
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानातील पोखरण येथे तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सरावाच्या निमित्ताने स्वदेशी संरक्षण क्षमतांचे समन्वित प्रदर्शन पाहिले. भारत शक्ती हा सराव स्वदेशी शस्त्रास्त्रे प्रणालीचे दर्शन घडवेल आणि देशाच्या पराक्रमाचा आधार असलेल्या आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवेल.
इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. "हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत" असे ते पुढे म्हणाले.
अत्याधुनिक एमआयआरव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज लांब पल्ल्याच्या अग्नी क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली, त्याबद्दल पंतप्रधानांनी सांगितले की जगातील काही मोजक्याच देशांकडे हे नवीन-युगाचे तंत्रज्ञान आणि सामर्थ्य आहे. आणि ही चाचणी संरक्षणातील आत्मनिर्भरतेच्या आपल्या यशाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा ठरली आहे.
"विकसित भारताची कल्पना आत्मनिर्भर भारताशिवाय शक्यच नाही", असे सांगत इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. आजचे उपक्रम हे या संकल्पाच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत खाद्यतेलापासून ते लढाऊ विमानांपर्यंत आत्मनिर्भरतेवर भर देत आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे यश भारताच्या रणगाडे, तोफगोळे, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि क्षेपणास्त्र प्रणालींद्वारे पाहिले जाऊ शकते, ते भारताचे सामर्थ्य दर्शवते असे पंतप्रधान म्हणाले. “शस्त्रास्त्रे, संपर्क प्रणाली उपकरणे, सायबर आणि अवकाश यांच्यासोबत आपण मेड इन इंडीयाच्या गगन भरारीचा अनुभव घेत आहोत. हीच भारत शक्ती आहे”, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. स्वदेशी बनावटीची तेजस लढाऊ विमाने, प्रगत हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, पाणबुड्या, विनाशिका, विमानवाहू युद्धनौका, प्रगत अर्जुन रणगाडे आणि तोफांचाही त्यांनी उल्लेख केला. भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकताना, धोरणात्मक सुधारणा, खाजगी क्षेत्रामध्ये सहभाग आणि या क्षेत्रातील एमएसएमई स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जात असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील संरक्षण कॉरिडॉरबद्दलचा संदर्भ देत, त्यात 7000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची माहिती त्यांनी दिली. शिवाय, आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना भारतात कार्यरत आहे. आयात करायच्या नाहीत अशा वस्तूंची यादी तयार केल्याबद्दल आणि या वस्तूंच्या भारतीय परिसंस्थेला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांचे अभिनंदन केले. गेल्या 10 वर्षांत भारतीय कंपन्यांकडून 6 लाख कोटी रुपयांची उपकरणे खरेदी करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या काळात देशाचे संरक्षण उत्पादन दुपटीने वाढून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. गेल्या 10 वर्षांत, 150 हून अधिक संरक्षण स्टार्टअप सुरू झाले आहेत आणि संरक्षण दलांनी त्यांच्याकडे 1800 कोटी रुपयांची मागणी नोंदवली आहे असे त्यांनी सांगितले.
“भारताच्या संरक्षण विषयक गरजांसाठीची आत्मनिर्भरता ही सैन्यदलाच्या आत्मविश्वासाची हमी आहे”, पंतप्रधान मोदी म्हणाले. युद्धात वापरली जाणारी शस्त्रे आणि उपकरणे स्वदेशी असली, तर सैन्यदलाची ऊर्जा अनेक पटींनी वाढते, हे त्यांनी अधोरेखित केले. भारताने गेल्या दहा वर्षांत स्वतःचे लढाऊ विमान, विमान वाहक, C295 वाहतूक विमान आणि विमानाची प्रगत यंत्रणा तयार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
भारतात पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची रचना, विकास आणि निर्मिती करण्याच्या मंत्रिमंडळाने अलीकडे घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देत, भविष्यातील संरक्षण क्षेत्राचा विकास तसेच रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. भारत हा संरक्षण सामुग्रीचा जगातील सर्वात मोठा आयातदार होता तेव्हाच्या काळाचे स्मरण करत, पंतप्रधानांनी संरक्षण निर्यातदार म्हणून भारताचा उदय झाल्याचा आणि 2014 च्या तुलनेत देशाच्या संरक्षण निर्यातीत आठ पटीने वाढ झाल्याचे अधोरेखित केले.
2014 पूर्वीचे संरक्षण घोटाळे, दारूगोळ्याची टंचाई आणि शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांच्या घसरलेल्या कामगिरीचे स्मरण करून, पंतप्रधानांनी शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांचे सात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रुपांतर केल्याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे एचएएल या तोट्यात असलेल्या कंपनीचे पुनरुज्जीवन करून विक्रमी नफा कमावणारी कंपनी बनवण्यात आल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी सीडीएसची निर्मिती, वॉर मेमोरियलची (राष्ट्रीय युद्ध स्मारक) स्थापना आणि सीमेवरील पायाभूत सुविधांचाही उल्लेख केला.
वन रँक वन पेन्शनच्या (OROP) अंमलबजावणीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, “सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी मोदी गॅरंटी म्हणजे काय, हे अनुभवले आहे.” राजस्थानमधील 1.75 लाख संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना OROP अंतर्गत 5,000 कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
देशाच्या आर्थिक सामर्थ्याच्या प्रमाणात सशस्त्र दलांची ताकद वाढते यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. ते म्हणाले की, जेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू तेव्हा संरक्षण दलाचे सामर्थ्यही नवीन उंची गाठेल. त्यांनी या प्रक्रियेतील राजस्थानची भूमिका अधोरेखित केली आणि "विकसित राजस्थान विकसित सेनेला बळ देईल" असे सांगितले.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी आणि नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
भारत शक्ती जमीन, हवाई, सागरी सायबर आणि अंतराळ क्षेत्रातील धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांच्या एकात्मिक परिचालन क्षमता प्रदर्शित करणाऱ्या वास्तववादी, समन्वयित, बहु-क्षेत्रीय परिचालनाला बळ देईल.
सरावात भाग घेणारी प्रमुख उपकरणे आणि शस्त्र प्रणालीमध्ये, T-90 (IM) रणगाडे, धनुष आणि सारंग गन सिस्टीम, आकाश वेपन्स सिस्टम, लॉजिस्टिक ड्रोन, रोबोटिक मुल्स, आधुनिक हलके हेलिकॉप्टर (ALH) आणि मानवरहित हवाई वाहनांची एक श्रेणी, यासह इतर सामुग्रीचा समावेश आहे. ज्याद्वारे, भारतीय लष्कराची जमिनीवरील प्रगत युद्ध आणि हवाई देखरेख क्षमता प्रदर्शित होत आहे.
भारतीय नौदलाने नौदलाची जहाज-रोधक क्षेपणास्त्रे, स्वयंचलित मालवाहतूक करणारी हवाई वाहने आणि हवाई लक्ष्य साधणारी यंत्रणा, याद्वारे देशाचे सागरी सामर्थ्य आणि आधुनिक तंत्र कुशलता प्रदर्शित केली. भारतीय वायुसेनेने स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजस, हलके युटिलिटी हेलिकॉप्टर आणि प्रगत हलके हेलिकॉप्टर तैनात केले, जे हवाई कारवाईमधील देशाची श्रेष्ठता आणि अष्टपैलुत्व सिद्ध करते. देशांतर्गत उपायांसह समकालीन आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याच्या आणि त्यावर मात करण्याच्या भारताच्या तयारीचे स्पष्ट संकेत देऊन, भारत शक्ती जागतिक स्तरावर भारताच्या देशांतर्गत संरक्षण क्षमतांची लवचिकता, नवोन्मेष आणि सामर्थ्य ठळकपणे दर्शवते. हा कार्यक्रम भारतीय सशस्त्र दलांचे सामर्थ्य आणि परिचालन क्षमता तसेच स्वदेशी संरक्षण उद्योगाची कल्पकता आणि वचनबद्धता प्रदर्शित करून, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाची प्रगती अधोरेखित करतो.
यही पोखरण है, जो भारत की परमाणु शक्ति का साक्षी रहा है, और यहीं पर हम आज स्वदेशीकरण से सशक्तिकरण का दम देख रहे हैं: PM @narendramodi pic.twitter.com/b7bWC6e6bC
— PMO India (@PMOIndia) March 12, 2024
विकसित भारत की कल्पना, आत्मनिर्भर भारत के बिना संभव नहीं है।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2024
भारत को विकसित होना है, तो हमें दूसरों पर अपनी निर्भरता को कम करना ही होगा: PM @narendramodi pic.twitter.com/pf3z58lvRO
भारत शक्ति। pic.twitter.com/lbSPXsaCP1
— PMO India (@PMOIndia) March 12, 2024