“एनसीसी एक भारत श्रेष्ठ भारत कल्पना अधोरेखित करते”
“कर्तव्य पथावरील 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन नारी शक्तीला समर्पित होते”
"भारताची 'नारी शक्ती' प्रत्येक क्षेत्रात सिद्ध करत असलेले कर्तृत्व जग पाहत आहे"
“आम्ही मुलींसाठी अशा क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या आहेत जिथे पूर्वी त्यांना प्रवेश नव्हता किंवा मर्यादित होता"
“आज स्टार्टअप असो की बचत गट, प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत”
“जेव्हा देश मुला मुलींमधील गुणवत्तेला समान संधी देतो, तेव्हा तेथील प्रतिभावंतांची संख्या अनेक पटींनी वाढते”
गेल्या 10 वर्षांत, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था युवकांसाठी सामर्थ्याचा एक नवीन स्रोत बनली आहे"
"विकसित भारत आपल्या युवकांची स्वप्ने पूर्ण करेल"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंडवर वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित केले. याप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित होते आणि सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कार देखील त्यांनी प्रदान केले. त्यांनी एनसीसी मुलींच्या मेगा सायक्लोथॉन आणि झाशी ते दिल्ली दरम्यान नारी शक्ती वंदन रन’चे स्वागत केले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ते स्वत: एनसीसीचे माजी छात्रसैनिक असल्यामुळे एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित असताना त्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. “एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित राहताना एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रचिती येते”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की देशाच्या विविध भागांतील छात्रसैनिक इथे  उपस्थित असल्याचे त्यांना आढळले आहे.  एनसीसीची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आजचा हा प्रसंग एक नवीन सुरुवात असल्याचे नमूद केले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत सरकार विकसित करत असलेल्या सीमावर्ती भागातील गावांचे 400 हून अधिक सरपंच आणि देशभरातील बचत गटांमधील 100 हून अधिक महिला इथे उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले .

या रॅलीमुळे ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेला बळ मिळत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 2014 मध्ये या रॅलीमध्ये 10 देशांचे कॅडेट होते, आज ही संख्या 24 वर गेली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ऐतिहासिक 75 वा प्रजासत्ताक दिन नारी शक्तीला समर्पित असल्याचे नमूद करून पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताच्या मुलींनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात केलेली प्रगती यानिमित्ताने  देशाने प्रदर्शित केली.  पुरस्कार प्राप्त कॅडेट्सचे यावेळी त्यांनी कौतुक केले. वडोदरा आणि  काशी येथील सायकल गटांचा त्यांनी उल्लेख केला आणि या दोन्ही ठिकाणचे आपण खासदा असल्याचे नमूद केले.

 

 

ज्या काळात समाजातील महिलांचा सहभाग सांस्कृतिक कार्यक्रम आणि आयोजनापुरता मर्यादित होता, त्या काळाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की आज भारताच्या मुली प्रत्येक क्षेत्रात, मग ते जमीन, समुद्र, आकाश किंवा अंतराळ क्षेत्र असो, आपले कर्तृत्व सिद्ध करत असल्याचे जग पाहत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या  संचलनात सहभागी झालेल्या महिलांच्या कर्तृत्वाबाबत त्यांनी  सांगितले की हे एका रात्रीत मिळालेले यश नसून गेल्या 10 वर्षांच्या समर्पित प्रयत्नांचे फलित आहे.

“भारतीय परंपरेत नारी ही नेहमीच शक्ती मानली गेली आहे ” असे  सांगत पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटिशांना चारी मुंड्या चित करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा आणि राणी वेलूनचियार यांसारख्या शूर वीरांगनांचा उल्लेख केला. गेल्या 10 वर्षात सरकारने देशात नारी    शक्तीची ही ऊर्जा सातत्याने अधिक बळकट केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

एकेकाळी प्रतिबंधित किंवा मर्यादित प्रवेश असलेल्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रवेशातील सर्व   अडथळे दूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आणि तीनही संरक्षण दलांमधील आघाडीची  पदे त्यांच्यासाठी खुली केली आहेत, संरक्षण क्षेत्रात महिलांसाठी कायमस्वरूपी नियुक्ती आणि कमांड रोल आणि कॉम्बॅट पोझिशन्सची उदाहरणे दिली. “अग्नीवीर असो की लढाऊ पायलट, महिलांचा सहभाग वाढत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. सैनिक शाळांमध्ये मुलींसाठी प्रवेश खुले केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.  गेल्या 10 वर्षांत  केंद्रीय सशस्त्र दलातील महिलांची संख्या दुपटीने वाढली आहे, तर राज्यांना राज्य पोलीस दलात अधिकाधिक महिलांची भरती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती   त्यांनी दिली.

 

समाजाच्या मानसिकतेवर या पावलांच्या प्रभावाचा संदर्भ देत, इतर क्षेत्रातही महिलांचा सहभाग वाढत आहे, हे पंतप्रधानांनी नमूद केले. ग्रामीण भागात बँकिंग आणि विमा सुनिश्चित करण्यासाठी महिलांची संख्या मोठी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “स्टार्टअप्स किंवा बचतगटांसारख्या क्षेत्रांमध्ये महिलांचा वाढलेला प्रभाव दिसून येत आहे, असे ते म्हणाले. 

महिलांच्या सहभागामुळे प्रतिभा वाढत असून विकसित भारताच्या निर्मितीचे हे सुचिन्ह आहे, असे ते म्हणाले. "संपूर्ण जग भारताकडे "विश्व मित्र" म्हणून पाहत आहे, असे सांगत मोदी यांनी भारताच्या पारपत्राच्या वाढत्या सामर्थ्याकडे लक्ष वेधले. “अनेक देश भारतातील युवा वर्गामध्ये प्रतिभा आणि कौशल्यामध्ये संधी पाहत आहेत”, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनाची रूपरेषा मांडली आणि पुढील 25 वर्षांमध्ये देशाचे भविष्य घडवण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. आगामी 25 वर्षांचा हा अमृतकाळ केवळ विकसित भारताच्या निर्मितीचा साक्षीदार होणार नाही. याचा लाभ मोदींना नाही तर प्रामुख्याने तरुणांना होईल, असे त्यांनी मनापासून सांगितले. "भारताच्या विकासाच्या प्रवासाचे प्रमुख लाभार्थी म्हणून तरुणांना अधोरेखित करत "या काळातील सर्वात मोठे लाभार्थी तुमच्यासारखे तरुण आहेत", असे मोदी यांनी सांगितले. "उत्कर्षासाठी तुम्ही सर्वांनी सातत्याने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे," असे सांगत त्यांनी निरंतर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

 

"गेल्या 10 वर्षांत, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रयत्न केले गेले आहेत", असे मोदी यांनी गेल्या दशकभरात विविध क्षेत्रात केलेली प्रगती मांडताना सांगितले. भारताची प्रगती अधिकाधिक परिणामकारक करण्यासाठी त्यांनी तरुणांची प्रतिभा आणि कौशल्यांचा उपयोग करण्यावर भर दिला.

पंतप्रधान मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि देशभरातील हजारो शाळांचे आधुनिकीकरणाचे उद्दिष्ट असलेल्या पीएम श्री अंतर्गत स्मार्ट शाळा मोहिमेसारख्या उपक्रमांद्वारे तरुणांना सक्षम करण्यासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. गेल्या दशकात व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये, विद्यापीठे आणि संस्थांमध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीचाही त्यांनी उल्लेख केला.

"गेल्या 10 वर्षांत, भारतीय विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे मोदी यांनी भारताच्या शैक्षणिक परिदृश्यातील प्रगती अधोरेखित करताना सांगितले. अनेक राज्यांमध्ये नवीन आयआयटी आणि एम्सच्या स्थापनेसह वैद्यकीय महाविद्यालये आणि जागांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला.

संशोधनाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी नवीन कायदे आणताना, तरुण प्रतिभांसाठी संरक्षण, अंतराळ आणि मॅपिंग यांसारखी क्षेत्रे खुली करण्याच्या सरकारच्या समर्पणाबद्दल पंतप्रधानांनी सांगितले. "हे सर्व उपक्रम तुमच्या फायद्यासाठी, भारतातील तरुणांसाठी हाती घेण्यात आले आहेत" याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आर्थिक सक्षमीकरणाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी "मेक इन इंडिया" आणि "आत्मनिर्भर भारत" मोहिमेचा संदर्भ दिला आणि भारतातील तरुणांच्या आकांक्षेशी या मोहिमा निगडीत आहेत यावर भर दिला. "या मोहिमा तुमच्यासारख्या तरुणांसाठीही आहेत, ज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत", असे त्यांनी सांगितले.

 

भारताच्या डिजिटल क्रांतीचा दाखला म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल अर्थव्यवस्थेची झपाट्याने होणारी वाढ आणि त्याचा तरुणांवर होणारा प्रभावी परिणाम यावर प्रकाश टाकला. "गेल्या 10 वर्षांत, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था आपल्या तरुणांसाठी एक नवीन शक्ती बनली आहे," असे त्यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप प्रणाली म्हणून भारताचा उदय झाल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी तरुणांमधील नवउद्योजकतेच्या भावनेची प्रशंसा केली. "आज भारतात 1.25 लाख स्टार्टअप आणि शंभरहून अधिक युनिकॉर्न नोंदणीकृत आहेत," असे त्यांनी सांगितले. भारतातील मोबाईल निर्मिती आणि परवडणाऱ्या दरात डेटा उपलब्धता तसेच प्रत्येक गावापर्यंत ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटीमध्ये झालेली वाढ याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

ई-कॉमर्स, ई-शॉपिंग, होम डिलिव्हरी, ऑनलाइन शिक्षण आणि दुर्गम क्षेत्रात आरोग्य सेवा विस्ताराचा संदर्भ दे,त डिजिटल आशय निर्मितीचा प्रसार आणि ग्रामीण भागात पाच लाखाहून अधिक सार्वजनिक सेवा केंद्रांची स्थापना तसेच असंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाद्वारे सादर केलेल्या संधींचा फायदा घेण्याचे तरुणांना आवाहन केले. 

 

 

पंतप्रधानांनी भविष्याकडे पाहणारे धोरण आणि स्पष्ट प्राधान्यक्रम अधोरेखित केले. सीमा भागातील गावाला शेवटचे गाव म्हणण्याची मानसिकता बदलल्याचे त्यांनी सांगितले. आता ही गावे ‘देशातील पहिली गावे’,  ‘व्हायब्रंट गावे’ आहेत.  येत्या काळात ही गावे पर्यटनाची मोठी केंद्रे बनतील, असे ते म्हणाले.

तरुणांना थेट संबोधित करताना पंतप्रधानांनी भारताचे भविष्य घडवण्याच्या त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आणि राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी "माय भारत ऑर्गनायझेशन" मध्ये नोंदणी करून समृद्ध भारताच्या विकासासाठी आपल्या कल्पनांचे योगदान देण्याचे आवाहन तरुणांना केले.

भाषणाच्या समारोपात पंतप्रधानांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही विकसीत भारताचे शिल्पकार आहात’, असे जाहीर करून त्यांनी तरुणाईवरील आपल्या विश्वासाची ग्वाही दिली.

 

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे या वेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

या कार्यक्रमात ‘अमृत काळातील राष्ट्रीय छात्र सेना’ या संकल्पनेवर आधारित अमृत पीढीचे योगदान आणि सक्षमीकरण दर्शविणाऱ्या सांस्कृतिक सादरीकरणाचा समावेश होता. ‘वसुधैव कुटुंबकम’ या सच्च्या भारतीय भावनेनुसार, 2200 हून अधिक राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स आणि 24 देशातील तरुण कॅडेट्स या वर्षीच्या रॅलीत सहभागी झाले.

व्हायब्रंट व्हिलेजचे 400 हून अधिक सरपंच आणि देशाच्या विविध भागांतील अनेक बचत गटांतील 100 हून अधिक महिलांनी राष्ट्रीय छात्र सेना - पंतप्रधान रॅलीला विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली.

 

 

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'You Are A Champion Among Leaders': Guyana's President Praises PM Modi

Media Coverage

'You Are A Champion Among Leaders': Guyana's President Praises PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi congratulates hockey team for winning Women's Asian Champions Trophy
November 21, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the Indian Hockey team on winning the Women's Asian Champions Trophy.

Shri Modi said that their win will motivate upcoming athletes.

The Prime Minister posted on X:

"A phenomenal accomplishment!

Congratulations to our hockey team on winning the Women's Asian Champions Trophy. They played exceptionally well through the tournament. Their success will motivate many upcoming athletes."