पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित केले. यावेळी आयोजित प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे ग्लोबल फिनटेक फेस्ट चे आयोजन केले आहे. फिनटेकमधील भारताची प्रगती प्रदर्शित करणे आणि या क्षेत्रातील प्रमुख हितधारकांना एकत्र आणणे हे याचे उद्दिष्ट आहे.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांमध्ये उत्सवी वातावरण आहे तसेच देशातही सणासुदीचे दिवस आहेत आणि ग्लोबल फिनटेक फेस्टचे आयोजन स्वप्नांच्या शहरात म्हणजेच मुंबईत होत आहे. पंतप्रधानांनी सर्व मान्यवर आणि पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रदर्शनाला दिलेल्या भेटीतील अनुभव आणि साधलेला संवाद याविषयी बोलताना मोदी म्हणाले की, युवकांच्या नवोन्मेषाचे आणि भविष्यातील संधींचे संपूर्ण नवीन जग येथे दिसते.
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 च्या यशस्वी आयोजनात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
भारताच्या फिनटेक नवोन्मेषाचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले, "पूर्वी भारताला भेट देणारे परदेशी पाहुणे इथले सांस्कृतिक वैविध्य पाहून थक्क व्हायचे, आता ते फिनटेकच्या विविधतेनेही थक्क झाले आहेत." मोदी म्हणाले की, भारताची फिनटेक क्रांती विमानतळावर उतरल्या क्षणापासून ते स्ट्रीट फूड आणि खरेदीचा अनुभव घेण्यापर्यंत सर्वदूर दिसून येते. “गेल्या 10 वर्षात, फिनटेक क्षेत्रात 31अब्ज डॉलर्सहून अधिक विक्रमी गुंतवणूक झाली आहे आणि स्टार्टअपमध्ये 500 टक्के वाढ झाली आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच परवडणारे मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि शून्य शिल्लक असलेल्या जन धन बँक खात्यांनी मोठी क्रांती घडवून आणल्याकडे लक्ष वेधले. “आज देशातील एकूण ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या 60 दशलक्ष वरून 940 दशलक्ष पर्यंत वाढली आहे,” असे सांगून मोदी म्हणाले की, आज देशात 18 वर्षांहून अधिक वयाचा क्वचितच कोणी असेल ज्याचे आधार कार्ड, डिजिटल ओळख नाही. “आज देशातील 530 दशलक्षाहून अधिक लोकांकडे जन धन खाती आहेत. एक प्रकारे आम्ही संपूर्ण युरोपियन महासंघाच्या लोकसंख्येएवढ्या लोकांना अवघ्या 10 वर्षांत बँकिंग व्यवस्थेशी जोडले आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी जन धन, आधार आणि मोबाईल यांच्या त्रिसूत्रीने ‘ज्याच्या हाती रोख तो राजा’ ही मानसिकता मोडीत काढत जगातील सुमारे अर्धे डिजिटल व्यवहार भारतात शक्य केल्याचे अधोरेखित केले. “यूपीआय हे भारताच्या जागतिक पातळीवर फिनटेक यशाचे मोठे उदाहरण ठरले आहे” असे सांगून पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक गाव आणि शहरात सर्व प्रकारच्या ऋतूमानात 24X7 बँकिंग सेवा पुरवठा यूपीआयमुळे शक्य झाला आहे. कोविड महामारीच्या काळाची आठवण करून देत पंतप्रधानांनी सांगितले की बँकिंग सेवा सुरळीत चालू राहिल्या अशा जगातील राष्ट्रांमधील एक राष्ट्र भारत होते.
जन धन योजनेला काही दिवसांपूर्वीच 10 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाचे मोठे माध्यम बनली आहे. या योजनेचे फलित म्हणून, महिलांसाठी 29 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून त्यामुळे महिलांसमोर बचत आणि गुंतवणुकीसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, सर्वात मोठी सूक्ष्मकर्ज योजना – मुद्रा योजना जन धन खात्यांच्या आधारे सुरू करण्यात आली आणि तिच्या मार्फत आजवर 27 ट्रिलिअन कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे. “या योजनेचे 70 टक्के लाभार्थी महिला आहेत,” अशी माहिती मोदी यांनी दिली. जन धन खात्यांमुळे महिला बचत गटांना बँकिंग व्यवस्थेशी जोडून घेणे शक्य झाले असून त्याचा 10 कोटी ग्रामीण महिलांना फायदा झाला आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, “जन धन उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भक्कम पायाभरणी झाली.”
समांतर अर्थव्यवस्थेमुळे जगासमोरील धोक्यांबाबत सावध करताना पंतप्रधानांनी टिप्पणी केली की अशा समांतर व्यवस्थेला धक्का देऊन आर्थिक पारदर्शकता आणण्यात फिनटेकने प्रभावी भूमिका बजावली आहे. ते म्हणाले की डिजिटल तंत्रज्ञानाने भारतात पारदर्शकता आणली आहे; उदाहरणादाखल त्यांनी शेकडो सरकारी योजनांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या वापरामुळे व्यवस्थेतील गळतीला प्रतिबंध करता आल्याचे सांगितले. “औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडून घेतल्याचे फायदे आज लोकांना दिसून येत आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
फिनटेक उद्योगाने देशात घडवून आणलेल्या बदलांची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की त्यामुळे भारताच्या तंत्रज्ञानाच्या बाजूत सकारात्मक बदल झाला आहे इतकेच नव्हे तर शहरी आणि ग्रामीण भारत यांच्यातील अंतर कमी झाले असून त्याच्या सामाजिक प्रभावाची व्याप्ती मोठी आहे. ज्या बँकिंग सेवा पूर्वी दिवसभराचा वेळ घेऊन शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अडचणीच्या ठरत त्याच सेवा आता फिनटेकमुळे मोबाईल फोनच्या माध्यमातून सहजसाध्य झाल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आर्थिक सेवांच्या लोकशाहीकरणातील फिनटेकची भूमिका अधोरेखित करताना पंतप्रधानांनी कर्जांची सुलभ उपलब्धता, क्रेडिट कार्डे, गुंतवणूक आणि विमा ही उदाहरणे दिली. ते म्हणाले की फिनटेकने कर्जप्राप्तीचा मार्ग सुलभ आणि समावेशी केला आहे. पुढे त्यांनी प्रधान मंत्री स्वनिधी योजनेचे उदाहरण दिले. रस्त्यावरील विक्रेत्यांना अनुषंगिक-मोफत कर्ज घेऊन व्यवसायवृद्धीसाठी डिजिटल व्यवहारांमुळे मदत होत असल्याचे ते म्हणाले. शेअर बाजार प्रवेश आणि म्युच्युअल फंड, गुंतवणूक अहवाल मिळवणे आणि डिमॅट खाती उघडणे सुलभ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ‘डिजिटल इंडिया’च्या उदयाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी दुर्गम भागात आरोग्य सेवा, डिजिटल शिक्षण आणि कौशल्य अध्ययन फिनटेकविना शक्य झाले नसते असे सांगितले. “भारताची फिनटेक क्रांती जगण्याची प्रतिष्ठा वाढवण्यात आणि जगण्याचा दर्जा सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे,” असे मोदी म्हणाले.
भारताच्या फिनटेक अर्थात तंत्रज्ञानाधारित आर्थिक सेवा सुविधा क्रांतीने केलेली करामत ही केवळ नवकल्पनांबद्दल नसून ती स्वीकारार्ह देखील असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या क्रांतीचा वेग आणि व्याप्ती स्वीकारल्याबद्दल भारतातील नागरिकांचे कौतुक करताना हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधांच्या (डीपीआय) भूमिकेचीही पंतप्रधानांनी वाखाणणी केली आणि या तंत्रज्ञानाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी देशात आश्चर्यकारक अभिनवतेचे सृजन झाल्याचे उद्धृत केले.
डिजिटल ओन्ली बँक्स आणि निओ-बँकिंगच्या आधुनिक काळातील संकल्पनांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “21 व्या शतकातील जग वेगाने बदलत आहे आणि चलन ते क्युआर (क्विक रिस्पॉन्स) कोडपर्यंतचा टप्पा गाठण्यात आपल्याला काहीसा अधिक अवधी लागला असला तरी दैनंदिन नवोन्मेष आपण अनुभवत आहोत.” डिजिटल ट्विन्स तंत्रज्ञानाचे स्वागत करताना याद्वारे जगाची जोखीम व्यवस्थापन मूल्यांकन, फसवणूक शोध मूल्यांकन तसेच ग्राहकांना अनुभव प्रदान करण्याची पद्धत बदलणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) चे फायदे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की याद्वारे ऑनलाइन खरेदी सर्वसमावेशक होत असून लघु व्यवसाय आणि उद्योगांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. आज, बिगर बँकिंग वित्तीय सेवा पुरवणाऱ्या संस्था कंपन्यांच्या सुरळीत कामकाजासाठी डेटा वापरत आहेत, ट्रेड प्लॅटफॉर्ममुळे छोट्या संस्थांचा रोखता आणि रोख रक्कम प्रवाह सुधारत आहे आणि e-RUPI सारखे डिजिटल व्हाउचर विविध स्वरूपात वापरले जात आहे याकडे लक्ष वेधताना मोदी म्हणाले की ही उत्पादने जगातील इतर देशांसाठी तितकीच उपयुक्त आहेत.
“भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक आराखडा तयार करण्याचे आवाहन केले आहे” हे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, क्युआर कोडसह साउंड बॉक्सचा वापर हा असाच एक नवोपक्रम आहे. त्यांनी भारतातील फिनटेक क्षेत्राला सरकारच्या बँक सखी कार्यक्रमाचे अध्ययन करण्याचे आवाहन केले आणि फिनटेक ला नवीन बाजारपेठ मिळण्यासाठी प्रत्येक गावात बँकिंग आणि डिजिटल जागरूकता पसरवण्याच्या या कन्यांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
फिनटेक क्षेत्राला मदत करण्यासाठी सरकार धोरण स्तरावर सर्व आवश्यक बदल करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि एंजल टॅक्स रद्द करण्याबरोबरच देशातील संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद आणि डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी यासारखी उदाहरणे दिली. सायबर फसवणुकीला पायबंद घालण्याची गरज व्यक्त करून पंतप्रधानांनी नियामकांना डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी मोठी पावले उचलण्याचे आवाहन केले. देशातील फिनटेक आणि स्टार्टअपच्या वाढीच्या मार्गात सायबर फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शाश्वत आर्थिक वाढीला आज भारताचे प्राधान्य आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. प्रगत तंत्रज्ञान आणि नियामक चौकटीसह वित्तीय बाजारपेठेला बळकट करण्यासाठी सरकार मजबूत, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रणाली तयार करत आहे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी हरित वित्त आणि आर्थिक समावेशाच्या परिपूर्तीसह शाश्वत वाढीला समर्थन देण्याचा उल्लेख केला.
भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की भारतातील फिनटेक परिसंस्था भारतातील लोकांना दर्जेदार जीवनशैली प्रदान करण्यात मोठी भूमिका बजावेल. “मला विश्वास आहे की भारताची फिनटेक परिसंस्था संपूर्ण जगाचे सुलभ राहणीमान अधिक उंचावेल. आमचे सर्वोत्तम अद्याप बाकी आहे,” पंतप्रधान म्हणाले. पाच वर्षांनंतर 10व्या जीएफएफ मध्ये आपण उपस्थित राहू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सांगतेपूर्वी, पंतप्रधान मेळाव्यासोबत सेल्फीसाठी उभे राहिले आणि एआयच्या वापरामुळे, या छायाचित्रातील कोणीही व्यक्ती नमो ॲपच्या फोटो विभागात जाऊन त्यांचा सेल्फी अपलोड करून तो मिळवू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि जीएफएफ चे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन आदी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल संयुक्तपणे जागतिक फिनटेक महोत्सवाचे आयोजन करत आहेत. भारत आणि इतर विविध देशांतील धोरणकर्ते, नियामक, वरिष्ठ बँकर्स, उद्योगपती आणि शिक्षणतज्ज्ञांसह सुमारे 800 वक्ते या परिषदेत 350 हून अधिक सत्रांना संबोधित करतील. या महोत्सवात फिनटेक क्षेत्रातील अद्ययावत नवोपक्रम देखील प्रदर्शित केले जातील. जीएफएफ 2024 मध्ये दृष्टिकोन आणि उद्योग जगताची सखोल माहिती देणारे 20 पेक्षा जास्त विचारवंतांचे अहवाल आणि श्वेतपत्रिका प्रकाशित केल्या जातील.
Click here to read full text speech
India's FinTech diversity amazes everyone. pic.twitter.com/uVgdHym2fB
— PMO India (@PMOIndia) August 30, 2024
Jan Dhan Yojana has been pivotal in boosting financial inclusion. pic.twitter.com/RWRr6BXQTa
— PMO India (@PMOIndia) August 30, 2024
UPI is a great example of India's FinTech success. pic.twitter.com/dlo1OzMVaL
— PMO India (@PMOIndia) August 30, 2024
Jan Dhan Yojana has empowered women. pic.twitter.com/csr1Zawu9k
— PMO India (@PMOIndia) August 30, 2024
The transformation brought about by FinTech in India is not limited to just technology. Its social impact is far-reaching. pic.twitter.com/uxQfFiEYOs
— PMO India (@PMOIndia) August 30, 2024
FinTech has played a significant role in democratising financial services. pic.twitter.com/MBQhPLAL2A
— PMO India (@PMOIndia) August 30, 2024
India's FinTech adoption is unmatched in speed and scale. pic.twitter.com/Nnf5sQH5JW
— PMO India (@PMOIndia) August 30, 2024
FinTech for Ease of Living. pic.twitter.com/Wt83ZFUVdk
— PMO India (@PMOIndia) August 30, 2024