पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.
गयाना देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार असलेल्या ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ चा स्वीकार करताना आपण गौरवान्वित झाल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. या सन्मानासाठी त्यांनी गयानाच्या जनतेचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी हा पुरस्कार 1.4 अब्ज भारतीय तसेच भारत-गयानीज समुदायाचे 3 लाख मजबूत समर्थक आणि त्यांनी गयानाच्या विकासाप्रती दिलेले योगदान यांना समर्पित केला.
दोन दशकांपूर्वी,एक उत्सुक पर्यटक म्हणून गयानाला दिलेल्या भेटीमधील सुंदर आठवणींचे स्मरण करत पंतप्रधान मोदी यांनी या अनेक नद्यांच्या भूमीवर भारतीय पंतप्रधान म्हणून आता पुन्हा आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या काळानंतर आतापर्यंत येथे झालेले अनेक बदल लक्षात घेत ते म्हणाले की गयानामधील जनतेचे प्रेम आणि आपुलकी मात्र अजून तशीच राहिली आहे. “तुम्ही भारतातून एखाद्या भारतीयाला वजा करू शकता मात्र तुम्ही भारतीय माणसाच्या मनातून भारत वजा करू शकत नाही,” असे सांगून पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या या भेटीतील अनुभवांनी या तत्वाला दुजोराच दिला आहे.
दिवसाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी गयानामधील भारतीयांच्या आगमनाच्या स्मरणार्थ उभारलेल्या इंडियन अरायव्हल स्मारकाला भेट दिली. सुमारे दोन शतकांपूर्वी, भारत-गयानीज लोकांच्या पूर्वजांनी येथे येताना केलेल्या दीर्घ आणि कठीण प्रवासाला हे स्मारक सजीव करते असे ते म्हणाले. भारताच्या विविध भागांतून लोक येथे आले हे लक्षात घेत मोदी म्हणाले की हे लोक येथे त्यांच्यासोबत आपापली वैविध्यपूर्ण संस्कृती, भाषा आणि परंपरा आणली आणि कालांतराने गयाना देशालाच आपले घर मानले. ते पुढे म्हणाले की या भाषा, कहाण्या आणि परंपरा आज गयानाच्या समृद्ध परंपरेचा भाग झाल्या आहेत. भारत-गयानीज समुदायाने त्यांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही यांसाठी दिलेल्या लढ्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. अत्यंत नम्र पद्धतीने सुरुवात करून वेगाने विकसित होणाऱ्या लोकशाही देशांमध्ये स्थान मिळवण्यासाठी या समुदायाने मोठी मेहनत घेतली आहे याची पंतप्रधानांनी नोंद घेतली. छेदी जगन यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत पंतप्रधान म्हणाले की जगन हे कामगार कुटुंबाच्या विनयशील पार्श्वभूमीपासून कार्याला सुरुवात करून जागतिक पातळीवरील नेत्याच्या रुपात उदयाला आले. पंतप्रधान म्हणाले की राष्ट्रपती इरफान आली, उपराष्ट्रपती भरत जगदेव तसेच माजी राष्ट्रपती डोनाल्ड रामोतर हे सर्वजण भारत-गयानीज समुदायाचे दूत आहेत. प्राचीन काळातील भारत-गयानीज प्रतिभावंत जोसेफ रोमन, प्राचीन काळातील भारत-गयानीज कवी राम जरीदार लल्ला तसेच सुप्रसिध्द कवयित्री शाना यार्डन यांच्यासह इतर अनेक जणांनी कला, शिक्षण, संगीत आणि वैद्यकीय क्षेत्रांमध्ये विलक्षण प्रभावशाली कार्य केले आहे.
आमच्यातील समान गोष्टींनी भारत-गयाना मैत्रीचा पाया भक्कम केला, असे अधोरेखित करत, मोदी म्हणाले की, संस्कृती, पाककृती आणि क्रिकेट या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांनी भारताला गयानाशी जोडले आहे. श्री राम लल्ला यांचे 500 वर्षांनंतर अयोध्येत आगमन झाले असल्याने यंदाची दिवाळी विशेष होती, असेही ते पुढे म्हणाले. अयोध्येत बांधण्यासाठी गयानातील पवित्र जल आणि शिलाही पाठवण्यात आल्याचे भारतीय जनतेला स्मरण आहे, असे त्यांनी सांगितले. आदल्या दिवशी जेव्हा त्यांनी आर्य समाज स्मारक आणि सरस्वती विद्या निकेतन शाळेला भेट दिली तेव्हा त्यांना हे जाणवले, की दोन्ही देशांच्या मधोमध एक विशाल सागर असूनही भारत मातेशी त्यांचे सांस्कृतिक नाते घट्ट आहे आणि, हे नमूद करत पंतप्रधानांनी प्रशंसा केली. भारत आणि गयाना या दोघांनाही आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे आणि ही विविधता केवळ सामावून न घेता साजरी करण्यासारखी गोष्ट आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. सांस्कृतिक विविधता ही ताकद असल्याचे दोन्ही देश हे दाखवत आहेत, असे ते पुढे म्हणाले.
खाद्यसंकृतीविषयी बोलताना, पंतप्रधानांनी नमूद केले की इंडो-गुयाना समुदायाची एक अनोखी खाद्य परंपरा देखील आहे ज्यामध्ये भारतीय आणि गयानीज या दोन्ही देशांतील खाद्यघटकांचा समावेश आहे.
दोन्ही राष्ट्रांना घट्ट बांधून ठेवणाऱ्या क्रिकेटच्या प्रेमाबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, हा केवळ एक खेळ नाही, तर आपल्या राष्ट्रीय अस्मितांमध्ये खोलवर रुजलेली जीवनपद्धती आहे. गयाना मधील प्रोव्हिडन्स नॅशनल क्रिकेट स्टेडियम हे आमच्यातील मैत्रीचे प्रतीक आहे, असे ते पुढे म्हणाले. कन्हाई, कालीचरण, चंद्रपॉल ही सर्व भारतातील प्रसिद्ध नावे आहेत तसेच क्लाइव्ह लॉयड आणि त्यांची टीम ही अनेक पिढ्यांची आवडती टीम आहे, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. गयानाच्या युवा खेळाडूंचा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले, की अनेक भारतीयांनी यावर्षाच्या सुरुवातीला येथे आयोजित केलेल्या टी-20 विश्वचषकासाठी उपस्थित रहात खेळाचा आनंद लुटला.
काही वेळापूर्वी गयाना संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मला मिळाला, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, लोकशाहीच्या जननीकडील देशातून आल्याने, कॅरिबियन प्रदेशातील सर्वात ज्वलंत लोकशाहीशी त्यांना विशेष प्रकारचा आध्यात्मिक संबंध जाणवला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वसाहतवादी राजवटीविरुद्धचा समान संघर्ष, लोकशाही मूल्यांबद्दल प्रेम आणि विविधतेचा आदर, अशा पैलूंनी एकमेकांना बांधून ठेवणारा असा भारत आणि गयाना यांना एक सामायिक इतिहास आहे. विकास आणि विकासाच्या कक्षा, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाप्रती वचनबद्धता आणि न्याय्य आणि सर्वसमावेशक जागतिक व्यवस्थेवर विश्वास यावर भर देत ,”आम्हाला एक सामायिक भविष्य आहे जे आम्हाला घडवायचे आहे”,असे मोदींनी यावेळी अधोरेखित केले
गयानाचे नागरिक भारताचे हितचिंतक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. मोदी पुढे म्हणाले, “गेल्या दशकभरात भारताने मोठा पल्ला गाठला असून भारताची शाश्वत विकासाकडे झपाट्याने वाटचाल होत आहे.” अवघ्या 10 वर्षांत जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारताने दहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवकांनी भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी स्टार्टअप परिसंस्था बनवले आहे, याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.ई- वाणिज्य, कृत्रिम प्रज्ञा, फिनटेक, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी भारत हे एक जागतिक केंद्र असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारताच्या मंगळ आणि चांद्र मोहिमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
महामार्गापासून ते आय-वे, हवाई मार्ग ते रेल्वे अशा अत्याधुनिक पायाभूत सुविधा आपण निर्माण करत असल्याचे ते म्हणाले. भारताचे सेवा क्षेत्र सक्षम असल्याचे त्यांनी विशद केले. भारत उत्पादन क्षेत्रातही मजबूत होत असून भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
“भारताचा विकास केवळ प्रेरणादायीच नाही तर सर्वसमावेशकही आहे”, असे त्यांनी नमूद केले. भारतातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा गरीबांना सक्षम करत आहेत आणि सरकारने लोकांसाठी 500 दशलक्ष बँक खाती उघडली आहेत, ही बँक खाती डिजिटल आयडेंटिटी आणि मोबाईलशी जोडलेली आहेत. यामुळे लोकांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट मदत मिळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी मोफत आरोग्य विमा योजना आहे, या योजनेचा फायदा 500 दशलक्ष लोकांना होत आहे. सरकारने गरजूंसाठी 30 दशलक्षाहून अधिक घरे बांधली आहेत, असे ते म्हणाले.
“फक्त एका दशकात आम्ही 250 दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे”, असे मोदींनी सांगितले. या उपक्रमांचा सर्वाधिक लाभ गरीब महिलांना फायदा झाला आहे आणि तळागाळातील लाखो महिला उद्योजक बनत आहेत, या महिला रोजगार आणि संधी निर्माण करत आहेत, असे ते म्हणाले.
ही लक्षणीय वाढ होत असताना, भारताने शाश्वततेवरही लक्ष केंद्रित केले आहे असे मोदी यांनी सांगितले. अवघ्या एका दशकात भारताची सौरऊर्जा क्षमता 30 पटीने वाढली आहे आणि पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून पर्यावरण रक्षणाकडे भारताने वाटचाल केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, ग्लोबल बायोफ्यूएल्स अलायन्स, आपत्ती प्रतिरोधक स्वरुपाच्या पायाभूत सुविधांसाठी युती यासारख्या अनेक उपक्रमांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावली आहे, या आघाड्यांचा विशेष भर दक्षिणेकडच्या जगाला सक्षम करणे हा आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारताने गेल्या वर्षी प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून गयानाचे राष्ट्रपती इरफान अली यांना निमंत्रित केले होते. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, गयानाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स आणि गयानाचे उपराष्ट्रपती भरत जगदेवही भारतात आले होते. त्यांनी भारताशी एकत्रितपणे अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी काम केले आहे. आज दोन्ही देशांनी ऊर्जा ते व्यवसाय, आयुर्वेद ते शेती, पायाभूत सुविधा ते नव उपक्रम, आरोग्यसेवा ते मानवी संसाधने आणि डेटा विकास अशा अनेक क्षेत्रांत सहकार्याची व्याप्ती वाढवण्यास सहमती दर्शवली आहे आणि ही भागीदारीसंबंध अधिक व्यापक होण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, काल झालेली दुसरी भारत-कॅरिकॉम शिखर परिषद याचाच पुरावा आहे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे सदस्य या नात्याने दोन्ही देशांचा सुधारित बहुपक्षवादावर विश्वास आहे आणि विकसनशील देश म्हणून त्यांना ग्लोबल साऊथची ताकद समजली आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.
सामरिक स्वायत्तता आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी पाठिंबा मागितला आहे, असे मोदी म्हणाले.शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षणाला भारत आणि गयाना या उभय देशांचे प्राधान्य असून जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी त्यांनी व्यापक संवादाचे आवाहन केले आहे, असे ते म्हणाले.
गयानातील भारतीय समूह हा राष्ट्रदूत असून भारतीय संस्कृती आणि मूल्यांचाही हा समूह दूत आहे,असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की गयाना ही त्यांची मातृभूमी आहे तर भारत माता ही पूर्वज भूमी आहे हे इंडो-गयानी समुदायासाठी दुप्पट वरदान आहे.
भारतीय समूहाने 'भारत को जानिये' या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हावे, असे आवाहन मोदी यांनी केले. भारतीय मूल्ये, संस्कृती आणि विविधता समजून घेण्याची एक चांगली संधी या प्रश्नमंजुषेमुळे मिळत असून त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे आणि आपल्या मित्रांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुढील वर्षी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात गयानातील भारतीय समूहाने कुटुंबीय आणि मित्रांसह सहभागी व्हावे असे निमंत्रण त्यांनी दिले. त्यांनी अयोध्येतील राम मंदिरालाही भेट भेट द्यावी असे त्यांनी सुचवले.
भुवनेश्वर येथे जानेवारीत होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवसासाठी गयानातील भारतीय समूहाने सहभागी व्हावे तसेच पुरीमध्ये महाप्रभू जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी यावे असेही मोदी भाषणाचा समारोप करताना म्हणाले.
Click here to read full text speech
You can take an Indian out of India, but you cannot take India out of an Indian: PM @narendramodi in Guyana pic.twitter.com/lJuyfAYH7a
— PMO India (@PMOIndia) November 21, 2024
Three things, in particular, connect India and Guyana deeply.
— PMO India (@PMOIndia) November 21, 2024
Culture, cuisine and cricket: PM @narendramodi pic.twitter.com/TwhPevlimu
India's journey over the past decade has been one of scale, speed and sustainability: PM @narendramodi pic.twitter.com/REbJ1MWnKL
— PMO India (@PMOIndia) November 21, 2024
India’s growth has not only been inspirational but also inclusive: PM @narendramodi pic.twitter.com/w40NO42na0
— PMO India (@PMOIndia) November 21, 2024
I always call our diaspora the Rashtradoots.
— PMO India (@PMOIndia) November 21, 2024
They are Ambassadors of Indian culture and values: PM @narendramodi pic.twitter.com/H8FWACdlwE