सर्व देशांच्या मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो आणि या दोन दिवसीय शिखर परिषदेत तुम्ही या क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. मला विश्वास आहे की, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञ मंडळी इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जे आपल्या सर्वांच्या वचनबद्धतेचे आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि 80 हजार झाडे लावण्याचा आणि ती ही आईच्या नावाने लावण्याचा एक मोठा उपक्रम आपले मंत्री नायडू जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला. मात्र मी आणखी एका विषयाकडे तुमचे लक्ष आकर्षित करू इच्छितो, आपल्या देशात जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते, तेव्हा तो आनंद एका वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो; आणि आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी जे काही गणित मांडले आहे, ते म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते तेव्हा त्या व्यक्तीने सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजेच एक हजार वेळा पूर्ण चंद्र पाहिलेला असतो. याचा अर्थ या क्षेत्रातील आपल्या संघटनेने देखील एक हजार पौर्णिमा पाहिल्या आहेत आणि उड्डाण करून एक प्रकारे त्याला जवळून पाहण्याचा अनुभव देखील घेतला आहे. तर या पृथ्वीच्या लाटेतही 80 वर्षांचा हा अविस्मरणीय प्रवास, यशस्वी प्रवास अभिनंदनास पात्र आहे.
मित्रहो,
हा जो विकास होत आहे, यामध्ये नागरी विमान वाहतुकीची खूप मोठी भूमिका आहे. भारताची जी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, त्या सर्व क्षेत्रांपैकी एक आपले विमान वाहतूक क्षेत्र देखील आहे. आपण या क्षेत्राच्या माध्यमातून लोक, संस्कृती आणि समृद्धी यांना जोडण्याचे काम करत आहोत. 4 अब्ज लोक, वेगाने वाढणारा मध्यमवर्ग आणि त्यामुळे वाढणारी मागणी ही या क्षेत्राच्या वाढीसाठी एक मोठी प्रेरक शक्ती आहे. या प्रदेशात संधींचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून आम्ही पुढे मार्गक्रमण करत आहोत; आणि एक असे जाळे जे आर्थिक विकासाला चालना देईल, नवोन्मेषाला गती देईल, शांतता आणि समृद्धी मजबूत करेल. विमान वाहतुकीचे भविष्य सुरक्षित करणे, ही आपली सामायिक वचनबद्धता आहे. येथे तुम्ही सर्वांनी नागरी विमान वाहतुकीशी संबंधित संधींवर गांभीर्याने विचारमंथन केले आहे. तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांमुळे आज दिल्ली घोषणापत्र आपल्यासमोर आहे. हे घोषणापत्र प्रादेशिक संपर्क व्यवस्था, नवोन्मेष आणि विमान वाहतूक क्षेत्रातील शाश्वत विकासाचा आपला संकल्प पुढे नेईल. मला विश्वास आहे की प्रत्येक मुद्द्यावर जलद गतीने कृती केली जाईल. या घोषणापत्राची आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी करू शकू आणि सामूहिक शक्तीनिशी नवीन शिखरे गाठू. आशिया प्रशांत क्षेत्रात विमान वाहतूक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी ज्ञान, कौशल्य आणि संसाधने सामायिक केल्यामुळे कदाचित आपली ताकद आणखी वाढेल. आपल्याला पायाभूत सुविधांमध्ये आणखी गुंतवणूक करावी लागेल; आणि त्यालाही सर्व संबंधित देशांमध्ये नैसर्गिक प्राधान्य असावे लागेल. मात्र केवळ पायाभूत सुविधा असून उपयोगाचे नाही, कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान अद्ययावत करण्याची ही निरंतर प्रक्रिया त्याच्या विकासासाठी महत्त्वाची आहे आणि ती देखील आपली एक प्रकारची दुसरी गुंतवणूक असेल असे मला वाटते. विमान प्रवास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्हाला हवाई प्रवास सुरक्षित, परवडणारा आणि सर्वांसाठी सुलभ बनवायचा आहे; आणि यासाठी आपले हे घोषणापत्र आणि आपले सामूहिक प्रयत्न आणि आपला एवढा प्रदीर्घ अनुभव आपल्याला खूप उपयोगी पडेल, असा माझा विश्वास आहे.
मित्रहो,
आज इथे तुमच्यासोबत मी भारताचा अनुभव सामायिक करू इच्छितो. आज भारत हा जगातील अव्वल नागरी विमान वाहतूक परिसंस्थेचा एक मजबूत आधारस्तंभ बनला आहे. आमच्याकडे नागरी विमान वाहतूक क्षेत्राची वाढ अभूतपूर्व आहे. अवघ्या एका दशकात भारताने खूप मोठे परिवर्तन घडवून दाखवले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, विमान प्रवास विशिष्ट वर्गापुरता मर्यादित न राहता समावेशक झाला आहे. कारण एक काळ असा होता की भारतात विमान प्रवास हा काही विशिष्ट वर्गातील लोकांसाठीच होता. काही मोठ्या शहरांमध्ये उत्तम हवाई कनेक्टिव्हिटी होती. काही मोठे लोक सातत्याने विमान प्रवासाचा लाभ घेत होते. दुर्बल आणि मध्यमवर्गीयांना क्वचित कधीतरी, नाईलाजाने प्रवास करावा लागला तर जाणे व्हायचे मात्र सामान्यांच्या आयुष्यात तो नव्हता; परंतु आज भारतातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज आमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्येही तेथील नागरिक तिथून विमान प्रवास करत आहेत. यासाठी आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, धोरणात्मक बदल केले आहेत आणि व्यवस्था विकसित केली आहे. मला विश्वास आहे की तुम्ही भारताच्या उडान योजनेचा नक्कीच अभ्यास कराल, प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या या अद्भुत योजनेने भारतात विमान वाहतूक सर्वसमावेशक बनवली आहे. या योजनेने विमान प्रवास भारतातील छोटी शहरे आणि निम्न मध्यमवर्गीयांपर्यंत पोहचवला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 14 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला आहे. यापैकी लाखो लोक तर असे आहेत ज्यांनी पहिल्यांदाच आतून विमान पाहिले आहे. उडान योजनेमुळे निर्माण झालेल्या मागणीमुळे अनेक लहान शहरांमध्ये नवीन विमानतळ तयार झाले आहेत आणि शेकडो नवीन मार्ग बनले आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल आणि जसे नायडूजी म्हणाले, 10 वर्षात भारतातील विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. इतर कामांमध्ये देखील आम्ही वेगाने प्रगती करत आहोत. एकीकडे आम्ही छोट्या शहरांमध्ये विमानतळ बांधत आहोत, तर दुसरीकडे मोठ्या शहरांमधील विमानतळे अधिक आधुनिक बनवण्याच्या दिशेने आम्ही जलद गतीने काम करत आहोत.
भविष्यातील भारत हवाई संपर्काच्या बाबतीत जगातील सर्वात जास्त संपर्क सुविधा असलेल्या क्षेत्रांपैकी एक बनणार आहे, याची जाणीव आपल्या हवाई सेवा प्रदात्यांना देखील आहे. हेच कारण आहे की भारतातील हवाई सेवा प्रदान करणाऱ्या संस्थांनी 1200हून अधिक अधिक नव्या विमानांची मागणी नोंदवली आहे. नागरी विमान वाहतुकीची वाढ, विमाने आणि विमानतळापर्यंत सीमित नाही. भारतात विमान वाहतूक क्षेत्र रोजगार निर्मितीला देखील गती देत आहे. कुशल वैमानिक आणि कर्मचारी वर्ग तसेच अभियंते असे अनेक रोजगार तयार होत आहेत. देखभाल, दुरुस्ती आणि कार्यान्वयन या ‘एमआरओ’ सेवांना बळ मिळावे या दिशेनेही आम्ही एका मागे एक निर्णय घेऊन पुढे वाटचाल करत आहोत. यामुळे उच्च कौशल्यपूर्ण रोजगारांची निर्मिती होत आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत सर्वोत्कृष्ट एव्हिएशन हब बनण्याचे लक्ष समोर ठेऊन भारत अग्रेसर होत आहे. जिथे 4 अब्ज डॉलर्सचा एमआरओ उद्योग असेल त्यासाठी आम्ही देखभाल, दुरुस्ती आणि कार्यान्वयन धोरण बनवले आहे. श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरांमध्ये हवाई संपर्क सुविधा प्राप्त झाल्याने भारतातील शेकडो नवीन शहरे वाढीची नवी केंद्रे बनतील.
आपण सर्वजण मल्टी पोर्ट सारख्या नवोन्मेषाशी परिचित आहात. हे हवाई वाहतुकीचे एक असे प्रारूप आहे जे शहरांच्या प्रवास सुलभीकरणात वाढ करत आहे. आम्ही भारताला आधुनिक हवाई वाहतुकीसाठी देखील तयार करत आहोत. तो दिवस दूर नाही जेव्हा एअर टॅक्सी मधून प्रवास प्रत्यक्षात शक्य होण्याची आणि सामान्य होण्याची देखील शक्यता आहे. महिला नेतृत्वाचा विकास ही आमची वचनबद्धता आहे आणि तुम्ही पाहिलेच असेल की जी-20 शिखर परिषदेत काही एक जे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यात महिला नेतृत्वाच्या विकासासंबंधीत देखील निर्णय होते. आपले हवाई वाहतूक क्षेत्र महिला नेतृत्व विकासाचे मिशन पूर्ण करण्यात मदत करत आहे. भारतातील एकूण वैमानिकांपैकी जवळपास 15% वैमानिक महिला आहेत. महिला वैमानिकांची जागतिक सरासरी केवळ 5% आहे तर भारतातील महिला वैमानिकांचे प्रमाण 15% आहे. भारताने हे क्षेत्र अधिकाधिक महिला अनुकूल बनवण्यासाठी आवश्यक असणारी मार्गदर्शक सूचीका देखील जारी केली आहे. यामध्ये महिलांसाठी रिटर्न टू वर्क धोरण देखील आहे, महिलांसाठी विशेष नेतृत्व आणि मार्गदर्शक कार्यक्रमाला देखील आम्ही बळ दिले आहे
भारताने ग्रामीण क्षेत्रात विशेष करून कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरा संदर्भात एक खूप मोठा महत्त्वकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. आम्ही गावोगावी ड्रोन दीदी अभियानातून प्रशिक्षित ड्रोन पायलट चा एक समूह तयार केला आहे. भारताच्या हवाई क्षेत्राचे एक नवीन आणि विलक्षण वैशिष्ट्य आहे - डीजी यात्री उपक्रम, हा सुलभ आणि विना व्यत्यय हवाई प्रवासाठीचा डिजिटल पर्याय आहे. यामध्ये फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विमानतळावर पार कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रापासून प्रवाशांना मुक्ती मिळते आणि त्यांच्या वेळेची बचत होते. डीजी यात्रा कार्यक्षम आणि सोयीस्कर तर आहेच, याशिवाय यामध्ये भविष्यातील प्रवासांच्या पद्धतीची झलक देखील पहायला मिळते. आपली राज्ये इतिहास, परंपरा आणि विविधतेने समृद्ध आहे कारण हजारो वर्ष जुन्या सांस्कृतिक वारशाचे आपण धनी आहोत, महान परंपरांचे आपण धनी आहोत. आपली संस्कृती आणि परंपरा हजारो वर्ष जुन्या आहेत. अशाच कारणांमुळे संपूर्ण जग आपल्या देशाकडे आकर्षित होत आले आहे. एकमेकांच्या पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देखील आपण मदत केली पाहिजे. जगात कित्येक देशात भगवान बुद्धांची पूजा केली जाते. भारताने एक बुद्धिस्ट सर्किट विकसित केले आहे. कुशीनगरमध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील बनवले आहे. जर आपण संपूर्ण आशिया खंडात भगवान बुद्धांशी संबंधित असलेल्या तीर्थांना एक दुसऱ्यांशी संलग्न करण्याचे जर अभियान सुरू केले तर ते हवाई वाहतूक क्षेत्राला देखील आणि या तीर्थक्षेत्रांशी संबंधित देशांना देखील, तसेच सामान्य रूपाने प्रवाशांसाठी देखील खूप लाभदाय ठरेल असे एक प्रारूप आपण तयार करू शकतो, आणि आपणही या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. आणि या प्रकारच्या प्रवाशांना एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जाण्यासाठी एकाच प्रकारचे सर्व समावेशक प्रारूप जर आपण विकसित केले तर त्याचा संबंधित सर्व देशांना देखील लाभ मिळेल याची हमी आहे. जर आपण एक आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सर्किट विकसित केले तर याच्याशी संबंधित सर्व देशाच्या प्रवाशांना आणि सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होईल. आशिया प्रशांत क्षेत्रातील देश आणखी एका क्षेत्रात सहयोग वाढवू शकतील.
आशिया प्रशांत क्षेत्रात आता व्यापारी केंद्र देखील बनत आहे. जगभरातील व्यापारी अधिकारी किंवा कर्मचारी या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या कारणाने काही लोकांनी या क्षेत्रात आपली कार्यालये स्थापित करणे स्वाभाविकच होते, त्यामुळे त्यांच्या व्यापारी हालचाली देखील वाढत आहेत. असे कोणते सामान्य मार्ग आहेत ज्यावर या व्यावसायिकांचे येणे जाणे आहे, आणि त्याची वारंवारता किती आहे. आपण एका सर्वसमावेशक विचाराने आपले हवाई मार्ग या व्यवस्थेला सेवा पुरवण्यासाठी पुनर्रचित करू शकतो का? हे मार्ग आपण सुविधा जनक बनवू शकतो का? या क्षेत्राचा विकास होणे सुनिश्चित आहे आणि त्यामध्ये व्यावसायिकांसाठी सुविधा जितक्या वाढतील त्याच प्रमाणात कामाची गती देखील वाढणार आहे, म्हणून मला असे वाटते की आपण सर्वांनी या दिशेने देखील प्रयत्न केले पाहिजेत. आपण आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना आणि शिकागो अधिवेशनाचे 18वे वर्ष साजरे करत आहोत. त्यामुळे आपल्याला निवासी आणि समावेशी विमान वाहतूक क्षेत्रासाठीच्या आपल्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करायचे आहे. मला तुमच्या सायबर सुरक्षे संबंधीत, डेटा सुरक्षे संबंधीत चिंतेची जाणीव आहे. जर तंत्रज्ञानासोबतच आव्हाने समोर येत असतील तर त्यावरील उपाय देखील तंत्रज्ञानांमधूनच मिळत असतात. आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत केले पाहिजे. आपल्याला मोकळ्या मनाने तंत्रज्ञान सामायिक करण्याची गरज आहे, माहिती सामायिक करण्याची गरज आहे. असे केले तरच आपण या प्रणालींना सुरक्षित ठेवण्यात यशस्वी होऊ. ही दिल्ली परिषद एकता आणि सामायिक हेतूसह वाटचाल करण्याच्या आमच्या संकल्पाला आणखी मजबूत बनवेल. आपल्याला एका अशा भविष्यासाठी काम करायचे आहे जिथे आकाश सर्वांसाठी खुले असेल, जिथे जगातील प्रत्येक व्यक्तीचे उडण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मी सर्व पाहुण्यांचे स्वागत देखील करतो आणि या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेसाठी आपणा सर्वांचे हृदयपूर्वक आभार मानतो. तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद!