“अनेक पिढ्यांना प्रेम आणि भावना यांची भेट देणाऱ्या लतादीदींकडून बहिणीचे प्रेम मिळणे यापेक्षा सर्वात मोठे भाग्य काय असू शकते”
“मी हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करतो. लता दीदी सर्व जनतेच्या होत्या, त्यामुळे त्यांच्या नावाने मला दिलेला हा पुरस्कार देखील जनतेचा आहे”
“त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी भारताला आपला आवाज दिला आणि या देशाची 75 वर्षांची वाटचाल सुद्धा त्यांच्या आवाजाशी निगडित आहे”
“लताजींनी संगीताची उपासना केली पण त्यांच्या गीतांमधून देशभक्ती आणि राष्ट्रीय सेवेची देखील प्रेरणा मिळाली”
“लताजी म्हणजे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या सुमधुर सादरीकरणाप्रमाणे होत्या”
“लताजींचे सूर संपूर्ण देशाला एका धाग्यात गुंफण्याचे काम करायचे. जागतिक पातळीवर सुद्धा त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधानांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या वर्षापासून स्थापन करण्यात आलेला हा पुरस्कार दरवर्षी राष्ट्रउभारणीच्या कार्यात असामान्य योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला देण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंगेशकर कुटुंबाचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आपल्याला संगीतासारख्या गहन विषयाचे सखोल ज्ञान नसले तरी सांस्कृतिक जाणीवेतून संगीत म्हणजे साधना आणि भावना हे दोन्ही आहे, असे वाटते, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की जे अव्यक्ताला व्यक्त करतात, ते शब्द आहेत. जे व्यक्तमध्ये उर्जेचा चेतनेचा संचार घडवतो तो नाद आहे आणि जे चेतनेमध्ये भाव आणि भावना भरते, त्याला सृष्टी आणि संवेदनेच्या परमसीमेपर्यंत पोहोचवते ते संगीत आहे. संगीतामुळे तुमच्यात वीररस निर्माण होतो, संगीत मातृत्व आणि ममतेची अनुभूती देऊ शकते. संगीत तुम्हाला देशभक्ती आणि कर्तव्याच्या जाणीवेच्या शिखरावर पोहोचवू शकते. आपण सर्व अतिशय भाग्यवान आहोत कारण आपल्याला संगीताच्या या सामर्थ्याला या शक्तीला लतादीदींच्या रुपात प्रत्यक्ष पाहता आले आहे. लतादीदींशी आपल्या वैयक्तिक संबंधांविषयी सांगताना ते म्हणाले की माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीबरोबरच आणि जे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो की त्या माझ्या मोठ्या भगिनी होत्या. अनेक पिढ्यांना प्रेम आणि भावना यांची भेट देणाऱ्या लतादीदींकडून नेहमीच मला मोठ्या बहिणीचे अपार प्रेम मिळाले आहे. मला असे वाटते, यापेक्षा आयुष्यात दुसरे मोठे भाग्य काय असू शकते?, असे त्यांनी सांगितले.

साधारणपणे पुरस्कार घेण्यापासून आपण जरा अलिप्त असतो, असे समारंभ टाळतो, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र, जेव्हा मंगेशकर कुटुंबाने आपल्याला बोलावले आणि जो पुरस्कार देऊ केला होता, तो आपली मोठी बहीण, लता दिदींच्या नावे होता, त्यामुळे हा पुरस्कार आपल्यासाठी त्यांचे आपलेपण आणि स्नेहाचे प्रतीक होता, असे मोदी म्हणाले.” त्यामुळे या पुरस्काराला नाही म्हणणे मला शक्यच नव्हते. मी आज हा पुरस्कार माझ्या सर्व देशबांधवांना समर्पित करतो आहे. लता दीदी जशा सर्वांच्या होत्या, तसाच त्यांच्या नावाने मला मिळालेला हा पुरस्कार देखील, सर्व लोकांचा आहे.”, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी लता दिदींसोबतचे वैयक्तिक किस्से सांगितले. तसेच सांस्कृतिक विश्वाला लता दिदींनी दिलेल्या अतुल्य योगदानची माहिती दिली. “लता दिदींचा शारीरिक प्रवास अशावेळी पूर्णत्वास गेला, जेव्हा सगळा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यांनी भारताला स्वातंत्र्या पूर्वीपासून आपला आवाज दिला, देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा हा 75 वर्षांचा प्रवास त्यांच्या आवाजासोबतच झाला आहे.

आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी यावेळी, मंगेशकर कुटुंबियांमधील राष्ट्रप्रेमाच्या भावनेचाही उल्लेख केला. ते म्हणाले- “गाण्यासोबतच, लता दिदींच्या मनात कायम राष्ट्रभक्तीची भावना होती आणि या भावनेचे प्रेरणास्थान त्यांचे वडील होते.” यावेळी पंतप्रधानांनी एक किस्सा सांगितला, जेव्हा स्वातंत्र्यआंदोलनाच्या दरम्यान वीर सावरकर यांनी लिहिलेले एक गीत दीनानाथ मंगेशकर यांनी शिमला इथे ब्रिटिश व्हॉईसरॉयसमोर गायले होते. ह्या गीतात, सावरकरांनी थेट ब्रिटिश साम्राज्यालाच आव्हान दिले होते. राष्ट्रभक्तीची ही भावना, त्यांनी सहजपणे वारसा म्हणून आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवली, असे पंतप्रधान म्हणाले. लता दिदीसाठी, संगीत हीच पूजा होती, मात्र त्यांच्या अनेक गीतातून देशभक्ती आणि राष्ट्रसेवा करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते.

लता मंगेशकर यांच्या दीर्घ, बहुरंगी कारकीर्दीविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की. लताजी, “एक भारत, श्रेष्ठ भारत’चे जिवंत सूरमयी प्रतीक होत्या. त्यांनी 30 पेक्षा अधिक भाषांमधून हजारो गाणी गायलीत. मग ते मराठी असो, हिंदी, संस्कृत किंवा इतर कुठलीही प्रादेशिक भारतीय भाषा असो, त्यांचा सूर एकदम पक्का असे” असे पंतप्रधान म्हणाले.

संस्कृतीपासून ते श्रद्धेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लताजी यांचा आवाज संपूर्ण देशाला जोडण्याचे काम करतो. जागतिक स्तरावर देखील त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या, असे मोदी म्हणाले. त्यांचे स्वर, भारतातल्या प्रत्येक राज्यातील लोकांच्या मनात कोरले गेले आहेत. भारतीयत्व राखून संगीत अमर कसे करता येईल, हे त्यांनी दाखवून दिले, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी मंगेशकर कुटुंबीयांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी देखील ते बोलले.

भारतात, विकास म्हणजे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास असे आहे. या मंत्रातच, भारताचे ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्वज्ञान समावलेले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आणि देशाचा विकास केवळ भौतिक क्षमतेने होऊ शकत नाही. त्यासाठी आपली आध्यात्मिक चेतना देखील तेवढीच महत्वाची आहे. म्हणूनच आज, भारत योग, आयुर्वेद आणि पर्यावरणासारख्या क्षेत्रांत नेतृत्व करत आहे. “भारताच्या या योगदानात, आपले संगीत देखील महत्वाची भूमिका पार पाडू शकेल, असा मला विश्वास वाटतो. ही परंपरा आपण सगळे मिळून जिवंत ठेवूया. आपली तीच मूल्ये पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवूया. आणि संगीताला जागतिक शांततेचे माध्यम बनवूया” असा संदेश शेवटी पंतप्रधानांनी दिला.  

 

 

 

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage