"भारताची चांद्रमोहीम म्हणजे विज्ञान आणि उद्योग या दोघांचेही यश"
"RAISE या बी-20 च्या संकल्पनेत I म्हणजे इनोव्हेशन(नवोन्मेष), मात्र इनोव्हेशनसह, या आय मध्ये मी इन्क्ल्युजीव्हनेस (समावेशन) सुद्धा पाहतो"
"आपल्या गुंतवणुकीसाठी सगळ्यात जास्त आवश्यक गोष्ट कुठली असेल तर ती आहे परस्पर विश्वास"
"जागतिक विकासाचे भवितव्य व्यापाराच्या भवितव्यावर अवलंबून आहे"
"कार्यक्षम आणि विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळी उभारण्यात भारताचे महत्त्वाचे स्थान "
"संधी आणि व्यवसायाचा आराखडा दोन्ही बाबतीत शाश्वतता महत्त्वाची"
"व्यवसाय करताना पृथ्वीवरील पर्यावरणाला बाधा पोहोचणार नाही अशा दृष्टीने, भारताने व्यवसायासाठी ग्रीन क्रेडिटची रुपरेषा तयार केली आहे"
"व्यवसायाने अधिकाधिक लोकांची क्रयशक्ती (खरेदीक्षमता) वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण स्वतःपुरते पाहण्याचा दृष्टीकोन सर्वांचे नुकसान करेल"
"आपण निश्चितपणे 'आंतरराष्ट्रीय ग्राहक सेवा दिना' बाबत विचार केला पाहिजे. यामुळे व्यवसाय आणि ग्राहकांमधील विश्वास दृढ होण्यास मदत होईल"
"क्रिप्टोकरन्सी संदर्भात अधिक एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे"
"कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर व्हावा या दृष्टीने जागतिक व्यावसायिक समुदाय आणि सरकारांना एकत्र काम करावे लागेल"
"परस्परांशी जोडलेले जग म्हणजे, सामायिक उद्देश, सामायिक वसुंधरा, सामायिक समृद्धी आणि सामायिक भविष्य यांचा विचार करणारे जग"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत बी-20 परिषद भारत 2023, या बैठकीला संबोधित केले. भारतातील या बी-20 परिषदेने, जगभरातील धोरणकर्ते, आघाडीचे व्यावसायिक-उद्योजक आणि तज्ञांना, बी-20 भारताच्या घोषणापत्रावर चर्चा आणि विचारमंथनासाठी एकत्र  आणले आहे.  जी-20 मध्ये सादर करावयाच्या, 54 शिफारशी आणि 172 धोरणात्मक कार्यवाहींचा, या घोषणापत्रात समावेश आहे.

बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांचा भर, चंद्रयानाने  23 ऑगस्ट रोजी चंद्रावर केलेल्या यशस्वी अलगद अवतरणाचा आनंद साजरा करण्यावर होता.  ते म्हणाले की भारतात पारंपरीक सण पुढे येऊ घातले आहेतच, मात्र चंद्रयानाच्या यशाने सण आधीच साजरे होऊ लागले आहेत आणि समाज तसेच व्यवसायही उत्सवाच्याच मानसिकतेमध्ये आहेत. चांद्र मोहिमेतील इस्रोच्या भूमिकेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी या मोहिमेतील उद्योगाच्या भूमिकेचे महत्व देखील हे सांगत मान्य केले की चंद्रयानाच्या अनेक सुट्या भागांचा पुरवठा, खाजगी क्षेत्र आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांनी केला आहे.   "हे विज्ञान आणि उद्योग या दोघांचेही यश आहे", असे ते म्हणाले.

 

भारताचे हे यश भारतासोबतच संपूर्ण जग साजरे करत आहे आणि एक जबाबदार अंतराळ कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जाणे हे त्यामागचे कारण आहे. पंतप्रधान म्हणाले की हा उत्सव, रिस्पॉन्सिबिलिटी (जबाबदारी), अॅक्सलरेशन(गतिमानता), इनोव्हेशन (नवोन्मेष), सस्टेनेबिलिटी (शाश्वतता)आणि इक्वॅलिटी (समानता) चा आहे, जी आजच्या बी-20 ची संकल्पना आहे. ही संकल्पना मानवता आणि एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य याबाबत आहे असेही त्यांनी सांगितले.

बी-20 च्या या संकल्पनेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की 'R.A.I.S.E' या बी-20 च्या संकल्पनेत I म्हणजे इनोव्हेशन(नवोन्मेष) चा असला, तरी इनोव्हेशनसह तो,  इन्क्ल्युजीव्हनेसचे (समावेशन) सुद्धा प्रतिनिधित्व करतो. आफ्रिकी देशांच्या समुहाला जी-20 मध्ये स्थायी  सदस्यत्वासाठी आमंत्रित करताना हाच दृष्टीकोन अवलंबल्याची माहिती त्यांनी दिली.  पंतप्रधान पुढे म्हणाले की बी-20 मध्येही आफ्रिकेचा आर्थिक विकास याच मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.  “ या मंचाच्या (बी-20) सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा या गटावर(जी-20) थेट परिणाम होईल असा भारताला ठाम विश्वास आहे”, असे  पंतप्रधान म्हणाले.  त्यांनी नमूद केले की, इथे घेतलेल्या निर्णयांना मिळणाऱ्या यशाचा थेट परिणाम, जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड देताना आणि शाश्वत विकास साधण्यावर होईल.

शतकातून  एखादेवेळी येणाऱ्या कोविड-19 महासाथी सारख्या आपत्तीतून मिळालेल्या धड्यांविषयी बोलताना मोदी म्हणाले की, आपल्या  गुंतवणुकीसाठी सगळ्यात जास्त आवश्यक गोष्ट कुठली असेल तर ती आहे परस्पर विश्वास, हे या महासाथीने आपल्याला शिकवले आहे.  पंतप्रधान म्हणाले की, या महासाथीने परस्पर विश्‍वासाची इमारत डळमळीत केली असताना, भारत परस्पर विश्वासाचा ध्वज उंचावत, आत्मविश्वासाने आणि उदार सहकाऱ्याच्या भावनेने उभा राहिला.  पंतप्रधान म्हणाले की, जगाचे औषधालय या आपल्या बिरुदाला जागत भारताने 150 हून अधिक देशांना औषधे उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी, भारताने लसीचे उत्पादन वाढवले. भारताची लोकशाही मुल्ये नेहमीच  आपल्या कृतीतून आणि प्रतिसादातून दिसून येतात, असेही पंतप्रधानांनी सांगितले.  ते म्हणाले, "भारतातील 50 हून अधिक शहरांमध्ये झालेल्या आणि होत असलेल्या जी-20 बैठकांमधून  भारताची लोकशाही मूल्ये दिसून येत आहेत."

भारतासोबत भागीदारी करण्यात जागतिक व्यवसाय उद्योग समुदायाला आकर्षित करणारी बाब म्हणजे भारताच्या गुणवान युवावर्गासह, भारताने घडवून आणलेल्या डिजिटल क्रांतीचा त्यांनी उल्लेख केला. भारतासोबतची तुमची मैत्री जेवढी गाढ होईल, तेवढीच सुबत्ता दोघांनाही लाभेल," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.

ते म्हणाले," व्यवसाय, क्षमतेचे रुपांतर सुबत्तेत, अडथळ्यांचे रूपांतर संधीत,महत्त्वकांक्षांचे रूपांतर यश प्राप्तीत करू शकतो. व्यवसाय, मग तो छोटा असो वा मोठा, जागतिक असो वा स्थानिक, प्रत्येकाला प्रगतीची दारे निश्चितपणे उघडून देऊ शकतो." म्हणूनच पंतप्रधान पुढे म्हणाले," जागतिक विकासाचे भवितव्य हे व्यवसायाच्या भवितव्यावर अवलंबून आहे."

कोविड-19 महामारीला सुरुवात होत असतानाच्या काळापासून आपल्या जगण्यात झालेल्या बदलांवरही पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय ठरू शकणारे आणि कधीही बदलता येणार नाहीत, अशा बदलांना त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखीत केलं.  ज्यावेळी जगाला सर्वात जास्त गरज होती, त्यावेळीच ती नेमकी खंडित  झाली असं म्हणत, त्यांनी जागतिक पुरवठा साखळीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आज जग ज्या ज्या अडथळ्यांना सामोरे जात आहे त्यावरच्या उपाययोजनांसाठी भारत हेच उत्तर असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले. यावेळी त्यांनी आज जगात अस्तित्वात असलेल्या विश्वासार्ह पुरवठा साखळीच्या निर्मीती प्रक्रियेतल्या भारताचे स्थान  अधोरेखित केले  आणि जागतिक व्यवसाय उद्योगांच्या  योगदानावर भर दिला.

 

जी-20 समुह देशांमधल्या व्यवसाय उद्योगांसाठी बी 20 एक मजबूत व्यासपीठ म्हणून उदयाला आल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. आपण शाश्वततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. शाश्वतता म्हणजे एक संधी आणि व्यवसायिक प्रारुपही आहे, हे लक्षात घेऊनच जागतिक व्यवसाय उद्योग क्षेत्राने पुढची वाटचाल करायला हवी असे आवाहन त्यांनी केले. यासाठी त्यांनी सुपरफूड तसेच पर्यावरणपूरक म्हणून नावारुपाला आलेल्या आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी उत्तम साधन ठरलेल्या भरडधान्यांचे उदाहरण दिले. भरडधान्यांचे प्रारुप हे अर्थव्यवस्था आणि जीवनशैली या दोन्ही दृष्टिकोनातून लाभ देणारे प्रारुप ठरले असल्याचे ते यावेळी म्हणाले. चक्रीय अर्थव्यवस्था आणि हरित ऊर्जेचाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. भारतानं स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांमधून जगाला सोबत घेऊन जाण्याचा भारताचा दृष्टिकोन अधोरेखीत होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

कोरोनानंतरच्या काळात जगभरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाली आहे, आपल्या दैनंदिन जगण्यातही त्याचं प्रतिबींब ठळकपणे दिसून येत असल्याचे निरीक्षण पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मांडले. अशाप्रकारच्या कोणत्याही घटनेमुळे भविष्यात काय परिणाम होऊ शकतील या दिशेने लोक विचार करू लागले असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या व्यावसायिक - उद्योजकांनी तसेच समाजानेही याच दृष्टीकोनातून पृथ्वीकडे पाहायला हवे, आणि आपल्या निर्णयांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो याचे विश्लेषणही करत राहीले पाहीजे असा सल्ला त्यांनी दिला. पृथ्वीचे कल्याण ही आपलीही जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केले. यावेळी पंतप्रधानांनी मिशन लाईफ या अभियानाबद्दल बोलताना  पृथ्वीसाठी सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा एक गट किंवा समूह तयार करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट असल्याचे सांगीतले. जेव्हा आपली जीवनशैली आणि व्यवसाय उद्योग  पृथ्वीसाठीही सकारात्मक असतील, त्यावेळी आपल्यासमोरच्या निम्म्या समस्या कमी होतील ही बाब त्यांनी अधोरेखित केली . आपण पर्यावरणानुसार जगण्याची पद्धत आणि व्यवसाय जुळवून घ्यायला हवेत यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.  भारताने व्यवसाय उद्योगांसाठी भारत ग्रीन क्रेडीटचा  आराखडा तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. या आराखड्यात पृथ्वीच्या दृष्टीने आपल्या सकारात्मक कृती काय असाव्यात यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितलं. जगभरातील सर्व दिग्गज व्यवसायायिकांनी भारताच्या या प्रयत्नांना साथ द्यावी  आणि या उपक्रमाला जागतिक चळवळ बनवावं असे आवाहन त्यांनी केले.

आपण व्यवसाय उद्योगांबाबतचा आपल्या पारंपारिक दृष्टिकोनाचा पुनर्विचार करायला हवा असे पंतप्रधान म्हणाले. आपण ब्रँड आणि विक्रीच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. "एक व्यवसाय म्हणून, आपण आपल्यासाठी दीर्घकालीन लाभ देणारी परिसंस्था तयार करण्यावरही लक्ष केंद्रित करायला हवे असे ते म्हणाले . भारताने गेल्या काही वर्षांत राबवलेल्या धोरणांमुळे अवघ्या 5 वर्षांमध्ये 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व लोक बाजारपेठांसाठीचे नवे ग्राहक आहेत. हा नवमध्यमवर्ग देखील भारताच्या विकासाला गती देत आहे ही बाब त्यांनी नमूद केली. सरकारने गरिबांसाठी केलेल्या कामाचा खराखूरा फायदा हा आपला मध्यमवर्गीय समाज तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्राला झाल्याचे त्यांनी सांगितले.  आपण केवळ स्वतःचा विचार केला तर अशा स्वयंकेंद्री दृष्टिकोनामुळे प्रत्येकाचे नुकसान होईल, हे समजून घेत अधिकाधिक लोकांची क्रय शक्ती  कशी वाढीला लागेल यावर उद्योजकांनी लक्ष केंद्रित करायला हवे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. भूगर्भातील  महत्वाची खनीजे आणि धातूंच्या उपलब्धतेत जगभरात असमानता आहे, मात्र त्याची गरज ही सार्वत्रिक आहे ही बाब त्यांनी अधोरेखीत केली. म्हणूनच हा साठा ज्यांच्याकडे आहे त्यांनी ही आपली जागतिक जबाबदारी म्हणून पाहायला हवे, नाही तर त्यामुळे वसाहतवादाच्या नव्या प्रारुपाला चालना मिळेल असे ते म्हणाले.

 

उत्पादक आणि ग्राहकांच्या हितांच्या बाबतीत समतोल साधला गेला तरच लाभ देणारी बाजारपेठ टिकून राहू शकते आणि हेच तत्व देशांनाही लागू होते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उत्पादक देशांनी इतर देशांना केवळ बाजारपेठ मानूनच वाटचाल सुरू ठेवली तर त्यामुळे उत्पादक देशांचेही नुकसानच होईल ही बाबही त्यांनी ठळकपणे नमूद केली. प्रगतीमध्ये सर्वांना समान भागीदार म्हणून समाविष्ट करून घेणे हाच पुढे वाटचाल करत राहण्याचा मार्ग असल्याचे ते यावेळी म्हणाले. ग्राहक हा व्यक्ती असो वा देश मात्र जगभरातील व्यवसाय उद्योग ग्राहक केंद्री कसे होऊ शकतील याबद्दल या परिषदेत उपस्थित  असलेल्या उद्योजकांनी विचार करावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. ग्राहकांसोबतच उद्योजकांच्या हिताची काळजी घेणेही गरजेचे आहे, त्यासाठी दरवर्षी अशा मोहीमेचे आयोजन करावे अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. जगभरातले उद्योजक दरवर्षी एकत्र येऊन ग्राहकांच्या आणि आपल्यासाठीच्या बाजारपेठांच्या हितासाठी स्वत:ची वचनबद्धता व्यक्त करू शकतील का असा सल्लावजा प्रश्नही पंतप्रधानांनी यावेळी विचारला.

जागतिक व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या रुचीबाबत चर्चा करण्यासाठी एक दिवस निश्चित करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केले. जेव्हा आपण ग्राहकांच्या हक्कांबद्दल बोलतो तेव्हा आपण ग्राहकांच्या  हितरक्षणाची जाणीव ठेवायला नको का त्यामुळे  ग्राहकांची अनेक हक्कांची आपोआपच काळजी घेतली जाईल. आपण नक्कीच आंतरराष्ट्रीय ग्राहक हित दिवस यासाठीच्या पद्धतीबाबत  आपण  विचार केला पाहिजे असं ते म्हणाले. यामुळे व्यापार आणि ग्राहकांमधील परस्पर विश्वास अधिक बळकट होईल असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की ग्राहक म्हणजे केवळ ठराविक भौगोलिक परिघातील किरकोळ ग्राहकांपर्यंत मर्यादित नसून अशी राष्ट्र सुद्धा जे जागतिक व्यापार, जागतिक वस्तू आणि सेवा यांचे ग्राहक आहेत.

जागतिक व्यापारात आघाडीवर असणाऱ्या उद्योगांची उपस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधानांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्न उद्धृत केले आणि व्यापार आणि मानवतेचं भवितव्य या प्रश्नांच्या उत्तरांवर निर्भर असल्याचं प्रतिपादन केलं. यांच्या उत्तरांच्या संबंधात  ते  म्हणाले की या प्रश्नांची उत्तरे प्राप्त होण्यासाठी परस्पर सहकार्य आवश्यक आहे. वातावरण बदल, ऊर्जा क्षेत्रातील समस्या, अन्न वितरण साखळीतला असमतोल, जलसुरक्षा. सायबर सुरक्षा यासारख्या समस्यांचा व्यापारावर मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे यावर मात करण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर त्यांनी भर दिला. दहा-पंधरा वर्षांपूर्वी ज्या  समस्यांचा  कोणी विचारही करू शकणार नाही अशा मुद्यांना स्पर्श करत त्यांनी  क्रिप्टो करन्सीशी संबंधित समस्यांचा उल्लेख केला. याबाबत एकत्रित दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे असं सांगत सर्व संबंधितांच्या समस्या सोडवण्यासाठी एक जागतिक आराखडा आखण्याची सुचना पंतप्रधानांनी केली. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतही असाच दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि उत्सुकता अधोरेखित करत कौशल्य आणि पुनकौशल्य    यासंदर्भात  काही नैतिक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत असं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच, काही अनुचित पूर्वग्रह  आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याबाबतही विचार करणे आवश्यक आहे असे म्हणाले.  अशा प्रकारच्या समस्या एकत्रितपणे सोडवल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. जागतिक समुदाय आणि सरकारांना नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार वाढवण्यासाठी एकत्रित काम करणं गरजेचं असल्याचं ते  म्हणाले. विविध क्षेत्रांमधल्या संभाव्य  अडथळ्यांबाबत  संवेदनशील  राहणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं.

 

व्यापार सीमा ओलांडून यशस्वीपणे पुढे गेला  आहे मात्र आता व्यापार विशिष्ट   स्तरापलीकडे  नेणे आवश्यक आहे असं ते आपल्या संबोधनाचा समारोप करताना म्हणाले. यासाठी पुरवठा साखळ्यांमध्ये लवचिकता आणि शाश्वतता आणणं आवश्यक असेल  यावर त्यांनी भर दिला. B-20 परिषदेने सामायिक  परिवर्तनाचा मार्ग मोकळा केला असल्याचं त्यांनी सांगितलं. परस्परांशी जोडलेलं जग हे केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडलं गेलं नाही हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे केवळ सामाजिक मंच सामायिक करणं नसून सामायिक हेतू, सामायिक ग्रह, सामायिक समृद्धी आणि सामायिक भवितव्य हे सुद्धा यात अंतर्भूत आहे असं पंतप्रधान म्हणाले.

 

पार्श्वभूमी

व्यवसाय  20 (B20) हा G20  चा जागतिक व्यापार समुदायांबरोबर एकत्रित चर्चा करण्यासाठीचा मंच आहे. याची स्थापना 2010 साली झाली असून B20 हा G20 मधला अत्यंत महत्त्वपूर्ण गट असून यात अनेक कंपन्या आणि व्यापारी संघटना सहभागी आहेत. B20 हा आर्थिक वाढ आणि विकासाला उत्तेजन देण्यासाठी ठोस कृतिशील धोरणाची शिफारस करण्यासाठी कृतीशील आहे.

25 ते 27 ऑगस्ट दरम्यान ही तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली.याची संकल्पना R.A.I.S.E अर्थात जबाबदार, गतिमान, सूजनशील, शाश्वत आणि  न्याय्य व्यापार ही आहे. सुमारे 55 देशातले 1500 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Budget touches all four key engines of growth: India Inc

Media Coverage

Budget touches all four key engines of growth: India Inc
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM congratulates musician Chandrika Tandon on winning Grammy award
February 03, 2025

The Prime Minister today congratulated musician Chandrika Tandon on winning Grammy award for the album Triveni. He commended her passion towards Indian culture and accomplishments as an entrepreneur, philanthropist and musician.

In a post on X, he wrote:

“Congratulations to @chandrikatandon on winning the Grammy for the album Triveni. We take great pride in her accomplishments as an entrepreneur, philanthropist and ofcourse, music! It is commendable how she has remained passionate about Indian culture and has been working to popularise it. She is an inspiration for several people.

I fondly recall meeting her in New York in 2023.”