

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्ये होणा-या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.
देशातील नागरिकांना आणि जगभरातील ख्रिश्चन समुदायाला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी ख्रिसमसच्या समारंभात सहभागी झालो होतो आणि आज बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय)च्यावतीने आयोजित या कार्यक्रमात सर्वांबरोबर सामील होण्याचा सन्मान मिळत आहे. कॅथोलिक सीबीसीआय च्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त होत असलेला हा विशेष कार्यक्रम आहे. या उल्लेखनीय टप्प्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सीबीसीआय आणि त्याच्याशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.
याआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ‘सीबीसीआय’समवेत आपण ख्रिसमस सण साजरा केला होता, त्याचे स्मरण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी करून दिले आणि त्यानंतर आज सर्वजण सीबीसीआयच्या परिसरामध्ये जमले असल्याचे ते म्हणाले. तसेच “मी इस्टरच्या वेळी सेक्रेड हार्ट कॅथेड्रल चर्चलाही भेट दिली आहे आणि तुमच्या सर्वांकडून मला मिळालेल्या हार्दिक शुभेच्छा, प्रेम याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्याकडूनही असाच स्नेह मिळाला आहे. त्यांना मी या वर्षाच्या प्रारंभी इटलीमध्ये जी -7 शिखर परिषदेदरम्यान भेटलो होतो. गेल्या तीन वर्षांमध्ये आमची ही दुसरी भेट झाली. मी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले आहे, ” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क दौऱ्याच्या दरम्यान आपण कार्डिनल पिट्रो पॅरोलिन यांची भेट घेतली होती. अशा अध्यात्मिक भेटीमुळे सेवेची बांधिलकी, प्रेरणा अधिक बळकट होते.
परमपूज्य पोप फ्रान्सिस यांनी नुकतीच कार्डिनल ही पदवी बहाल केलेले महामानव कार्डिनल जॉर्ज कूवाकड यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीचे पंतप्रधानांनी स्मरण केले. भारत सरकारने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “ज्यावेळी एखादा भारतीय असे यश मिळवतो तेव्हा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी कार्डिनल जॉर्ज कूवाकड यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो,” असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी अनेक आठवणीही सांगितल्या, विशेषत: एक दशकापूर्वी युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून फादर ॲलेक्सिस प्रेम कुमार यांची सुटका करतानाच्या क्षणांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. फादर ॲलेक्सिस प्रेम कुमार यांना आठ महिने ओलिस ठेवण्यात आले होते आणि इतकी कठीण परिस्थिती असतानाही सरकारने त्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. “या कार्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेला आनंद, त्या आनंदाचा स्वर मी कधीही विसरणार नाही. तसेच जेव्हा फादर टॉम यांना येमेनमध्ये ओलिस ठेवले होते, त्यावेळीही आम्ही त्यांना परत आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आणि त्यांना माझ्या घरी बोलावण्याचे सद्भाग्य मला मिळाले. आखाती देशात संकटात सापडलेल्या परिचारिका भगिनींना वाचवण्याचे आमचे प्रयत्न तितकेच अथक होते आणि ते यशस्वी ठरले,” असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला की, हे प्रयत्न केवळ राजनैतिक मोहिमेचा भाग नाहीत तर कुटुंबातील सदस्यांना परत आणण्यासाठी असलेली भावनिक वचनबद्धता आहे. आजचा भारत, भारतीय कोठेही असला तरी, संकटसमयी त्यांची सुटका करणे हे आपले कर्तव्य समजतो.
पंतप्रधानांनी यावर भर दिला की,भारताचे परराष्ट्र धोरण कोविड-19 महासाथीच्या काळामध्ये दाखविल्याप्रमाणे राष्ट्रीय हितांसह मानवी हितांना प्राधान्य देते. अनेक देशांनी स्वतःच्या हितावर लक्ष केंद्रित केले असताना, भारताने निःस्वार्थपणे 150 देशांना औषधे आणि लस पाठवून मदत केली. याचा सकारात्मक जागतिक परिणाम झाला, गयाना सारख्या राष्ट्रांनी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक व्दीपकल्पांची राष्ट्रे, पॅसिफिक राष्ट्रे आणि कॅरिबियन देश देखील भारताच्या मानवतावादी प्रयत्नांची प्रशंसा करतात. भारताचा मानवकेंद्रित दृष्टीकोन 21 व्या शतकात जगाला उंचावण्यासाठी सज्ज आहे.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की,भगवान ख्रिस्तांची शिकवण ही प्रेम, सौहार्द आणि बंधुत्वावर भर देणारी आहे.ज्यावेळी हिंसाचार आणि हिंसक कारावायांमुळे समाजजीवन विस्कळीत होते, ते दुःखदायक असते. अलीकडेच जर्मनीतील ख्रिसमस मार्केटमध्ये आणि श्रीलंकेतील 2019 इस्टर बॉम्बस्फोटादरम्यान ज्यांना प्राण गमवावे लागले, त्या पीडितांना आपण श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा ख्रिसमस अधिक विशेष आहे कारण तो आशेवर केंद्रित असलेल्या जयंती वर्षाची सुरुवात आहे. “पवित्र बायबल आशेला सामर्थ्य आणि शांतीचा स्रोत मानते. आम्हाला आशा आणि सकारात्मकतेने देखील मार्गदर्शन केले जाते. मानवतेची आशा, चांगल्या जगाची आशा आणि शांतता, प्रगती आणि समृद्धीची आशा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी पुढे नमूद केले.
गेल्या 10 वर्षांत, भारतातील 250 दशलक्ष लोकांनी गरिबीवर मात केली आहे, या आशेने गरीबीवर विजय मिळवणे शक्य आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत देखील 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, हा आपला आत्मविश्वास आणि चिकाटीचा दाखला आहे. विकासाच्या या कालखंडात स्टार्ट-अप, विज्ञान, क्रीडा आणि उद्योजकता यासारख्या विविध क्षेत्रातील तरुणांसाठी संधींसह भविष्यासाठी नवीन आशा निर्माण झाली आहे. "भारतातील आत्मविश्वासपूर्ण तरुण देशाला प्रगतीच्या दिशेने नेत आहेत, ज्यामुळे आम्हाला विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, अशी आशा आहे", पंतप्रधान पुढे म्हणाले.
गेल्या 10 वर्षांत, भारतातील महिलांनी उद्योजकता, ड्रोन, विमानचालन आणि सशस्त्र दल यासारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय सशक्तीकरण साधले आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही हे त्यांची प्रगती अधोरेखित करते. अधिक महिला कामगार आणि व्यावसायिक कामगार दलात सामील होत असल्याने भारताच्या भविष्यासाठी नवीन आशा निर्माण होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की बायबल आपल्याला एकमेकांचे ओझे वाहण्याची शिकवण देते, ज्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेणे आणि एकमेकांच्या कल्याणाची जबाबदारी घेणे शिकतो. या विचारसरणीने संस्था आणि संघटना समाजसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. नवीन शाळा उभारणे, शिक्षणाद्वारे समाजाची उन्नती घडवणे किंवा सार्वजनिक सेवेसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की येशू ख्रिस्तानी जगाला करुणा आणि निःस्वार्थ सेवेचा मार्ग दाखवला. आपण ख्रिसमस साजरा करतो आणि येशूंचे स्मरण करतो जेणेकरून या मूल्यांचा आपल्या जीवनात समावेश करता येईल आणि आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देता येईल. हे केवळ आपले वैयक्तिक कर्तव्य नाही तर ती आपली सामाजिक जबाबदारी देखील आहे. आज आपला देश 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' या संकल्पाने पुढे जात आहे, प्रेरित होत आहे. अनेक विषय जे पूर्वी विचारात घेतले गेले नव्हते, पण मानवी दृष्टिकोनातून अत्यावश्यक होते, त्यांना आपण प्राधान्य दिले आहे. आपण सरकारला कडक नियम आणि औपचारिकतेतून बाहेर काढले. आपण संवेदनशीलतेला एक मापदंड बनवले. प्रत्येक गरिबाला कायमस्वरूपी घर मिळावे, प्रत्येक गावाला वीज मिळावी, लोकांच्या आयुष्यातील अंध:कार दूर करावा, स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, कोणी ही पैशांच्या अभावामुळे उपचारांपासून वंचित राहू नये हे सुनिश्चित करण्यासाठी आपण एक संवेदनशील प्रणाली तयार केली," असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की सरकारच्या उपक्रमांमुळे विविध समुदायांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांच्या नावाने घरे बांधल्याने त्यांना सशक्त बनवले जात आहे. नारी शक्ती वंदन कायद्याने संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे. मोदी म्हणाले की दिव्यांग समुदाय, जो एकेकाळी उपेक्षित होता, आता सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि रोजगार यासारख्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा प्राधान्याने समावेश केला जातो. संवेदनशील प्रशासन आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे हे त्यांनी अधोरेखित केले. स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाच्या निर्मितीपासून ते किसान क्रेडिट कार्ड आणि मत्स्य संपदा योजनेसारख्या उपक्रमांनी लाखो मच्छीमारांचे जीवन सुधारले आहे आणि अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.
पंतप्रधान म्हणाले, "लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी 'सबका प्रयत्न' म्हणजेच सामूहिक प्रयत्न याबद्दल बोललो होतो. राष्ट्राच्या भविष्याच्या जडणघडणीत प्रत्येक व्यक्तीची भूमिका किती महत्त्वाची आहे हे यावरून अधोरेखित झाले. सामाजिकदृष्ट्या जागरूक भारतीय हा
'स्वच्छ भारत' यांसारख्या महत्त्वपूर्ण चळवळी पुढे नेत आहेत, ज्यामुळे महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी सकारात्मक परिणाम झाले आहेत." श्री अन्न (भरड) ला प्रोत्साहन देणे, स्थानिक कारागिरांना पाठिंबा देणे आणि "एक पेड माँ के नाम" अभियान, ज्याद्वारे निसर्ग देवतेचा आणि आपल्या मातांचाही सन्मान केला जातो, यांसारख्या उपक्रमांना वेग आला आहे. ख्रिश्चन समुदायातील अनेक लोकही या प्रयत्नांमध्ये सक्रिय आहेत. या सर्व सामूहिक कृती विकसित भारताच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक आहेत.
पंतप्रधान म्हणाले की सामूहिक प्रयत्न देशाला पुढे नेतील याबाबत आपल्याला आत्मविश्वास आहे. "विकसित भारत हा आपला सामायिक उद्देश आहे आणि आपण मिळून तो साध्य करू. भावी पिढ्यांसाठी अधिक तेजस्वी भारत निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. पुन्हा एकदा, नाताळ आणि नविन वर्षासाठी मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो," असे म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सांगता केली.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
It is a moment of pride that His Holiness Pope Francis has made His Eminence George Koovakad a Cardinal of the Holy Roman Catholic Church. pic.twitter.com/9GdqxlKZnw
— PMO India (@PMOIndia) December 23, 2024
No matter where they are or what crisis they face, today's India sees it as its duty to bring its citizens to safety. pic.twitter.com/KKxhtIK4VW
— PMO India (@PMOIndia) December 23, 2024
India prioritizes both national interest and human interest in its foreign policy. pic.twitter.com/OjNkMGZC6z
— PMO India (@PMOIndia) December 23, 2024
Our youth have given us the confidence that the dream of a Viksit Bharat will surely be fulfilled. pic.twitter.com/OgBdrUEQDl
— PMO India (@PMOIndia) December 23, 2024