"अनेक शतकांच्या संयम, अगणित बलिदान , त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले श्रीराम येथे आले आहेत "
"22 जानेवारी 2024 ही कॅलेंडरवरची केवळ तारीख नाही, तर ती नव्या 'कालचक्र'चा उगम आहे"
“न्यायाची प्रतिष्ठा जपल्याबद्दल मी भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार मानतो. न्यायाचे प्रतिक असलेल्या प्रभू रामाचे मंदिर न्याय्य पद्धतीने बांधण्यात आले .
“माझ्या 11 दिवसांच्या व्रत आणि अनुष्ठान दरम्यान मी त्या स्थानांना नतमस्तक होण्याचा प्रयत्न केला जिथे श्रीरामाची पावले पडली होती. ”
"समुद्रापासून ते शरयू नदीपर्यंत सर्वत्र राम नामाबद्दल एकसारखी चैतन्यदायी भावना आहे"
“रामकथा असीम आहे आणि रामायणही अनंत आहे. रामाचे आदर्श, मूल्य आणि शिकवण सर्वत्र सारखीच आहे.
“हे श्रीरामाच्या रूपात राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे. प्रभू श्रीराम हा भारताचा विश्वास, पाया, कल्पना, कायदा, चेतना, विचार, प्रतिष्ठा आणि वैभव आहे”.
“मला शुद्ध अंतःकरणाने असे वाटते की काळाचे चक्र बदलत आहे. आपल्या पिढीला या महत्वपूर्ण मार्गाचे शिल्पकार म्हणून निवडण्यात आले हा सुखद योगायोग आहे”
"आपल्याला भारताचा पुढील एक हजार वर्षांसाठी पाया रचायचा आहे"
"देव ते देश, राम ते राष्ट्र - देवता ते राष्ट्रापर्यंत आपली जाणीव वाढवायची आहे"
"हे भव्य मंदिर विशाल भारताच्या उदयाचे साक्षीदार बनेल "
"ही भारताची वेळ आहे आणि आपण पुढे मार्गक्रमण करत आहोत"

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) सोहळ्यात सहभागी झाले. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमजीवींशी मोदी यांनी संवाद साधला.

 

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले की, अनेक शतकांनंतर आपल्या रामाचे आगमन झाले आहे. “अनेक शतकांच्या संयम, अगणित बलिदान , त्याग आणि तपश्चर्येनंतर, आपले प्रभू श्रीराम  येथे आले आहेत” असे पंतप्रधान म्हणाले आणि त्यांनी नागरिकांचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले की, ‘गर्भ गृह’ (गाभारा)  मधील दिव्य चैतन्याचा अनुभव शब्दात मांडता येणार नाही आणि त्यांचे शरीर उर्जेने धडधडत आहे आणि मन प्राणप्रतिष्ठेच्या क्षणाप्रति समर्पित आहे. “आपला  राम लल्ला आता यापुढे तंबूत राहणार नाही. हे दैवी मंदिर आता त्यांचे घर असेल” असे ते म्हणाले. आज जे घडले आहे त्याची अनुभूती देशभरातील आणि जगभरातील रामभक्तांना होत असेल असा विश्वास आणि आदर त्यांनी व्यक्त केला. “हा क्षण अलौकिक आणि पवित्र आहे, हे वातावरण,  ही ऊर्जा हे प्रभू रामाच्या आपल्यावरील आशीर्वादाचे प्रतीक आहेत”, असे मोदी म्हणाले. 22 जानेवारीचा सकाळचा सूर्य आपल्यासोबत एक नवीन आभा घेऊन आला आहे असे त्यांनी अधोरेखित केले. "22 जानेवारी 2024 ही  कॅलेंडरवरची केवळ तारीख नाही, तर ती नव्या 'कालचक्र'चा उगम आहे" असे सांगत  पंतप्रधान म्हणाले की, ‘रामजन्मभूमी मंदिराचे भूमीपूजन झाल्यापासून संपूर्ण राष्ट्राचा आनंद आणि उत्साह सतत वाढत होता. आणि विकासकामांच्या प्रगतीने नागरिकांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला होता.  “आज आपल्याला शतकानुशतकांच्या संयमाचा वारसा मिळाला आहे, आज आपल्याला श्री रामाचे मंदिर मिळाले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. गुलामगिरीच्या मानसिकतेच्या बेड्या तोडून भूतकाळातील अनुभवातून प्रेरणा घेणारा देश इतिहास लिहितो  असे त्यांनी अधोरेखित केले. “ आजपासून हजार वर्षांनंतर देखील आजच्या तारखेची चर्चा होईल आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादानेच या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “दिवस, दिशा, आकाश आणि सर्व काही आज दिव्यतेने भारलेले आहे”.  हा काही सामान्य काळ नाही तर एक अमिट स्मृती रेखा आहे जी कालचक्रावर अंकित होत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

श्री रामाच्या प्रत्येक कार्यात श्री हनुमानाची  उपस्थिती नमूद करत पंतप्रधानांनी श्री हनुमान आणि हनुमान गढीला नमन केले. त्यांनी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि माता जानकी यांनाही वंदन केले. कार्यक्रमात दैवी तत्वांची  उपस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. आजचा दिवस पाहण्यास विलंब  झाल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रभू श्रीराम यांची क्षमा मागितली. ते म्हणाले  की आज ती पोकळी भरून निघाली आहे, श्रीराम नक्कीच आपल्याला  क्षमा करतील.

 

‘त्रेतायुग’मध्ये संत तुलसीदासांनी श्रीरामाच्या पुनरागमनाबद्दल लिहिल्याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की  त्यावेळच्या अयोध्येला नक्कीच आनंद वाटला  असेल. “त्याकाळी  श्रीराम वनवासात गेल्यानंतरचा वियोग 14 वर्षांचा होता आणि तरीही इतका असह्य होता. या युगात अयोध्या आणि देशवासीयांना शेकडो वर्षांचा वियोग सहन करावा लागला,” असे ते म्हणाले. संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये श्री राम विराजमान असूनही, स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ कायदेशीर लढाई लढली गेली, असे मोदी पुढे म्हणाले. न्यायाची प्रतिष्ठा अबाधित ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताच्या न्यायव्यवस्थेचे आभार मानले. न्यायाचे मूर्त रूप, श्री रामाचे मंदिर न्याय्य मार्गाने बांधले गेले” यावर त्यांनी भर दिला.

लहान गावांसह संपूर्ण देशात  मिरवणुका काढल्या जात आहेत आणि मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. संध्याकाळी ‘राम ज्योती’ लावण्यासाठी  प्रत्येक घरात तयारी सुरु आहे” असे मोदी म्हणाले. राम सेतूचा प्रारंभ बिंदू असलेल्या अरिचल मुनईला काल दिलेल्या भेटीचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की तो एक क्षण होता ज्याने कालचक्र बदलले. त्या क्षणाशी साधर्म्य साधत पंतप्रधान म्हणाले की, आजचा क्षण देखील कालचक्र बदलून पुढे जाण्याचा क्षण असेल असा विश्वास त्यांना जाणवला. आपल्या 11 दिवसांच्या अनुष्ठानादरम्यान  प्रभू राम ज्या  ज्या ठिकाणी गेले,  त्या सर्व ठिकाणी आपण नतमस्तक होण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.  नाशिकमधील पंचवटी धाम, केरळमधील त्रिप्रयार मंदिर, आंध्र प्रदेशातील लेपाक्षी, श्रीरंगममधील श्री रंगनाथस्वामी मंदिर, रामेश्वरममधील श्री रामनाथस्वामी मंदिर आणि धनुषकोडी यांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी समुद्र ते शरयू नदीपर्यंतच्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “समुद्रापासून ते शरयू नदीपर्यंत सर्वत्र राम नामाबद्दल उत्साहाची  एकच भावना आढळते " असे  ते पुढे म्हणाले, “भगवान राम भारताच्या आत्म्याच्या प्रत्येक कणाशी जोडलेले आहेत. राम भारतीयांच्या हृदयात वास करतो. ते पुढे म्हणाले की,  भारतात कोठेही कुणाच्याही अंतर्मनात एकतेची भावना आढळू शकते आणि सामूहिकतेसाठी याहून अधिक परिपूर्ण सूत्र असू शकत नाही.

अनेक भाषांमध्ये श्रीराम कथा ऐकायला मिळाल्याचा अनुभव सांगून पंतप्रधान म्हणाले की, स्मृतींमध्ये , पारंपरिक  उत्सवांमध्ये सर्वत्र राम असतो. “प्रत्येक युगात लोक राम जगले आहेत. त्यांनी त्यांच्या शैलीतून आणि शब्दातून  राम व्यक्त केला आहे. हा ‘रामरस’ जीवनाच्या प्रवाहासारखा अखंड वाहत असतो. रामकथा असीम आहे आणि रामायणही अनंत आहे. रामाचे  आदर्श, मूल्ये आणि शिकवण सर्वत्र सारखीच आहे.”

 

आजचा दिवस शक्य  करणाऱ्या लोकांच्या त्यागाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी संत, कारसेवक आणि रामभक्तांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले, “आजचा सोहळा  हा केवळ उत्सवाचा क्षण नव्हे, तर भारतीय समाजाच्या परिपक्वतेच्या जाणिवेचाही क्षण आहे. आमच्यासाठी हा प्रसंग केवळ विजयाचाच नाही तर विनम्र होण्याचाही आहे.” इतिहासाच्या गाठी उलगडताना पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की, एखाद्या राष्ट्राचा  इतिहासाशी केलेल्या संघर्षाचे फलित क्वचितच आनंददायी असते. “तरीही, आपल्या देशाने इतिहासाची ही गाठ ज्या गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने सोडवली आहे त्यावरून आपले भविष्य हे आपल्या भूतकाळापेक्षा खूपच सुंदर असेल हे जाणवते” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आशंका व्यक्त करणाऱ्यांना आपल्या सामाजिक नीतिमत्तेची जाणीव नव्हती असे  पंतप्रधान म्हणाले. “रामललाच्या या मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. हे बांधकाम आग  नव्हे तर उर्जा  जागृत करत असल्याचे आपण अनुभवत आहोत. उज्वल भविष्याच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी राम मंदिराने समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.” ते पुढे म्हणाले, "राम हा तापस नाही, तो ऊर्जा आहे, तो विवाद  नाही तर उपाय आहे, राम फक्त आपला नाही तर सर्वांचा आहे, राम फक्त वास्तव नाही तर तो अनंत आहे"

प्राणप्रतिष्ठेने संपूर्ण जग जोडले गेले आहे आणि राम हा सर्वव्यापी असल्याच्या अनुभूतीवर पंतप्रधानांनी भर दिला. अशाच प्रकारचे उत्सव अनेक देशांमध्ये पाहायला मिळतात आणि अयोध्येचा उत्सव हा रामायणातील जागतिक परंपरांचा उत्सव बनला आहे हे सांगताना त्यांनी “राम लल्लाची प्रतिष्ठा ही ‘वसुधैव कुटुंबकम’ ची संकल्पना असल्याचेही सांगितले.” 

हा केवळ श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नसून श्रीरामाच्या रूपाने प्रकट झालेल्या भारतीय संस्कृतीवरील अतूट श्रद्धेचीही ही प्राणप्रतिष्ठा आहे, असे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले. संपूर्ण जगाची काळाची गरज असलेल्या मानवी मूल्यांचे आणि सर्वोच्च आदर्शांचे ते मूर्त स्वरूप आहे असे त्यांनी उद्धृत केले. सर्वांच्या कल्याणाच्या संकल्पांनी आज राम मंदिराचे रूप धारण केले असून ते केवळ मंदिर नसून भारताची दृष्टी, तत्त्वज्ञान आणि दिशा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “हे रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे. प्रभू राम हा भारताचा विश्वास, पाया, संकल्पना, कायदा, चेतना, विचार, प्रतिष्ठा आणि वैभव आहे. राम हा प्रवाह आहे, राम प्रभाव आहे. राम म्हणजे नीती. राम अनादी आहे. राम म्हणजे सातत्य. राम विभूती आहे. राम सर्वव्यापी आहे, जग आहे, वैश्विक भावना आहे” असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, प्रभू रामप्रतिष्ठेचा प्रभाव हजारो वर्षे जाणवू शकतो. महर्षी वाल्मिकींचा हवाला देत पंतप्रधान म्हणाले की, रामाने दहा हजार वर्षे राज्य केले जे हजारो वर्षांपासून रामराज्य असल्याचे प्रतीक आहे. त्रेतायुगात रामाचा अवतार झाल्यावर हजारो वर्ष रामराज्य होते. राम हजारो वर्षांपासून जगाला मार्गदर्शन करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

 

पंतप्रधानांनी प्रत्येक रामभक्ताला भव्य राम मंदिर साकारल्यानंतर पुढील वाटचालीचे आत्मपरीक्षण करण्यास सांगितले. “आज मला मनःपूर्वक असे वाटते की कालचक्र बदलत आहे. आमच्या पिढीला या महत्वपूर्ण मार्गाचे शिल्पकार म्हणून निवडण्यात आले हा आनंदाचा योगायोग आहे.” पंतप्रधानांनी  सध्याच्या युगाचे महत्त्व अधोरेखित केले आणि ‘यही समय है सही समय है’ अर्थात हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे याचा पुनरुच्चार केला. “आपल्याला पुढील एक हजार वर्षांसाठी भारताचा पाया रचायचा आहे. मंदिरातून बाहेर पडताना, आता आपण सर्व देशवासियांनी या क्षणापासून एक मजबूत, सक्षम, भव्य आणि दिव्य भारत घडवण्याची शपथ घेऊया”, असे पंतप्रधानांनी देशवासीयांना आवाहन केले. त्यासाठी रामाचा आदर्श राष्ट्राच्या अंतरात्म्यामध्ये असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

 

पंतप्रधानांनी देशवासियांना देव ते देश, राम ते राष्ट्र - देवतेपासून राष्ट्रापर्यंत आपल्या जाणिवेची व्याप्ती वाढवण्यास सांगितले. त्यांनी त्यांना श्री हनुमानाची सेवा, भक्ती आणि समर्पणातून बोध घेण्याचे आवाहन केले. “प्रत्येक भारतीयातील भक्ती, सेवा आणि समर्पणाची भावना सक्षम, भव्य आणि दिव्य भारताचा पाया बनेल”, असे ते म्हणाले. प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात ‘राम येईल’ हा माता शबरीच्या विश्वासामागील भाव हा भव्य सक्षम आणि दिव्य भारताचा आधार असेल असेही पंतप्रधानांनी सांगितले. निषादराजांबद्दल रामाला असलेल्या जिव्हाळ्याचा आणि मौलिकतेचा संदर्भ देत यातून हेच प्रतीत होते कि सर्व एक आहेत आणि ही एकता आणि एकसंधतेची भावना सक्षम, भव्य आणि दिव्य भारताचा आधार असेल असे ते म्हणाले.

आज देशात निराशेला थारा नाही, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. खारीच्या कथेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, स्वतःला लहान आणि सामान्य समजणाऱ्यांनी खारीचा वाटा लक्षात ठेवावा आणि नकारात्मक मानसिकतेतून मुक्त व्हावे. लहान असो वा मोठ्या प्रत्येक प्रयत्नाची ताकद आणि योगदान असते, असे त्यांनी नमूद केले. “सबका प्रयास ची भावना मजबूत, सक्षम, भव्य आणि दिव्य भारताचा पाया बनेल. आणि हा देवापासून देशाच्या चेतनेचा आणि रामापासून राष्ट्राच्या चेतनेचा विस्तार आहे,” असे पंतप्रधानांनी विशद केले.

अत्यंत ज्ञानी आणि अफाट सामर्थ्य असलेल्या लंकेचा राजा रावणाविरुद्ध लढताना निश्चित पराभवाची जाणीव असलेल्या जटायूच्या सचोटीवर प्रकाश टाकून पंतप्रधान म्हणाले की, अशी कर्तव्यतत्परता हाच सक्षम आणि दिव्य भारताचा पाया आहे. जीवनातील प्रत्येक क्षण राष्ट्र उभारणीसाठी समर्पित करण्याचे वचन देताना मोदी म्हणाले, “रामाच्या कार्याशी, राष्ट्राच्या कार्याशी, काळाच्या प्रत्येक क्षणाशी, शरीराचा रोम अन रोम रामाच्या समर्पणाला राष्ट्राकरिता समर्पणाच्या ध्येयाशी जोडेल.

 

स्वत: पलीकडे विचार करण्याची त्यांची संकल्पना मांडत, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भगवान रामाची आपली उपासना ही ‘स्वतःसाठी’ पासून ‘आपल्यासाठी’ म्हणजे चराचर सृष्टीकरिता असली पाहिजे. आपले प्रयत्न विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

सध्या सुरू असलेल्या अमृतकाळ आणि तरुण लोकसंख्याशास्त्राचा संदर्भ देत पंतप्रधानांनी देशाच्या वाढीसाठी या घटकांच्या परिपूर्ण संयोजनाची आवश्यकता नमूद केली. पंतप्रधानांनी तरुण पिढीला त्यांच्या मजबूत वारशाचा आधार घेऊन आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सांगितले. “परंपरेची शुद्धता आणि आधुनिकतेची अनंतता या दोन्ही मार्गांचा अवलंब करून भारत समृद्धीच्या ध्येयापर्यंत पोहोचेल”, अशी खात्री पंतप्रधानांनी दिली. 

 

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, भविष्य हे यश आणि कर्तृत्वासाठी समर्पित आहे आणि हे भव्य राम मंदिर भारताच्या प्रगती आणि उदयाचे साक्षीदार असेल. “हे भव्य राम मंदिर विकसित भारताच्या उदयाचे साक्षीदार ठरेल”, असेही पंतप्रधान म्हणाले. जर ध्येय न्याय्य असेल आणि ते सामूहिक आणि संघटित ताकदीमधून जन्माला आले असेल तर ते नक्कीच साध्य केले जाऊ शकते हा बोध हे मंदिर देते. “आताचा काळ हा  भारताचा आहे आणि भारत प्रगती साधत पुढे जाणार आहे. शतकानुशतके वाट पाहिल्यानंतर आपण इथे पोहोचलो आहोत. आपण सर्वांनी या युगाची, या कालावधीची वाट पाहिली आहे. आता आपण थांबणार नाही. आपण अशीच विकासाची नवनवीन शिखरे गाठत राहू”, राम लल्लाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि सर्वांना शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

यावेळी उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे (ट्रस्टचे) अध्यक्ष नृत्य गोपाल दास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

पार्श्वभूमी

या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्राचे प्रतिनिधी आणि विविध आदिवासी समुदायांच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा सहभाग होता.

भव्य श्री रामजन्मभूमी मंदिर पारंपारिक नागर शैलीत बांधले गेले आहे. या मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) 380 फूट आहे; रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे; या मंदिराला एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. या मंदिराच्या खांबांवर आणि भिंतीवर हिंदू देवता, देव आणि देवी यांचे कोरीव शिल्प चित्र दिसतात. या मंदिराच्या तळमजल्यावर मुख्य गर्भगृहात भगवान श्री राम (श्री रामलल्लाची मूर्ती) यांचे बालपणीचे रूप दाखवणारी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

 

या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे, सिंहद्वार मार्गे 32  पायऱ्या चढून या मंदिराकडे जाता येते. मंदिरात एकूण पाच मंडप (हॉल) आहेत - नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप. मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर (सीताकूप) आहे, जी प्राचीन काळातील आहे. मंदिर परिसराच्या नैऋत्य भागात, कुबेर टीला येथे, भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून येथे जटायूच्या मूर्तीची देखील स्थापना करण्यात आली आहे.

 

या मंदिराचा पाया 14-मीटर-जाडीचा रोलर-कॉम्पॅक्टेड कॉंक्रिट (आरसीसी) च्या थराने बांधण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मंदिरात कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही. जमिनीतील ओलाव्यापासून संरक्षणासाठी ग्रॅनाइटचा वापर करून 21  फूट उंचीचा चौथरा बांधण्यात आला आहे. मंदिर संकुलात सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र, अग्निसुरक्षेसाठी पाणीपुरवठा आणि स्वतंत्र वीज केंद्र आहे. देशातील पारंपारिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
5 Days, 31 World Leaders & 31 Bilaterals: Decoding PM Modi's Diplomatic Blitzkrieg

Media Coverage

5 Days, 31 World Leaders & 31 Bilaterals: Decoding PM Modi's Diplomatic Blitzkrieg
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister urges the Indian Diaspora to participate in Bharat Ko Janiye Quiz
November 23, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today urged the Indian Diaspora and friends from other countries to participate in Bharat Ko Janiye (Know India) Quiz. He remarked that the quiz deepens the connect between India and its diaspora worldwide and was also a wonderful way to rediscover our rich heritage and vibrant culture.

He posted a message on X:

“Strengthening the bond with our diaspora!

Urge Indian community abroad and friends from other countries  to take part in the #BharatKoJaniye Quiz!

bkjquiz.com

This quiz deepens the connect between India and its diaspora worldwide. It’s also a wonderful way to rediscover our rich heritage and vibrant culture.

The winners will get an opportunity to experience the wonders of #IncredibleIndia.”