोखीम स्वीकारत आहेत. भारतात नोंदणी झालेल्या सव्वा लाखांहून अधिक स्टार्ट अप उद्योगांमधून हे स्पष्टपणे दिसून येत आहे असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान म्हणाले की एक काळ असा होता जेव्हा व्यवसाय म्हणून क्रीडा क्षेत्राचा स्वीकार करणे देखील धोक्याचे होते. मात्र, आज आपल्या लहानलहान शहरांतील तरुण देखील हा धोका पत्करत आहेत आणि जगभरातून देशासाठी मानसन्मान प्राप्त करत आहेत. स्वयं सहाय्यता बचत गटांशी संबंधित महिलांचे उदाहरण देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशातील सुमारे 1 कोटी लखपती दीदी प्रत्येक गावामध्ये उद्योजक बनून स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत.
"आज भारतीय समाज अभूतपूर्व आकांक्षांनी भारलेला आहे आणि आम्ही या आकांक्षांना आमच्या धोरणांचा आधार बनवले आहे", असे मोदी म्हणाले. सरकारने विकासाच्या अशा एका मॉडेलला प्रोत्साहन दिले आहे ज्यात गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि विकासाच्या माध्यमातून सन्मान वाढीस लागेल, असे ते म्हणाले. यामध्ये गुंतवणूक आहे आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्माण होतो, ज्यातून विकास होतो आणि विकासामुळे भारतातील नागरिकांचा सन्मान वाढतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी देशभरात शौचालये बांधण्याचे उदाहरण दिले, जे सुविधेसोबतच सुरक्षा आणि प्रतिष्ठेचे साधन आहे. मोदी म्हणाले की यामुळे विकासाला गती मिळाली, पर्यायाने गुंतवणुकीद्वारे रोजगार निर्मिती, विकासाद्वारे सन्मान हा मंत्र प्रत्यक्षात यशस्वी झाला. पूर्वी प्रतिष्ठेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरचे उदाहरणही त्यांनी दिले. ते म्हणाले की त्यांच्या सरकारने प्रत्येक घरात गॅस जोडणी देण्यास प्राधान्य दिले, त्याउलट पूर्वीच्या सरकारांनी लोकांना किती सिलिंडर द्यायचे यावर केवळ चर्चा केली. ते पुढे म्हणाले की 2014 मधील 14 कोटींच्या तुलनेत देशात आज 30 कोटींपेक्षा जास्त गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. गॅस सिलिंडरची मागणी पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी सहाय्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. विविध ठिकाणी बॉटलिंग प्लांट उभारण्यापासून ते वितरण केंद्रे तयार करण्यापर्यंत आणि सिलिंडरच्या वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यात रोजगार निर्मिती झाल्याचे ते म्हणाले. मोदी यांनी मोबाईल फोन, रुपे कार्ड, यूपीआय इत्यादी उदाहरणे देखील दिली, जी गुंतवणुकीद्वारे रोजगार, विकासाद्वारे सन्मान या मॉडेलवर आधारित होती.
आज भारत ज्या प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे ते समजून घेण्यासाठी सरकारचा दुसरा दृष्टिकोन समजून घेणे अत्यावश्यक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. हा दृष्टिकोन आहे, "लोकांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणे आणि लोकांसाठी मोठी बचत करणे " असे त्यांनी नमूद केले. याचे स्पष्टीकरण देताना मोदी म्हणाले, 2014 मध्ये भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 16 लाख कोटी रुपयांचा होता, आज तो 48 लाख कोटी रुपयांचा आहे. ते पुढे म्हणाले की आजचा भांडवली खर्च 2013-14 मधील 2.25 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा भांडवली खर्च नवीन रुग्णालये, शाळा, रस्ते, रेल्वे, संशोधन सुविधा आणि अशा अनेक सार्वजनिक पायाभूत सुविधांवर केला जात आहे, असे ते पुढे म्हणाले. जनतेवरील खर्च वाढवण्याबरोबरच सरकार जनतेच्या पैशाचीही बचत करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. वस्तुस्थिती आणि आकडेवारी सादर करताना मोदी म्हणाले की थेट लाभ हस्तांतरणामुळे गळती थांबली आणि देशाची 3.5 लाख कोटी रुपयांची बचत झाली तर आयुष्मान भारत योजनेंतर्गत मोफत उपचारांमुळे गरिबांसाठी 1.10 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. ते पुढे म्हणाले की जनऔषधी केंद्रांवर 80% सवलतीत उपलब्ध असलेल्या औषधांमुळे नागरिकांची 30 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, तसेच स्टेंट आणि गुडघा प्रत्यारोपणाच्या किमतींवर नियंत्रण ठेवल्यामुळे लोकांची हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे. ही यादी अशीच पुढे चालू ठेवत त्यांनी उजाला योजनेचा उल्लेख केला, ज्यामुळे लोकांच्या वीज बिलात 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, तर स्वच्छ भारत अभियानामुळे आजार कमी झाले असून यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाची सुमारे 50 हजार रुपयांची बचत झाली आहे. युनिसेफच्या अहवालाचा दाखला देत मोदी म्हणाले की ज्या कुटुंबाकडे स्वतःचे शौचालय आहे त्यांचीही सुमारे 70 हजार रुपयांची बचत होत आहे आणि ज्यांच्या घरात पहिल्यांदाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे अशा 12 कोटी लोकांच्या जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे की त्यांचीही दरवर्षी 80 हजार रुपयांहून अधिक बचत झाली आहे.
10 वर्षांपूर्वी कुणीही भारतात एवढ्या मोठ्या बदलांची अपेक्षा केली नव्हती, असे सांगून मोदी म्हणाले, “भारताच्या यशाने आम्हाला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली”. यामुळे अपेक्षा वाढली आहे आणि हे शतक भारताचे शतक असेल असा दृष्टिकोन निर्माण झाला आहे. या दिशेने वाटचाल करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आहे यावर भर देत मोदी म्हणाले की सरकार प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी वेगाने काम करत आहे. आपण आपल्या प्रक्रिया उंचावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे जेणेकरून भारताचे उत्पादन ‘जागतिक दर्जा’ चे म्हणून ओळखले जाईल, मग ते वस्तूंचे उत्पादन असेल किंवा बांधकाम, शिक्षण असेल किंवा मनोरंजन असेल. लोकांच्या मनात हा दृष्टिकोन रुजवण्यात हिंदुस्तान टाईम्सचीही मोठी भूमिका आहे आणि त्यांचा 100 वर्षांचा अनुभव विकसित भारताच्या वाटचालीत खूप उपयुक्त ठरेल, असे मोदी म्हणाले.
भाषणाचा समारोप करताना मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की भारत विकासाचा हा वेग कायम राखेल आणि लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. ते पुढे म्हणाले की झपाट्याने बदलणाऱ्या भारताच्या नव्या शतकाचा हिंदुस्तान टाईम्स देखील साक्षीदार असेल.
Click here to read full text speech
जिस शक्ति ने भारत का भाग्य बनाया है, भारत को दिशा दिखाई है... वो है... भारत के सामान्य मानवी की सूझबूझ, उसका सामर्थ्य: PM @narendramodi pic.twitter.com/lw0Xd6LWSe
— PMO India (@PMOIndia) November 16, 2024
Progress of the people...
— PMO India (@PMOIndia) November 16, 2024
Progress by the people...
Progress for the people... pic.twitter.com/3NWmA2pGwI
In the past 10 years, the transformations in the country have reignited a risk-taking culture among the citizens. pic.twitter.com/ky700RYbS3
— PMO India (@PMOIndia) November 16, 2024
Today, India is filled with unprecedented aspirations and we have made these aspirations a cornerstone of our policies. pic.twitter.com/xDmF7LCV76
— PMO India (@PMOIndia) November 16, 2024
Our government has provided citizens with a unique combination... pic.twitter.com/do0f0XbIIi
— PMO India (@PMOIndia) November 16, 2024
Spend Big For The People… Save Big For The People. pic.twitter.com/DKfI9Xde5R
— PMO India (@PMOIndia) November 16, 2024
This century will be India's century. pic.twitter.com/f2AmRk47QO
— PMO India (@PMOIndia) November 16, 2024