"आपल्या संकल्पांना नवी झळाळी देण्याचा हा दिवस आहे"
"भारतात शस्त्रे केवळ शस्त्रागारात ठेवून देण्यासाठी वापरली जात नाहीत तर संरक्षणासाठी वापरली जातात"
"आम्हाला रामाने बाळगलेल्या 'मर्यादा' (सीमा) माहीत आहेत, त्याच प्रमाणे आमच्या सीमांचे रक्षण कसे करायचे हे देखील माहीत आहे"
"प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर उभारले जाणारे मंदिर हे शतकानुशतकांच्या आम्हा भारतीयांच्या प्रतीक्षेसह बाळगलेल्या संयमाच्या विजयाचे प्रतीक आहे"
"भगवान श्रीरामाच्या विचारांचा भारत आपल्याला घडवायचा आहे".
"भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही तसेच सर्वात विश्वासार्ह लोकशाही म्हणून उदयास येत आहे"
"समाजातील दुष्प्रवृत्ती आणि भेदभाव नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण केली पाहिजे"

नवी दिल्लीत द्वारका येथे आयोजित रामलीला सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले आणि त्यांनी रावण दहन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की विजयादशमी हा सण अन्यायावर न्यायाच्या, अहंकारावर मानवतेच्या, क्रोधावर  संयमाने मिळवलेल्या विजयाचा सण आहे. हा दिवस आपण घेतलेल्या शपथा, आपण केलेले संकल्प यांना नवीन झळाळी देण्याचा सुद्धा आहे असे ते म्हणाले.

 

चंद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर ठीक दोन महिन्यांनी आपण यावेळी विजय दशमी साजरी करत आहोत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  या दिवशी केल्या जाणाऱ्या शस्त्रपूजन परंपरेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी जोर देऊन सांगितले की भारतात शस्त्रे केवळ शस्त्रागारात ठेवून देण्यासाठी वापरली जात नाहीत तर संरक्षणासाठी वापरली जातात.ते म्हणाले की, शक्तीपूजा म्हणजे संपूर्ण सृष्टीचे सुख, कल्याण, विजय आणि सर्जन अशा वैभवाची कामना करणे.  त्यांनी आपल्या भाषणात भारतीय तत्त्वज्ञानाच्या शाश्वत आणि आधुनिक पैलूंवर देखील भर दिला.  "आम्हाला रामाने बाळगलेल्या 'मर्यादा' (सीमा) माहित आहेत, त्याच प्रमाणे आमच्या सीमांचे रक्षण कसे करायचे हे देखील माहीत आहे", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

"प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर उभारले जाणारे मंदिर हे शतकानुशतकांच्या आम्हा भारतीयांच्या प्रतीक्षेसह बाळगलेल्या संयमाच्या विजयाचे प्रतीक आहे", असे ते म्हणाले. पुढच्या राम नवमीला अयोध्येच्या श्रीराम मंदिरात होणारी प्रार्थना संपूर्ण जगात आनंद पसरवेल असेही त्यांनी सांगितले. भगवान श्रीराम बस आनेवाले ही  है, प्रभू श्रीरामचंद्रांचे  आगमन हे अपरिहार्य आहे असे ते म्हणाले. प्रभू श्रीरामाच्या, रामराज्याच्या आगमनाचे रामचरितमानसामध्ये दिलेले संकेत नमूद करत पंतप्रधान म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे मिळत असलेले संकेत, भारताचे चंद्रयान चंद्रावर यशस्वीपणे उतरणे, नवे संसद भवन, नारीशक्ती वंदन अधिनियम, हीसुद्धा रामराज्य येण्याचीच लक्षणे आहेत. 

 

"भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही तसेच सर्वात विश्वासार्ह लोकशाही म्हणून उदयास येत आहे", ते म्हणाले. प्रभू राम यांचे आगमन अशा शुभ संकेतांच्यावेळी होत असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, “ एका प्रकारे, आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भारताचे भाग्य उजळणार आहे.”

 

समाजातील एकोपा, जातीयवाद, प्रादेशिकता आणि भारताच्या विकासाऐवजी स्वार्थाचा विचार करणाऱ्या विकृत शक्तींविरुद्ध जागृत राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. "आपण समाजातील दुष्कृत्ये आणि भेदभाव संपवण्याची शपथ घेतली पाहिजे", ते म्हणाले.

 

पंतप्रधानांनी, भारतासाठी पुढील 25 वर्षे खूप महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार केला. “आपल्याला भगवान रामाच्या विचारांचा भारत घडवायचा आहे. एक विकसित भारत, जो स्वावलंबी आहे, एक विकसित भारत, जो जागतिक शांततेचा संदेश देतो, विकसित भारत, जिथे प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा समान अधिकार आहे, एक विकसित भारत, जिथे लोकांमध्ये समृद्धी आणि समाधानाची भावना आहे. हा रामराज्य ची संकल्पना आहे”,असेही ते म्हणाले.

याच अनुषंगाने, पंतप्रधानांनी प्रत्येकाला पाणी बचत, डिजिटल व्यवहारांना चालना, स्वच्छता, वोकल फॉर लोकल, दर्जेदार उत्पादने बनवणे, परदेशात फिरायला जाण्याचा विचार करण्यापूर्वी संपूर्ण देश पाहणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, भरड धान्याचा वापर आणि त्याला प्रोत्साहन देणे, आरोग्याबाबत जागरूकता, आणि  सर्वात शेवटी "आपण किमान एका गरीब कुटुंबाचा त्यांच्या घरातील सदस्य बनून सामाजिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करणे."असे 10 संकल्प करण्यास सांगितले. जोपर्यंत देशात एकूण एक गरिबाला त्याच्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत, घर नाही, वीज, गॅस, पाणी, उपचार सुविधा नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers

Media Coverage

Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जानेवारी 2025
January 02, 2025

Citizens Appreciate India's Strategic Transformation under PM Modi: Economic, Technological, and Social Milestones